आषाढाच्या एक दिनी
आषाढाच्या एक दिनी...
कुंद,सावळ्या वातावरणी
आषाढाच्या एक दिनी
हिरवा डोंगर झाकून जाई
पाऊसभरल्या मेघांनी
स्तब्ध तरूंवरी स्तब्ध पाखरे
लोकालयीही तीच स्तब्धता
वाराही जणू रुसून बसला
मनात भरवूनी उदासीनता
अशात कुठुनी चुकार बगळा
कापत जाई मेघांना
भेदरलेली चिमणी बसली
मिटून अपुल्या पंखांना
असाच काही काळ लोटला
अन् डोलू लागले वृक्षलता
वा-यासंगे जणू मिळाली
वर्षागमनाची वार्ता
झरझर,सरसर पडू लागल्या
धवल शुभ्र पाऊसधारा
उदासलेल्या चराचरावर
हो चैतन्याचा शिडकावा