कविता

||चंद्रवेळ||

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
9 May 2020 - 8:35 am

1 आकाशातून खिडकीत, खिडकीतून फोटोत उतरलेला चंद्र,
तुला WhatsApp वर पाठवला की मग कुठे माझी पौर्णिमा सुरू होते.
अन तुझा त्यावर reply आला की ती शारदीय होते.

2माहीत असतं, "छान, ओके किंवा तूच माझा चंद्र"
याहून दुसरा तुझा reply येणार नाही.
पण तरी मी खूष असते कारण मला कळतं
याहून अधिक तुला खरंच काही सुचणार नाही.

3 आठवतं? एका रात्री एअरपोर्टवरवरून तू मला कॉल केला होतास.
तू घरी पोचेपर्यंत आपण बोलत होतो. .
तेव्हा चंद्रसुद्धा खिडकीपाशी थांबून राहिला होता.

काहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कविताकविताचारोळ्यामुक्तक

वणवा

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
8 May 2020 - 9:37 am

असा पेटतो वणवा
उरी घर्षती झाडे,
आणि भणानून उठती
दु:खाचे धूसर वाडे.

रात्र वेशीला अडली
अंधारच इथे सजलेला,
अग्नीच्या तप्त तमांतून
मोगरा कसा भिजलेला?

कुणी हाक देऊनी स्वर्गी
वणवा असा रोखावा,
वनमेघ दाटूनी विवर्त
वळीवाचा पाऊस यावा.

-कौस्तुभ

करुणकविता

आत्म दीपो भव

Kaustubh bhamare's picture
Kaustubh bhamare in जे न देखे रवी...
8 May 2020 - 1:30 am

बुद्ध,,,,,
काय दिले तू मानवजातीला?,,,,

शांती,,,
ती तर केव्हाच कैद झाली आहे
रक्तपिपासू,साम्राज्यवादी,शोषित भांडवलशाहीच्या महत्वकांक्षेत,,,,

संयम,,,
नजर टाकून पहा कुचकरून टाकलेल्या कळ्यांकडे
अहंकारी पुरुषी वासनेने संयमाच्या कधीच चिंधड्या उडविल्या,,,,

हास्य,,,
पहा बर तुला सापडते का?
भुकेने तडफडणाऱ्या निरागस बालकांच्या चेहेऱ्याआड,,,

सत्य,,,
असत्यतेचा नंगानाच चालणाऱ्या स्वार्थी बाजारात
सत्य,,,,सत्य केव्हाच कवडीमोल ठरले,,,

कविता

अस्त

सुमित_सौन्देकर's picture
सुमित_सौन्देकर in जे न देखे रवी...
7 May 2020 - 10:53 pm

चार दिसांची चहू चिंतने
भ्रमितपणाची बहू लक्षणे
विषासम त्या प्रवासातले
क्षणिक गोडवे अस्त पावले

अनाठाई त्या रूचक चिंता
स्वप् नसुखांच्या रजई विणता
सूर निराळे गवसण्यापरी
तारेवरचा नवा डोंबारी

नको म्हणाया धजते ना मन
धडगत नाही रीते रीते पण
बेधुंदपणाचि सूटली आवड
दिनपणाचि जूडली कावड

क्षिण जाहल्या नियतिच्या वाटा
नको जपाया स्वप्नांच्या लाटा
अधांतरी क्षितिजाच्या मागे
विझून गेले लख्ख पोरगे

कविता माझीकविताजीवनमान

प्राणवेळा

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
6 May 2020 - 1:46 am

आठवांच्या काळवेळा पाहिल्या.
हृदयाच्या प्राणवेळा पाहिल्या.
मालवेणा चंद्र भोळा कालचा.
कालच्या या चांदण्याही राहिल्या.

सोसली मी ही तमांची अंतरे.
रात्र काळी झाडपाने मंतरे.
गारव्याने जाग आली या फुला.
पाकळ्यांच्या गंधपेशी दाहिल्या.

प्राण झाले कातिलांचे सोबती.
सांग हे का माणसाला शोभती ?
वाचण्याचे मार्ग सारे संपले.
शेवटाला प्रार्थना मी वाहिल्या.

-कौस्तुभ
वृत्त - मालीबाला

करुणशांतरसकवितामालीबाला वृत्त

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा : २०२०

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
3 May 2020 - 3:51 pm

मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा : २०२०

नमस्कार मंडळी,
नुकतीच शासनाने लॉकडाउन आणखी दोन आठवडे वाढवत असल्याची घोषणा केली. म्हणजे आपल्याला आणखी दोन आठवडे घरी थांबायचे आहे. म्हणून मग आपण आणखी एक स्पर्धा आयोजित केली आहे.

सोसुनिया लॉकडाउनचे घाव
पुरता इस्कटलोय, काय सांगू राव
मनी दिसे आता फक्त एकच नाव
मिसळपाव मिसळपाव

काय म्हणतो, बरोबर ना भाव?

हे ठिकाणकविताप्रकटनआस्वादप्रतिभा

हो मनुजा उदार तू ..

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
1 May 2020 - 10:50 am

निसर्गाने सूक्ष्म हे
दैत्य असे सोडले
अहंकारी माणसा
गर्व सारे तोडले

धूर हा हवेत रोज
नदीत जहर सांडले
प्रतिशोध हा असेल
तुला घरात कोंडले

उपसलेस बहुत तेल
गिरी अनेक फोडले
सजेल ही धरा पुन्हा
तव हस्तक्षेप खोडले

विकास नाव देऊनी
वृक्ष अमाप छाटले
दुःख ते अपार किती
वसुंधरेस वाटले ?

मोडलेस घर त्यांचे
नांगर थेट फिरवले
झुंजलेत पशु त्यांना
हिंसक तूच ठरविले

शिक आता दिला धडा
जरा तरी सुधार तू
देई स्वार्थ सोडुनी
हो मनुजा उदार तू

कविताकरोनानिसर्ग

खूप झालं देवा आता....

Vivekraje's picture
Vivekraje in जे न देखे रवी...
28 Apr 2020 - 8:27 pm

खूप झालं देवा आता, काहीतरी चमत्कार कर..
नाहीच जमलं काही तर, तुझं अस्तित्व अमान्य कर..

किड्या मुंग्यांसारखी देवा, माणसं मरत आहेत..
तुला कसं कळणार म्हणा, तुझी तर देवळच बंद आहेत..

माहितीय का देवा तुला, अख्ख जग इथं थांबलय..
सगळे जिवंत आहोत, कारण फक्त मरण पुढं लांबलय..

धावणारी माणसं सगळी, आज घरातच कोंडलीत..
मंदिरही सुनी तुझी, सगळी फुलं सुकी पडलीत..

शेवटी म्हटलं देवा, कुठूनतरी ये पुन्हा गाभाऱ्यात तुझ्या..
तेवढ्यात आला चमत्कारिक आवाज हळूच कानात माझ्या..

कविता

निर्घृण खुन..

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
27 Apr 2020 - 11:55 pm

निर्घुण खुन..

काय अपराध
होता तयांचा
जे त्यांस
असे मरण यावे?
माणसांतल्याच लांडग्यांनी
तयांस जीवे ऐसे मारीले
या माणसांपरी
ते लांडगे तरी बरे
हेरतात ते सावज
भुक शमविण्यासाठी
संचारबंदी असोनी
ऐसा जथ्था तेथ जमला
अन्
माणसांतल्या माणुसकीचा
निर्घुण खुन तेथेची जाहला..

(Dipti Bhagat)

कवितासमाज

मौनाचे गुपित

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
21 Apr 2020 - 6:33 pm

मौनामागे दडुनी असती
नाना परिची किती कारणे
कुठे व्यग्रता, कुठे खिन्नता
वरुन दाखवी 'नको बोलणे'

मौनाच्या वाटांचे वळसे
वाटसरूला होई चकवा
निबिड शांतता चहुबाजूला
असह्य होई अबोल थकवा

मौन राखते दाट अरण्ये
अनेक गुपिते अनेक आख्या
वरवर जे दिसते डोळ्यांना
खरे भासते असून मिथ्या

मौन पाहते सूचक, रोखुन
धारदार भेदक डोळ्यांनी
एका एका प्रश्नासंगे
यक्षाची तलवार परजुनी

प्रश्नहि ऐसे महाकठिण ते
सापडता सापडे न उत्तर
चकव्यामधुनी सुटण्याइतके
नशिब कुणाचे की बलवत्तर?

कविता