दोघे आपण...!!
परिणय आपुला, हे नवजीवन,
त्यास प्रीतीचे, अनुपम कोंदण,
जगा वेगळा वाटे साजण,
तरी, दोन ध्रुवांवर दोघे आपण..
मनी बांधते मखमली तोरण,
छोटे घरकुल, मोठे अंगण,
अनुरागाचे त्या, मधुर शिंपण,
पण, दोन ध्रुवांवर दोघे आपण..
दोन मनांची नाजूक गुंफण,
जना मनाचे सुरेख बंधन,
विवेक करितो अभिनव कुंपण,
कां, दोन ध्रुवांवर दोघे आपण..
दोन जीवांचे एकच बंधन,
सुगंधी नाते, जणु ते चंदन,
आता उरले अबोल क्रंदन,
दोन ध्रुवांवर दोघे आपण..
कलहामधुनि सदैव घर्षण,
संघर्षाचे चर्वित चर्वण,
कुठे हरवले ते आकर्षण,
दोन ध्रुवांवर दोघे आपण..
संसारी या एक उणेपण,
आनंदाची भासे चणचण,
वादविवादाची ती तणतण,
दोन ध्रुवा