खूप झालं देवा आता, काहीतरी चमत्कार कर..
नाहीच जमलं काही तर, तुझं अस्तित्व अमान्य कर..
किड्या मुंग्यांसारखी देवा, माणसं मरत आहेत..
तुला कसं कळणार म्हणा, तुझी तर देवळच बंद आहेत..
माहितीय का देवा तुला, अख्ख जग इथं थांबलय..
सगळे जिवंत आहोत, कारण फक्त मरण पुढं लांबलय..
धावणारी माणसं सगळी, आज घरातच कोंडलीत..
मंदिरही सुनी तुझी, सगळी फुलं सुकी पडलीत..
शेवटी म्हटलं देवा, कुठूनतरी ये पुन्हा गाभाऱ्यात तुझ्या..
तेवढ्यात आला चमत्कारिक आवाज हळूच कानात माझ्या..
चक्क देवच कुठूनतरी , जणू माझ्याशीच बोलत होता..
शब्द त्याचे होते की, स्वप्नात भास मला होत होता..
देव म्हटला... बेटा..... खरंच थांबलय की रे सगळं..
फक्त तुला जे दिसतंय त्यापेक्षा मला दिसतंय वेगळं..
माझ्या मंदिरातील गर्दी आज मंदिरात नाही..
पण खरा भक्त मला फक्त मंदिरात शोधत नाही..
जग थांबलय सारं, अस तुला का वाटतंय..
बघ माणसासाठी, आज माणसाचंच मन आटतय..
घासातला घास आज , माणूस माणसात वाटतोय..
खरं सांगू तुला मला , आज खरा नेवैद्य भेटतोय..
निवांत पणे माणूस आज , एकच विचार करतोय..
कमाई तर खूप झाली, आज मी कशासाठी
जगतोय..
बघ ना सगळी जात पात गेली , अन माणसं एक
झाली..
शरीराने दुरावली पण मनाने जवळ आली..
आज खरतर माणसातला देवच शोधला माणसाने..
आणि जे मला जमलं नाही ते करून दाखवलं या
आजाराने...
ते खरंय देवा, पण माणसं भुकेने मरतील आता..
चुली तर कधीच विझल्यात, सरण रचली जातील आता..
एक वचन देतो बेटा.. भुकेने कुणी मरणार नाही..
धान्य नसलं घरात , तरी उपासमार होणार नाही..
थोडं कठीण वाटतंय , पण अशक्य नक्कीच नाही..
कारण तुझ्या दानाची किंमत, कमी ठरणार नाही..
या आजाराने माणसाला एक नक्की शिकवलं..
सगळ्या ऐहिक सुखाला एका कोपऱ्यात जाऊन
बसवलं..
सगळं खरंय देवा , पण आता बघवत नाही रे..
तुझ्या सृष्टीची नासाडी, तुझ्याच समोर होईल रे..
घाबरू नकोस बेटा, फक्त माणसं म्हणजे सृष्टी
नाही..
आणि माझ्या सृष्टीची नासाडी ही कला माझ्यात
नाही..
कळ सोस थोडी, सगळं सुरळीत होईल..
फक्त आताची माणुसकी, जन्मभर लक्षात
राहील..
जमलं तुला तर , थोडे कष्ट करून बघ..
कुणासाठी जमलं तर , काहीतरी करून बघ..
एकदाच मिळालीय संधी मला गाभाऱ्याबाहेर
बघण्याची..
त्यांच्याकडून शिकून घे कला दुसऱ्या साठी
जगण्याची..
देवळात नसलो तरी आज रस्त्यावर तुला
अडवणारा , वर्दीत मीच आहे ...
आणि दवाखान्यात उपचार करणारा , पण मीच
आहे..
आजार काय रे....आला तसा निघून
जाईल...
पण आजची माणुसकी ही जन्मभर लक्षात
राहील...
प्रतिक्रिया
28 Apr 2020 - 8:31 pm | Vivekraje
मिपा वर माझं आज पहिलीच कविता आहे , खरंतर मिपा मुळेच मला लेखनाची गोडी लागली. मिपा वरील साहित्याचा किमान चार पाच वर्षांपासून आस्वाद घेत आहे. मिपावरील माझ्या पहिल्या प्रयत्नाला मिपाकर नक्कीच सांभाळून घेतील...
28 Apr 2020 - 8:42 pm | प्रचेतस
छान लिहिलंय, येत राहा, लिहीत राहा.
29 Apr 2020 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहित राहा. आवडली कविता.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2020 - 9:16 pm | Prajakta२१
+१
28 Apr 2020 - 9:29 pm | मदनबाण
सुरेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mere Dil Ka Tumse Hai Kehna ( Cover) | Armaan | Shankar Ehsaan Loy & Chitra
29 Apr 2020 - 9:02 pm | सौ मृदुला धनंजय...
खूपच छान.
29 Apr 2020 - 11:08 pm | जव्हेरगंज
भारी जमलीये!!
30 Apr 2020 - 7:54 am | चांदणे संदीप
ही कविता मला दोन दोन व्हाट्सॲपवरून दोन जणांकडून आलेली आहे. त्यात कविचे नाव नाही.
कविता ठीकच.
सं - दी - प
30 Apr 2020 - 9:25 am | बाजीगर
आवडली,
छान लिहीलीय.
30 Apr 2020 - 12:41 pm | शा वि कु
कविता छान जमलीये.
2 May 2020 - 2:55 pm | Vivekraje
सर्वा॑ना खुप खुप धन्यवाद...
2 May 2020 - 6:42 pm | अत्रुप्त आत्मा
पांडू मोड ऑन
छाण विवेचण!
पांडू मोड ऑफ
----------////--------
आत्मा प्रकटन:-
लिखते रहो, आते रहो!
3 May 2020 - 6:54 pm | गुल्लू दादा
खूप आवडली...