कविता

माैन

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जे न देखे रवी...
21 Jun 2020 - 10:30 am

शब्दांचा प्रवास
काहीच फर्लांग
माैनाचा थांग
निरंतर...॥

शब्दांचा अर्थ
कळे यथामती
माैनाची महती
कोणा कळे ॥

शब्दांचे शस्त्र
जिव्हारी घाव
अंतरीचा ठाव
माैन घेई ॥

शब्दांचे धन
उजळली आभा
माैनाचा गाभा
अंधारात ॥

शब्दांचे नाते
नांदे जिव्हेसंगे
मनासवे रंगे
माैन परि ॥

कविता

असा भास होतो

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
20 Jun 2020 - 2:26 pm

आभास होतो कसा त्रास होतो
तू येत आहे असा भास होतो

स्मरतो गजरा केसात माळलेला
माझा कसा मोगरा श्वास होतो

डोळ्यात जादू तिच्या पेरलेली
जो पाहतो तो तिचा दास होतो

कळायचे मला ती न बोलताही
साथी कधी तोच मी खास होतो

असे कुणी का इतके आवडावे
जो जीवनाचा खरा ध्यास होतो

कवितागझल

रूटीनाच्या रेट्यातही

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
20 Jun 2020 - 11:26 am

रूटीनाच्या रेट्यातही
कधी थोडं वेडं व्हावं
दवबिंदूत इवल्या
ओलं ओलंचिंब व्हावं

कानठळी कोलाहली
अंतर्नादी गाणं गावं
प्रमेयाच्या पंखाखाली
व्यत्यासांना विसरावं

चारोळीनं महाकाव्य
पचवून ढेकरावं
धीट शून्यानं शतदा
अनंताला हाकारावं

मुक्त कविताकविता

अंतर

aanandinee's picture
aanandinee in जे न देखे रवी...
18 Jun 2020 - 11:57 am

तुझं माझं हे दूर असणं
जसे नकाशावरचे दोन ठिपके.
आठवण करून द्यायला जणू,
की कितीही म्हटलं तरी झालोय परके.

तुझ्या माझ्या ठिपक्यांना, जोडणारी ती रेषा
नकाशात ती दोघांमधलं अंतर दाखवते.
पण सरळसोट नाहीच ती,
नात्यांसारखी तीसुद्धा नागमोडी वळते.

मला त्यात नात्याची एक उसवलेली वीण दिसते...

डॉ. माधुरी ठाकूर

भावकवितावाङ्मयकविता

भावंडं

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
17 Jun 2020 - 10:43 pm

'निसर्ग' वादळाचे तांडव आणि झाडं यांच्यातलं युद्ध मांडायचा एक छोटासा प्रयत्न...

।। भावंडं ।।

उन्हातान्हात राबायची
त्यांच्यासमोर वाकायची
घामावर पोसतापोसता
गडीमाणसं रापायची

तुकडा तुकडा ऊन खायची
घोट घोट सावली प्यायची
सुखदुःख कष्टात मिसळून
मजुरीही तरतरुन यायची

नावं ठेवली होती त्यांना
अर्थबिर्थ नव्हता तरीही
कळत होत्या हाका त्यांना
प्रेमाSनं 'ओ' म्हणायची

छप्पर होऊन छायेत मावली
खिशांमधल्या मायेत दिसली
अन्न होऊन कायेत मुरली
श्वास बनून प्राणांत विरली

कविता

दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.

कौस्तुभ भोसले's picture
कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी...
17 Jun 2020 - 4:24 pm

दोघांत सांडलेला अंधार मी गिळालो.
चंद्रास वाहिलेल्या रात्रीस मी मिळालो.
काळीज फाटले तेव्हा आसवे गळाली.
हा काळ त्या स्मृतींचा सोडून मी पळालो.

पाऊस वाजताना पाण्यात मी भिजावे.
तेव्हाच वाटलेले वाहून दु:ख जावे.
अस्तित्व सांधताना अंधारली निळाई.
विश्रब्ध वेदनांच्या ओघात मी जळालो.

माझ्याच भावनांना माझाच स्पर्श झाला.
संदिग्ध जाणिवांचा आकांत फार झाला.
हे फोल खेळ सारे प्रारब्ध झाकण्याचे.
स्वप्नांध प्राक्तनांना मोडून मी निघालो.

-कौस्तुभ
वृत्त- आनंदकंद

आनंदकंद वृत्तकविता माझीमाझी कवितावृत्तबद्ध कविताकलाकविता

कळ्या..

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
17 Jun 2020 - 1:50 pm

जपल्या होत्या
ओंजळ भरून कळ्या
परसातील वेलीवर
तुला फुले देण्यासाठी

दंवाचे माळून मोती
लेऊन वसने अंगभर
सोनेरी किरणांची
सजल्या होत्या कळ्या

पाकळ्या पाकळ्यांत
भरून गडद रंग
करून साठवण सुगंधाची
कळ्यांचे फुले झाली

भरली ओंजळ रिते अंगण
आणि दारावर मोठे कुलूप
गाव सोडून गेलेली तू
आत्ताच कळले मला

हातातली फुले
आपसूक सांडली
अंगण भर त्यांनी
रांगोळी मांडली

झेलत मा‍झ्या आसवांचे मोती
क्षणात फुल झाली निर्माल्य
फुले नव्हतीच ती
कोमेजली प्रीतीच माझी...

कवितामुक्तक

ती कळ्या देऊन गेली..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
16 Jun 2020 - 12:42 pm

ती कळ्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली...

कवडसे तिरपे उन्हाचे सांडलेले
गणित वेळेचे प्रयत्ने मांडलेले
छेद त्या देऊन गेली, चांदणे घेऊन गेली..

शब्द होते, सूर होते भोवताली
गीत जुळले अन् अचानक सांज झाली
गझल ती ठेवून गेली, चांदणे घेऊन गेली..

क्षण जरी गेले उडोनी कापुराचे
दरवळे पण दार अजुनी गोपुराचे
कोपरा उजळून गेली, चांदणे घेऊन गेली..

कविता

तू गेल्यावर

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
16 Jun 2020 - 10:50 am

नाही वेलीवर फुल उमलले तू गेल्यावर
कुंडी मधले रोपही सुकले तू गेल्यावर

पाणी नाही रखरख आपले शिवार झाले
मेघ गरजले नाही बरसले तू गेल्यावर

तुळशी वाचून उदास नुसते अंगण दिसते
कुठे रांगोळी नाही सजले तू गेल्यावर

ओळख माझी तुझ्या मुळेच ही जगास झाली
माझे असणे मागे हरवले तू गेल्यावर

भात शिजून ना दरवळ आला संध्याकाळी
नाही चुलीला त्या पेटवले तू गेल्यावर

एकांती मी स्तब्धच बसतो नदी काठावर
नाही कुणी मग मला शोधले तू गेल्यावर

घरपण घराचे निघून गेले कळा लागली
माझ्या सवे छत रडू लागले तू गेल्यावर

कवितागझल

अस्पर्शिता..

सस्नेह's picture
सस्नेह in जे न देखे रवी...
15 Jun 2020 - 11:46 am

अस्पर्शिता एक राधा मानसीं दडून आहे..
रिक्त रुक्ष ओंजळीच्या रसतळीं भरुन वाहे..
वठला जरी तरु तो वैशाख अग्निदाहे..
नि:शब्द भावनांचे तृण-अंकुर गर्भि वाहे..
वनवास वाटचाल पायातळीं निखारे..
अंतरी परि चित्ताच्या श्रीहरी नित्य पाहे..
होरपळे तनु विरहाचा वैशाख-दाह साहे...
हृदयी परि गोविंद मीलनाची आस आहे..

gazalसंस्कृतीकवितामुक्तक