एक संध्याकाळ कवितेची…..

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
19 Jul 2020 - 3:43 pm

कार्यक्रम कसला? कविता वाचनाचा, कोण वाचणार कविता तर कवियत्री नीरजा, सो’कुल’ सोनाली कुलकर्णी, सौमित्र उर्फ किशोर कदम, प्रतिक्षा लोणकर, मुक्ता बर्वे, मिलिंद जोशी, हास्यकवी अशोक नायगांवकर आणि…. आणि…. नाना पाटेकर. ही अशी नाव लोकसत्ताच्या ‘अभिजात’ म्हणून सुरु झालेल्या उपक्रमाविषयीच्या ‘एक संध्याकाळ कवितेची’ नावाच्या कार्यक्रमाची माहिती पहिल्या पानावर बघितल्यावरच या कार्यक्रमाला जायला पाहिजे असं मनात पक्क झालं, पण कार्यक्रम आहे कुठे? तर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह घोडबंदर रोड ठाणे, हे ठिकाण काम करत असलेल्या ऑफिसपासून दहा मिनिटावर रिक्षाने, त्यामुळे जायचं अजून पक्क झालं. आणि या सगळ्यात महत्तवाची गोष्ट हा कार्यक्रम मोफत होता. हो! हेच सगळ्यात महत्तवाचं! हयामुळेच कार्यक्रम बघायला येणा-याची गर्दी होणार ही शक्यता वाढली होती, त्यातल्या त्यात जमेची बाजू ही होती की शुक्रवार होता… .त्यामुळे सुटटीच्या वारी होणारी वाढीव जमाव- गर्दी होणारं नसल्याचं कळतं होतं. या सगळ्या कार्यक्रमाला मराठी भाषादिनाचं निमित्त होतं…. मराठी भाषादिन झाला एक दिवस अगोदर… आज तारीख अठठावीस फ्रेबुवारी.

शुक्रवार सकाळी कामावर गेल्यापासूनच, आज संध्याकाळी कार्यक्रमाला जाऊ का नको याबादल शाशंक होतो, नाही म्हटलं तरी कार्यक्रम संपायला रात्रीचे नऊ-दहा वाजतील, आणि कार्यक्रमस्थळावरुन घरी जायला तिथून एक तास… पार घोडबंदर रोडवरुन ठाणे रेल्वे स्टेशन गाठेपर्यंत…. आणि तिथून ट्रेन पकडून घरी जाईपर्यंत. त्यामुळेच, जाऊ का नको? असंच सारखं मनात येत होतं. पण नाना पाटेकरला प्रत्यक्ष बघायची खुमखुमी होती आणि कार्यक्रम मोफत होता. जाऊ च्यायला… पुन्हा कधी असा चान्स भेटणारं… आता मनाला नवीन कारण भेटलं होतं. पण एक मन सारखं म्हणत होतं. काय करायचं जाऊन? कवितेत काय असतं एवढं? आपल्याला काही एक कळतं नाही त्यातलं… पुन्हा मनाने कच खाली… च्यायला नाय जात… एवढं काय सेलिब्रिटी लोकांना बघायचं… आणि कविता ऐकायच्याच तर मग… नंतर होईल की कार्यक्रम टी.व्हीवर प्रक्षेपित… जावं का?…. की जावू नये?… याशिवाय अजून एक शंका मनात घर करत होती ती म्हणजे, संध्याकाळी सहाचा कार्यक्रम होता, मोफत तिकीटविक्री कांऊटरवर साडेपाचला सुरु होणार होती, अश्याप्रकारची माहिती लोकसत्तात वाचली होती… म्हणजे लोक लाईन लावतील…. आपण काय पाच वाजल्याशिवाय ऑफिसमधून निघू शकत नाही…. आणि आपण तिथं पोचलो… आणि नेमकी लाईनतली तिकीट संपली तर… आणि वापस पचका होऊन तिथून माघारी निघायचं…. मनात काही पक्कं ठरत नव्हतं… जावं का नाही जावं?… सारखं मनात येतं होतं…

मग एकदाचा पाच दहाला आफिसातून निघालो, रिक्षा पकडली आणि पाच पंचवीसला नाट्यगृहाच्या बाहेर…!!! माझा अंदाज साफ चुकला होता, ही तोबा गर्दी होती, खूप सारी माणसं, तिकीट कांऊटरची लाईन… न संपणारी….फिरुन फिरुन…तीन-चार रेषा गुंडाळीत बनलेल्या रांगेत उभा राहिलो…... रांग फिरु लागली… साधारण तीनशे माणसं पुढे असतील माझ्या. तरी मनात होतं की आपल्याला तिकीट नक्की भेटेल. लाईन पुढे पुढे चालत असताना या कार्यक्रमाच्या प्रायोजकांनी वाटेलेली त्यांच्या जाहिरातीची प्रत्रक त्या सगळ्या भागात जमिनिवर पडलेली दिसली. खूप सा-या लोकांच्या हातात ही ती पत्रक असलेली दिसली. एकूण त्या गर्दीचं वय बघितलं तर… लोक तीन वाजल्यापासूनच कार्यक्रमास्थळी आल्याचं कळत होतं. तिकीटविक्री मात्र आताच सुरु केल्याचं कळलं. ज्येष्ठ नागरिकाचां भरणा जास्त होता. उत्साह मात्र प्रंचड होता. खूप सारी लोकं नटून-थटून आली होती. तिथं त्या लाईनीत तीन-चार वेळा मोठया रेषेत करावी लागणारी भ्रमणं काहीच्या तब्येतीशी जुळणार नसली तरी कार्यक्रमाच्या हौशेपोटी लोक सगळं सहन करत होते. पाय-या उतरण्या-चढण्याचा प्रकार ही करावा लागतं होता. काहीजण हातातला मोबाईल बाहेर काढतं, हे सगळं शूट करत होते. तिथला तो एकमेव सिक्युरिटी गार्ड जमेल तेवढे प्रयत्न करत होता रांग सुरळीत लागावी यासाठी. या सगळ्या भ्रमण प्रकारात मनात सारखं येतं होतं…. तिकीट भेटेल का नाही?…. भेटेल का नाही?…. मन आणि डोकं दोन्हीची मत एक होवून एक कल देतं होतेचं…. झालं….. नेमका माझा निराशावादी अंदाज बरोबर आला, माझ्यापुढे लाईनीत तीस-एक लोक उभे असताना कार्यक्रम “हाऊसफुल्ल” झाल्याची कुजबूज ऐकू आली, पण मनात येत होतं..... काही नाही भेटेल तिकीट…. हळूहळू रांग पुढे सरकू लागली… एक कोपरा होता… नव्वद अंशातला…..तो पार केला की तिकीट कांऊटर… जसा जसा पुढे जाऊ लागलो… तो काटकोन पार केला आणि…. समोरच्या खांबाला हाऊसफुल्लची पाटी टांगलेली दिसली… ”धन्यवाद” लिहिलेली… माझ्यापुढे आता केवळं पाच-सहा लोक उभे होते. ते नुसतेच कांऊटरवर जाऊन कांऊटरधारकाचं तोंड बघत….. न काढता येणारी पाऊल झटकत….. झटकत….. नाईलाजाने का होईना… बिना तिकीटीशिवाय… हिरमूसून….त्या कांऊटरपासून दूर होत होती. तिथचं उभा असलेला एक माणूस म्हणत होता “अहो टिकीटस तर केव्हाच संपल्यात, लोक उगाच कांऊटरवर येतायतं… कशाला रांग लावलीय देव जाणे” आता माझी वेळ आली कांऊटरवर जायची, त्या कांऊटरवरच्या खिडकीपलीकडचा माणूस सांगत होता “पासेस म्हणजेच तिकीट संपलेयत, आम्ही काय करणार?” आता मीही लाईन बाहेर आलो, त्या लाईनीकडे पाहत होतो. ती तशीच होती… कुणीही सांगत नव्हतं की लाईन लावू नका… तिकीट… पास.. संपलेत…. मीपण तसाच… पुढच्या काही मिनिटातच रांग पांगली…. माझा तर प्रंचड भ्रमनिरास झाला. काही वेळापूर्वी आपल्या डोळ्यापुढे काय काय तरळत होतं. आपण मस्तपैकी आत जाऊ…खुर्चीत बसून कविता ऐकू….सेलिब्रिटीनां पाहू…. सगळा बटयाबोळ झाला होता…..

वेळ पाच वाजून पन्नास मिनिट झाली होती… माझ्यासारखीचं खूप सारी माणसं होती ज्यांना तिकीट-पास भेटला नव्हता. हो खूप सारी…. ज्यांच्याजवळ तिकीट-पास होते त्यांना आत सोडलं जात होतं… गेटवरुन.... गेटवरचा कर्मचारी आपलं काम इमान-ईताबारे करत होता. त्यांच्यासोबत एक महिला कर्मचारी ही होती. आता त्या हिरमुसलेल्या लोकांचा मोर्चा प्रवेश्याच्या गेटजवळ जमू लागला, मी ही आता तिथचं गेटपाशी उभा राहिलो. त्या गेटपलीकडे, काशिनाथ घाणेकराचं… तैलचित्रं…. बाळासाहेब ठाकरेचं तैलचित्रं…. ती संपूर्ण पाहता येतं नव्हती. साधारणं पुढच्या दहा मिनिटातच शंभर-एक माणसं तिथं जमा झाली. एका सदगृहस्थाचां आवाज पहाडी होता, ते त्या गेटच्या बाहेरुन जोरात खेकसले “अरे मॅनेजरला बाहेर बोलवा… तिकीट संपातात म्हणजे काय…. इथं लोक लांबून लांबून आलीयत…. खूप सारे ज्येष्ठ नागरिक आहेत… हे असं तुमचं बकवास मॅनेजमेंट…. कुठेयतं गिरीश कुबेर….. बोलवा…बोलवा त्यांना बाहेर….”. आता माझ्यासकट त्या बाकीच्या तिकीट न भेटलेल्या लोकांना हुरुप आला, कुणीतरी हे बोलायला हवं होतं…. आणि ‘ते’ ते बोलत होते….. लगेचच… लोकांनी… लोकसत्ता हाय….! हाय…! चे नारे दयायला सुरवात केले. ‘गिरीश कुबेर बाहेर या’च्या आरोळ्या सुरु झाल्या. अरे जर बाराशे लोकाच्या बसायची व्यवस्था असलेलं थिएटर आहे तर फक्त पाचशेच पास कसे वाटले गेलेयतं?… बाकीचे पास कुठे गेलेत?…. लोकांची कुजबूज वाढत होतीच. जो तो त्या गेटच्या आत जायचा प्रयत्न करत होता… आणि गेटकीपर त्यांना रोखत होता. काही जणानीं आपल्या हातातलं प्रेसकार्ड पुढे करत…. पत्रकार असल्याचं सांगत आत जाण्यासाठी पाऊल टाकलं तर त्यांनाही जाऊ दिलं नाही…. यांचा अर्थ एक होता की कार्यक्रम रंगतदार असणार होता… त्यामुळेच उत्सुकतेपोटी लोकं ही अशी हददपार करत होते. पास न भेटलेल्यांना पास असणा-याचा हेवा ही वाट होता, आणि त्यांच्याकडचा पास काढून घेऊन आपण आत प्रवेश करावा अशी लालसा ही उत्पन्न होतं होती….

PUBLIC VIEW

लोक आता तो लोखंडी गेट जोरजोरात वाजवू लागले, ते मघाचेच गृहस्थ अजून जोरात बोलत सुटले “अरे मटावाले बघा कसे कार्यक्रम आयोजित करतात…. शिका जरा त्यांच्याकडून…”. त्यांच्या बोलण्यानं काही महिलांना ताकद आली त्याही मग बोलायला लागल्या, “अहो बघा आतमध्ये सीट खाली आहेत…. मला आतल्या लोकांनी व्हॉटसअप केलयं….”

“पासवाल्याना का आत सोडताय….” त्या गेटबाहेरच्या लोकांचा आवाज वाढतच होता,

“अहो लोकं खाली बसून कार्यक्रम बघतिलं.. तुम्ही आतमध्ये तर सोडा….”.

“लोकसत्ता शेम शेम…. गिरीश कुबेर बाहेर या…. मॅनेजर बाहेर या….”

या सगळ्या कल्लोळाला थोडासा मिश्कीलतेचा स्पर्श होता….

“नाना पाटेकरांना बोलवा….“ असंही ओरडत होते, आणि तिथल्या तिथं हलकीशी हास्याची लकेर ही पसरली होती.

आता वाजले सहा पंचवीस…. आतून काहीच प्रतिक्रिया….. आतून म्हणजे आयोजकांकडून येत नव्हती…. ज्यांच्याजवळ पास होता त्यांना मात्र त्या गेटवरच्या लोकांच्या घोळक्यातून आत शिरताना प्रंचड कसरत करावी लागत होती,……प्रत्येक तिकीटधारी माणसाला आत सोडताना मोठयाने आरोळ्या दिल्या जात होत्या….. त्या आरोळ्यामध्ये मी कुठेच ओरडलो नव्हतो…. आता थोडयावेळात उदास मनाने ईथून जावं लागणारं…. असचं वाटतं… होतं….

आता लोकं, गेटपाशी हमरीतुमरीवर आली. गेटपाशी तिकीट न भेटलेल्यांची दाटी वाढतच जाऊ लागली. गेटकीपर कार्यतत्पर होता. तो पास चेक करुनच आत सोडत होता. पास असण-याला त्या पास नसण-या लोकांमधून जाणं मुश्कील झालं. तिथली ती महिला कर्मचारी काकुळतीला येऊन लोकांना गेटपासून दुर जाण्यासाठी सांगत होती. पण लोक झाट ऐकून घेत नव्हते. एका क्षणाला वाटायला लागलं की आता खरचं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहतो की काय? सुशिक्षित आणि सभ्येतेचे बुरखे पाडले जात होते. या सगळ्यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर होते. ट्रेनच्या रेटारेटीचा अनुभव गाठीशी असलेली ही लोक आपल्या लोकलीय जमातीचा धक्काधक्कीचा नवा अविष्कार इथे करु पाहत होते का कोण जाणे? त्यांचाच प्रत्यय तिथं येत होता. लोक म्हणत होते पासवाल्या एकाला ही सोडू नका. आणि तो गेटकीपर चेव आणीत म्हणत होता, “मी पास आहे त्यांना सोडणार… काय करायचं ते करा…..”, आता माहौल अधिकच गंभीर बनत चालला होता. रेटारेटी वाढत होती, तिकडे दिल्लीत दंगलीचा प्रकार ताजा होता इथं मात्र जगण्यात त्यांचा टिपूसभर मागमूसही नव्हता, फक्त कुणीही हे सगळं शूट करायला मोबाईल काढल्याचं तेवढं दिसलं नाही….

आता गिरीश कुबेराचा निषेध असो….चे नारे वाढले…. त्यांच्या अग्रलेखांच्या विरोधातला रागही असू शकतो…. का कोण जाणे?…. गिरीश कुबेरांचा निषेध करायला भेटतोय यातचं काही चेहरे आंनदी झाले होते. मॅनेजरला बोलवण्याचा तगादा वाढला, त्यातही एखादा त्यांचा माणूस येई…. आणि… “तिकीटीच संपल्या तर आम्ही काय करणार”चं पुराणं लावून बसला. लोक त्याला खिजगणीतही पकडत नव्हते, मला या सगळ्याचा काही शेवट दिसत नव्हता, व्यवस्थेचे वाभाडे करणारी पत्रकारिता स्वतःही काही वेगळी राहू शकत नाही याचाचं तर दाखला होता. लोकं त्या पासाच्या संख्येचं आणि नाट्यगृहयाच्या सीटचं गणित मांडत बसली होती.

“लोकांना काय….जमिनीवर बसून बघतिलं…..आत तर सोडा….यांच्या अगोदर काय हाऊसफुल्ल कार्यक्रम झाले नाहीत काय?” ची कूजबूज वाढू लागली. कविता वाचनाचा कार्यक्रम राहिला बाजूला आणि इथं हा तमाशा बघायला भेटत होता. यातही काहीजण नवीन नवीन निषेधाचे प्रकार सुचवू पाहत होते. आपण ना त्या दुस-या गेटपाशी जाऊ… तिथून कलाकाराची गाडी येईल…. मग त्यांना कळेल…. इकडे काय गोंधळ चालू आहे ते…. पण तसं काही झालं नाही….

यात ही काही व्हीआयपी माणसं होती… ज्यांना केवळ कुणाचं तरी नाव सांगितल्यावर आत सोडलं जात होतं… विना पासेसचं…. ‘साला आपली पण अशी ओळख पाहिजे होती’चा फिल येत होता… हो कितीपण चुकीचं असलं तरी पण….

या सगळ्यात मघाशी माझ्या मागे लाईनीत उभे असलेले चेहरे आता पास घेऊन आत जाताना दिसले… यांना पास कुणी दिले…. आता काहीजण गेटच्या आतून पास बाहेर आपल्या ओळखीच्याना देत होते….हे सगळं लोकांच्या नजरेस पडल्यावर त्यांनी जोरात कोलाहल केला…. ज्यांनी हे पासेस ‘घेतले-दिले’ त्या दोघांनाही खजील झाल्यासारखं वाटत होतं….

आता यांचा शेवट काय होईल…. एखादया फिल्मी सीन सारखं…. नाना पाटेकर येतील, ते काही डायलॉग बोलतील…आणि लोकं ते मान्य करतील… असं काही तरी… पण तसं काही झालं नाही…

राहून राहून वाटत होतं की आपण काहीचं प्रतिक्रिया देत नाही आहोत….तिथल्या कुठल्याचं घोषणेत आवाज मिसळत नाही आहोत… मग काहीतरी करायला तर हवं…. आपलं मत मांडायला हवं…. असा विचार करत लोकसत्ताच्या टिविटर हॅडलवर गेलो…. काशिनाथच्या बाहेरची हालत बघा…. टीवीट केलं…. आता माझी जबाबदारी संपली होती….

इतक्यात गेटच्या आतून काही माणसं सांगण्यासाठी गेटपाशी आली, आता लोक आपआपसांत एकमेंकाला शांत करायचा प्रयत्न करु लागले “हे बघा सगळ्या जागा फुल झाल्यात, तुमची खालती बसायची तयारी आहे का?” लोकांनी ‘हो’ म्हटलं.

“आम्हाला दहा मिनिटं दया आम्ही नियोजन करुन तुम्हाला आत सोडतो….”

लगेच “गिरीश कुबेर जिंदाबाद”च्या घोषणा दयायला सुरवात केली, मघासपासून हिरमुसलेलें चेहरे खुलले… काहीतरी मिळवल्याचं सुख प्रत्येकाच्या चेह-यावर दिसत होतं….

आता लोकांना दोन दोनच्या रांगा करायला सांगितलं गेलं. पण लोक मुळीच रांग लावायच्या मूडमध्ये नव्हती, त्यांना धुसमुसळेपणाची सवय झालीय. यांतही प्रामुख्याने ज्येष्ठ नागिरक होते. आपल्याला मधुमेह आहे, आपल्याला हदयविकाराचा झटका आलाय, आपल्या शरीराला ही हेळसांड जमणार नाही असा कसलाही विचार करत नव्हती. आता खूप सारी लोक आत जात होती. मी ही जात होतो, तितक्यात बाजूचा गेट तत्परतेने खोलण्यासाठी गेटकीपर सरसावला, मागे वळून बघितलं, महापौर होते, त्यांनीही “पाहिलं यांना जाऊ दयायचं“ सांगितलं, यांनी आपल्या पोटाचं आपरेशन केल्याचं ऐकलं होतं, पूर्वी टी.व्हीवरच्या चर्चेत यायचे तेव्हा आणि आता खूपच फरक पडला….

एकदाचा आता प्रवेश मिळाला…. खाली बसून का होईना… कार्यक्रम बघायला भेटणार याचं सुख मनाशी होतं… मघाशी अर्ध दिसणारं काशिनाथ घाणेकराचं… ते तैलचित्र पूर्ण दिसलं… बाकी इतरंही होती… पण कधी एकदा वरती जाऊन जागा पकडतोय असं झालं… पण नंतर डोक्यात काही आलं…. नी बाथरुम गाठलं… सगळे विधी आटोपले… यात नाही म्हटलं तरी दहा मिनिट गेली… नंतर आत जायला जाणारं तसं तिथचं प्रायोजकांनी कांऊटर लावले होते, त्यात एक खादयपदार्थ विकणारा स्टॉल होता… या सा-याकडे दुर्लक्ष केलं…. सरळं आत घुसलो… अजूनही लोक जागेच्या शोधात होते…. पण खाली सीट कुठेही दिसत नव्हती…. त्या जायच्या-यायच्या मोठाल्या पॅसेजमध्येच लोक थपकान घालून बसले होते… ती प्रक्रिया ही आता शेवटाकडे यायला लागायच्या आत मी बसलो…. समोर नजर गेली… इथूनही चांगल स्पष्ट दिसत होतं…

FRONT VIEW

रंगमंचावर… रिकाम्या खुर्च्या होत्या, त्यांच्या पाठीमागे विं. दा. करंदीकर, नामदेव ढसाळ, कुसमाग्रज, सुरेश भट यांची रेषात रेखाटलेली चित्र होती… मी पोचलो तेव्हा कुबेराचं निवेदन संपल होतं… त्यांनी कार्यक्रमाची सूत्र ‘कुणाल रेगे’ नावाच्या मुलाखतकार कम निवेदकाकडे दिली…. एकदा आजूबाजूला नजर फिरवली नुसती माणसचं माणसं… काही जणं नुसतीच भिंतीचा टेकू करुन उभी राहिलेली…. आता माझ्या पाठी मागे बसण्या-यांची गर्दी वाढत चालली होती…

कवितावाचनाचा कार्यक्रम सुरु झाला, आपल्याला आवडलेल्या कवी किंवा कवियत्रीची एक कविता आणि आपली कविता…. असं साधारण स्वरुप होतं… पहिल्या कवियत्री नीरजा आल्या, त्यांनी नामदेव ढसाळांची कविता सादर केली… सध्याच्या क्रेंद सरकार बदलच्या त्यांच्या भूमिकेला साजेशी अशी ती कविता होती असं मला तरी वाटून गेलं… लोकांनी भरभरुन दाद दिली…. हयात सीएए, एनआरसी, आंदोलन, जाळपोळ, दंगे सगळंच आलं. निवेदक मध्ये मध्ये त्यांच्याबदलही लोकांना सांगत होताच, त्यांची पार्श्वभूमी… कविता… याबदलचं बोलणं चालू होतं…

मग त्यानंतर आली मुक्ता बर्वे आणि मिलिदं जोशी… मुक्ता बर्वेने वातावरणाचा नूरच बदलून टाकला, स्वतःला कविता तितकीशी काही करता येत नाही असं प्रांजळपणे कबूल केलं. आणि आपल्या कविता लोकांना जमवून जमवून ऐकवाव्या लागतात, त्यामुळे इतक्या लोकांसमोर कविता ऐकवण्याचा चान्स मी काही सोडणार नाही असं म्हणतातच… एकच हशा पिकला… तिनं सादर केलेल्या एका ‘स्त्री’ बदलच्या जुन्या कवितेला आजही तशीच परिस्थती असल्याचं समजून आल्यावर लोकांनी वन्समोअरची दाद दिली, त्यानंतर तिनं आपली…सावली नावाची कविता सादर केली… मिलिंद जोशी…यांनी गात गात कविता सादर केली… कविता स्फुरण्याबदलची कविता… कुणा पटो वा ना पटो… कविता… लोकांच्या चेह-यवार मिश्कील हसू आलं…लोकांना आता झिंग चढत होती…

मांडी घालून बसायचा कंटाळा आला की मांडी मोडायचो आणि पाय मोकळे करायचो, पाठीला जरासाही टेकू नसल्यामुळे सारखं सावरुन बसावं लागत होतं…. असं वाटत होतं असचं पाय मोकळे करत पार ताणून देत या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा…. नंतर आले सोनाली कुलकर्णी आणि किशोर कदम…. आम्ही दोघं एकाच गुरुचे चेले असूनही एकत्र काम करण्याचा योग अदयाप न आल्याची खंत किशोर सांगत होता, आणि एकदा आलेला चान्स आपल्यामुळे गेला यांची त्याने जाहीर कबूली दिली…..सुरवातीला सोनालीने कविता वाचायला सुरवात केली…. तिच्या ‘ग्राभीच्या पाऊस’ सिनेमाच्या वेळी तिथं पार विर्दभातल्या शेतक-याच्या आत्महत्याग्रस्त महिल्याच्या बददलची कविता…. याशिवाय आणखीन एक कविता तिंन लिहून आणली होती ती वाचावी का नाही यांचा संभ्रम होता… तिनं ती वाचली… नंतर किशोर… म्हणजे सौमित्रने कविता सुरु केली… ते त्याचं होमपीच असल्या सारखा तो सुटला…. रसिकाचं दाद देणं सुरु होतं…. सौमित्रनं आपला ‘बाऊल’ नावाचा कवितासंग्रह सोनालीला दिला….

मला या कवितेतलं थोडं थोडं कळतं होतं आणि खूप सारं डोक्यावरुन जातं होतं… काही जण या बोलत असलेल्या कविता त्या प्रायोजकांनी दिलेल्या कागदावर पटापटा गिरवत होते…. तर काही जण मोबाईलच्या कॅमेरत शूट करत होते…

त्यानंतर आले हास्यकवी अशोक नायगांवकर…. येता येताच आजूबाजूचे सगळेच गंभीर चेहरे अचानक खुलायला लागले… निवेदकाने काही बोलायच्या अगोदर आपल्या नेहमीच्या शैलीतल्या सुरवातीच्या काही वाक्यातच त्यांनी अख्ख्या कार्यक्रमाचा नूरच पालटून टाकला…. पाठीमागे असलेल्या कवीच्या फोटोकडें पाहत… नामदेव ढसाळाबदल सांगू लागले… मी आणि नामदेव… नाम्या… एकमेकांच्या घरी कितीवेळा जेवलो.. त्यांची आई, जेवण करुन घालायची… नाम्या माझ्या घरी यायचा… त्यांच्यासोबत मुंबईच्या झोपडपटया, अख्ख्या महाराष्ट्र पालथा घालयचो… नंतर नंतर मी हास्य कविता करायला लागल्यावर… हे काय करतो अशोक… म्हणारा नाम्या…

त्यानी एक कविता बाबासाहेब आंबेडकराना वाहिलेली…. लोकांनी दाद दिली….

तुम्हाला म्हणून सांगतो म्हणत… त्यांनी जो काही माहौल सजवला त्याला तोड नाही…हास्यफवारे, हास्याचे धुमारे… सारे काही दिसत होते…

हे सुरुच होतं, खूप वेळ सुरु होतं… कवितेची मेजवानी म्हणजे काय यांचा प्रत्यय तिथं प्रत्येकाला येतं होता, याला जोड होती अशोक नायगांवकर यांच्या खुमसदार खुशखुशीत बोलण्याच्या पदधतीची…. समोर ठेवलेल्या पाणी पिण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटलीकडे पाहत म्हणाले, “बघा काळ कसा पारदर्शक बनत चाललायं, नाहीतर पूर्वी तांब्या ठेवला जायचा, ताब्यांच्या आत काय ठेवलयं कुणाला ठाऊक?…. पाणी की दुसरचं काही…” पुन्हा हास्याचे फवारे सुरु झाले… ते मध्येच एखादी मुखोदगत कविता म्हणत… कविता नावाची गोष्ट आता येणा-या पिढीकडून सुटत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अशोक नायगांवकराच्या सोबत कविता सादर करण्यासाठी येणारी प्रतिक्षा लोणकर यांना यायला थोडा उशीर झाला आणि त्यांच्या ‘प्रतिक्षे’पायी मग रसिकांना जास्तीचे नायगांवकर ऐकायला मिळाले, नंतर थोडयावेळाने प्रतिक्षा आली तिने बहिणाबाईची कविता सादर केली. अशोक नायगांवकर आणि प्रतिक्षा यांच्या कविता संपल्या तश्या लोकांनी नायगांवकरासाठी जागेवरुन उठून दाद दिली… ते त्यांचे खरेच हक्कदार होते…

आता सगळ्यात शेवटी, ज्यांची ख-या अर्थाने लोक वाट बघत होते ते नाना पाटेकर रंगमंचावर अवतरणार होते, क्रार्यक्रमाची निवेदनाची सूत्र आता रेगेकडून कुबेरांनी घेतली, आणि नाना पाटेकर आले, टाळ्याचा कडकडाट वाढला. समोरच्या रसिकाकडे हात जोडून ते खुर्चीवर बसले, मग मुलाखत कम कविता वाचनाचा कार्यक्रम सुरु झाला, हा कार्यक्रम होण्यामागची घटना म्हणजे पाटेकरांनी एका रात्री कुबेंराना फोन करुन ऐकवलेली त्यांनी तेव्हा रचलेली कविता होती.

त्यांनी त्याची कविता सादर करायला सुरवात केली, आई गेल्यानंतरच्या या कार्यक्रमात आईविषयी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, इतकी वर्ष आईला मी नाही, आईने मला संभाळलं…. टाळ्याचा कडकडाट झाला, त्यांनी त्यांची एक कविता केली… त्यात एका ठिकाणी त्यांनी चुकून दोन हजारांच्या नोटेचा चुकीचा संदर्भ घेतला गेला जो खरं म्हणजे एक हजाराच्या नोटेबाबत यायला हवा होता, माझ्यासमवेत बहुतेक सगळ्याच्या ते लक्षात आलं पण कवितावाचन तोपर्यंत बरंच पुढं गेलं होतं… नाना पाटेकरांनी या कवितावाचनाच्या कार्यक्रमाचा त्यांचा उददेश निव्वळ वैयक्तिक असून, स्वतःच्या भावनानां वाट करुन देण्यासाठी असल्याचं सांगितलं, तिथं कविता वाचताना त्यांना त्या खुर्चीत बसलेलं, आणि तेही इतक्या तुंडुब भरलेल्या हॉलमध्ये… काहीसं अडखळल्या सारखं होतं होतं… बोलता बोलता ते म्हणाले “इथं पुरुष चा प्रयोग करायला हवा”….. त्यांना मुखोदगत असलेल्या आरती प्रभूच्या कविता त्यांनी बोलून दाखवल्या…. आणि एकूणच आपण म्हणजे मी स्वतः जो हा लेख लिहतोय तो या कविता या प्रांतापासून कोसे दूर असल्याची जाणीव झाली, गिरीश कुबेरांनी त्यांना कविता या विषयाला धरुन काही प्रश्न विचारले, काहीश्या नेहमीच्या आयुष्याच्या बदलच्या संकल्पना मांडत नाना पाटेकर यांनी उत्तर देत, कुठेतरी वेगळीकडेच आपली गाडी वळवत होते, तुम्ही ज्या संख्येने इथं आला आहात त्याचं ताकदीने आपली मत मांडत चला, व्यक्त व्हा… देशातला माहौल बघताच आहात… आता लागून गेलेल्या विधानसभा निकालानंतर कळालचं असेल, तुमच्या मताची काय किंमत ठेवली जातेय ते…. नंतर नंतर कुबेरांनी त्यांनी कविता या विषयावर आणायचा प्रयत्न केला, यातही पब्लिक डिंमाड नाना पाटेकरांनी “थोडा रुमानी हो जाए”, “घरमें हे सिर्फं छे लोग”… सादर केल्या…

CELB VIEW

यात जसे साडेनऊ वाजले तसे खूप सारेजण उठून जाऊ लागले, नाना पाटेकर कविता सादर करत असताना देखील… सातच्या आत घरात चा शिरस्ता आता साडेनऊच्या आत घरात वर गेल्याचा परिणाम किंचित का होऊना असू शकतो…. मघापासून जमिनीवर थपकान घालून बसलेले काहीजण आता त्या आसनाच्या हव्यासाने लगबगीने जाऊ लागले… शेवटी एकदाचा नाना पाटेकर यांचा कविता वाचनाचा कार्यक्रम संपला, मग सगळ्याच कलाकरांना रंगमंचावर बोलावलं, अशोक नायगांवकराचं विशेष कौतुक करत नाना पाटेकरांनी त्यांना आमचा “विस्फोटक ओपनर” म्हणत दाद दिली. एकदाचा कार्यक्रम संपला… आता आलो त्याचं गेटने बाहेर आलो…. सव्वा दहा वाजले होते…. पाऊल पटापटा टाकत बसस्टॉपच्या दिशेने वळालो… खूप सारी लोक जमा झाली होती… तिथंच एकजण होता त्यांच्या दुस-याशी पुढीलप्रमाणे संवाद सुरु होता…

एकजणःतुम्ही पण कविता करता काय?

दुसराः हा… माझा कवितासंग्रह प्रसिदध झालाय, त्याला नायगांवकर साहेबांची प्रस्तावना हाय…

एकजणः कामाला कुठं…?

दुसराःबीएमसी मध्ये…राहायला बोरवली…

एकजणःएवढं सगळं करता…चागलं हायं…कायतरी छंद असणं….

दुसराःपण घराच्यांनी कौतुक करायला पाहिजे ना… त्यांना याचं काही नाही….

हे ऐकत असताना, तितक्यात बस आली ठाणे स्टेशनला जाणारी, मस्त बसायला जागा मिळाली, बस तुंडूब भरली, आता त्या बसमध्ये त्या कार्यक्रमाबदलच बोलणं चालू होतं…

मी बसमध्ये बसल्या बसल्या ते संध्याकाळी केललं टीवट डिलीट केलं…. अनुभव म्हणून… हदयाच्या कप्प्यात खोलवर बंद करणारी संध्याकाळ दिल्याबदल… आयोजकाचें मनापासून आभार…

नंतर हा कार्यक्रम टी.व्ही.वर प्रक्षेपित झाल्यावर त्या कविता तुकडया तुकडया दाखवल्यामुळे… जो जिंवत कविता वाचनाचा आस्वाद घेतला त्यांची याला सर नाही…..

कविता समजून घेण्यासाठी लागणार मन आपल्याकडे नाही यांची जाणीव झाली, घरात असलेला एखाद दुसरा कवितासंग्रह पुन्हा वाचू लागलो पण या प्रकारातलं काहीच कळत नाही, नेमका आस्वाद घ्यायचा म्हणजे काय? तुम्ही त्या कवितेच्या ओळी तुम्हच्या आयुष्याशी, अनुभवाशी जोडून पाहायचा प्रयत्न करता.. पण नाही जमत… अश्यावेळी जो लहानपणापासूनचा एक संस्कार असायला हवा त्यांच्याबदल आठवू लागलो तर … घोकून घोकून पाठ करुन घेतलेल्या कविता आठवायचा प्रयत्न केला तर त्यातली एकही आठवत नव्हती… जगण्यातल्या रितेपणाची जाणीव पुन्हा एकदा झाली……………

………………………….समाप्त……………………………..

-लेखनवाला

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

कलाकविताअनुभव

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

19 Jul 2020 - 5:57 pm | प्राची अश्विनी

अनुभव छान लिहिलाय. हा कार्यक्रम मी सुद्धा पाहिला. चांगला झाला होता.

गणेशा's picture

19 Jul 2020 - 7:41 pm | गणेशा

वा मस्त लिहिलं आहे.

मोठ्या लोकांना मी आवर्जून भेटलेलो नाही कधी.. ती आवड नाही..

पण नायगावकर आणि नीरजा यांच्या भेट आठवली.. मस्त...

सिरुसेरि's picture

20 Jul 2020 - 3:22 pm | सिरुसेरि

रोचक वर्णन .