ओमर खय्याम... भाग - ८

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
17 Jun 2011 - 8:04 am

ओमर खय्याम भाग - १
ओमर खय्याम भाग - २
ओमर खय्याम भाग - ३
ओमर खय्याम भाग - ४
ओमर खय्याम भाग - ५
ओमर खय्याम भाग - ६
ओमर खय्याम भाग - ७

औषध
दररोजच्या कटकटीमुळे माणसाचा जीव वैतागून जातो.
शरीराला शांत पडून आराम देता येतो. पण मनाचे काय ? त्याला उल्हसित कसे करणार ? साधक, योग, ध्यान, इत्यादींचा वापर करुन त्याला विश्रांती देऊ शकतात पण सामान्य माणसाचे काय ? त्याला तेवढा वेळही नसतो. मग खय्याम म्हणतो ......

ऊठ ! दुर्मुखलेल्या जीवात जीव आण !
ती सुगंधित मदीरा घेऊन ये !
तुझ्या दु:खावरचे औषध पाहिजे असेल,
तर लाल मद्य आणि संगीत ह्याशिवाय आहे काय?

संगीतात मन शांत करण्याची तेवढीच ताकद आहे हे खय्यामने अधोरेखित केले आहे आणि किती खरे आहे ते ?

माती
माणूस आणि माती यांचे काय अतूट नाते आहे कोणास ठाऊक ! माणसाचा जन्म आईच्या उदरात होतो आणि शेवट मातीत होतो. असे होऊ शकत नाही जेथे जन्म झाला तेथेच अंत व्हावा म्हणून बहुतेक मातीला म्हणजे जमिनीला आई म्हणत असावेत. त्यामुळे माणसाला मातीत मिसळण्याचे वेध लागलेले असतात.
मातीला निष्ठूरपणे तुडवणारा कुंभार खरेतर त्यातून नवनिर्मिती करत असतो. त्याचा हेतू शुद्ध असतो पण संतांच्या मनाला तेही पटत नसावे, म्हणून हजार वर्षापूर्वी खय्याम म्हणाला –
I saw a potter in the bazaar yesterday
He was violently pounding the fresh clay
and that clay said to him, in mystic language,
“I was once like thee – so treat me well

माती सांगे कुंभाराला
पायी मज तुडविशी,
तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी.
आज तू नीट वाग माझ्याशी.

या शब्दांचे आणि विचारांचे भाषांतर या मराठीतील गाण्याइतके चांगले होऊच शकत नाही. शेवटची ओळ माझी आहे.

स्वर्गाची हमी
परंपरा या माणसाने केलेल्या एखाद्या कृत्यापासून सुरु झालेल्या असतात. परंपरा तयार होतात कारण त्या काळात सलग काहीवेळ त्या कृत्यापासून माणसाला फायदा झालेला असतो. आत्ता तसा होईल, हे परमेश्र्वरपण सांगू शकत नाही. मग का पाळल्या जातात ह्या परंपरा ? मला वाटते त्या माणसाच्या अहंकाराला वाट देतात, अनेक अर्थहीन गोष्टींची त्यामुळे उत्तरे द्यावी लागत नाहीत. परंपरेकडे बोट दाखवले की काम भागते. याने तुम्ही थोरामोठ्यांची,विद्वानांची तोंडे एका झटक्यात बंद करु शकता. परंपरा वाईट चालींचीसुद्धा असू शकते. उदा. सतीची चाल, बगाडाची चाल, गोटेमारीची परंपरा. परंपरा हा एक जगन्नाथाचा गाडा आहे. तुम्ही त्याची यात्रा बघितली आहे का ? तो गाडा ओढताना शंभरएक माणसे मेली तरी काही फरक पडत नाही. त्यांना परंपरेने स्वर्गाचे द्वार खुलेच असते. त्यांच्या बायकापोरांकडे ह्या जगात कोणी बघत नाही हे वेगळे. अशा ह्या परंपरा.
खय्याम म्हणतो स्वर्ग स्वर्ग काय करतोस? मी देतो तुला स्वर्ग ! त्यासाठी तुला असले गाडे ओढायची गरज नाही.. मग कसा मिळेल तो
स्वर्ग ?
खय्याम म्हणतो –

सोड त्या परंपरा, आणि आज्ञा !
तुझा घास नको रोखूस कोणापासून !
वेदना आणि ठेच नको देऊस कोणाच्या ह्रदयाला
मी तुला स्वर्गाची हमी देतो. जा ! मद्य आण !

स्वत:च्या ताटातला घास गरजूला दे ! तुला मग परंपरांचे अवडंबर माजवायचे कारण नाही. स्वर्ग, देव, या फार किरकोळ गोष्टी आहेत. हे करुन बघ, समाधानातच सगळे आहे.

सुर्याची ओढणी.

मद्य गुलाबी आहे, प्याला गुलाबाच्या पाकळ्यांनी भरला आहे – असेल
त्या स्फटीकाच्या पेटीत माणिक आहे – असेल !
वितळलेले ते माणिक जणू पाण्यात आहे – असेल !
चंद्र सूर्याची ओढणी आहे – असेल .

ज्या काळात शास्त्रज्ञ आणि कर्मठ उद्धट धर्मगुरु ह्यांच्यात विळ्या भोपळ्याचे सख्य असायचे त्यावेळची ही रुबाया आहे हे लक्षात घ्या ! सत्य आणि असत्य ह्यांच्यातला फरक पचवणे फार अवघड आहे. भास, आभास आणि सत्य यांच्यातला फरक स्पष्ट करुन सांगण्याचे काम फार पूर्वीपासून शास्त्रज्ञ करत आलेले आहेत. त्यात ते मृत्युमुखीपण पडलेले आहेत. मग जनतेला शास्त्रीय सत्य तर सांगायचे, पण पटेल अशा शब्दात आणि चमत्कार करुन हा पायंडा पडला. दुर्दैवाने सत्य पडले बाजूला आणि चमत्काराला महत्व प्राप्त झाले कारण त्याला करमणुकीची झालर होती. अशाच एका प्रयत्नात खय्याम म्हणतो

मद्य गुलाबी आहे, प्याला गुलाबाच्या पाकळ्यांनी भरला आहे – असेल
त्या स्फटीकाच्या पेटीत माणिक आहे – असेल
वितळलेले ते माणिक जणू पाण्यात आहे – असेल
चंद्र सूर्याची ओढणी आहे – असेल

चंद्राचा प्रकाश हा सूर्याचा असतो. कदाचित असेल असे जनतेला सांगायचा कदाचीत हा प्रयत्न असेल. मित्रहो चंद्राची इस्लाम धर्मामधील प्रतिमा आणि महत्व मी तुम्हाला सांगायला नको. या आधुनिक जगात आजही इस्लामी राज्यात कशाला धर्माचा अपमान म्हणतील आणि लोकांना ठार मारतील सांगता येत नाही, उदा. पाकिस्तान, येमेन, इ..इ..या सारख्या देशांकडे बघावे.
त्या पार्श्वभूमीवर ही रुबाया वाचली पाहिजे !

प्रेमात धुंद
विक्टर ह्युगो एके ठिकाणी म्हणतो -

रस्त्यावर तो फिरत होता,
त्याचे कपडे फाटके होते.
कोट ऊसवलेला होता आणि त्याला ठिगळे होती.
त्याच्या फाटक्या बुटातून पाणी ठिबकत होते,
पण ह्रदयातून तारे ओसंडत होते.
तो कोणाच्यातरी प्रेमात पडला होता.”

प्रेमात पडल्यावर काय होते ते मी सांगायला नको. सगळ्या प्रतिज्ञा मोडल्या जातात.......कबाबमें हड्डीचा अर्थ कळायला लागतो. जग परके वाटायला लागते, लोक मूर्ख म्हणायला लागतात. पण प्रेमात पडल्यावर काय फरक पडतो ?
खय्याम म्हणतो –

आपण करतो प्रतिज्ञा, मोडतो प्रतिज्ञा,
प्रसिद्धीची दारे आम्ही स्वत:हून बंद करतो.
मला दोषी नका ठरवू, मी मूर्ख !
कारण मी प्रेमात धुंद आहे.

प्रेमात पडल्यावर जगाची पर्वा असते कुणाला ?.....

जयंत कुलकर्णी.

संस्कृतीकलाधर्मइतिहासवाङ्मयकविताचारोळ्याप्रेमकाव्यसमाजआस्वादलेखमाहिती

प्रतिक्रिया

प्रास's picture

17 Jun 2011 - 11:04 am | प्रास

हा भागही छान!

मात्र काही ठिकाणी संपादनाची गरज आहे का, ते तपासावं नि असल्यास स्वसंपादनाची सोय वापरावी...

म्हणून १००० हजार वर्षापूर्वी खय्याम म्हणाला

“I was once like three....

कारण परत एकदा मी प्रेमाने धुंद आहे.

पुलेप्र

जयंत कुलकर्णी's picture

17 Jun 2011 - 12:41 pm | जयंत कुलकर्णी

:-) धन्यवाद !

डॉ.श्रीराम दिवटे's picture

17 Jun 2011 - 12:09 pm | डॉ.श्रीराम दिवटे

छान.
हा भागही आवडला.