व्यक्त : कारण आणि परिणाम
माणसाचं शरीर हा एक भव्य कारखाना आहे. या कारखान्यात बाहेरून कच्चा माल मागवला जातो, जो श्वासाच्या, अन्नाच्या, आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या रूपाने येतो. त्यावर प्रक्रिया होते. अन्नाचं पचन होतं. श्वास मंदज्वलनासाठी ऒक्सिजन पुरवतो. आणि अनुभवावर बेतलेली विचारप्रक्रिया मनात सुरू होते. या प्रक्रियांच्या अंताला आपल्या शरीराकडे बरीच उत्पादनं तयार झालेली असतात. काही वापरण्यासाठी, म्हणजे कृती करण्यासाठी; तर काही उत्सर्जित करण्यासाठी - ज्यांना आपण टाकाऊ म्हणतो. पण खरंच ती टाकाऊ असतात का?