जाई बरसुनी मेघ
करी धरेशी सलगी
धरा येता मोहोरुनी
विरे मेघ तो बैरागी
आसुसल्या धरणीशी
गाठ पडता जळाची
बीज अंकुरुनी येई
कुस चिरीत आईची
हात जोडुनिया कोंब
सांगे भूमीचे मार्दव
जरा थांब क्षणभर
करी मेघाला आर्जव
वीण बांधुनी भुईशी
करी लवलव पाते
नवलाईचे हे बंध
झाले नव्हत्याचे होते
पूर्ण होता ऋतुचक्र
पुन्हा लागती डोहाळे
करी नेमाने तरीही
सृष्टी साजरे सोहळे
प्रतिक्रिया
23 Jul 2020 - 5:46 pm | प्रचेतस
अतीव सुंदर कविता.
23 Jul 2020 - 5:56 pm | गणेशा
अप्रतिम
हात जोडुनिया कोंब
सांगे भूमीचे मार्दव
जरा थांब क्षणभर
करी मेघाला आर्जव
वा.. मस्त..
अंकुर हात जोडून उभा आहे हि कल्पनाच खुप आवडली..
कविता खुप सुंदर नितळ.. मस्त
23 Jul 2020 - 6:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व जीवन-चराचर सृष्टीचा एक कालचक्राचा अर्थ यात दडला आहे, आवडल्या ओळी.
लिहिते राहा...........!
-दिलीप बिरुटे
23 Jul 2020 - 11:22 pm | सत्यजित...
सहज,सुंदर,समर्पक!
24 Jul 2020 - 11:32 am | रातराणी
फार सुरेख!!
24 Jul 2020 - 11:43 am | गवि
वाह. क्या बात है.
24 Jul 2020 - 12:03 pm | मी-दिपाली
सर्व वाचकांचे अन् प्रतिसाद देणाऱ्यांचे मनापासुन आभार _/\_
24 Jul 2020 - 12:27 pm | श्वेता२४
खूप आवडली