आधीचे भाग
टोरांटो ट्रिपचा शेवटचा दिवस मला अजूनही आठवतो.हॉप ऑन बसने दिवसभर शहरात फिरून आम्ही संध्याकाळी सी एन टॉवर बघितला आणि मग कॅब करून हॉटेलवर परत आलो.येताना रात्रीचे जेवण म्हणून एका ठिकाणी थांबून पिझ्झा खाल्ला. खरेतर माझा अंदाज चुकल्याने मी दोन मोठे पिझ्झा मागवले होते. पण कॅनडात प्रत्येक गोष्ट जरुरीपेक्षा मोठीच असते की काय कोण जाणे. म्हणजे भारतातील मोठा पिझ्झा हा तेथील मिडीयम पिझ्झा असेल, तीच गोष्ट कोक ,पेप्सी किंवा तत्सम शीतपेयांच्या बाबत.एक ग्लास घेतला की दोन जण आरामात पिऊ शकतील. एकुणात ते दोन पिझ्झा संपवता संपवता आमच्या नाकी नऊ आले. आणि त्यात दिवसभर उन्हात फिरल्याने पित्त भयंकर वाढले असावे. हॉटेलवर परत आल्यावर डोके गरगरू लागले , म्हणजे इतके की पूर्ण खोली गरगर फिरते आहे कि काय असा भास होऊ लागला.आणि शेवटी खणखणीत उलटी होऊन मग कुठे जरा बरे वाटले. पण हा एव्हढा एका प्रसंग सोडल्यास बाकी सर्व ट्रिप झकासच झाली.
ही सुंदर ट्रिप संपवून आम्ही रेजिनाला परतलो आणि एक नवीन अध्याय सुरु झाला.जुलै महिना संपत आला होता आणि ऑगस्टमध्ये माझी फॅमिली भारतात परत जाणार होती.कारण मुलांचे भारतातील शाळेचे पुढचे वर्ष सुरु झाले होते. मात्र आम्ही दिलेल्या अर्जामुळे शाळेने आम्हाला दोन महिन्यांची मुदतवाढ देऊन ऑगस्टमध्ये येण्याची मुभा दिली होती. आता मी एकटाच असणार तेव्हा २ बी एच के चा फ्लॅट घेऊन काय करायचे? त्यापेक्षा हा फ्लॅट सोडून देऊ आणि एखाद्या लहान इमारतीत स्वतंत्र राहू असा माझा विचार चालू होता. पण या ५-६ महिन्यात घरात बरेच सामान सुमान जमत गेले होते. ते प्रथम कमी करायला हवे होते. परदेशात सामान घेणे आणि विकणे दोन्ही तसे सोपे असते. बऱ्याच वेबसाईटवर असे व्यवहार करता येतात आणि वाजवी किंमत असेल तर फारशी घासाघीस ना करता ते पार पडतात.अर्थात आता भारतातही ओ एल एक्स वगैरे साईटवरून ते सोपे झाले आहे, पण १० वर्षांपुरवी तसे नव्हते. तर आता आमचे सगळे विकांत सामानाचे फोटो काढणे ,योग्य किमतीला वेगवेगळ्या साईट्सवर ते टाकणे , आणि येणाऱ्या फोन चौकशांना उत्तरे देणे किंवा जमेल तसे सामान विकणे यातच जाऊ लागले. खास स्वयंपाक घरातील जास्तीचे सामान जसे की भांडी कुंडी ,मसाले हे बाकीच्या भारतीय महिला वर्गात वाटून टाकले. जे सामान अगदीच विकले जाणार नाही ते सालवेशन आर्मि किंवा व्हॅल्यू व्हिलेज ला देऊन टाकायचे किंवा शेवटचा उपाय म्हणजे घरामागच्या गल्लीत कचरा कुंडीजवळ ठेवून द्यायचे.
या सगळ्या धबडग्यात ऑगस्ट उजाडला आणि त्याच सुमारास भारतातून आमच्या कंपनीने एका नवीन माणसाला रेजिनाला धाडले. हा माणूस म्हणजे अंगद , क्लायंटची इमेल सिस्टीम लोटस नोट्स वरून आऊटलूक वर मायग्रेट करणार होता. त्यामुळे त्याचे इथले काम कमीत कमी वर्षभर चालणार होते. अंगद २-४ दिवसांपुरवीच इथे आला होता आणि राहण्यासाठी जागेच्या शोधात होताच. माझी फॅमिली भारतात परतणार आहे हे माहिती असल्याने ऑफिसमधील कुणीतरी आमची गाठ घालून दिली.थोडा वेळ बोलणे झाल्यावर माणूस बरा वाटला. भाडे,लाईट बिल वगैरे वाटून घेण्याची त्याची तयारी होती. त्यामुळे आहे तो फ्लॅट तसाच ठेवून मी आणि अंगद तेथे राहू शकत होतो. त्याला अनायास जागा मिळणार होती आणि मला पुन्हा नवीन जागेत सुरुवात करावी लागणार नव्हती असा राजीखुशीचा मामला असल्याने मी त्याला पुढच्या आठवड्यात राहायला येऊ शकतोस असे कळवले.
एकीकडे राहिलेली आवराआवरी चालू होती तर दुसरीकडे आता मला इथे एकटेच राहावे लागणार याची हुरहूर होती. तसा थोडाफार स्वयंपाक करता येत होता त्यामुळे जेवायचे वांधे होणार नव्हते. पण तरीहि ठराविक दोन चार पदार्थ सोडून अजून काय काय बनवता येईल याच्यावर बायकोने रोज माझी शाळा घ्यायला चालू केली. रोज एखादा पदार्थ बनवायचा किंवा किमान ती बनवत असताना बाजूला उभे राहून शिकायचे. शिवाय कधी कच्ची तयारी करून देणे, पाककृती लिहून घेणे वगैरेही चालायचे. आमटीवर गरम फोडणी घालणे आणि फोडणीवर शिजलेली डाळ ओतणे , तेलाची फोडणी आणि तुपाची फोडणी वेगळी कशी असे बारकावे ती मला शिकवू लागली.पण भात,वरण, खिचडी,ऑम्लेट आणि फारतर उसळ किंवा भाजी यापुढे मात्र माझी मजल जाऊ शकली नाही. पोळ्या/कणिक वगैरे तर दूरच. शेवटचा उपाय म्हणजे एका फुलस्केप कागदावर आमटी,टोमॅटोचे सार अशा ६-७ प्रकारच्या पाककृती लिहून मी फ्रिजवर चिकटवून ठेवल्या. आणि दर आठवड्याला यातील २-३ करून बघेन असे तिला वचन दिले.अर्थात आता तुनळीवर किंवा इतर वेबसाईटवर हे सर्व ज्ञान २४ तास उपलब्ध असते आणि प्रत्येकाच्या हाती मोबाईल असतो त्यामुळे ही सर्व अतिशयोक्ती वाटेल पण तेव्हा मात्र मला हे प्रकरण बरेच गंभीर वाटले होते. किंबहुना परदेशात प्रथमच बरेच दिवसांसाठी जाणाऱ्या प्रत्येक कुटुंबाची एखादी बॅग पोळपाट लाटणे, कुकर,चमचे,डाव,झारे,कालथे,तवे आणि मुख्य म्हणजे मसाले यांनी भरलेली का असते याचा मला साक्षात्कार झाला.
शेवटी हो ना करत करत जाण्याचा दिवस उजाडला.रेजिना टोरांटो -टोरांटो म्युनिच-म्युनिच मुंबई असा मोठा पल्ला होता आणि दोन लहान मुलांना घेऊन बायको एकटीच प्रवास करणार होती त्यामुळे जरा टेन्शन होते.अर्थात बाकी कुठल्याही प्रवासापेक्षा विमान प्रवास अधिक सुरक्षित असतो असा आतापर्यंतचा अनुभव असल्याने एकमेकांना धीर देत देत आम्ही कॅब करून रेजिना विमानतळावर पोचलो. चेक इन करून सामान देऊन टाकले आणि पर्स ,तिकिटे वगैरे जुजबी सामान बरोबर ठेवले. खरेतर मागचा आठवडाभर माझे ऑफिसचे काम,तिचे घर आवरणे आणि सहकाऱ्यांकडे जेवायला जायची निमंत्रणे,वस्तू वाटून टाकायची धांदल यामुळे आम्हाला एकमेकांशीच बोलायला वेळ झाला नव्हता.विमानाला थोडा वेळ होता. मग टीम हॉर्टन्स मधून एक एक कॉफी घेऊन एक ऊन असलेला कोपरा बघून निवांत बोलत बसलो.बाजूला मुले मजेत खेळत होती. आईबापांचे चेहरे का उतरले आहेत हे कळायचे त्याचे वय नव्हते. त्यातल्या त्यात मोठयाला माहित होते की आता बाबा एकटाच इथे राहणार आहे आणि आपली शाळा चालू झाल्याने आपल्याला परत जायचे आहे. आणि तो बरोबर असल्याने लहाना सुद्धा मजेत होता. त्यांचे दोघांचे एक वेगळेच छान जग होते आणि आमचे दोघांचे दुसरेच असे काहीतरी विचित्र विचार माझ्या डोक्यात येऊ लागले. पण सुंदर क्षण पटकन निघून जातात तसाच हाही वेळ संपला आणि टोरांटोच्या विमानाची घोषणा झाली. हातातील पर्स आणि दोघा मुलांना सावरत बायको निघाली.सुरक्षा रक्षकांच्या पलीकडे जाऊन तिने माझ्याकडे वळून बघितले आणि हात हलवून निरोप घेतला.डोळ्यावरच्या अश्रूंच्या पडद्यामुळे कि काय माहित नाही पण लवकरच ते सगळे दिसेनासे झाले आणि मी जड पावलांनी खाली आलो.परतीची कॅब पकडून ऑफिसला तर पोचलो ,पण काय काम करावे तेच मला सुचेना. जसे काही माझा एक तुकडाच कोणीतरी तोडला होता. अर्थात हे काही अचानक झाले नव्हते . असे होणार ह्याची आम्हा दोघांना कल्पना होती. पण प्रत्यक्ष वेळ आल्यावर ते स्वीकारणे मात्र जड जात होते. कसाबसा दिवस ढकलला आणि ऑफिस सुटल्यावर एकटाच वासकाना तळ्यावर फिरायला गेलो. पानगळीचा ऋतू चालू होणार होता त्यामुळे सगळ्या झाडांची पाने पिवळी केशरी दिसत होती. जोडीला सायंकाळची उतरणीची उन्हे तळ्यावर मस्तपैकी चमकत होती. त्याच बोटी ,तीच कारंजी ,तीच काठावर बागडणारी लोक, झाडीतून पळणारे ससे सगळे नेहमीसारखेच होते. फक्त माझे मन बधिर झाल्याने मला ते काहीच जाणवत नव्हते. यंत्रवत चालताना इथे आपण परवा बसलो होतो, इथे मुले खेळत होती,इथे कोणत्या विषयावर गप्पा मारल्या होत्या असे काय काय आठवत होते. हळूहळू अंधार पडू लागला आणि नाईलाजाने पावले घराकडे वळवली.
इकडे ऑफिसात नेहमीप्रमाणेच धांदल चालू होती. रोजच्या मीटिंग ,चर्चा, नवीन प्रोजेक्टची कामे काय आणि काय. तर तिकडे घरी अंगद आणि मी एकमेकांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होतो. सुरुवातीला आम्ही दोघे विकांताला बसने सुपर स्टोरला जाऊन भाजी आणणे किंवा मंदिरात जाणे असे करत असू .दोघांनाही थोडाफार स्वयंपाक येत असल्याने आणि भांडी वगैरे घासायची सवय असल्याने कामाची वाटणी झाली.दोन सेपरेट बेडरूम असल्याने आमची भेट कधीतरी फक्त स्वयंपाकघरातच व्हायची.ज्याला पहिले भूक लागायची किंवा जो पहिले ऑफिसातून परत येई तो दोघांचे जेवण बनवी आणि राहिलेला नंतर भांडी घासत असे. विकांताला कपडे धुणे, घराची थोडी साफसफाई आणि मुख्य म्हणजे आपापल्या कुटुंबियांशी फोनवर बोलणे हाच कार्यक्रम असे.
बाहेरचे वातावरण आता बदलु लागले. हळूहळू पानगळ संपून हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आणि दिवस ५ वाजताच मावळू लागला.यथावकाश सगळीकडे बर्फाची चादर पसरली आणि एक उदासवाणे वातावरण सर्वत्र पसरले. दिवसभर ऑफिसच्या कामात वेळ पटकन निघून जायचा.कामही मनासारखे चालू होते. मात्र विकांताला सकाळी कुटुंबियांशी बोलले , आणि दुपारचे जेवण वगैरे झाले की वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडत असे. मग उगाच आंतरजालावर सर्फिंग करा नाहीतर कुठले तरी जुने चित्रपट बघा असे करून वेळ दवडायचा आणि सोमवारची वाट बघायची. या काळात मी फॉरेस्ट गम्प, द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय, बेसिक इंस्टींकट,व्हर्टिकल लिमिट्स असे वेगवेगळ्या विषयांवरचे अनेक चित्रपट बघितले. त्यातल्या त्यात ट्रेकिंग आणि पहिले दुसरे महायुद्ध यावरचे चित्रपट जास्त आवडीने बघितले. पण कधीतरी याही गोष्टीचा कंटाळा यायचा आणि मग मी आणि अंगद अजून एक दोन बॅचलर लोकांच्या बरोबरीने काहीतरी ट्रिपचा प्लॅन बनवायचो. यात काहीकाही गमती जमती सुद्धा होत.
पहिल्या महिन्यातच अंगदला समजले की भारतीय लायसन्स वर इकडे पहिले ३ महिने कार चालवू शकतो. रेंटल कारही जवळच्या एंटरप्राइज कंपनीच्या दुकानात सहज मिळत असे. विकांताला साधारण २० डॉलर भाडे आणि परत देताना पेट्रोल टाकी फुल करून देणे एव्हढीच काय ती अट असे. तर एका विकांताला अंगदने उत्साहाने कार घेतली आणि आम्ही ३-४ जण सुपरस्टोरला जायला निघालो. पहिला प्रयत्न असल्याने अंगदला सोपे पडावे म्हणून एक लांबचा कमी गर्दीचा रस्ता आम्ही निवडला होता. मधल्या काळात अजून एक नवीन सहकारी विशाल ,आमच्या फ्लॅटमध्ये राहायला आला होता आणि तो ड्रायव्हिंगचा जाणकार होता. त्याच्या सल्ल्याने रस्त्यावरच्या पाट्या ,सिग्नल वगैरे सगळे सांभाळत गाडी ४०-५० च्या वेगाने चालली होती.अशीच एका सिग्नलला गाडी थांबली. आमच्या पुढे दोन गाड्या होत्या आणि आमची गाडी डिव्हायडरला लागून उभी होती. आता सिग्नल सुटला कि डावीकडे वळायचे असे ठरले होते. सिग्नल सुटला, पुढची गाडी हलली आणि अंगदने गाडी रेज केली मात्र, काय होते आहे ते ते समजायच्या आतच गाडी ३६० डिग्री गोल फिरली आणि मागे तोंड करून थांबली. काय होते आहे ते क्षणभर कोणालाच सुधरेना. मागून येणाऱ्या सर्व गाड्या खटाखट थांबल्या. आणि आम्ही येडबंबू सारखे त्यांच्या तोंडाकडे बघत होतो. झाले असे होते की रात्रभर बर्फ पडल्याने रस्ता घसरडा झाला होता आणि अशा रस्त्यावर गाडी चालवायची अंगदला सवय नव्हती त्यामुळे टेक्निक चुकले होते. सुदैवाने लवकरच सगळे भानावर आले आणि हळूहळू करत गाडी रस्त्याकडेच्या एका शॉपिंग एरियात घेतली आणि पार्क केली. सगळे गाडीतून उतरले आणि छातीचे ठोके नियंत्रणात आल्यावर आम्हाला जी काही हास्याची उकळी फुटली ती थांबेचना. सगळ्यांनी अंगदला मनसोक्त शिव्या घातल्या, पण खरेतर त्याचीही फारशी चूक नव्हती. असेलच तर ही की जुजबी माहितीवर त्याने गाडी चालवली. मात्र त्यामुळे कदाचित मोठा अपघात होऊन हे संकट आमच्या जीवावर बेतू शकले असते. देवाचे आभार मानले आणि घरी परतलो.त्यानंतर मात्र त्याने रीतसर ट्रेनींग घेऊन आणि परीक्षा देऊन कॅनेडियन लायसन्स काढले आणि मगच गाडी चालवली. मात्र पुढचे काही महिने ऑफिसात ही घटना फारच चवीने चघळली जाई आणि नवख्या लोकांना घाबरवले जाई.पुढे हिवाळ्यातच आम्ही पुन्हा एकदा मूस जॉ आणि नंतर एकदा लेक रेजिना आणि इंडियन हेड नावाच्या गावाची एक दिवसाची ट्रिप केली ती फारच सुंदर झाली.
रेजिनामध्येही हिवाळ्यात काही ठिकाणी बर्फावरचे लोकप्रिय खेळ खेळले जात. वासकाना तळे हिवाळ्यात पूर्ण गोठत असे आणि त्यावर लोक स्केटिंग किंवा जाड बर्फाचा थर असेल तर कर्लिंग वगैरे खेळताना दिसत. एकदा मात्र आमच्या ऑफिसमधील एक हौशी कॅनेडियन माणूस आणि त्याची बायको स्नो मोबाईल घेऊन बर्फावर सर्फिंग करत असताना बर्फाच्या थराला भोक पडून आत पडले होते आणि उणे ३०-४० तापमानाचा फटका बसल्याने त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले होते. सुदैवाने रेजिना जनरल हॉस्पिटल हे एक मोठे सुसज्ज इस्पितळ इथे होते. पंचक्रोशीमधले सगळे लोक तिथेच उपचारासाठी येत त्यामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र या खेळांमध्ये काय दुर्घटना घडू शकते हे मात्र आम्हाला यानिमित्ताने चांगलेच समजले.
आता ख्रिसमस जवळ आला होता. सगळेजण सुट्टीत कुटुंबासकट कुठे कुठे जायचा किंवा खरेदीचा प्लॅन करू लागले. मला मात्र दिवसेंदिवस इथे राहायचा कंटाळा येऊ लागला. लोकात असून एकटा अशी काहीतरी विचित्र परिस्थिती मला छळू लागली.एकीकडे घरूनही भारतात परत येण्यासाठी भुणभुण चालू होतीच. त्यात बायको, आई,नातेवाईक असे सगळेच सामील होते. पण दुसरीकडे प्रत्येक महिन्याला बाजूला पडणारी शिल्लक आणि भारतात लवकर फिटणारे गृहकर्जाचे हप्ते खुणावत होते. शेवटी मात्र हृदयाने मेंदूवर मात केली आणि मी माझ्या मॅनेजरकडे भारतात परत जायचा विषय काढलाच. प्रथम त्याने माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. "अरे गाढवा, लोक इथे ऑन साईटला चिकटून राहण्यासाठी माझ्याकडे खेट्या मारतात आणि तुझे सगळे चांगले चालू आहे तर तुला परत जायची खुमखुमी का आली आहे?" असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. एकतर क्लायंटचे मत माझ्याबद्दल चांगले असल्याने त्याला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता .दुसरे म्हणजे माझ्या टीम मधील सहकाऱ्याची बायको बाळंत होऊ घातली होती त्यामुळे तो सुट्टीवर जाणार होता. त्यामुळेही मला राहणे भाग होते. शेवटी तो सुट्टीवरून परतला की मी भारतात परत जाऊ शकतो असे ठरले. क्लायंटला तसे कळवले. आता मला कोणीही "भारतात कधी परतणार?" असे विचारले कि "ते सहकाऱ्याच्या बायकोवर अवलंबून आहे" असे उत्तर मी देई आणि ऑफिसात एकच हशा पिके. असे काही दिवस गेले आणि ती शुभ वार्ता माझ्या कानावर आली. माझ्या सहकाऱ्याला मुलगी झाली होती आणि आठवड्याभरात तो पुन्हा कामावर रुजू होणार होता. महिना संपत आला होता त्यामुळे मी फ्लॅट सोडण्याची नोटीस बिल्डिंग मॅनेजरला दिलीच होती. अर्थात तोवर अंगद आणि विशालने मिळून जवळच्याच एका इमारतीत दुसरा फ्लॅट भाड्याने घेतला होता त्यामुळे तो प्रश्न मिटला. शेवटच्या विकांताला माझे जुजबी सामान आणि त्यांचे बरेचसे सामान यु हॉल (सामानाची ने आण करण्यासाठी स्वतः चालविण्याच्या गाड्या भाड्याने मिळतात ) ची गाडी घेऊन आम्ही हलवले आणि माझा फ्लॅट रिकामा करून कार्पेट सफाईसाठी देऊन टाकला.(फ्लॅट सोडताना बिल्डिंग एजन्सीला होता तसा साफ करून , रंग खराब झाला असेल तर रंग देऊन परत करावा लागतो किंवा अनामत रक्कम कापली जाते.) मग सुपरस्टोर ,झीलर्स वगैरे ठिकाणी जाऊन बायकोने फोनवर सांगितल्यानुसार सगळी खरेदी करून झाली.ऑफिसात छोटेखानी निरोप समारंभ झाला. बॅगा भरून तयार होत्याच, आता फक्त परतीचे तिकीट मिळायचे बाकी होते. आमच्या टोरांटो ऑफिसला फोनाफोनी करून तेही पदरात पाडून घेतले आणि अखेर एका शुभ दिवशी सकाळी ८ वाजता सामान सुमान बांधून रेजिना टोरांटो विमानात स्थानापन्न झालो माझ्या देशात परतण्यासाठी.(समाप्त)
प्रतिक्रिया
20 Jun 2022 - 5:21 pm | सुप्रिया
चारही भाग छान !
20 Jun 2022 - 7:31 pm | रात्रीचे चांदणे
नेहमीप्रमाणे हाही भाग वाचनीय झाला. प्रवासाचे अजून काही अनुभव असतील तर ते पण लिहा.
20 Jun 2022 - 8:52 pm | फारएन्ड
छान लेखमाला.
21 Jun 2022 - 6:37 am | कर्नलतपस्वी
फोर्स्ड बॅचलरहुड आणी ते सुद्धा तरुणपणी, एक मीश्र अनुभव, पती पत्नी दोघांनाही.नंतर मात्र सवय होते.
21 Jun 2022 - 8:06 am | नचिकेत जवखेडकर
खूप छान लेखमाला!
21 Jun 2022 - 9:18 am | सुखी
मस्त लिहिलंय...
21 Jun 2022 - 4:11 pm | राजेंद्र मेहेंदळे
सध्या थोडी विश्रांती. पुन्हा एखादा किडा चावला तर पुढचा लेख किवा लेखमाला टाकेन सवडीनुसार.
24 May 2023 - 12:32 pm | प्रकाश घाटपांडे
सगळे भाग सुरेख! मला तर कुठल्यातरी अनामिक विश्वात घेउन गेले. मूळात मी बर्फ पाहिले तेच खूप उशीरा. मनाली जवळ. मला ते मीठच वाटायचं.