एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा -१
परिक्रमेमागील तत्त्वे
जगन्नाथ कुंटे यांनी परिक्रमेचे जे नियम नमूद केले आहेत ते मानून चालाव्या लागणार्या आध्यात्मिक पठडीतील आहेत. उदा. गुरुंची आज्ञा, परिक्रमेला जाण्याची प्रचंड अंतस्फूर्ती, प्राणायामाचे प्रकार, नर्मदा न ओलांडणे इत्यादी मोघमपणे पाळायचे ते नियम आहेत. त्यांनी त्यांच्या विविध पुस्तकांत सांगितलेल्या अनुभवांची संगती आपण तसा विचार करण्याकडे झुकत असू तर गुरुकृपा आणि नर्मदामाईची कृपा एवढाच किंवा निव्वळ योगायोग असा लाऊ शकतो.
वास्तविक नर्मदेचीच परिक्रमा कशासाठी करायची? पौराणिक किंवा आध्यात्मिक कारणं जी मानली जात असतील ती असोत - पण त्या 10-12 कि.मी. मध्ये त्या जीवनाची मला जी झलक मिळाली त्यातून आणि आठवडाभरातील चिंतनातून परिक्रमा हा प्रकार मला आवडला. तो कशामुळे हे थोडक्यात आटोपतो. हे मूळ कथनाला सोडून अवांतर आहे पण हेच परिक्रमेचं सार आहे.
1. परिक्रमा ही एक एकदा का होईना करुन पहावी अशी मूलभूत रुपातील आगळी जीवनपद्धती आहे. सर्वसामान्यपणे लोकांच्या संगतीत राहून सगळंच करुनही विशेष असे काही साधत नाही. कशामुळे तरी कुठल्याही वयात असणार्या कुणाचाही श्वास थांबतो आणि तोंडाचे बोळके उघडे राहून त्याची निष्प्राण हाडं-आतडी शिल्लक रहातात. त्यापुढे कुठलाही शोध, संवाद, प्रयत्न अगदी सगळ्यालाच पूर्णविराम लागतो. पण सगळे काही व्यवस्थित चालू असताना एकटे राहून ज्ञाताच्या सीमेवरुन जो पुढे पाऊल टाकू इच्छितो त्याला परिक्रमेचा मार्ग मोकळा आहे. असं काही न मानता 'फॉर ए चेंज' वाल्यांनाही तो मोकळा आहे.
2. नर्मदेच्या तीरावर वसलेल्या गावांमध्ये किंवा आश्रमांमध्ये ते लोक परिक्रमावासियांच्या जेवणाची सोय करतात. धपाट्यापेक्षा थोडा जाड आणि चवीला अगदी धपाट्यासारखाच 'टिक्कड' नावाचा पदार्थ आणि वरण हे दोन साधे पदार्थ आश्रमांमधून परिक्रमावासियांना दिले जातात - तोच त्यांचा सर्वसामान्य आहार. कुठंतरी निघुन जायचं आहे, पण तिथं गेल्यावर खायचं काय अशी चिंता कोणाही त्याच त्या रुटीनला विटलेल्या, कुठेतरी निघुन जाऊ इच्छिणार्या माणसाला सतावते. ही चिंता अशी आपोआप मिटली की परिक्रमावासी 'त्याचा त्याला' ध्यान करण्यासाठी स्वतंत्र असतो - हे एक.
याचीच दुसरी बाजू म्हणून ध्यान वगैरे काहीही न करता फक्त पोटभरीच्या माफक आशेनं परिक्रमेत फिरणारे लोकही आहेत. कारण नर्मदेच्या तीरावरील गावातील आणि आश्रमांतील लोक जेवणाची वेळ असेल आणि परिक्रमावासी नजरेस पडला तर कोणत्या का रुपात होईना, त्याला खाऊ घालतातच. तीरावर गावे जास्तीत जास्त 20-25 कि.मी. च्या टप्प्यांत असली तरी दर 3-5 कि.मी. वर एखादा तरी आश्रम हा प्रकार नर्मदेच्या तीरावर अद्याप टिकून आहे. आश्रमांची ही संख्या वाढतही आहे.
3. परिक्रमेदरम्यान आयुष्य सूर्योदय ते सूर्यास्त या दोन दररोज घडणार्या अत्यंत महत्त्वाच्या घटीकांमध्ये बांधले जाते. सूर्य उगवला की जिथे आहात तिथून तीरावरुन चालायला लागायचं आणि हव्या त्या ठिकाणी स्नान आटोपायचं. दिवसभर मानवेल तेवढ्या आणि रस्ता जसा सापडेल त्या वेगाने चालत रहायचं. सूर्य मावळला की मात्र थांबावं लागतं. अंधारातून तीरावरुन चालताच येत नाही. या दोन अपरिहार्यतांमुळे चालणं आणि एका ठिकाणी थांबणं या दोन क्रियांवर नैसर्गिक बंधनं येतात. चालण्यामुळं श्रम होतात, शरीराचा प्रत्येक भाग सक्रिय होतो.. आणि रात्री नैसर्गिकपणे येणार्या थकव्यानं प्रचंड नैसर्गिकपणे आलेली झोप लागते आणि 'ब्राह्ममुहूर्त' नावाचं जे काही आहे त्यावेळी आपोआप जागही येते. नैसर्गिक ठरलेल्या क्रमाने ध्यानाला बसता येतं. काही दिवसांचे अपवाद सोडले तर हा दिनक्रमच होतो - हा परिक्रमेचा गाभा.
4. परिक्रमेत चालताना रोज पुढे काय येईल हे माहित नसते. कित्येक पायवाटा, प्रस्तर, जंगल या असंख्य ठिकाणाहून प्रवास होतो. त्या-त्या भागाच्या बोलण्या-चालण्याच्या पद्धती दिसतात. त्यामुळं येणारा प्रत्येक क्षण, अनुभव नवा असतो. ओळख-पाळख नसलेले लोक मान देतात - काही अपमानही करतात. संकेतस्थळावर मी कोण व तो कोण हे पुरेसं स्पष्ट नसताना झालेला मान किंवा अपमान वेगळा आणि प्रत्यक्ष समोरासमोर झालेला मान किंवा अपमान वेगळा. मान मिळाला तरी मनात त्याबद्दल गंड निर्माण न होऊ देता त्याला योग्य असेल तसं सामोरं जायचं - आणि अपमान झाला तरी तो समजून घेऊन मौन रहायचं, किंवा पुढं चालायचं - हा सुद्धा एक क्रमच होऊन बसतो. हे नव्याने आलटुन पालटुन रोजच. शूलपाणीसारख्या ठिकाणी तर परिक्रमीजवळ असलेली प्रत्येक गोष्ट लुटण्याचेही प्रकार होतात. जरुर तेवढेच कपडे अंगावर असताना सर्वहारा अवस्थेत काही किलोमीटर चालणे आणि त्यादरम्यान मनात सुरु असलेली प्रक्रिया यातून जो अनुभव येतो तो विरळा आहे.
5. माणसात नैसर्गिकपणे असलेल्या, पण इतर रुटिनमध्ये अनुभवता न येणार्या जीव-ऊर्जेला नर्मदेच्या किनार्यावर उत्थापन मिळते. इनक्रीस्ड लेव्हल ऑफ एनर्जी. हे उत्थापन अर्थातच अवधानाचे विषय मर्यादित झाल्याने, तरीही त्यात नवेपणा, ताजेपणा असल्याने मिळते. आणखी सखोल सांगायचं तर, परिक्रमावासी एकाच दिशेने जाणार्या नर्मदेचे पाणी पितो - आणि नर्मदेचा प्रवाह ज्या दिशेने जात रहातो त्याच दिशेने शरीरातील पाण्यासगट माणूसही पुढे जात रहातो - हे गुजरातेतील भडोचजवळ नर्मदा सागरात जाईपर्यंत एका दिशेने चालू रहाते. नर्मदा सागराला जाऊन मिळाली तरी तिथून पुन्हा नर्मदेच्या उगमापर्यंत उलट परिक्रमा करीत यायचे असते. प्रवाही नर्मदा सागरात मिसळली तरी परिक्रमीच्या शरीरातील नर्मदा त्याच्यासोबतच उगमापर्यंत परत येते. उगमापर्यंतचा हा परिक्रमेतील प्रवास नर्मदेभोवती केलेले हिंडणे न ठरता स्वत:च्याच अंतरात सर्व स्तरांवर केलेले परिक्रमण ठरते. याचे सुपरिणाम कुठल्याही विश्लेषणाच्या पार असतात असे अनेक अनुभव आहेत - होणारी प्रक्रिया गहन व बहुपेडी आहे.
प्रतिक्रिया
11 Jan 2012 - 4:21 am | विकास
थोडक्यात पण छान वर्णन आहे!
धन्यवाद!
11 Jan 2012 - 1:44 pm | यकु
>>>परिक्रमा संपूर्ण करायला किती वेळ (दिवस/महीने/वर्ष) लागतो (लागतात)?
परिक्रमा पूर्ण व्हायला लागणारा वेळ ती कोणत्या प्रकारे केली जाते यावर अवलंबून आहे. मध्ये पावसाळा लागणार नाही अशा बेताने, रोज किमान 20 कि.मी. अंतर कापण्याचा क्रम ठेऊन चालत केली तर 6 ते साडेसहा महिन्यांत परिक्रमा पूर्ण होते अशी माहिती साधुसंत, परिक्रमी आणि पुजार्यांकडून मिळाली. परिक्रमा 1. ओंकारेश्वर किंवा 2. अमरकंटक (नर्मदेचे उगमस्थान) येथून सुरु केली जाते. गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही लोक हल्ली नारेश्वर, गरुडेश्वर, ग्वारी घाट किंवा कोणत्याही तीर्थस्थानाहून परिक्रमा सुरु करतात.
वाटेतील तीर्थक्षेत्री 8-8/ 15-15 दिवस राहिले, पावसाळ्याचे चार महिने एका स्थानावर राहायचे ठरवले (चातुर्मास) तर 3 वर्ष 3 महिने 13 दिवस (किंवा 3.. प्रत्येकाने हा काळ वेगवेगळा सांगितला, अर्थातच तो चालण्याच्या वेगावर अवलंबून आहे) लागतात.
>>>हा सगळा जंगल/वन थोडक्यात नागरी वस्तीच्या बाहेरच सगळा भाग आहे का? नर्मदेचा काठ (अगदी काठ म्हणजे काठ नाही पण जवळपास) दृष्टीपथात कायम असतो का?
ओंकारेश्वरहून निघाल्यानंतर नर्मदा तीरापासून 5 कि.मी. च्या आवाक्यात आणि अमरकंटकहून येताना 7.5 कि.मी.च्या आवाक्यात राहून तीरावरुन चालण्याचा नियम आहे. पण शास्त्रशुद्ध परिक्रमा करणारे जगन्नाथ कुंटे व आपल्या परिचयातील आत्मशून्यासारखे लोक नर्मदेच्या तीराहूनच चालणे पसंत करतात. अगदी तीरच धरुन चालायचे तर फक्त जंगले पायवाटा, काटेकुटे, दगडधोंडे, नर्मदेच्या प्रवाहाने क्षरण झालेले संगमरवरी खडक, ओढे-नाले अशा नाना अडचणी (अगदी साप, मगरीही) पार कराव्या लागतात.
नर्मदा मोजकी ठिकाणे सोडली तर नेहमी दृष्टीपथात असते.
>>>आता जे काही सरदार सरोवर झाले आहे, त्याचे काही परीणाम दिसतात का ते या परीक्रमेपेक्षा वेगळ्या ठिकाणी आहे?
परिक्रमेदरम्यान सरदार सरोवर लागते. प्रकल्पग्रस्तांनी चालवलेल्या तेथील जीवनशाळाही लागतात.
सरदार सरोवर आणि नर्मदेवर झालेल्या आणखी 3-4 धरणांमुळे परिक्रमेच्या मार्गात 200 कि. मी. ची अतिरिक्त भर पडली आहे. धरणाच्या पाण्याचा फुगवटा जिथपपर्यंत पसरला असेल तेवढा क्रमावा लागतो - अर्थात तीरावरुन चालणार्या परिक्रमीला. बसमध्ये बसून जाणार्यांना अशी अडचण नाही.
11 Jan 2012 - 6:31 am | अरुण मनोहर
तुमचे सविस्तर अनुभव वाचण्यास उत्सुक आहे. जगन्नाथ कुन्टे ह्यान्चे पुस्तक वाचलेय. प्रचन्ड प्रभावित झालो होतो. त्या जोडीला, अध्यात्म व योगविद्या ह्या व्यतिरिक्त, दैनन्दिन जिवनाच्या दृष्टीतून लिहीलेले वर्णन वाचायला आवडेल.
पहिला भाग भराभरा वाचला. पुन्हा नीट वाचीन. पुढचे वाचायला उत्सुक आहे.
11 Jan 2012 - 6:54 am | मराठमोळा
स्वानुभवातून लिहिलेला लेख आवडला.
इथे फोटोंची मागणी करणे चुकीचे वाटते आहे तरी फोटो टाकावेत से मनोमन वाटते.
माझ्या माहितीनुसार १६-१७ दिवस लागतात परीक्रमा पुर्ण करायला. त्यामुळे सध्या तरी ते शक्य नाही. :)
11 Jan 2012 - 9:27 am | बहुगुणी
ममो: १६-१७ दिवसांत होईल परिक्रमा?
नर्मदेचा विस्तार उगम-ते-समुद्र असा १३०० कि मी आहे, म्हणजे जाऊन-येऊन २६०० किमी अंतर असणार. इतकं अंतर अगदी सलग चालूनही १६ दिवसांत पार करायचं तर दिवसाला १६० किमी चालणं भाग आहे. अगदी दिवसाकाठी १२ तास चालायचं म्हंटलं तरी, साधारण माणसाच्या ताशी ५ किमी वेगाने ६०च किमी अंतर चालून होईल, त्यामुळे ४०-४५ दिवस लागत असावेत असं वाटतं.
11 Jan 2012 - 9:56 am | मराठमोळा
http://www.narmadasamagra.org/parikrama.htm
वरील लिंकमधे म्हंटल्याप्रमाणे एकुणात २६२४ किमी अंतर चालून पुर्ण करण्यास ३ वर्षे ३ महिने आणि १३ दिवस लागतात आनी त्याला पुर्ण व्यवस्थित केलेली परीक्रमा असे म्हणतात.
टीपः वरील माहिती आंतरजालावरून साभार.
आमचे एक स्नेही पुढच्या महिन्यात या परीक्रमेला जाणार आहेत, त्यांनी माहिती मिळवल्याप्रमाणे बरचसं अंतर हे बसने प्रवास करुन केले जाते आणि मग १६-१७ दिवसात ही परीक्रमा 'क्रॅश कोर्स' प्रमाणे पुर्ण करता येते. (पंढरपूरच्या वारीत काही दिंड्या ट्रक/बसने प्रवास करतात तसे.)
आता ही परीक्रमा चालून पुर्ण करायची की कशी हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न. :)
12 Jan 2012 - 1:51 am | नेत्रेश
> २६२४ किमी अंतर चालून पुर्ण करण्यास ३ वर्षे ३ महिने आणि १३ दिवस लागतात
म्हणजे सरासरी दिवसाला सव्वादोन की.मी. झाले, रोज १ तासापेक्षा कमी चालायचे?
रोज १० ते १२ की.मी. चालले तर ७ ते ८ महीन्यात परीक्रमा पुर्ण होईल. दिवसभर चालले तर ४ महीन्यातही पुर्ण व्हायला हरकत नाही.
12 Jan 2012 - 11:19 am | बिपिन कार्यकर्ते
त्यातले ३ वर्षांचे चातुर्मास कमी केलेते का? म्हणजे १२ महिने म्हणजेच १ वर्ष गेलं. त्याशिवाय, सगळीच वाट सोपी आहे असंही नाही. खडतर शब्दही फिका पडावा असे पॅचेस असतील. तिथे वेळ लागत असेल. एका भागात, तिथले भिल्ल अडवतात आणि अंगावरच्या सगळ्या वस्तू काढून घेतात. बहुधा लंगोटीदेखील. पण हे ही सगळे महत्वाचे नाही.
या परिक्रमेत केवळ चालणे हा उद्देश नाहीये. त्याला अनुसरून काही विशिष्ट मानसिक कर्मेही असतात. जसे की नामस्मरण, अनुसंधान इत्यादी. त्यामुळे इथे कमीतकमी वेळात परिक्रमा पूर्ण करणे हा मुद्दाच नाहीये. उद्देश वेगळाच आहे.
अर्थात, किती लोक हे अगदी असेच करतात आणि किती लोक नाही हा वेगळा भाग आहे.
12 Jan 2012 - 11:34 am | यकु
थँक्यू बिका.
अद्याप गुरु केला नसल्याने नामस्मरण हे मी विसरलोच होतो.
12 Jan 2012 - 2:32 pm | राघव
सुंदर सांगीतलेत बिपिनदा.
आ.शु.ना परिक्रमेसाठी शुभेच्छा!
आणि यशवंतना दोन्ही लेखांसाठी धन्यवाद!
फक्त नर्मदेचीच परिक्रमा का करायची याचे उत्तर कुठेतरी वाचले/ऐकले होते. एकदा पुन्हा चाळून मग इथे टंकेन. बाकी यशवंत म्हणतात तसे ही परिक्रमा म्हणजे स्वतःच्याच अंतरात केलेले परिक्रमण म्हणता येईल. एक रूपक धरले तर नीट समजून घेता येईल.
नर्मदेचा प्रवाह म्हणजे जीवन. परिक्रमा म्हणजे जीवनक्रमण. त्यात येणारे चांगले-वाईट अनुभव म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातली सुखदु:खे. हे अनुभव आपल्याला काही शिकवण्यासाठी असून त्यात गुंतून न पडता परिक्रमा पूर्ण करणे म्हणजे जीवनक्रमणात आपणास हवा असणारा निर्लेपपणा. परिक्रमा करतांना आपल्याजवळ काहीही नसतांना गरज पडेल तशी कोणा न कोणाकडून जरूरीपुरता आपोआप होत जाणारी मदत ही अनुभूती म्हणजे कृपेची अनुभूती [अर्थात् यासाठी तेवढाच अनन्यभाव मनापासून यायला हवा].
साधाराण हे रूपक धरले तर आपल्या जीवनाशी अन् आपल्या आत्मिक उन्नतीशी या परिक्रमेची सांगड घालता येते. या परिक्रमेतला भाव आपल्या जीवनात कायम ठेवता आला तर संपूर्ण जीवनच एक परिक्रमा होईल.
राघव
11 Jan 2012 - 6:57 am | पाषाणभेद
छान माहिती दिली आहे. त्रंबकेश्वरला श्रावण महिन्यात तिसर्या सोमवारी अशीच फेरी होते. अर्थात ती एक दिवसाची असते. पण आता त्या फेरीतला भक्तीभाव जावून मजाखाव भाव आलेला आहे. तसली परिस्थिती येथे नसावी किंवा यापुढे होवू नये असे मनापासून वाटते.
11 Jan 2012 - 7:03 am | रेवती
चांगली माहिती.
योगायोग म्हणजे गेल्या काही दिवसात मला अजिबात माहित नसलेल्या या प्रकाराबद्दल इतके ऐकायला आणि (डिव्हिडी) पहायला मिळाले आहे की आपला लेख येताच गंमत वाटली. पुढची पायरी म्हणजे परिक्रमेला निघणे.;)
11 Jan 2012 - 10:15 am | हंस
रेवतीतै! हिच देवाची इच्छा असेल, आणि तुम्हाला तसे सुचवत असेल! त्यामुळे तुम्ही परिक्रमेला निघाच कसे!!!!
11 Jan 2012 - 8:05 am | ५० फक्त
आत्मशुन्य परत आला की यावर एक विशेष कट्टा आयोजित केला जाईल, त्याला सर्वांनी आवर्जुन उपस्थित राहावे ही विनंती.
11 Jan 2012 - 12:14 pm | सुहास झेले
नक्की... हा कट्टा चुकवणार नाही !!!
11 Jan 2012 - 7:01 pm | तिमा
नर्मदा परिक्रमा करणार्याची दारु सुटते म्हणतात! म्हणजे कट्टा केला तरी तो निर्जळी करावा लागेल. बिचारा आ.शू. न पिता बसणार आणि इतर स्वाहा करणार, हे शोभून दिसणार नाही.
11 Jan 2012 - 10:01 pm | प्रचेतस
तसाही तो निर्व्यसनी आहे.
11 Jan 2012 - 9:17 am | मन१
शिवाय त्या संपूर्ण फेरित अत्यंत जैव वैविध्य अनुभवायस मिळते. स्थानिक जीएवन्शैली पहावयास मिळते असे ऐकून आहे.
एखाद्या भाविकानेच जावे असे नाही. मोकळ्या मनाने भटक्या पब्लिकनंही तिथं जायला हरकत नसावी.
आणि तू सांगितलेलं दिनक्रमाचं चक्र वगैरे तर अगदिच फिट्ट होउन येतं म्हणे.
11 Jan 2012 - 9:19 am | जोशी
छान विषय, उत्तम माहिती
थोडी अवांतर माहिती...चार जणांची सायकलवरुन परिक्रमा..
http://www.esakal.com/esakal/20111221/5422673218009505327.htm
जोशी
11 Jan 2012 - 9:36 am | किसन शिंदे
नर्मदा परिक्रमेविषयी अतिशय छान माहिती दिलीत यकु शेठ!
11 Jan 2012 - 12:38 pm | स्वाती दिनेश
वर्णन आवडले,
नर्मदा परिक्रमेविषयी कुंट्यांचे पुस्तक वाचायच्या कितीतरी आधी गोनिदांचे कोण्या एकाचे भ्रमणगाथा वाचले होते तेव्हापासूनच एक गूढ आकर्षण आहे.
स्वाती
11 Jan 2012 - 3:23 pm | मेघवेडा
आता ध्रुव भट्ट यांचं मूळ गुजराथीतलं अंजनी नरवणे यांनी मराठीत अनुवादित केलेलं 'तत्त्वमसि' सुद्धा वाचा! :)
छान माहिती यकुशेट. :)
11 Jan 2012 - 3:55 pm | यशोधरा
तत्वमसि तर सुरेख आहेच.
स्वातीताई, भारती ठाकुरांचं, नर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्राही वाच. उत्कृष्ट आणि प्रांजळ आणि 'स्व' चा कुठेही कसलाही बाऊ न करता केलेलं कथन म्हणजे ह्या पुस्तकाचा आत्मा आहे. नक्की वाच हे पुस्तक.
12 Jan 2012 - 12:40 pm | स्वाती दिनेश
तत्वमसि आणि अंतर्यात्रा दोन्ही यादीत अॅड केली आहेत.
धन्यवाद.
स्वाती
11 Jan 2012 - 1:01 pm | स्वातीविशु
उत्तम माहिती मिळाली. आ. शू. चे अनुभव एकायला आवडेल.
विशेष कट्ट्याला नक्की येणार.
11 Jan 2012 - 1:11 pm | विजय_आंग्रे
मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची.
------------------------------
ही यात्रा अतिशय खडतर आहे.
ती पायी करावी लागते.
वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही.
ती चातुर्मासात करीत नाहीत.
त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो.
सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते.
परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.
11 Jan 2012 - 2:23 pm | स्मिता.
'नर्मदा परिक्रमा' ही गोष्टच याआधी माहिती नव्हती, तुमच्या या दोन लेखांमधून त्याबद्दल माहिती मिळाली. पण सर्व संसारी कामं बाजूला ठेवून एवढा काळ फक्त अनुभव घेण्याकरता फिरायला भरपूर धाडस आणि निग्रह लागत असणार.
11 Jan 2012 - 2:26 pm | गणेशा
अतिशय छान माहिती.. पण फोन वगैरे घरी ठेवुन .. एकट्यानेच ही परिक्रमा करणे म्हणजे धोक्याचे नाहि का ?
11 Jan 2012 - 2:36 pm | इष्टुर फाकडा
गोनीदांची परिक्रमा वाचली होती...एवढीच आमची 'परिक्रमा' या गोष्टीशी ओळख. पण त्या वाचनानेही खूप प्रभाव पडला होता...प्रत्यक्ष परिक्रमा पूर्ण करून येणाऱ्या आत्मशुन्य ला भेटणे, ऐकणे अद्भूत अनुभव असेल !
11 Jan 2012 - 2:55 pm | मी_ओंकार
हा प्रश्न इथे कदाचित अप्रस्तुत वाटेल पण फक्त नर्मदा परिक्रमेलाच इतके महत्व आणि प्रसिद्धी का आहे? ती बाकीच्या भाषा/राज्ये मधील लोकांमध्ये ही आहे का? की जगन्नाथ कुंटे हे मराठी होते व पुस्तक मराठीत आहे म्हणून मराठी लोकांमध्ये ही परिक्रमा माहीत आहे? तसे पाहिले तर गंगा ही सर्वात पवित्र आणि मुख्य नदी. तिची परिक्रमाही केली जाते का?
- ओंकार.
11 Jan 2012 - 3:08 pm | यकु
नद्यांच्या बाबतीत केवळ नर्मदेचीच परिक्रमा पूर्वापार रुढ आहे.
नर्मदा परिक्रमेसाठी भारतातील पूर्वेकडची आसाम, मणिपूर ही राज्ये सोडली तर सर्व राज्यातील लोक येतात.
सध्या महाराष्ट्रातील लोकांची संख्या लक्षणीय आहे आणि याचे श्रेय गोनिदां, जगन्नाथ कुंटे यासारख्या लेखक-साधकांना जाते.
गंगेची परिक्रमा केली जात नाही.. तिचा मार्ग चालण्यास बर्याच ठिकाणी अशक्य आहे.
नर्मदेचीच परिक्रमा केली जाते कारण परिक्रमीला अन्नदानाचा पायंडा नर्मदातीरावरील गावांत पडून गेला आहे.
12 Jan 2012 - 11:34 am | गवि
जास्त लोक नर्मदा परिक्रमा करायला लागले की त्यातला थरार जाऊन गर्दी होईल. मग त्याची टुरिस्ट पॅकेजेस निघतील (वैष्णोदेवी, मानसरोवर टाईप).. चालण्याचा भाग मागे पडून खास व्हिडीओ कोचने हा प्रवास होईल. इ इ शक्यता डोळ्यासमोर तरळून गेल्या.
एके काळी अजिंक्य असलेलं एव्हरेस्ट शिखरही हळूहळू सोपं (अर्थात तुलनेत सोपं) होत गेल्यामुळे आता हजारो गिर्यारोहक तिथे जातात. आता शिखरापर्यंत मोबाईल कनेक्टिव्हिटी आहे. वाटा रुळल्या आहेत.
कचरा, आणि चोरीमारी या समस्या आणि पर्यटकांसाठी वेश्याव्यवसाय हे सर्व एव्हरेस्टवर सुरु झालंय. (याची नर्मेदेच्या खोर्यातल्या लुटण्याशी तुलना नाही.)
हळूहळू तिथे रीतसर हेलिकॉप्टर फेरी वगैरे सुरु होईल की काय असं वाटतं.
12 Jan 2012 - 2:57 pm | प्यारे१
प्रकाटाआ.
12 Jan 2012 - 12:52 pm | मन१
शिवाय एवरेस्ट परिसरातील अतिगर्दीमुळे पर्यावरणाचा तोल ढासलतो आहे. नवीन बेस कॅम्प पूर्वी पेक्षा कितीतरी उंचावर असल्यामुळे तिथपर्यंत थेट वाहनाने जाता येते, ह्याला अस्सल गिर्यारोहण मानूच नये, ट्राफिकवर मर्यादा घालाव्यात असं खुद्द एवरेस्ट सर्वप्रथम सर करणार्यांपैकी एक एडमंड हिलरी ह्यांनीच कित्येकदा म्हटलं होतं.
इकडे मुबै-नाशिक्-पुणे हा जैववैध्यानं समृद्ध, ऐतिहासिक दृष्ट्या मह्त्वाचा, बर्यापैकी जंगल् व शेतीवाडी असलेला पट्टाही शहरीकरणाने वाट लागायच्या मार्गावर आहे. असो. अवांतर होइल.
12 Jan 2012 - 1:39 pm | सुहास..
छान माहीती आणि अनुभव