एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा

यकु's picture
यकु in जनातलं, मनातलं
10 Jan 2012 - 9:22 pm

मध्‍य प्रदेशात येऊन चार महिने उलटले तरी इंदुरातल्या सराफ्‍याशिवाय इतर कुठेही जाऊ शकलो नव्हतो. नव्या सालाच्या पहिल्याच दिवशी भारत भ्रमण करायला निघालेला आत्मशून्य इंदुरात येऊन पुढे जाणार होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या ओमकारेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जायचे असे त्याचे ठरले होते. त्याप्रमाणे तो रविवार 1 जानेवारी रोजी इंदुरात येऊन पोहोचला. मिपावर प्रतिसाद देताना दुसर्‍या उकाराचा अतोनात मारा करणारी ही वल्ली कोण याबद्दल उत्सुकता होतीच. आत्मशून्याच्या भेटीअंती तो केवळ प्रतिसाद लिहिताना फक्त दुसरा उकार वापरतो, मात्र 'ण' चा उच्चार बाणातल्या ण प्रमाणे शास्‍त्रशुद्ध पुणेरी पद्धतीने करतो असे दिसले.
तसेच याचा एक पाय ट्रॅव्हलींग बस मध्‍ये झोपला असताना मुडपला असल्याचे त्याने गळाभेट घेताच जाहिर केले. तो लंगडत असलेला पाहून मला वेगळाच संशय आला होता. मग दुसर्‍या दिवशी आरामात त्याला मेडिकलवाल्याकडे घेऊन गेलो. मेडिकल वाल्याने थेट त्याच्या काऊंटरचा अडसर दूर करुन क्षतिग्रस्त पायाच्या निरीक्षणार्थ आशूला दुकानाच्या आत आमंत्रित केले. आशू पुण्‍यनगरीनिवासी असल्याने या प्रकारामुळे घाबरला. पण त्या मेडिकलवाल्यानेच आत्मशून्यच्या चेहेर्‍यावर उमटलेल्या सर्व शंका दूर केल्या. त्याला एका स्टूलावर स्‍थानापन्न केले. पायाचे निरीक्षण करताना आशूशी संवाद साधत पायाला झटका दिला. मग त्या मेडिकलवाल्याने त्याच्या लंबोळक्या दुकानात आशूच्या निर्दोष चालण्‍याची दोन चार वेळा तालीम घेऊन पुन्हा त्याच्या पायाला झटके दिले. आत्मशून्याने झटक्यांमुळे पायाच्या वेदनांत चाळीस टक्के फरक पडल्याची कबुली दिली. मग मेडिकलवाल्याने पायाला लावायला शास्त्रापुरत्या गोळ्या आणि एक मलम दिले.

आत्मशून्याशी झालेल्या संवादातून कळले की तो इंदूरपासून 60 कि.मी.वर असलेल्या ओंकारेश्वरला जाणार आहे. मी काही देवदेव करणार्‍यांपैकी नाही. ठायीच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा... न लागती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण हे मी कधीतरी ऐकले आहे. त्यामुळे आमच्या खात्यावर तीर्थाटन, देवदर्शन, पूजा-अर्चा नेहमीच सायडींगला पडलेले असते. तरीही, तीर्थाटनाने आनंदित होणार्‍या दोस्तांचे आपल्याला वावडे नाही.

आत्मशून्य ओमकारेश्वरला जाणारच आहे तर अनायासे ओमकारेश्वर पाहुन घ्‍यावे असे ठरवले. तो आला त्या दिवशी सुटी असल्याने बाकायदा इंदुरातल्या सराफ्‍यावर आडवा हात मारला. सराफ्‍यातल्या खास व्यंजनांचे फोटो काढून मिपावर टाकले, तर त्या वासाने मिपाकर सराफ्‍यावर चाल करुन येतील आणि तो मराठी लोंढा आवरता आवरता मध्‍य प्रदेशातही नसता 'क्रायसिस' उद्भवेल असा संशय आल्याने सराफ्‍यात फोटो काढले नाहीत. माझ्‍याकडे सध्‍या कॅमेरा असलेला मोबाईल नाही ही खरी गोष्‍ट आहे. ;-) आत्मशून्यही मोबाइल घरीच ठेऊन प्रवासाला निघाला होता.

इंदूरात सध्‍या आमचा तंबू जिथे ठोकला आहे त्या लोकमान्य नगरच्या उशाशी असलेल्या, सतत पेंगत रहाणार्‍या ठेसनातून ओंकारेश्वरी जाता येते ही नवी माहिती विकीपिडीयानं दिली. एरव्ही रोज आम्ही चहा प्यायला याच स्‍टेशनबाहेर असलेल्या झोपडीरुपी रेस्‍टॉरंटमध्‍ये जात होतो. पण एवढ्‍या शांत स्‍टेशनातून कुठे जाता येत असेल यावर माझा विश्‍वास नव्हता. विकीपिडीयाच्या माहितीची स्‍टेशन मास्‍तरांकडून खात्री करुन घेणे आवश्‍यक होते.

चहा पिऊन झाल्यावर आत्मशून्याला पुण्‍या-मुंबईसारखे बिलकुल नसणारे स्‍टेशन दाखवावे व ओमकारेश्वरच्या गाडीची 'पूछताछ' करावी असे ठरले. शक्यतोवर नियम पाळण्‍याकडे माझा कल असतो. फलाटावर जायचे म्हणजे प्लॅटफॉर्म तिकीट घ्‍यायला हवे. म्हणून खिडकीच्या आत विदाउट युनिफॉर्म बसलेल्या बाबांना प्लॅटफॉर्म तिकिट मागितले. तर ते म्हणाले, ''प्लॅटफॉर्म टिकट किसलिए चाहिये?'' मी म्हणालो प्लॅटफॉर्मवर जायचंय म्हणून. तर ते एकदम खेकसलेच.. फलाटपर जाने के लिए टिकट की क्या जरुरत म्हणणारा तो म्हातारा स्‍टेशनलाच खेटून असलेल्या झोपडीरुपी हॉटेलचा मालक आहे असा प्रकाश पडला.. आणि दोन रेल्वेंच्या मधल्या टायंबात यजमानाकडे जेऊन येणार्‍या पुलंच्या स्‍टेशन मास्‍तरची आठवण झाली.

दररोज सकाळी 9 वाजता त्या स्टेशनमधून ओमकारेश्वरला रेल्वे जाते यावर त्या म्हातारबांच्या हॉटेल चालवणार्‍या अर्धांगिनीने सहमतीची मोहोर उठवली. ते ऐकून माझ्‍यापेक्षा आत्मशून्यच जास्त खूश झाला. कारण गाडी पकडण्‍याची पळापळ वाचली होती. रुमपासून या स्‍टेशनात पाच मिनीटांत जाता येते.

आता इथून पुढे मात्र या कथनाला वेगळे वळण लागत आहे. हे कथन मी मिपावर किंवा मिपावरील कुणाकडेही करु नये अशी आत्मशून्याने अगदी अनेक वेळा कळवळून विनंती केली असली तरी माझ्‍या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरुन मी शून्याचे गुपीत फोडत आहे. त्याबद्दल तो मला माफ करील अशी आशा आहे. हे गुपीत फोडले तर मी मित्रांसाठी विश्वासार्ह माणूस नसेल अशी तंबीही त्याने देऊन ठेवली आहे. कितीही काही असले तरी, कुणाला जाहीर होणे पसंत नसलेली गोष्‍ट मी उघड करीत आहे याबद्दल माझ्‍या मनात सल आहे.

'युजींविषयी तुझ्‍यासोबत बोलायचंय.. म्हणून तुझ्‍याकडे येत आहे' असे सांगणारा आत्मशून्य इंदुरला आला तो वेगळाच संकल्प मनात घेऊन. एकमेकांची ओळख होऊन एकमेकांबद्दलचा नवेपणा संपल्यानंतर त्याने तो ओमकारेश्वराहून सध्‍या तरी एकट्याने पायी चालत, 'नर्मदा परिक्रमेला' निघणार असल्याचे त्याचे गुपीत माझ्‍यासमोर फोडले. ते ऐकून, त्याने सोबत आणलेली जगन्नाथ कुंटे उर्फ अवधूतानंद यांची पुस्तके वाचून, इंटरनेटवरुन परिक्रमेबाबत 2 दिवस माहिती काढून मला सुद्धा त्याच्यासोबत परिक्रमेला जावे असे वाटायला लागले. पण माझ्‍यावर असलेल्या जबाबदार्‍यांमुळे मी ते करु शकलो नाही. या जबाबदार्‍या नाणेफेक करुन तूर्त टाळणे योग्य होईल काय याचाही प्रयत्न मी करुन पाहिला - पण ते होणे नव्हते. असो.

शेवटी दिनांक 9 जानेवारी रोजी आम्ही लोकमान्य नगर स्‍थानकातून ओमकारेश्वरकडे जाणार्‍या खंडवा-अकोला-रतलाम रेल्वेत चढलो. मीटरगेजवरुन झुक् झु्क् करीत जाणार्‍या रेल्वेत आम्ही चढलो. शिटा रिकाम्या असूनही सगळा प्रवास उभे राहून, डोंगरदर्‍यांची रमणीय दृश्‍ये मीटरगेजच्या गतीने डोळेभरुन पहाता आली. डॉ. आंबेडकरांचं जन्मस्‍थान असलेले महूदेखील वाटेत लागले. मागील पावसाळ्यात दोन लोकांचा बळी गेलेल्या कुप्रसिद्ध ''पातालपानी'' हा विकराल धबधबा वाटेत भीती घालून गेला. सुमारे चार तासांनंतर गाडीने आम्हाला ओमकारेश्‍वर रोड उर्फ मोरटक्का स्टेशनवर सोडले.

दुपारी दीडच्या दरम्यान नर्मदेच्या तीरावर ओबडधोबड पर्वतशिलांवर वसलेल्या ओमकारेश्वर येथे पोहोचलो. तिथल्या घाटांवर फिरुन झाल्यानंतर परिक्रमेपूर्वी नर्मदापूजन, प्रसादाच्या 'कढाई' साठी गुरुजी गाठणे आले.

हे फोटो काढल्या ठिकाणीच छापून मिळाले.. जे तंत्रज्ञान आयफेल टॉवरखाली तेच नर्मदेच्या तीरावर

ही परिक्रमा पूर्णत: शास्‍त्रोक्तपणे, सर्व नियमांचे पालन करुनच करायची असे आत्मशून्याने ठरवले होते. शेवटी कुंटेंच्याच पुस्तकात नाव दिलेल्या श्री. सुधाकरशास्‍त्री जोशी यांचा पत्ता काढत नर्मदेच्या पलिकडील तीरावरच्या ओमकारेश्वर मंदिराकडे निघालो. इतर कुठल्याही तीर्थस्‍थानाप्रमाणे इथेही भोवती पंडित लोकांचा गराडा पडलाच. पण आम्हाला श्री. सुधाकरशास्‍त्री हवे होते. सुधाकरशास्‍त्रीच हवे असण्‍याचे कारण म्हणजे, कुंट्‍यांनी लिहिल्याप्रमाणे ते महाराष्‍ट्रीय. त्या पुजार्‍यांनी सुधाकरशास्‍त्री हे 2003 मध्‍येच निधन पावल्याचे वर्तमान सांगितले. बाळाशास्‍त्री हे त्यांचे त्यांचे सुपूत्र भेटू शकतील असे सांगून त्यांचा मोबाइल नंबर आमच्या हातात पडला. पुढे गेल्यानंतर एका जॅकेटधारी पंडिताला बाळाशास्‍त्रींचा अतापता विचारला तर ''रुकें, अभी मिला देते है..वे भगवान के मुख्‍य पुजारियों मे से एक है..'' असे सांगून तो ओंकारेश्वर मंदीरातील गर्दीत अंतर्धान पावला. थोड्‍या वेळाने बाळाशास्‍त्री गर्दीतूनच कुठूनतरी समोर आले. महाराष्‍ट्रातून, कुंटेंच्या पुस्तकात नाव वाचून परिक्रमेसाठी आलोय म्हटल्यावर बाळाशास्‍त्री यांनी पूर्णपणे हिंदी लहेजाच्या कह्यात गेलेल्या मराठीत माहिती द्यायला सुरुवात केली.
उद्या परिक्रमा सुरु करता येईल, आता थकला असाल, पलीकडच्या तीरावरच गजानन महाराज संस्‍थानचा भक्त निवास असून तिथे आराम करा असे सुचवले. रात्री साडेसात-आठला ओंकारेश्वराची आरती असते तेव्हा परत एकदा या म्हणजे उद्या कढाईचा विधी करणार्‍या त्यांच्या बंधूराजांशी भेट घालून देता येईल असे सांगितले.

गजानन महाराज संस्‍थानचा भक्त निवास पाहून आम्ही चाट पडलो. अवघ्‍या 175 रुपयांत रात्रभरासाठी उत्तम दर्जाची खोली मराठी माणसांना महाराष्‍ट्राबाहेरही उपलब्ध करुन देण्‍याच्या प्रयत्नाला केवळ दंडवत घातला. ओळख सिद्ध करणारे पुरावे मात्र काऊंटरवर दाखवावे लागले. तिथे जेवणाचीही सोय आहे, पण आम्हाला फिरण्‍याच्या नादात वेळेचे भान राहिले नाही. त्यामुळे भक्त निवासात प्रसाद घेता आला नाही.

तासभर आराम करुन भक्त निवासाच्या जवळच असलेल्या ममलेश्वराच्या दिशेने निघालो. घाट चढून गेल्यानंतर एका दुकानात भल्या मोठ्‍या अक्षरात पाटी लाऊन भांग विकली जात असल्याने 'अचंभा' वाटला. पण इंदूरमध्‍येच, आत्मशून्य आणि मी टपरीवर गेल्यानंतर त्याने चॉकलेटसारख्‍या गोळ्या पाहून ते काय आहे असे विचारले होते. सिगारेटींसाठी मी ज्या टपरीवर रोज जातो तिथे भांगेच्या गोळ्याही एका रुपयात एक या भावाने विकल्या जातात हे ज्ञान मला इंदुरात रहायला आल्यानंतर चार महिन्यांनी झाले होते.

तेव्हा मजा म्हणून त्या स्वस्तातल्या भांगेच्या दोन गोळ्या रात्री झोपताना घेतल्या होत्या. दुसर्‍या दिवशी हपिसला ब्राम्हण घातला गेला. जागच दुपारी 12 वाजता आली. भांगेत मंद-मंद नशा उत्पन्न करुन अंमल असेपर्यंत माणसाला अवकाशगामी ठेवण्‍याची शक्ती आहे. पण 'दिडकीची भांग घेतली की वाट्टेल तेवढ्‍या कल्पना सुचतात' हे काही खरे नसावे. मला काहीही सुचले नाही.

येताना एका दुकानात शेरलॉक होम्स सारखा ओढायचा 'पाइप' पाहिला होता. सुव्हेनियर म्हणून मला तो हवा होता. एक फुटला तर दुसरा म्हणून ते दोन पाइफ घेऊन आम्ही घाट उतरु लागलो. बाजूलाच असलेल्या पुस्तकांच्या दुकानात गीता प्रेसची उपनिषदे आणि चारी वेद विकायला ठेवले होते. श्रीमद् विद्वद्वर - वरदराजाचार्यप्रणित लघुसिद्धांतकौमुदी होते. संस्‍कृत पूर्णपणे समजण्‍याच्या नावाने बोंब.. पण उगाच किडा म्हणून ती स्वस्तातली खरेदी केली आणि भक्तनिवास गाठला.

(आत्मशून्यासोबत केलेल्या 12 कि.मी.च्या परिक्रमेचा वृत्तांत, वाटेत आलेले मजेदार प्रसंग उद्या)

कुंट्‍याच्या पुस्तकातून 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय, ती कशी करायची हे बहुतेक सर्वांना माहित असेल. म्हणून त्याच माहितीची पुनरावृत्ती टाळावी असे वाटते. पण कुणाला ही माहिती हवी असेल तर तसे सांगावे म्हणजे पुढच्या भागात थोडक्यात लिहू.

धर्मसमाजजीवनमानराहणीप्रकटनविचारसद्भावनाशुभेच्छाप्रतिक्रियाआस्वादलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

पैसा's picture

10 Jan 2012 - 9:40 pm | पैसा

बढिया! मस्त! उद्याच्या लेखाची वाट पहात आहे. परिक्रमेबद्दल लिहिलंस तर हवंच आहे.

यकु's picture

10 Jan 2012 - 9:43 pm | यकु

आत्मशून्य एकूण २२६० कि.मी.च्या परिक्रमेसाठी पायी चालत गेला आहे.
मी फक्त १२ कि.मी. पर्यंत त्याच्या सोबत राहिलो.

पैसा's picture

10 Jan 2012 - 9:50 pm | पैसा

पुस्तकातल्या माहितीबद्दल म्हणतेय.

कवितानागेश's picture

10 Jan 2012 - 10:33 pm | कवितानागेश

परिक्रमा अशी मध्येच सोडता येत नाही.
उरलेले २२४८ किमी नर्मदामय्या पूर्ण करुन घेइलच! :P

विलासराव's picture

10 Jan 2012 - 10:36 pm | विलासराव

यकुशेठ करा आता तयारी. आलोच मी............

परिक्रमा अशी मध्येच सोडता येत नाही.
उरलेले २२४८ किमी नर्मदामय्या पूर्ण करुन घेइलच!

अहो लिमाकाकू, :p
सोमवारी हपिसात न विचारताच सुटी घेतली होती..
नंतर फोन लावल्यावर किमान मॅनेजरशी खडाखडी व्हायला पाहिजे म्हणजे लगेच राजीनामा देतोय असे सांगता येईल आणि परिक्रमेला निघता येईल असे आम्ही ठरवले होते..
पण तो आमचा मॅनेजरच गायब झाला.
अजूनही संधी मिळाली तर बाकायदा संकल्प करुन आत्मशून्याला रस्त्यात गाठेन. :)

सोत्रि's picture

10 Jan 2012 - 10:22 pm | सोत्रि

पैसातैंशी बाडिस!

- (भटक्या) सोकाजी

निवेदिता-ताई's picture

10 Jan 2012 - 10:47 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते....

रेवती's picture

10 Jan 2012 - 9:54 pm | रेवती

मस्तच! वाचतिये.
उद्या वृत्तांत नक्की टाका.

गणेशा's picture

10 Jan 2012 - 10:04 pm | गणेशा

लिहा हो सर्व माहितीसहित ...
हा भाग सुंदर ..

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jan 2012 - 10:11 pm | अत्रुप्त आत्मा

नर्मदा परिक्रमा हे एकंदर काय प्रकरण आहे याची मला चांगलीच कल्पना आहे..जाऊन आलेल्या काही लोकांकडनं त्याचे वृत्तांत ऐकताना माझ्या अंगावर शहारे आले होते...तेंव्हा आ.शू. परत आलास की तुझ्या या धैर्याला/धाडसाला/ठाम आत्मविश्वासाला मी खरोखरी दिसशील तिथे साष्टांग नमन करणार आहे...

प्रचेतस's picture

10 Jan 2012 - 10:13 pm | प्रचेतस

मस्त वृत्तांत.
कमाल आहे आत्मशून्य या माणसाची. तसा अफाटच माणूस आहे हा. वाटेल ते निधडेपणाने करू शकणारा.

+ १००० कमाल आहे आत्मशून्य या माणसाची. तसा अफाटच माणूस आहे हा. वाटेल ते निधडेपणाने करू शकणारा.
हेच म्हणते :)
खरच कमाल आहे आ.शु. ! तुझ्या परिक्रमेला शुभेच्छा :)
अन यशवन्त व्रुत्तान्त छान :)
पु.भा.शु. :)

प्रास's picture

10 Jan 2012 - 10:20 pm | प्रास

आयला, भारीये की हा आत्मशून्य!

यकुशेठ, हा भाग मस्त झालाय. पुधचं विनासंकोच लिहा.

वाट बघत आहे.

विलासराव's picture

10 Jan 2012 - 10:35 pm | विलासराव

कशाला पुस्तक वाचायला लावताय आता?
लिहाच थोड्क्यात परीक्रमेबद्दलही.
कोणी सांगावं आमच्याही भाग्यात हा योग असायचा.
तुमच्या लेखामुळेच मला प्रेरणा मिळाली असे होउन तुम्हीही पुण्यात भागीदार व्हाल.

प्रास's picture

10 Jan 2012 - 10:36 pm | प्रास

'पुण्यात' हल्ली भागीदारांना कमी नाहीये. सगळेच 'पुणे' वाटून खातायत ;-)

विलासराव's picture

10 Jan 2012 - 10:39 pm | विलासराव

ह्यासाठी शक्यतो प्रतिसाद देत नाही. पण विषयच असा होता की रहावले नाही.

प्रास's picture

10 Jan 2012 - 10:44 pm | प्रास

अहो, राज्यकर्ते पुणे वाटून खातायत तर त्याच्याशी तुमच्या प्रतिसाद न देण्याची सांगड का बरं घालताय? :-o

मी तर म्हणेन की तुम्ही परिकम्मेला जरूर जा पण इथे त्याचा व्यवस्थित वृत्तांत देण्याच्या बोलीवरच! :-)

चुकलं माकलं क्षमा करा......

विलासराव's picture

10 Jan 2012 - 10:52 pm | विलासराव

मी तर म्हणेन की तुम्ही परिकम्मेला जरूर जा पण इथे त्याचा व्यवस्थित वृत्तांत देण्याच्या बोलीवरच!

Smile

म्हणजे जाउच नको असं म्हणा ना.

चुकलं माकलं क्षमा करा......

काय हे प्रास........... ?
हे क्षमा प्रकरण कशासाठी बॉ.

पाषाणभेद's picture

11 Jan 2012 - 2:17 am | पाषाणभेद

फारच छान लेख, आत्मशुन्याला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!
अन 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय हे तुम्ही लिहाच. आम्ही कुंटे साहेबांचे पुस्तक वाचलेले नाही. थोडक्यात लिहा हवे तर.

विकास's picture

11 Jan 2012 - 2:48 am | विकास

असेच म्हणतो!

विटेकर's picture

11 Jan 2012 - 5:37 pm | विटेकर

सगळेच 'पुणे' वाटून खातायत ??

हा शब्द आमच्या बारामतीकर दादांना आवडणार नाही हो !
तुमचे म्हणजे अगदीच समाजवादी धोरण... तुम्ही असे सगळ्ञाना पुणे वाटायला लागला तर काका- पुतण्यांनी कोणाच्या तोंडाकडे पहावे? नुकताच " भाईंचा" अडसर दूर होतोय...

वास्तविक विषय इतका छान आहे की असले अवांतर करणे जीवावर आले होते .. पंण मोह टाळता आला नाही..

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jan 2012 - 10:37 pm | बिपिन कार्यकर्ते

तुम्हा दोघांना आणि तुमच्या किड्यांना.... _/\_

सुहास झेले's picture

11 Jan 2012 - 12:10 pm | सुहास झेले

तुम्हा दोघांना साक्षात दंडवत रे .... मानलं !!!!

आळश्यांचा राजा's picture

10 Jan 2012 - 10:56 pm | आळश्यांचा राजा

परिक्रमेच्या उद्यमाला, आणि ज्या खुमासदार शैलीत लिहिलेत त्याला!

मन१'s picture

11 Jan 2012 - 12:19 am | मन१

हे काय नवीन?
पुन्हा गो नी दांडेकर संचारले का काय कुणाच्या अंगात? हे आशू अध्यात्म वगैरे वर चित्रविचित्र बोलायचं तर वाटलं आमच्यासारखच पढतपंडित बेणं असेल म्हणून. स्वतः उपद्व्याप करणारा उचापती दिसतोय.
अस्सल सिंदबादला सलाम.

आणि हो, यक्कु ष्टाइल लेखही (कधी नव्हे तो) बरा जमलाय. ;)

<<कुंट्‍याच्या पुस्तकातून 'नर्मदा परिक्रमा' म्हणजे काय, ती कशी करायची हे बहुतेक सर्वांना माहित असेल. म्हणून त्याच माहितीची पुनरावृत्ती टाळावी असे वाटते. पण कुणाला ही माहिती हवी असेल तर तसे सांगावे म्हणजे पुढच्या भागात थोडक्यात लिहू. >>

काहिच माहित नाही या बद्दल, पहिल्यांदाच ऐकतोय, तर जरा लिहुन सांगा कि हि परिक्रमा काय आणी कशी करायची.

विकिवरुन थोडीशी माहीती कळाली ती अशी.

http://en.wikipedia.org/wiki/Parikrama#Narmada_parikrama

--टुकुल.

कुळाचा_दीप's picture

11 Jan 2012 - 6:42 am | कुळाचा_दीप

जरूर जाऊन या ... आणि वाटेत तो परशुराम का कोण तो अश्वत्थामा दिसला तर तला आमचा पण नमस्कार सांगा...अनेक अनेक शुभेच्छा आपणाला व आत्मशुन्य यांना !
वृत्तांताच्या प्रतिक्षेत...

मस्त लेखन, आत्मशुन्य कडुन ही अपेक्षा होतीच, खरंतर अपेक्षा जरा जास्त खडतर प्रवासाची होती तरी सुद्धा नर्मदा परिक्रमा म्हणजे अपेक्षाभंग नव्हे.

नंदन's picture

11 Jan 2012 - 8:36 am | नंदन

पुढच्या भागाची वाट पाहतो. यकु, तुमचीही परिक्रमा लवकर पूर्ण होवो आणि तिचे साद्यंत वर्णन मिपावर वाचायला मिळो.

किसन शिंदे's picture

11 Jan 2012 - 9:38 am | किसन शिंदे

आशू..

_/\_

तुझी पुढची संपुर्ण परिक्रमा सुखरूपपणे पार पडो.

मूकवाचक's picture

11 Jan 2012 - 10:00 am | मूकवाचक

आत्मशून्यला परिक्रमा सुखरूपपणे पार पडण्यासाठी शुभेच्छा.

प्यारे१'s picture

11 Jan 2012 - 10:15 am | प्यारे१

आत्मशून्य खरंच असं काहीतरी करणार आहे हे वाचत होतोच ख व मध्ये.
पण त्यानं 'कात्रज' केला आमचा.
आम्हाला वाटलेलं 'नार्थ ईस्टा'त कुठं तरी जाणार आहे तो.

नर्मदा परिक्रमा करणं सोप्पं नाही हे कुंटेंच्या पुस्तकातून आणि सौ. चितळेंच्या व्हीसीडीतून वाचले, ऐकले आहेच.
विलक्षण अनुभव येतात, प्रचंड संकटं, शारिरीक, मानसिक परिक्षांचे क्षण सामोरे येतात पण त्यातून तरुन जाऊन परिक्रमा पूर्ण करणं हेच खरं कौशल्य आहे.

आत्मशून्य पुढे नतमस्तक नी तो भेटला की साष्टांग नमन. वी आर प्राऊड ऑफ यू बॉस.

स्वातीविशु's picture

11 Jan 2012 - 12:49 pm | स्वातीविशु

आत्मशुन्य यांना नर्मदा परिक्रमेस खुप शुभेछा! पुढील भागाची प्रतिक्षा करत आहोत.

नर्मदा परिक्रमा

मध्यप्रदेशातील श्रीओंकारेश्वरापासून सुरुवात करायची. पश्चिमेला नर्मदेच्या दक्षिण तटाच्या कडेने जायचं, रेवासागर (नर्मदा जिथे अरबी समुद्राला मिळते ते नर्मदेचे मुख) नावेने ओलांडायचा, नर्मदेच्या उत्तर तीराजवळून पूर्वेकडे नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं. तिथे वळसा घालून नर्मदेच्या दक्षिण तटाजवळून पश्चिमेला ओंकारेश्वरापर्यंत येऊन परिक्रमा पूर्ण करायची.
------------------------------
ही यात्रा अतिशय खडतर आहे.
ती पायी करावी लागते.
वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही.
ती चातुर्मासात करीत नाहीत.
त्यामुळे प्रथम थंडीचा कडाका आणि नंतर असह्य उन यांचा सामना करावा लागतो.
सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते.
परस्त्रीला माई म्हणजे नर्मदेचे रूप समजून तिच्याशी आदरयुक्त व्यवहार करणे आवश्यक असते.

अन्या दातार's picture

11 Jan 2012 - 2:10 pm | अन्या दातार

फक्त एक बदल सुचवतोय

नर्मदेच्या उगमापर्यंत झारखंडातील अमरकंटकापर्यंत यायचं.

अमरकंटक झारखंडमध्ये नसून म.प्र,मध्येच आहे.

आशूला त्याचे इच्छित प्राप्त होवो हिच सदिच्छा.

स्मिता.'s picture

11 Jan 2012 - 2:08 pm | स्मिता.

वाचतेय. हा भाग आवडला... पुढेही लिहा नर्मदा परिक्रमेबद्दल.

बाकी आत्मशून्याला परिक्रमेकरता शुभेच्छा!

आत्मशून्य आणि यशवंत, तुम्हां दोघांना परिक्रमेसाठी शुभेच्छा.
अगदी अद्ध्यात्माचा भाग बाजूला ठेवला तरी अशा प्रवासाचा योग असावा हे खरंच भाग्य आहे. किती अनुभव, दृश्ये, निसर्गदर्शन गाठीशी बांधले जाईल आणि त्यातूनच कितीतरी शिकायला मिळेल... नर्मदा, गंगामाई अशांसारख्या स्वतःचे व्यक्तिमत्व असलेल्या नदयांकाठाने आणि सोबतीने प्रवास करायला मिळणे ही खरोखरची पर्वणी असते, हे अनुभवांती सांगते. भाग्यवान आहात.

कधीतरी ही परिक्रमा करायला मिळावी ही इच्छा आहे.

विसुनाना's picture

11 Jan 2012 - 4:09 pm | विसुनाना

नर्मदा परिक्रमेला निघालेल्या आत्मशून्य यांच्या धाडसासमोर नतमस्तक आहे.
लेख उत्कृष्ट आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

शंका : सरदार सरोवरामुळे/नर्मदा प्रकल्पामुळे परिक्रमेच्या मार्गात काही बदल झालेला आहे किंवा कसे?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jan 2012 - 4:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्मशुन्य यांच्या नर्मदा परिक्रमेचा बेत आमच्याशी शेअर केल्याबद्दल यकुशेठ आपले आभार........!!!

बाकी, आत्मशुन्य यांच्या धाडसाला आपला बॉ नमस्कार आहे. आत्मशुन्य जेव्हा ही नर्मदा परिक्रमा पूर्ण करेल तेव्हा त्या समग्र वृत्तांताबद्दल आत्ताच उत्सुकता लागली आहे.

-दिलीप बिरुटे

विटेकर's picture

11 Jan 2012 - 5:54 pm | विटेकर

साष्टांग नमन !
मी ही खूप दिवसांपासून या विचारात आहे पण असे पटकन निघून जाणे .. ऊठून चालावे दिगंतरासी..
असे होणे नाही ! माझी इच्छा प्रबळ केल्याबद्द्ल धन्यवाद ! मरण्यापूर्वी नक्किच करणार असे आणि एवढेच म्हणतो !
सत्य संकल्पाचा दाता इश्वर !
परिक्रमेची मराठीतील सर्व पुस्तके वाचून झाली आहेत .. पैकी भारती ताई चे अंतर्यात्रा अप्रतिम .. एका गुरुवारी अर्ध्या रात्रीत वाचून काढले होते आणि सकाळी भारती ताईला मेल लिहली.. संध्याकाळी उत्तर आले.. शनिवारी आम्ही मोर ट्क्क्या वर .. एक दिवासाचा अनुभव घेतला..
आता आत्मशून्य केव्हा अंगात येताहेत याची वाट पहातोय !

पिवळा डांबिस's picture

12 Jan 2012 - 12:14 am | पिवळा डांबिस

श्री आत्मशून्य यांना त्यांच्या श्रीनर्मदा परिक्रमेसाठी हार्दिक शुभेच्छा!
त्यांचा हा संकल्प निर्विघ्नपणे पार पडो ही प्रार्थना!

जयंत कुलकर्णी's picture

12 Jan 2012 - 10:16 am | जयंत कुलकर्णी

वाचले आहे, वाचतोय आणि वाचेन.....

जयंत कुलकर्णी's picture

12 Jan 2012 - 10:18 am | जयंत कुलकर्णी

..

काय अफाट प्रकार आहे हा यशवंता.. २००० हून जास्त किलोमीटर्स प्रवास करण्यासाठी,
हाती फोन, गाडी , अन्नसाठा, पैसा नसताना ..
किंवा पैसा असून तो हाती टिकेल अशी शाश्वती नसताना ("लुटले जातात" असे म्हटलेस त्यावरुन) ..
किंवा पैसा हाती सुरक्षित टिकला तरी त्याची जंगलात कागदाच्या तुकड्यापलीकडे किंमत नसताना..
चालत चालत निघणं म्हणजे निव्वळ अचाट-अफाटपणा आहे. आत्मशून्य हे जबरी व्यक्तिमत्व दिसतंय.

तो यातून यशस्वीपणे आणि सुरक्षित माघारी येईल याची खात्री आहे. त्याच्या साहसाला आणि शोधक वृत्तीला सलाम.

यशवंता, तू उत्तम लेख लिहीला आहेस, नेहमीप्रमाणेच.

अन्या दातार's picture

12 Jan 2012 - 11:07 am | अन्या दातार

तो यातून यशस्वीपणे आणि सुरक्षित माघारी येईल याची खात्री आहे. त्याच्या साहसाला आणि शोधक वृत्तीला सलाम.

हा जरा Paradox वाटतोय. नक्की काय म्हणायचे आहे गवि?? नर्मदा परिक्रमेत एकतर यशस्वी होता येईल किंवा अयशस्वी. पण यशस्वी माघार नसावी बहुदा.

(विचारात पडलेला) अन्या

विश्वनाथ मेहेंदळे's picture

12 Jan 2012 - 11:14 am | विश्वनाथ मेहेंदळे

अरे माघारी म्हणजे परत रे. घरी नाही का येणार तो परिक्रमा संपली की ??

दातार,

वन डे एके दिवशी फॉक्स कोल्हा रिव्हर नदीवर वेंट गेला.. वॉटर पाणी ड्रिंक पिऊनी वेंट बॅक माघारी गेला.

माघारी = ध्येय साध्य झाल्यावर परत येणे.

युद्धातली माघार नव्हे..

काय शब्दांचा कीस पाडते ही हल्लीची पिढी.. ;)

यात कोल्हा, नदी वगैरे ही फक्त उदाहरणे आहेत. त्यावरुन कल्ला सुरु करु नये असं म्हणून पाहतो.

पाषाणभेद's picture

16 Jan 2012 - 6:21 am | पाषाणभेद

गवि तुम्ही सल्लाकेंद्र चालू कराच. घोस्ट रायटींग मी करत जाईन हवं तर. (तसे दोन तिन ताईचे सल्ले लिहीले आहेत. बायोडेटा पाठवू काय? :-))

वपाडाव's picture

19 Jan 2012 - 3:36 am | वपाडाव

आत्मशुन्य या माणसाविशयी अतिशय आदर होता, आहे अन राहील....
__/\__ त्रिवार __/\__ सलाम __/\__