भाग 1 http://www.misalpav.com/node/20380
भाग 2 http://www.misalpav.com/node/20383
भाग 3 http://www.misalpav.com/node/20400
शास्त्रीजींनी पहिला पडाव ओंकारेश्वरहून १२ कि.मी. वर असलेल्या मोरटक्क्यात होईल असे सांगितले होते. मला असेही बसमध्ये बसून मोरटक्क्याहूनच पुढे जावे लागणार होते. त्याऐवजी शून्यासोबत चालत मोरटक्क्याला जाऊ आणि रात्री इंदूरला परत येऊ असे ठरवून घाट उतरायला सुरुवात केली.
..... पूर्वसूत्र
रस्त्यात बोलायला तोंड चालत नसेल तेव्हा खाण्यासाठी चालवावे म्हणून भाजलेल्या हरभर्याचा हिरवा टहाळ आणि केमिस्ट-कम-भजेवाल्याकडून स्वादिष्ट भजिये सोबत बांधून घेतले होते. भक्त निवासाची खोली तिथल्या औपचारिकता पूर्ण करुन नर्मदा पूजनाला निघतानाच सोडली होती. त्यामुळे आता आम्ही निघायला मोकळे होतो.
डाव्या बाजूच्या रस्त्याने नर्मदेच्या पात्रात उतरलो आणि आमच्या मागे वाळूत परिक्रमेची पावले सुटत जाऊ लागली. मागे दूरवर ओंकारेश्वराचे शुभ्र रंगातील शिखर चमकत लहान होत जात होते. काही अडचणी सोडता अखेर परिक्रमेला निर्विघ्न सुरुवात झाल्याने आत्मशून्य सुखावला होता.
भक्त निवासातून निघताना शेवटच्या क्षणीही आहे त्या स्थितीत परिक्रमेला निघण्यासाठी मी शेवटचे हातपाय मारुन पाहिले. ऑफिसला न कळवता एक दिवस इकडे थांबलो होतो. ऑफिसमधून सहकार्यांनी फोन केले होते. मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्थापनाने नुकताच एका सहकार्यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं.
दुधाची तहान ताकावर म्हणून मोरटक्क्यापर्यंतचे 12 कि.मी. चालू लागलो. वाळू, खडक, कधी गवताळ डगरींच्या उतारावून पुसट दिसणार्या पायवाटेने निघालो. मध्ये काठावर नर्मदेच्या पुराने क्षरण झालेले संगमवराचे रंगीत खडक दिसत होते. नर्मदा कुठे संथ, कुठे कलकलाट करीत पुढे जात होती.
ओमकारेश्वरापासून पुढे एक-दीड किलोमीटरवर नर्मदेत कावेरी (दक्षिण भारतातील नव्हे) येऊन मिळते. पैलतीरावर तो संगम दिसत होता. तिथेही गर्दी दिसत होती. दोन्ही तीरांवरची नजरेच्या आवाक्यात येईल तेवढी शोभा पहात पुढे जाऊ लागलो.
मध्ये एक ओघळ लागला. त्यातल्या खडकांवरुन मी तो ओलांडला.
आत्मशून्य मात्र मागेच थांबला.
नर्मदा, तिच्यातून निघालेली पाण्याची चिंचोळी पट्टीही कुठेच ओलांडायची नाही. ती जिथपर्यंत पसरली असेल तिथपर्यंत चालत जाऊन जमिनीवरुनच पुढे जायचे. नर्मदेत येणार्या इतर नद्या, ओहोळ, झरे ओलांडले तर हरकत नाही असे जगन्नाथ कुंटे यांच्या पुस्तकात लिहीले आहे.
हा ओढा ओलांडावा की कसे या द्विधा मन:स्थितीत आत्मशून्य गांगरला आणि तंतोतत शास्त्रोक्त परिक्रमाच करायची असल्याने त्याला तो ओढा ओलांडायचा धीर होईना. त्याने ओढा कुठपर्यंत आहे ते पहाण्यासाठी त्याच्या काठावरुन आत जंगलात जायला सुरुवात केली. मी चिडलो होतोच. पण त्याची स्थिती समजू शकत होतो. वाद घालणार नव्हतो. सोबत घेतलेल्या हरभर्याच्या ओंब्या सोलून तोंडात टाकत मी आपला ओढ्याच्या पलिकडे बसलो.
खूप वेळाने तो परत आला. ओढा दूरपर्यंत गेला आहे हे त्याला दिसले असावे.
आत्मशून्याने सॅकमधील कुंटेंची पुस्तके काढून शंका निरसनासाठी पाने चाळत ओढ्यापलिकडील खडकांमध्ये बसकण मारली. अर्धा तास उलटला तरी त्याला समाधानकारक उत्तर सापडले नसावे. मी कंटाळलो. शेवटी चिडून ओरडलो - जगन्नाथ कुंटेंनाच फोन लाऊन विचार म्हणजे तुझं समाधान होईल.
ते ऐकून तो ''गुड आयडिया.. यू आर दि मॅन'' म्हणाला आणि माझ्याकडचा फोन घेण्यासाठी त्याने मला ओढ्यापलिकडे बोलावलो. गेलो आणि फोन दिला. रेंज नव्हती. तो नर्मदेतल्याच एका टेकाडावर गेला आणि तिथून त्याने पुस्तकात दिलेल्या प्रकाशकांच्या नंबरवर पुण्याला फोन लावला. कुंटे सध्या नाशिकमध्ये आहेत, दोन मिनिटात तिथला नंबर एसएमएसने पाठवतो असे पलिकडून उत्तर मिळाले.
मी पुन्हा ओढा ओलांडून इकडे येऊन बसलो.
कुंटे नाशिकला थांबलेल्या ठिकाणचा नंबर सांगणारा एसएमएस आला. त्याने त्यावर फोन लावला तर कुंटे आत्ताच झोपले असून साडेपाच वाजता उठतील असे उत्तर मिळाले. म्हणजे कल्याणमस्तू! आता हा महात्मा साडेपाच वाजेपर्यंत किंवा समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत ओढ्यापलीकडेच बसून रहाणार आणि त्यात कल्पांतही उलटू शकतो. शूलपाणीतल्या अश्वत्थाम्यासारखे हा ही नंतरच्या परिक्रमावासियांना अधूनमधून दर्शन देणार असा विचार करुन मी माझे मनोरंजन करीत शून्यासोबत वाद घालण्याची उबळ रोखली.
तासभर उलटला. शेवटी त्याला ओरडून म्हणालो - ''दहा मिनीट ध्यान कर आणि तुला जे योग्य वाटेल ते कर.''
त्याला ते काही पटले नसावे.
शेवटी ओढ्यापलीकडे जाऊन हा ओढा आहे, ही काही नर्मदा नाही.. तसं पहायला गेलं तर नर्मदेवर धरण आहे त्यातल्याच पाण्याचा हा ओढा असू शकतो..असेल किंवा नसेलही.. पण अशी साखरेची साल काढत बसले तर परिक्रमाच पूर्ण होणार नाही..असे कितीतरी ओढे तुला रस्त्यात ओलांडावे लागतील वगैरे युक्तीवाद करुन पाहिले... तो काही बधेना.
मी कंटाळून पुन्हा ओढ्यापलीकडे जाऊन बसलो. दहा-पंधरा मिनिटांनी त्याला पुस्तकात उत्तर सापडले. त्याने मला पुन्हा तिकडे बोलावले. नर्मदेतून निघालेला ओघळ ओलांडू नये, इतर झरे, नद्या ओलांडायला हरकत नाही असे काहीतरी वाक्य होते.
तो नर्मदेचा ओहोळ नसून कुठून तरी वाहात आलेला ओढा आहे - ओलांडायला काहीच हरकत नाही अशी खात्री झाल्यानंतर तो एकदाचा पलिकडे आला आणि पुन्हा निर्वेधपणे अंतर कापले जाऊ लागले. आता त्याच्यासोबत वाद घालायला काहीच हरकत नव्हती.
मी मटीअरिलिस्टीक आयुष्य मनसोक्त जगून पाहिले आहे.. हे सुरु करतोय तेव्हा ते शास्त्रोक्तच असायला पाहिजे हा माझा अट्टाहस आहे. उत्तर सापडले नसते तर मी साडेपाच वाजेपर्यंतच काय, रात्रभर तिथेच बसून राहिलो असतो वगैरे उत्तरे त्याने दिली आणि मी या माणसासोबत येऊन कृतकृत्य झालो आणि त्याच्या कर्मठतेला मनोमन नमस्कार केला.
मी पुन्हा एकदा मिपावर हे सगळे लिहिण्याचा मुद्दा काढला. मी युजीपंथीय असल्याचा त्याचा आल्यापासूनच गैरसमज होता. त्याला वाटले मी टिका करण्यासाठी हे मिपावर लिहिणार आहे.
''माझ्यावर काय हवी ती टिका कर.. पण माझ्या गुरुंना यात ओढू नको'' कळवळून आत्मशून्य म्हणाला.
मी असे काही करणार नव्हतोच.
हा प्रसंग लिहीला तो आत्मशून्यावरची टिका म्हणून नव्हे हे वेगळे सांगायला नको. प्रसंगातून काय व्यक्त झाले आहे ते वाचकांनीच मला सांगावे.
पुढे चालत राहिलो. तीन-चार कि.मी. मागे पडले असावेत.
नर्मदेचे आता अनेक डोह दिसत होते. डोक्यावरचे केस पिकलेल्या आजोबांसारखे दिसणार्या डोंगरांच्या पायथ्यापर्यंत जाऊन नर्मदा सागरासारखा भासणार डोह करुन संथपणेपुढे जात होती. उन्हं कलायला उशीर असताना पात्रात जिकडे तिकडे गूढ-गंभीर शांतता दाटली होती. ते दृश्य पाहून ''चानी'' या चित्रपटाची आठवण झाली. त्यातला नावाडी जशी आरोळी मारतो तशी आरोळी मारुन पहावी वाटली.
''हेऽऽहेऽऽहेऽऽ हेयऽऽऽऽऽऽ!!!
प्रचंड जोरात ओरडलो आणि दोन्ही काठ दणाणून सोडले. आरोळीचे प्रतिध्वनी विरुन गेल्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी गूढ शांतता पसरली.
पात्रातील जमिनीच्या पट्ट्यांवर टरबूज, काकड्या, मका ही पिके घेऊन राखणीला झोपडी करुन रहाणारे लोक दूरवर दिसत होते. माकडे त्या पिकांवर टपून असणारच. ती डगरींवरच्या खैराच्या झाडांवर शेपट्या खाली सोडून निवांत काहीतरी चावत, बगला खाजवत बसलेली दिसत होतीच.
उन्हानं रापलेली शेताची एक कारभारीण सामोरी दिसली. एकटीच पिकाच्या राखणीला थांबलेली असावी. तिला साद घातली -
''नर्मदे हर ''
''हर हर नर्मदे'' तिने उत्तर दिले आणि तिच्या रस्त्याने गेली.
परिक्रमेदरम्यान माणूस दिसला की त्याला ''नर्मदे हर'' म्हणायचे. म्हणजे हा परिक्रमावासी आहे हे त्याला कळते.
चालत राहिलो.
आता पायवाट चढाची आली होती आणि रस्ता प्रशस्त दिसत होता. तो चढून वर आलो. धुळीत दुचाक्यांच्या टायरच्या खूणा उमटल्या होत्या. हा रस्ता एखाद्या आश्रमाच्या दिशेने जात असावा. काही वेळ चालत राहिल्यानंतर आश्रम दिसलाच. त्या वावभर रस्त्याला जोडून असलेल्या डगरीतून सिमेंट विटांनी पायर्या बांधून वर प्रशस्त जागी उतारावरच आश्रम होता.
केस पूर्ण पांढरे झालेले, पिकलेले, थकलेले व काठीच्या आधाराने उभे राहून नर्मदेच्या संथ डोहाकडे पहात उभे असलेले एक वृद्ध साधूबाबा दिसले. त्यांना ''नर्मदे हर'' केले.
क्षीण आवाजात त्यांनी उलट ''हर हर नर्मदे'' केले.
म्हणाले - ''खाना खावो.. उपर''
भूक नव्हतीच.
''खाना तो नहीं... पानी है तो पी सकते है'' आशू म्हणाला.
पायर्या चढून वर गेलो. एका बाजूला मांडव घातला होता. दोन-पाच भगवे कपडे घातलेले साधू इकडे तिकडे विखरुन होते. एक आमच्याएवढाच तरुण, दाढी-मिशा राखलेला, डोळ्यात काजळ घातलेला साधू यज्ञकुंडाजवळ बसून अंगाला राख फासून घेत होता. अंगावर फक्त लंगोट. राख फासून झाल्यानंतर त्यानं भगवा पंचा गुंडाळला आणि यज्ञकुंडाजवळ काहीतरी खालीवर करीत बसला.
आश्रमात परिक्रमावासी थांबलेले होते. मंडळींची जेवणं नुकतीच आटोपलेली दिसत होती. कारण नळावर गेलो तेव्हा पांढर्या कपड्यातले पाच-सात परिक्रमावासी खरकटी भांडी तिथे आणून ठेवत होते.
ओंजळ करुन दोघेही पाणी प्यालो.
ते खालचे वृद्ध साधुबाबा काठी टेकीत वर मांडवात येऊन बसले.
त्यांच्याकडे जाऊन दर्शन घेतलं. त्यांनी परिक्रमा कहां से उठाई म्हणजे कुठून चालायला सुरुवात केली वगैरे विचारणा केली. उत्तर दिले. मोरटक्का किती दूर राहिले ते त्यांना विचारले. त्यांनी मैल आणि किलोमीटर अशा दोन्ही मापात मोरटक्क्यापर्यंतचे अंतर किती राहिले त्याचे उत्तर दिले. साधूबाबा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत टिकले होते असे ताडले. पण जास्त काही विचारणा केली नाही.
खाली उतरुन नर्मदे हर म्हणून चालायला सुरुवात केली.
पुढे गेलो तर तारेचे कुंपण घातलेले होते. तारेखालून एक घळ सापडली. मी त्यातून घसरत पुढे गेलो व तारा ओलांडल्यावर अलिकडे उभ्या आशूकडून पिशवी घेतली. तो वर जाऊन तारांत अंतर जास्त होते तिथून आला.
पुढे चालू लागलो.
पायवाटेभोवती पसरट पाने असलेल्या खैर, ऐन किंवा धावड्याच्या झाडांचे जंगल पसरले होते. जमिनीवर जिकडेतिकडे पडलेली पांढरी पाने उदास वाटत होती. वनविद्येचा अभ्यास नाही म्हणून नक्की झाडे कोणती ते कळले नाही.
चालत राहिलो. नर्मदा खाली सोबतीला होतीच.
समोर पसरलेल्या पायवाटेवर उमटलेल्या प्राण्याच्या पायाच्या खूणा पाहून आशू म्हणाला - ''पगमार्क... वाघ असेल की बिबट?''
वाघ-बिबट्याच्या पाऊलखूणा तळहातापेक्षा थोड्या मोठ्या उमटतात. समोर मातीत उमटलेल्या खुणा लहान होत्या.
लांडगा, कोल्हा किंवा कुत्राही असेल. पुढे चालू लागलो.
आता पायवाट नर्मदेच्या पात्रात उतरून वाळूतून जात होती. औंदुबरासारखी दिसणारी काही खुरटी, काही उंच गेलेली झाडे नर्मदा जिकडे जाते त्या दिशेने वाकली होती. महापुरे वृक्ष जाती तेथे लव्हाळी वाचती. ही झाडे वाकडी-तिकडी वाकल्याने का होईना पण टिकून राहिली होती.
आणखी दोन-अडीच किलो मीटर मागे पडले असावेत.
एक झाड पाहून बसलो आणि सिगारेट पेटवली. थोडावेळ गप्पा मारुन पिशव्या काखोटीला मारल्या व पुढे निघालो. पुढे नर्मदेच्या पाण्यात यू टर्नसारखा एक प्रचंड प्रस्तर शिरला होता. त्याच्या मागच्या बाजूने आत जाता येणार नाही अशी झाडांची किर्रर्र दाटी. जवळ गेल्यानंतर पायवाट त्या प्रस्तराच्या कडातून वर चढत गेलेली दिसत होती. मी पुढे व तो मागे राहून हळू हळू ते प्रचंड खडक चढू लागलो. वरुन नर्मदेचा पंचवीस तीस फुट खाली पसरलेला डोह भयानक वाटत होता. पण हीच पायवाट बरोबर आहे असा संकेत करणारे छोटे भगवे ध्वज चाळीस-पन्नास फुटांवर त्यात रोवून ठेवलेले दिसले. हळूहळू चढलो आणि पुढच्या मोकळ्या जागी उतरलो. समोर एक कुलुप लावलेले मंदिर दिसले. चालत राहिलो.
समोर नर्मदेचे विशाल पात्र दूरवर नजरेत येत होते आणि नर्मदेच्या दोन्ही डगरी जोडणार्या पुलाची पुसट रेष लांबवर दिसत होती. तो पुल मोरटक्क्याचा होता. नेमका किती अंतरावर असेल तो पाहून अंदाज येत नव्हता.
पुढे आणखी एक छोटा आश्रम लागला. कसलीतरी अनोळखी मूर्ती शेंदूर फासून एका झाडाखाली उभी केलेली होती. शेजारी ओटा करुन समाधी बांधलेली होती आणि वर महादेवाची पिंड होती.
थकवा आल्याने मी त्या ओट्यावर जाऊन बसलो. तिथे झोपडीत एक माणूस बसलेला आशूला दिसत होता, तो माझ्या नजरेआड होता.
तिथे समाधीच्या ओट्यावर बसू नको, तो चिडेल असे आशू म्हणाला. थकलोच एवढा होतो की कुणी काही चिडत नाही म्हणालो.
थोड्या वेळाने लाकडी फाटक ओलांडून झोपडीकडे गेलो. इथे साधू वगैरे कुणी नव्हते. तो एकटाच माणूस पँट-बनियनवर बसला होता.
''नर्मदे हर''.. ''हर हर नर्मदे'' झालं.
त्या माणसाला मोरटक्का किती दूर राहिले विचारले तर त्या माणसाने हाताने दाखवत -
''सामने पुल दिख रहा है बस वही मोरटक्का.. पांच किलोमीटर है''
असे उत्तर मिळाले. झोपडीपलीकडचं फाटक ओलांडून पुढे गेलो. काही वेळ चालत राहिलो.
पुढे नर्मदेचा सपाट तीर होता. पसरट पात्रात अनेक लहान लांबट मोटरबोटी नर्मदेतील वाळू काढण्याच्या कामात गुंतल्या होत्या. त्यांच्या एंजिन्सचा आवाज घुमत होता. वाळूच्या ओझ्यानं एक बोट तर एका बाजूनं एवढी काठोकाठ बुडली होती की तीत बसलेली माणसे आतलं पाणी उपसून बाहेर फेकत होती. मला वाटलं पाणी आत शिरतंय आणि ती बोट बुडत आहे. पण बोटीत भरलेल्या वाळूतून पाझरलेलं पाणी ते बाहेर फेकत होते.
सूर्य बुडण्यासाठी कासराभर अंतर बाकी होते.
तिकडे नाशिकमध्ये असलेले जगन्नाथ कुंटे उठले असतील म्हणून आशूने त्यांना फोन लावला.
तु जवळ उभा राहू नको म्हणाला. त्याला वाटले मी मध्ये काही बोलून नसता घोळ करणार. त्याला बरंच मागे सोडून पुढे आलो.
कुंटेंनी आशूला ''परिक्रमेत आहेस की मजा म्हणून भ्रमणात आहेस? नर्मदेतून फोन कसा काय लावता येतोय? सुरुवातीला नर्मदेचा असा कोणताही ओघळ नाहीय.. तु नक्की नर्मदा परिक्रमेतच आहेस काय? वगैरे विचारून आशूची टोपी उडवली.
ओढे, नाले पार करावे लागतातच असे समाधानकारक उत्तर मिळाल्याने शेवटी हा त्रस्त समंध शांत झाला.
पुढं गेल्यावर एक आश्रम लागला. त्यात वस्तीला राहिलेले परिक्रमावासी पुढे निघत होते. आश्रमधारी दाढीवाले साधू त्यांना निरोप द्यायला सिगरेटचा धूर सोडत अर्ध्या पायर्यापर्यंत येऊन थांबले होते.
''नर्मदे हर'' ''हर हर नर्मदे'' झालं.
त्यांनी कुठुन परिक्रमा सुरु केली वगैरे विचारणा केली. ''प्रमाण-पत्र'' आणलंय काय तेही विचारलं.
''यहां रुकना है तो रुक सकते हो, लेकीन खाना खुद बनाके खाना होगा.. अगर रुकने की इच्छा नहीं है तो तीन किलोमीटर पर अगला आश्रम है.. सूर्यास्त होनेवाला है.. असं म्हणून आमच्या उत्तराची वाट न पाहता ते आत निघून गेले.
तेवढ्यात मागच्या आश्रमात नळावर खरकटी भांडी आणून ठेवणार्या परीक्रमींनी आम्हाला मागून येऊन गाठलं.
सात-आठ लोकांचा तो गट होता.
इथे थांबायचे की पुढे जायचे यासाठी त्या गटाच्या म्होरक्याने सगळ्यांना विचारणा केली व त्यांचे तिथेच रहायचे ठरले.
त्यातला एक निबर म्हातारा क्या है.. क्या है म्हणून म्होरक्यासमोर येऊन थांबला. त्यांना कमी ऐकू येत असावं. कारण म्होरक्या जे काही बोलला त्याचा भावार्थ असा - ''काही नाही झालं.. थांबायचं की पुढे जायचं ते सगळ्यांना विचारतोय.. तु लोड घेऊ नको. तुला एक गोष्ट चार वेळा सांगितली तरी तुझ्या टकुर्यात शिरत नाही.''
मग ते चार पाच जण वर आश्रमात निघून गेले.
आत्ताच म्होरक्याची बोलणी खाल्लेला वृद्ध तो म्होरक्या जे बोलला ते खरंच आहे असा भाव चेहेर्यावर घेऊन त्याचं बोचकं पायरीवर ठेऊन आमच्या सोबतच थांबला.
मी सिगारेटचं पाकिट काढून एक त्यांना दिली. माचीस पुढे केली तर ते म्हणे - ''माचीस है.''
आम्ही दोघांनी त्या पायर्यांवर बसून थोडावेळ धूम्ररेषा काढल्या.
मग मागून आलेल्या एका तुरुतुरु चालणार्या, दंताजीचे ठाणे उठून गेलेल्या सत्तरीच्या बाबांनी अगदी तोंडासमोर तोंड जवळ आणून आमची विचारपूस केली.
''किन्नु परकम्मा उठाई? एथ्थे र्हो.. सूर्यदेव रास्ता काट निकल्या'' म्हणाले.
आप कहां से आये है? विचारल्यानंतर पंजाबातील कुठल्यातरी अवघड नावाचा जिल्हा सांगितला.
कितने दिन से परिक्रमा शुरु है विचारल्यानंतर आमची परिक्रमा तर विनाकांक्ष आहे.. वाटेल तेव्हा सुरु, वाटेल तेव्हा बंद.. संकल्प वगैरे काही सोडलेला नाही असे त्यांनी त्यांच्या अपरिचित तरी कळू शकणार्या पंजाबीत सांगितले आणि वर आश्रमात निघून गेले.
मागून आलेल्या गटामधल्याच, ओमानी म्हातार्यांसारखा पेहराव केलेल्या तीन वृद्धांनी, बोलण्यात वेळ न घालवता पुढे झटझट रस्ता कापला आणि सायंकाळच्या निस्तेज होत जाणार्या उजेडात दिसेनासे झाले. ही अगदी राकट-रासवट त्रिमूर्ती एका जगद्विख्यात व्यावसायिकाच्या जन्मगावचे रहिवासी आहेत हे पुढे कळले.
आमच्या जवळ शिजवून खाण्यासारखे काही नव्हते. चुलीत नुसता जाळ फुंकला असता तरी इतर परिक्रमींनी आम्हाला उपाशी ठेवले नसते. पण आशूला शेजारच्याच छोट्याशा वस्तीतील घराकडे परतणार्या लोकांनी पुढे चांगला आश्रम आहे तिथे थांबायला सांगितले होते.
पुढे निघालो.
(पुढच्या भागात आपण आत्मशून्याला परिक्रमेत एकटे सोडून परतणार आहोत)
प्रतिक्रिया
13 Jan 2012 - 4:54 pm | स्वानन्द
छान.
13 Jan 2012 - 4:54 pm | रानी १३
निशब्द्द!!!!!!
13 Jan 2012 - 5:03 pm | यशोधरा
असे एकदा मला हिमालयात करायचे आहे. ह्यावेळेस करणार. गंगामाईला हाकारेन. नक्की :)
13 Jan 2012 - 5:13 pm | गणेशा
सुंदर झाला आहे भाग ...
आवडला ...
बाकी तो परिक्रमा किती दिवसात करणार आहे म्हणाला..
की तसे काही ठरले नाही
13 Jan 2012 - 5:13 pm | किसन शिंदे
हा भागही खुपच आवडला.!
१२ किमी परिक्रमा करून, आशूला एकट्याला पुढे सोडून परतीच्या प्रवासाला निघताना तुमच्या मनाची अवस्था अतिशय वाईट झाली असेल याची १००% खात्री वाटतेय.
13 Jan 2012 - 5:19 pm | मेघवेडा
हाही भाग आवडला! थोडंफार कुंटे स्टाईल लेखन वाटलं!
पुभाप्र!
13 Jan 2012 - 5:23 pm | गवि
अस्वस्थ होऊन वाचतोय. झपाटलं गेल्याचं फीलिंग येतंय.
हेवा वाटतो तुमचा यार..
13 Jan 2012 - 5:49 pm | नगरीनिरंजन
छान चाललंय. येऊ द्या!
13 Jan 2012 - 5:52 pm | अमित
तुम्ही आत्मशून्यला सोडल्यानंतर त्याच्या पुढच्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायला मिळणार नाही याची खंत वाटतेय.
13 Jan 2012 - 5:55 pm | मन१
काही विशेष नोंदी:-
तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता.
धन्य आहात.
जगन्नाथ कुंटेंनाच फोन लाऊन विचार म्हणजे तुझं समाधान होईल.
ते ऐकून तो ''गुड आयडिया.. यू आर दि मॅन'' म्हणाला
तुझ्यासोबत राहिल्यावर माणसाला साध्यासाध्या गोष्टिही सुचत नाहित हे सिद्ध होतय.
शूलपाणीतल्या अश्वत्थाम्यासारखे
शूलपाणे म्हणजे? काय पुस्तक वगैरे आहे का?
शून्यासोबत वाद घालण्याची उबळ रोखली.
नशीब.
शेवटी ओढ्यापलीकडे जाऊन हा ओढा आहे, ही काही नर्मदा नाही
हे असं ठरवता येउ शकेल. एकहदा कागद किंवा पान त्या ओघळात टाकायचं जर ते ओघळाकडून नर्मदेच्या पात्राकडे जात असेल, तर तो स्वतंत्र प्रवाह आहे. जर उलट असेल, नर्मदापात्रातून दूर जात असेल तर नर्मदेतून निघणारा प्रवाह आहे.(कालवा वगैरे) :) अर्थात, वारा जोरात नसेल तेव्हाच ह्याचा उपयोग होइल.
मी युजीपंथीय असल्याचा त्याचा आल्यापासूनच गैरसमज होता.
म्हणजे? आपण नाही आहात का? खरद्/व्यनि करणे.
''चानी'' या चित्रपटाची
काय "चानी"? कुठल्याभाषेत आहे म्हणे? कधी रिलीज झाला?
सूर्य बुडण्यासाठी कासराभर अंतर बाकी होते.
फार दिवसांनी "कासराभर" ह्या शब्दाची भेट झाली. बरे वाटले.
आश्रमधारी दाढीवाले साधू त्यांना निरोप द्यायला सिगरेटचा धूर सोडत
बम बम भोले....
13 Jan 2012 - 8:13 pm | किसन शिंदे
चानी हा मराठीतला खुप जुना चित्रपट आहे ज्यात रंजनाची प्रमुख भुमिका होती.
त्यातलं "तु एक राजपुत्र” हे गाणं खुप छान आहे.
13 Jan 2012 - 9:25 pm | मोदक
चानी हा मराठी चित्रपट आहे, हा (बहुतेक) व्ही.शांताराम यांनी याच नावाच्या कादंबरीच्या आधारावर काढला होता. कोकणातले वातावरण यामध्ये पुरेपूर दिसते.
चित्रपटातल्या (सोनेरी केसाच्या) नायिकेचे नाव चानी असते.
मोदक.
13 Jan 2012 - 5:56 pm | पुष्करिणी
चारही भाग वाचले, मालिका पूर्ण झाल्यावर प्रतिसाद देणार होते..पण रहावलं नाही. फारच सुंदर वर्णन आणि अनुभव.
आत्मशून्य ला शुभेच्छा आणि तुम्हांला इतका सुंदर अनुभव इथे दिल्याबद्दल धन्यवाद !
13 Jan 2012 - 6:00 pm | गवि
.. म्हणजे नर्मदेतून एखादाही इरिगेशनचा वगैरे कालवा काढला की झाला बल्ल्या.. तो कालवा जितके शेकडे किलोमीटर्स पसरला असेल तेवढा टल्ला मारुन परत यावे लागणार.. म्हणजे २६०० मधे आणि तेवढी अॅडिशन.
13 Jan 2012 - 8:17 pm | इष्टुर फाकडा
अगदी हाच विचार मनात होता...
14 Jan 2012 - 12:14 am | नेत्रेश
त्या कालव्याचा खालुन एक भुयारी रस्ता काढला की झाले.
नर्मदा ओलांडायची नाही, पण नर्मदेकडुन ओलांडुन घ्यायचे नाही असा तर नियम नाही.
14 Jan 2012 - 2:41 pm | प्रास
मला वाटतं, नर्मदेचा नैसर्गिक प्रवाह ओलांडण्याच्या दृष्टीने अडचण असावी. आजच्या काळाच्या दृष्टीने मानवनिर्मित कालवे ओलांडायला अडचण न व्हावी.
14 Jan 2012 - 4:06 pm | पैसा
कुठेतरी एका प्रतिक्रियेत वाचलं होतं की परिक्रमेचा मार्ग सुमारे २०० किमी ने वाढलाय म्हणून.
13 Jan 2012 - 6:19 pm | बिपिन कार्यकर्ते
वाचतोय.
13 Jan 2012 - 6:25 pm | प्रास
मस्त झालाय हा भागही!
आवडला.
आ.शू. पुढल्या भागापासून एकटाच चालत जाणार याने आत्तापासूनच काळजी वाटायला लागली आहे. आत्ताही त्याच्या सुयोग्य परिक्रमापूर्तीसाठी प्रार्थना सुरू आहे.
पुभाप्र
13 Jan 2012 - 6:51 pm | पैसा
ही नोकरी सोडलीस की परिक्रमा करूनच टाक एकदा. आम्हाला भ्रमणगाथेसारखं मस्त पुस्तक वाचायला मिळेल. ;) (मी फक्त माझा स्वार्थ बघतेय!)
13 Jan 2012 - 8:45 pm | जाई.
हाही भाग छान झालाय
गुंतवून ठेवलं वाचताना
13 Jan 2012 - 9:42 pm | रेवती
पुढचे लेखन या मालिकेतले शेवटचे (निदान आशू येईपर्यंत) असणार याचे आत्ताच वाईट वाटत आहे.
वाचताना छान वाटत होते. इतके नियम पाळून मी परिक्रमेला निघू शकणार नाही असे वाटते.
13 Jan 2012 - 9:58 pm | स्मिता.
हा ही भाग आवडला. परिक्रमा पूर्ण होईपर्यंत कित्ती न काय नुभव गाठीशी येत असतील!
हे शेवटचं वाक्य वाचून अस्वस्थ झालं आणि पुढचे अनुभव वाचायला मिळणार नाहीत म्हणून वाईटही वाटलं.
13 Jan 2012 - 10:01 pm | विलासराव
हे सगळं फक्त निमित्तमात्र. आपल्याला बरोबर परिक्रमा कारायची आहे. अजुनही तुमच्या लक्षात येत नाही का?
13 Jan 2012 - 10:07 pm | गणपा
वाचतोय.....
13 Jan 2012 - 10:13 pm | कौशी
आशु, पुढल्या भागापासून एकटाच असणार याची खरोखर काळजी वाटत आहे..
त्याच्या पुढच्या परिक्रमेसाठी खुप खुप शुभेच्छा!!
13 Jan 2012 - 10:36 pm | सुनील
लेख छानच.
आत्मशून्य यांच्या शात्रशुद्धतेच्या आग्रहाला दहा दंडवत!
13 Jan 2012 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा
यशवंतजी पुन्हा एकवार धन्यवाद...विशेष करुन तुमच्या ''आंखो देखा हाल" वृत्तांकनाला... अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतोय असं वाटत होतं... बाकी आशूबद्दल काय बोलू,,,?वेगळाच व्यक्तिविशेष आहे हा माणुस...!
आता पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.....
14 Jan 2012 - 3:17 am | पाषाणभेद
>>>> मॅनेजर महोदय नाराज होतेच. तापल्या तव्यावर कार्यभाग साधून घ्यावा. फोन करुन उद्या पण येणार नाहीय असे सांगितले की तो आणखी चिडणार आणि बोलणार - आणि मग राजीनामा देतोय असे सांगून मोकळे होता येईल असा विचार करुन ऑफिसला फोन लावून पाहिला होता. फासा अनुकूल पडला तर जवळचे मोबाइल हॅण्डसेट वगैरे कुरियरने मित्राकडे पाठवायचे आणि त्याला कार्डांचा पासवर्ड सांगून इंदूरातले खोली भाडे, पेपरबिल वगैरे मासिक देणी देऊन टाकायला सांगायचे. लॅपटॉप इत्यादी साहित्य त्याच्याकडे ठेवायला लावायचे असा माझा सगळा प्लॅन होता. पण मॅनेजर काही फोनवर उपलब्ध होईना. ऑफिसचे नियम मोडल्याने व्यवस्थापनाने नुकताच एका सहकार्यावर नोकरीवर रहाताना करारात लिहिलेल्या अटींचा वापर करुन जबर आर्थिक दंडाची कारवाई केली होती - त्यामुळे अचानक काही ठोस न करता निघून जाता येणार नव्हतं.
क्या यसवंत, क्या झाँकी है! हम पढ रहे है आपका लिखा हुवा| आप मिपा पे है तो हम भी यहाँ रहते है, तो जो कुछ लिखा है वो हम भी पढते है| आपकी गाडी सरवटे से बढानी है या भवरकुंआ से? एक बार ऑफिस में आ जाओ तब बतातें है मॅनेजर क्या होता है|
:-)
>>> कुंटे सध्या नाशिकमध्ये आहेत
ते सध्या नाशकात लागलेल्या एका पुस्तक प्रदर्शनात व्याख्यान देत आहेत. त्यांच्या नर्मदे हर हर पुस्तकाची विक्रमी विक्री झाली आहे. एका वर्षात १४०० च्या वर प्रती.
अधिक माहितीसाठी: दुवा
14 Jan 2012 - 1:18 am | मोदक
वाचतोय.. प्रवाही लिखाण आहे..
14 Jan 2012 - 3:02 am | प्रभाकर पेठकर
१ ते ४ सर्व भाग वाचले.
परिक्रमेचा विचार चुकूनही मनांत नसला तरी वाचनात रस आहे. आपली लिखाणाची हातोटी उल्लेखनिय आहे.
पुढच्या भागा नंतर श्री. आत्मशुन्य ह्यांच्या परिक्रमे बद्दल चकार शब्दही वाचावयास मिळणार नाही ह्याची हुरहुर लागली आहे. असो.
त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा..!
14 Jan 2012 - 3:14 am | टुकुल
तुमचा प्रतिसाद का कोण जाणो, पण इतिहासकालीन एखाद्या राजाच्या पत्रव्यवहारासारखा वाटतोय : )
--टुकुल
14 Jan 2012 - 11:45 am | प्रभाकर पेठकर
राजाच्या पत्रव्यवहारासारखा म्हणजे 'सरकारी अहवालासारखा रुक्ष', असे म्हणायचे नसेल तर धन्यवाद.
14 Jan 2012 - 8:47 am | ५० फक्त
धन्य आहात, पण एक शंका, (नेहमीप्रमाणे) नर्मदा परिक्रमा अशी एकदा सुरु करुन मागे फिरता येत नाही, मग भले ती शास्त्रशुद्ध पद्धतीनं सुरु केलेली नसली तरी, याबद्दल काही माहिती देउ शकेल का कोणी.?
14 Jan 2012 - 11:59 am | कपिलमुनी
>>अशी एकदा सुरु करुन मागे फिरता येत नाही, ?
14 Jan 2012 - 9:26 am | प्रचेतस
अप्रतिम लिखाण यशवंता.
14 Jan 2012 - 3:11 pm | मन१
आत्ताच लोकप्रभावर ही लिंक मिळाली नर्मदापरिक्रमेवर.
http://www.lokprabha.com/lokprabha/20120120/naramadechi-bhatkanti.htm
पहिल्या एक्-दोन परिच्छेदात उगाच जाउन आलेल्यांना सरसकट दुगाण्या झाडलेल्या आहेत.
साहेब स्वतः फुल्ल टू बसने जाउन आलेत, जाता-येता भक्तिभावाने यज्ञ वगैरे केलेत आणि इतरांना "च्छ्या कसले अंधश्रद्ध" म्हणून हिणवताहेत. to the top of that लेखाच्या शेवटच्या भागात अजून दोन वाक्ये सापडली:-
नर्मदेची परिक्रमा कोणालाही सहजपणे करता येण्यासारखी आहे, आपल्या घरच्या मोटारीनंही आरामात करता येईल. दुर्दम्य इच्छा असेल तर ती कोणालाही सहज जमेल!
ह्यातल्या दुसर्या वाक्याचा नक्की अर्थ काय? सहज होणार्या गोष्टीला दुर्दम्य इच्छा कशाला हवी? मुळात "दुर्दम्य इच्छा" ह्यापेक्षा "दुर्दम्य इच्छाशक्ती" हा शब्द वापरावा काय?
अर्थातच असल्या बस आणि कारने जाणार्यांची भरमसाट गर्दी वाढून हा टुरिस्ट स्पॉट झाला तर नर्मदेची गंगा व ओंकारेश्वराचे व एकूणच शांत प्रसन्न नर्मदेचे सध्याचे काशी-प्रयाग बनणे अवघड नाही.
14 Jan 2012 - 11:04 pm | कवितानागेश
या लिंकवरचा लेख वाचून करमणूक झाली. :P
एकंदरीतच कुठल्याही एका वाक्याचा दुसर्या कुठल्याही वाक्याशी फारसा संबंध दिसत नाही.
फार दिवसांनी इतके गमतीदार साहित्य वाचायला मिळाले... :)
14 Jan 2012 - 11:29 pm | अन्या दातार
बिनीवाल्यांनी काय पव्वा वगैरे टाकून लेख लिहिला कि काय हेच कळेना मला.
14 Jan 2012 - 11:33 pm | बिपिन कार्यकर्ते
त्यातली ही दोन वाक्यं मलाही फारच गमतीदार वाटली.
"गेल्या काही वर्षांमध्ये सुदैवानं नर्मदा नदीच्या पाण्याचं शास्त्रशुद्ध नियोजन होऊन तिच्यावर अनेक धरणं बांधली गेली, त्यामुळे नर्मदेला नित्यनेमानं येणारे विनाशकारी पूर बंद झाले खरे, "
"नर्मदेवरच्या धरणांमुळे गुजरातमध्ये कशी समृद्धी आली आहे, हे ह्य परिसरातल्या हिरव्यागार शेतांवरून सहज लक्षात येत होतं. ह्यचाच एक परिणाम म्हणजे नर्मदेच्या संपूर्ण परिसरात आता कुठेही भिकारी नाहीत, हे किती छान झालं!"
15 Jan 2012 - 8:13 pm | कवितानागेश
इथे 'गमतीदार' या शब्दातून प्रचंड राग व्यक्त होतोय अशी शंका येतेय.
मी 'मिसळपाव' तर्फे बिपिन कार्यकर्ते यांना कळकळीची विनंती करतेय, की त्यांनी कृपया बिनिवाल्यांना बुकलून काढू नये! :P
15 Jan 2012 - 9:21 pm | बिपिन कार्यकर्ते
मी काय बिपिन बुकलवार थोडीच आहे? ;)
पण ती वाक्यं खरंच गंमतीदार आहेत. जी काही थोडीफार माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार तरी.
16 Jan 2012 - 11:46 am | नंदन
कणेकरांचं सदर बंद झाल्यापासून लोकप्रभेत गंमतीदार/विनोदी/हास्यास्पद लेख लिहिण्याची परंपरा पुढे कोण चालवणार, ह्या प्रश्नाला उत्तर मिळालं म्हणायचं ;)
14 Jan 2012 - 3:33 pm | मुक्त विहारि
सुन्दर वर्णन ........
14 Jan 2012 - 6:30 pm | सुहास झेले
नर्मदे हर... !!
14 Jan 2012 - 9:08 pm | दादा कोंडके
आत्ताच झपाटल्यासारखे सगळे भाग वाचून काढले!
हॅट्स ऑफ टू यू गाईज!
हे असलं काहितरी मला कपाळ करंट्याला बापजन्मात शक्य होणार नाहीये. नूसता एक दिवस ऑफीसला जाताना मोबाईल विसरला तरी आख्खा दिवस वाईट जातो. :(
14 Jan 2012 - 11:29 pm | शिल्पा ब
एकदम भारी. आत्मशुन्य आला की त्याच्याकडुन माहीती घेउन पुढचे लेख लिहाच.
16 Jan 2012 - 11:55 am | नंदन
हाही भाग आवडला. नेमकी, छोटी वाक्यं; चित्रदर्शी शैली यामुळे ओघवता झालेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
16 Jan 2012 - 12:35 pm | स्वाती दिनेश
हाही भाग आवडला. नेमकी, छोटी वाक्यं; चित्रदर्शी शैली यामुळे ओघवता झालेला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
नंदन सारखेच म्हणते,
स्वाती
16 Jan 2012 - 12:27 pm | मन१
इस धारावाहिक की अगली कडी कब प्रदर्शित हो रहई है?
हम वाट बघरेले हय ना.
16 Jan 2012 - 5:08 pm | अभिज्ञ
यशवंत,
चारही भाग मस्तच झाले आहेत. परिक्रमेचे धावते नसले तरी ओघवते समालोचन आवडले.
नोकरी सोडली असल्यास आत्मशुन्यला गाठून परिक्रमचे डिफर्ड लाईव्ह समालोचन मिपावर टाकता येते का ते पहाणे. ;)
अभिज्ञ.
16 Jan 2012 - 5:20 pm | विजुभाऊ
पाओलो कोएलो चे " पिल्ग्रिमेज" नावाचे एक पुस्तक आठवले.
16 Jan 2012 - 5:45 pm | मदनबाण
सर्व भाग वाचले,वाचतोय... हल्लीच ओंकारेश्वराचे दर्शन घेण्याचा योग आला होता,सोबत नर्मदा तीराचे दर्शन देखील घडले... या लेखमालेमुळे परत ओंकारेश्वरची आठवण आली. :)