ओमर खय्याम भाग - १
ओमर खय्याम भाग - २
ओमर खय्याम भाग - ३
ओमर खय्याम भाग - ४
ओमर खय्याम भाग - ५
ओमर खय्याम भाग - ६
नजाकत
पहाटे दवबिंदू फ़ुलांचे गाल सुशोभित करते.
त्यांच्याच वजनाने त्यांची नजाक़त झुकते.
खरं सांगु का ? मला तर तीच आवडते गुलाबकळी मस्त,
जिने आपले घेतले आहे लपेटून वस्त्र !
थंडीतल्या पहाटे तुम्ही तुमच्या सखीच्या कमरेभोवती हात टाकून बागेत फ़ेरफ़टका मारता आहात त्याचे वर्णन –
बागेत अनेक प्रकारची फुले फुललेली आहेत. पण जास्त कळ्याच दिसत आहेत. उमललेल्या फ़ुलांच्या नाजुक कळ्यांवर दवबिंदूंची गर्दी झाली आहे. त्याच्या वजनाने त्या पाकळ्या खाली झुकल्यात. मला माझ्या प्रेयसीच्या गालावरुन जेव्हा अश्रू ओघळतात, त्या नजार्याची आठवण येते. ते अश्रू त्या गालाला असेच सुशोभित करतात, (बायका रडताना किंवा रडल्यावर अधिक सुंदर दिसतात हे त्या काळीही मान्य होते तर ) आणि त्यावेळीही तिच्या पापण्या अशाच झुकलेल्या असतात, ज्यामुळे ती अधिकच सुंदर दिसते.
या अनेक सुंदर फुलांमधे मला मात्र न उमललेली घट्ट पाकळ्यांची गुलाबकळीच आवडते जशी माझी प्रिया आत्ता दिसत आहे. थंडीमुळे तिने आपले वस्त्र अंगाला लपेटून घेतले आहे.
उद्या पहाटे हे वर्णन विसरु नका-
पहाटे दवबिंदू फ़ुलांचे गाल सुशोभित करते.
त्यांच्याच वजनाने त्यांची नजाक़त झुकते.
खरं सांगु का ? मला तर तीच आवडते गुलाबकळी मस्त,
जिने आपले घेतले आहे लपेटून वस्त्र !
मित्र,गप्पा आणि .....
मित्र, गप्पा, आणि बरोबर आवडते पेय, तुमच्या लक्षात येईल,... हे क्षण ..... याची किंमत कशाने करणार ?
म्हणून खय्याम म्हणतो-
दोस्तहो ! एकत्र जमाल तेव्हा,
जरुरी आहे माझी आठवण ठेवणे.
जेव्हा प्याल मुरलेली मदीरा,
लक्षात ठेवा, माझ्या पेल्यात सुरई उपडी करा !
ह्यावर जास्त काय बोलणार ! भावना ह्या गाण्यात जास्त चांगल्या व्यक्त होतील.
“मला ह्या दारुच्या पेल्याप्रमाणे नीट संभाळा
नाहीतर माझ्याबरोबर अजून थोडे अंतर चाला,
कारण मी नशेत आहे......
प्रसिध्द गायक सी. एच. आत्मा यांचे हे गाणे अतिशय सुंदर आहे. जरुर ऐका.
मित्र
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मित्रांना भेटणे हा केवढा आधार आहे आणि त्याचे महत्त्व किती हे ज्यांचे मित्र उरले नाहीत किंवा ज्यांना मित्र नाहीत त्यांना विचारा. किंवा आपल्या घरातील एखाद्या वृध्दाला विचारा आणि बघा आठवणींचा कसा धबधबा सुरु होतो तो.
मित्रहो सुदाम्याची गोष्ट तर आपल्याला माहीतच आहे. आता सध्याच्या, ज्या काळात लहानपणापासून म्हणजे शाळेपासूनच मुलांची विभागणी आर्थिक निकषांवर अगदी सहज होते त्या काळात कृष्ण आणि सुदाम्याची गाठ कुठली पडायला ?
खय्याम मात्र मित्रांना सांगतोय, अरे आपल्यापैकी कोणी राहिला आहे का हे अगोदर बघा ! .....
मित्रांनो जेव्हा ठरलेल्या वेळेस आणि ठिकाणी तुम्ही जमाल,
आणि संगतीत संगिताचा आनंद लुटाल,
आणि ती सुरई जेव्हा ह्या हातांतून फ़िरेल,
तुमच्या ह्या औदार्यापासून कोणी मित्र वंचित तर नाही ना ?
ठरलेल्या वेळी आणि ठिकाणी जमण्याची थोरवी मी सांगायला नको. शनिवारी दिवसभर मेजवानी करुन रविवारी परत सकाळी चहावर गप्पा मारण्यासाठी भेटणारी माणसे मला माहीत आहेत. मी ही त्यातलाच आहे. :-)
दोन मित्रांमधले नाते कसे असावे ?
हे नाते म्हणजे निख्खळ आनंद ! बास बाकी काही नाही.
परमेश्वर
परमेश्वराच्या शोधात शहाण्या माणसाने जाऊ नये.
त्या रस्त्यावर प्रचंड काटेकुटे आहेत. ते काटे काढायला फार अवघड ! पण ते काढल्याशिवाय पुढे जाणे मुष्कील ! ते तुम्हाला माहीत आहेच. हा एक ज्ञानाच्या वाटेवरचा फार मोठा ट्रॅफीक जॅम आहे म्हणाना ! पुढेही जाता येत नाही आणि मागेही वळता येत नाही.
खय्याम म्हणतो,
त्याला भेटण्यासाठी बायका पोरांपासून दूर,
संसारापासून तुझा मुक्काम हलवायला लागेल !
हे सर्व तुझ्या वाटेतील अडथळे,
ते काढल्याशिवाय तुझा प्रवास कसा ?
हे करताना, इथेही नाही आणि तेथेही नाही असे होण्याची शक्यताच फार. त्या अवस्थेत जे हाल होतात, त्याचे वर्णनही अंगावर काटा आणेल. त्यापेक्षा या संसारात रमावे, आनंदात रहावे, दुसर्याला आनंद वाटावा आणि सुखात मरुन जावे. परमेश्वर, परमेश्वर, म्हणजे तरी दुसरे काय असणार ?.....
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
14 Jun 2011 - 4:02 pm | इरसाल
या वरून मो.रफीच्या गाण्यातील बोल ' मीर कि गजल कहू तुझे मै, या कहू खय्याम कि रुबाई !! आठवले.
शनिवारी दिवसभर मेजवानी करुन रविवारी परत सकाळी चहावर गप्पा मारण्यासाठी भेटणारी माणसे मला माहीत आहेत. मी ही त्यातलाच आहे.
हे बाकी सहीच आहे राव.
14 Jun 2011 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा
क्या बात है दादा...प्रेयसीच्या बाबतित हळुवार/कोमलपणा काव्यात जागोजाग पहायला मिळतो...पण ईतकी समर्पकता विरळाच...व्हेरी ट्ची...एकदम मस्त...