कविता

हळव्यांची गळवे

उपयोजक's picture
उपयोजक in जे न देखे रवी...
27 Sep 2020 - 7:06 pm

मनावर यांच्या ठसठसणारी गळवे आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

गैरसमज करुन घ्यायला हे नेहमी पुढे आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

हे इतरांना टोचतील; प्रत्युत्तरे त्यांना नको आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

हे नेहमीच बरोबर असतात; इतर लोकच चुकत आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

भावनांना डिवचलेत? आता ते सूडाच्या तयारीत आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

शब्दबाण मारलेत? ते ग्रुप सोडायच्या तयारीत आहेत.
यांना काही म्हणू नका; हे हळवे आहेत.

कविताविडंबनविडंबन

परतीचे प्रवास

मका म्हणे's picture
मका म्हणे in जे न देखे रवी...
25 Sep 2020 - 9:15 am

म्हातारी माणसे एकटीच बसून
अश्रू ढाळतात.
कधी सहजच पाणी येते त्यांच्या
डोळ्यातून उगाच.
अचानक विकल होतात ती मागचे
काहीबाहि आठवून.
सैरभैर होतात माना हलवत
चेहेऱ्यावर अपराधी भाव घेऊन...

काय बर होत असेल त्यांना ?
कोण आठवतय आता या वयात ?
कशाने असे बावरले जात असतील ?
कसल्या वेदना पाझरताहेत मनातून?

आता खूप दूर निघून गेलेल्या
माणसांना काही सांगायचे असेल,
का आता जवळ असलेल्यांना
काहीच सांगता येत नसेल?

कविता

भान

मका म्हणे's picture
मका म्हणे in जे न देखे रवी...
21 Sep 2020 - 10:31 am

ही कसली हळवी गीते
मज स्मरति मागोमाग
नात्यांवर जमली राख
आतून देतसे ऊब

ही असली कसली खेळी
तू खेळून जासी सहजी
हरताना जख्मी होतो
तरी वाटे लावू बाजी

स्मरणारे जुनेच डाव
मी करतो अलगद चाल
अन पहाता पहाता देही
व्रण उठती लाले लाल

या खेळाचे मैदान
जरी भासे अंगण वाडी
पण नियती लागता मागे
पळता भुई वाटे थोडी

हे नियम उलटे सुलटे
मज कळो लागले जेव्हा
बळ सरले त्राणांमधले
संपला वेळहि तेव्हा

सरले जरी अंतर आता
परी देणे टळले नाही
तो फेडून घेतो आधी
जे दिलेच नव्हते काही

कविता

मन

Pratham's picture
Pratham in जे न देखे रवी...
19 Sep 2020 - 10:08 pm

मन हे कधी शांतपणे खळखळणारा झरा,
तर कधी अथांग सागरी लाट.
मन हे कधी कातळ खडकासारखे टणक,
तर कधी कापसासारखं नाजूक.
मन हे कधी आकाशात उंच झेपावणारे पाखरू,
तर कधी अविचल,स्निथप्रज्ञ क्रौंच.
मन हे कधी हिमालयासारखे भव्य,
तर कधी लाजाळू सारखे संकुचित.
मन हे कधी एक संथ पावसाची लहर,
तर कधी धो धो कोसळणाऱ्या सरी.

-प्रथमेश

कविता

कोणे एके काळी ...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
19 Sep 2020 - 9:42 am

कोणे एके काळी जेव्हा लोक एकमेकांंना सहज भेटत असत, कारणाशिवाय..
तेव्हा मॉलच्या पाय-यांवर भेटलास. इकडचं तिकडचं बोललास.
मी हसत होते वेड्यासारखी. आणि तू अचानक हातात हात घेतलास.
त्या स्पर्शात प्रेम होतं, विश्वास होता, ऊब होती..

कोणे एके काळी जेव्हा लोक चेहरा लपवत नसंत.
ओठांच्या कोपऱ्यात तर कधी खळखळून हसत असत.
तेव्हा तू तेव्हा तू माझ्या ऑफीसवर आलास.
अचानक मला जवळ ओढलंस, मध्ये टेबल असूनही..
त्या स्पर्शात प्रश्न होता, आणि उत्तर मिळाल्याचा आनंददेखील होता, ओढ होती...

कवितामुक्तक

प्रेमाचा कोव्हीड!!

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
18 Sep 2020 - 10:32 pm

(नम्र विनंती: कविता हलके वाचावी. न आवडल्यास विसरून जावी. भावना दुखवून वगैरे घेऊ नयेत. तितकी तिची लायकी नाही. दिवस हे असे आहेत. त्यात आपला जरा विरंगुळा, इतकेच!)
--------

आठवतं तुला? तुझ्या अंगाला सेंटचा वास येत होता, सॕनिटायझरचा नाही.

वॉचमनने दारात तुझं टेंप्रेचर मोजलं नव्हतं, पण मी हातात हात घेतल्यावर ते लगेच वाढत चाललेलं मला कळत होतं

तुझे थरथरते, अधीर ओठ घामट मास्कच्या मागे लपलेले नव्हते.

पण हपिसात उपस्थिती 100% असल्यामुळे एकांत मात्र नव्हता नावापुरताही.

कविताविनोद

वर्षादूत

मका म्हणे's picture
मका म्हणे in जे न देखे रवी...
16 Sep 2020 - 9:11 am

काळ्या झालरीची नक्षी
नभी लोलक विजांचे
वाजे चौघडा नगारे
वाऱ्यासंगे हे ढगांचे

आला,आला म्हणताना
दारी येउनी ठाकला
वर्षातला नवा ऋतु
माझ्या डोळ्यात साठला

किती किती त्याचा दंगा
किती रूपे, किती रंग
काळ्या फत्तराला देई
एक ओलसर अंग

त्याचे थेंब, त्याच्या सरी
येती धावून धावून
आर्त तापल्या भुईला
भेटी कवेत घेऊन

कोसळल्या धरेवरी
जशा धारांवर धारा
काळी माय झाली सर्द
बिलगून लेकराला

मग धावले बाहेरी
तिच्या अंतरीचे काही
वाहे भरून भरून
जाऊ दश दिशा पाही

कविता

तहान

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
13 Sep 2020 - 11:36 pm

झाडांचे उंच पिसारे
वारा हलतो जरासा
माझ्याही ओठावरती
थिजली शुष्क पिपासा

पेटले आभाळ वरती
दूरस्थ शीतल जाळ
पाण्यावर मंद लहरींच्या
पायी बांधले चाळ

पोकळीत वैशाखाच्या
तरंगते उष्ण हवा
डोंगरात झाडामध्ये
शोधते शांत विसावा

दगड झाड अन पाणी
मी याहून वेगळा नाही
कोलाहलातून शहराच्या
अलगद निसटू पाही

बुडता सूर्य मावळतीला
घरट्यात परतती रावे
कणाकणात या सृष्टीच्या
अलगद मिसळून जावे

जाग झोपेमधुनी येता
जाणीव याची व्हावी
आकाशी डुलत्या फांद्या
मुळे जमिनीत असावी

कविता

सोबतीण

Prajakta Sarwade's picture
Prajakta Sarwade in जे न देखे रवी...
13 Sep 2020 - 12:43 pm

आज अंगणातच मला दुरावा दिसला,
सगळयानी त्याला परक केल
याची खंत सलत होती त्याला,
त्याची ती अवस्था पाहवली नाही मला,
मी दुराव्याला ही आपलेस केलं,
असहायतेलाही साहय केलं,
दुख ही दरात उभा राहुन पाहत होत सार.
त्याच ही अगदी आनंदाने स्वागत केलं,
तो मला विखुरताना पाहयला आला होता,
त्यालाच मी प्रेमाच्या दोन शब्दांने सावरलं,
ते एेकुन माञ त्याचे डोळे नभाळ झाले
आणि दुख ही त्या क्षणी सुखावला,
कसली तरी चाहुल लागली,
कोण आहे तिकडे, पाहलं
कोपरयात गुपचुप खाली मान घालुन
एकटाच एकटेपणा बसला होता

कविता

झड

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in जे न देखे रवी...
12 Sep 2020 - 11:24 pm

पावसाची येता झड
जुने जातसे वाहून
आठवणींचा दोदाणा
आणि अंतरीची खूण

धोधो पाऊस वाहता
माझे मन स्वच्छ होई
मागमूस किल्मिषांचा
सापडेना कोण्या ठायी

कडाडते वीज नभी
लख्ख तेज चकाकते
आठवणीतले हसू
तिचे मज खुणावते

झड थांबे घटकेने
थंडगार आसमंत
पाण्यातले प्रतिबिंब
भासे मज शांत शांत

(दोदाणा: पाण्याचा वेगवान प्रवाह)

कविता