भावंडं

मायमराठी's picture
मायमराठी in जे न देखे रवी...
17 Jun 2020 - 10:43 pm

'निसर्ग' वादळाचे तांडव आणि झाडं यांच्यातलं युद्ध मांडायचा एक छोटासा प्रयत्न...

।। भावंडं ।।

उन्हातान्हात राबायची
त्यांच्यासमोर वाकायची
घामावर पोसतापोसता
गडीमाणसं रापायची

तुकडा तुकडा ऊन खायची
घोट घोट सावली प्यायची
सुखदुःख कष्टात मिसळून
मजुरीही तरतरुन यायची

नावं ठेवली होती त्यांना
अर्थबिर्थ नव्हता तरीही
कळत होत्या हाका त्यांना
प्रेमाSनं 'ओ' म्हणायची

छप्पर होऊन छायेत मावली
खिशांमधल्या मायेत दिसली
अन्न होऊन कायेत मुरली
श्वास बनून प्राणांत विरली

परवाही पर्वा न करता
"निसर्गा"शी झुंजत होती
विव्हळत होती कण्हत होती
वाकता वाकता मोडत होती

सड्यांचे सोहळे संपले
ऊर्जेचे उत्सव नुरले
चैतन्याचे चेव थांबले
भारवाही भीष्म उरले

कंपित होते नभ सारे
थरथरते सारे किनारे
बघत होत्या लाटा सर्व
अस्त होणारे हरितपर्व

घरा आसपास देह त्यांचे
जुनकोवळे हिरवळलेले
अस्ताव्यस्त असून देखील
अवयवदान केलेले

प्राण अजून गेला नव्हता
जोश पूर्ण ओसरला होता
हिरवी नाती तुटून जाता
पाऊस आमच्या डोळ्यांत होता

फिकी फिकी हसली होती
छपरांबद्दल दुःखी होती
पंचमहाभूतांना त्यांचा
वाटा घ्यायला सांगत होती

हात हाती घेतला होता
प्रत्येक अवयव बोलत होता
घराकडे बघता बघता
श्वास शेवटचा घेतला होता

आता त्यांना जाळायचं?
का किलोवर विकायचं?
चुलीत ढकलून शिजवायचं?
का भिंतींवर टांगायचं?

झुळूक तशी आजही येते
निरोप नाही रिकामीच येते
समुद्राला बिलगून आहे
माती अजून रडते आहे

अंगणात आमच्या संत होते
पुण्याईला साठवत होते
उशीरा कळून खंत वाटते
तेच आम्हाला सांभाळत होते

वडिलांनी पेरली होती
आईने सावरली होती
तशी आमची 'भावंडंच' ती
आमच्यासोबत वाढली होती.

- अभिजीत श्रीहरी जोगळेकर
१०/०६/२०२०

कविता

प्रतिक्रिया

वीणा३'s picture

18 Jun 2020 - 2:00 am | वीणा३

:(, केळशी दापोली ला पाऊस वादळाने झालेलं नुकसान बघितल, खूप वाईट वाटलं. प्रत्येक दारातली झाडं पडली होती, छपरं उडाली होती :( :(

मन्या ऽ's picture

21 Jun 2020 - 11:34 am | मन्या ऽ

छान तरी कसे म्हणु? .. :(