स्वरचित महाभारत : भाग शेवटचा
शेवटचा गाव मागे टाकून खूप वेळ झाला होता. चालून चालून त्यांच्या पायात गोळे आले होते. थोडाच वेळ आधी बर्फ पडून गेला होता. हवेतला गारवा वाढंतंच चालला होता. आणि अचानक धीरगंभीर आवाजात कोसळणारा जलप्रपात समोर आला. मंत्र टाकल्यासारखे सगळे एकाच जागी खिळून राहिले. तशी जायला दोन दगडांची वाट होती. पण एखादी उडी मारायला लागली असती. पण त्यांच्या काकडलेल्या शरीराला ती उडी सहन झाली नसती. इथून पुढे जाणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. द्रौपदी तर मटकन खालीच बसली. मग भीमानेच एक बऱ्यापैकी मोठा दगड त्या दोन दगडांवर रचला आणि त्या कामचलावू दगडावरून त्यांनी तो धबधबा पार केला.