आळस

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
2 Sep 2014 - 11:23 pm

मला जराही धीर धरवत नाही यासाठी मी स्वतःला आधी दोष द्यायचो. आता नाही. अभिमान आहे मला मी उतावळा असल्याचा.

माणूस सतत धावत असतो, पळत असतो. समोरची ट्रेन सुटली आणि तिच्यानंतर अजून एक ट्रेन येणार असली तरी मनातून एक आवाज उमटतो जो ओरडून ओरडून आपल्याला ती सुटणारी ट्रेन पकडायला सांगतो, आणि मग आपण जीवाची पर्वा न करता ती ट्रेन पकडायला धावत सुटतो. का? कारण समोर दिसणारी संधी सोडायला मन कधीच धजावत नाही. मनाला अनुभवाची भूक असते आणि प्रत्येक अनुभव एक वेगळीच शिकवण देऊन जात असतो. ही भूक भागवायची, वाढवायची प्रत्येक संधी मन हेरत असतं. आपल्याला मागे धरून ठेवतो तो शिकण्याचा आळस. आपण काहीतरी शिकू आणि ती शिकवण आपल्याला स्वस्थ बसू देणार नाही हे आळसाला माहित असतं. आपण अस्वस्थ झालो की आळस अशक्त होतो. आणि आपल्या मनातली भिती ही फक्त त्या आळसाच्या अस्तित्वासाठी चालू असलेल्या धडपडीचं प्रतिबिंब असतं.

खरंच आपल्याला खरी भिती अशी कधी वाटते का? आपण चुकीच्या बाबींविरोधात नव्याने उभे ठाकतो तत्पूर्वी जो संकोच आपल्याला वाटतो तो आपला आळस असतो. त्याला न जुमानता आपण आपल्या विरोधकाला सामोरे जातो तेव्हा नकळतपणे हृदयाची जी धडधड वाढत जाते, ती आपल्याला मागे ओढणा-या आळसापासून सामर्थ्य द्यायला. धडधड वाढते आपण उत्तेजित झाल्यावर. धडधड वाढते म्हणजे काय तर पंपिग वाढतं हृदयाचं. हृदय आपण न विचारताच आपल्याला शक्तीचा पुरवठा करतं. थोडक्यात आपलं शरीर आपल्याला ग्रीन सिग्नल देतं. आणि ग्रीन सिग्नल मिळाल्यावर भरधाव अॅक्सलरेट करून विरोधकाला तुडवण्याऐवजी बहुतांश वेळी आपण चक्क रिव्हर्स गिअर टाकून पळून जातो. का? उत्तर एकच. दिशाभूल. आळसानं आयत्या वेळी केलेली दिशाभूल. वाढलेली धडधड हा ग्रीन सिग्नल नसून तो आपल्या शरीराचा आपल्या संभाव्य कृतीला दर्शवलेला विरोध असल्याचं आपल्या मनात ठासवलं जातं. कारण आळस कृतीला घाबरतो.

पण शरीर कधीच कृतीला घाबरत नाही. आपण कितीही थकलेलो असलो तरी ते पंपिग करत राहतं. नव्या कृती शोधत राहतं. खरं तर रोजच्याच आयुष्यात कितीतरी अशा कृती कच-यासारख्या पडलेल्या असतात, कोणीतरी येऊन आपल्याला उचलेल आणि विल्हेवाट लावेल या आशेने. पण लोकांना कचरा ही जशी उचलण्याची कृती कमी आणि टाकण्याची जास्त वाटते, तसंच इतर कृतींबाबतही आहे. त्या करण्यापेक्षा न करण्यावर जास्त भर असतो माणसांचा. कारण काय तर आळस. मनाप्रमाणे कृती करण्यासाठी आधी विचार करावा लागतो, जिथे विचार करण्याचाच आळस केला जातो तिथे ऐच्छिक कृती घडण्याची अपेक्षा कोण ठेवणार! या आळसावर क्षणिक मात करता आलीच, तर त्या एका क्षणात सगळं काही साध्य करण्याच्या उद्देशाने मनाची आणि शरीराची लगबग सुरू होते. आळसावर, संकोचावर मात करून जेव्हा नव्याने काहीतरी कराल, तेव्हा स्वतःला निरखून पाहा. तुमची हालचाल जलद असेल, कारण संकोचाचा प्रभाव वाढायच्या आत तुम्हाला कार्य तडीस न्यायचं असतं.

अभ्यास, सराव, निरीक्षण, आकलन, विचार अशा महत्त्वाच्या आघाड्यांवर जिंकल्यानंतर आळसाला जाणवतं की मनाची खूपच घुसमट होत्येय. अनुभवाच्या भुकेने ते व्याकूळ झालंय. जास्त ताणलं तर बंड होऊ नये, म्हणून आलतू फालतू आघाड्यांवर तो दुय्यम कृतींना जिंकू देतो. मग आपण व्हिडीओ गेम्स खेळतो, सहलीला जातो. गाडी, बाईक भरधाव चालवतो, सिग्नल तोडतो, धावती ट्रेन पकडतो, थोडक्यात जिथे कृती करण्याची घाई नसते, तिथे आपण घाई करतो; आणि जिथे करायला हवी, तिथे आरामात सगळं आपोआप जुळून येण्याची वाट पाहात राहतो.

या आळसाला हरवण्याचं साधन आहे तुमची घाई. तोच एक आशेचा किरण आहे, ज्याला योग्य दिशेकडे परावर्तित करायचा अवकाश आहे, आळस नामशेष होऊन तुम्ही जिंकलात म्हणून समजा.

- © कौस्तुभ अनिल पेंढारकर

मांडणीवावरजीवनमानतंत्रराहणीविचारलेखमत

प्रतिक्रिया

पण लय आळस आलाय. :-O

कवितानागेश's picture

2 Sep 2014 - 11:42 pm | कवितानागेश

माझा एक मित्र म्ह्णतो, 'आळस हा माणसाचा शत्रू आहे, असं सांगतात. पण माझा तर बाबा मित्रच आहे! मला फार आवडतो. नेहमी माझ्यासोबत असतो. कध्धी मला सोडून जात नाही.' ;)

विजुभाऊ's picture

3 Sep 2014 - 12:17 pm | विजुभाऊ

खरे आहे आळस हा मोठ्ठा शत्रु आहे.
पण गांधी म्हणायचे शत्रुवरही प्रेम करा.
त्यामुळे या शत्रुवर माझे प्रेम आहे

प्यारे१'s picture

2 Sep 2014 - 11:50 pm | प्यारे१

आराम हा राम आहे.
-चाचा नेहरु.

सोत्रि's picture

3 Sep 2014 - 12:38 am | सोत्रि

आराम हा राम आहे.

हे असं ते तुमच्या (पक्षी: तुमच्या पिढ्यांमधे कोणाच्यातरी) कानात बोलले होते का?

- (छिद्रान्वेषी) सोकाजी

आमच्या शाळेत लिहिलेलं असलंच काहीतरी. नीट आठवत नाही.
आठवून बघायचा प्रयत्न आळसामुळं टाळला.

कवितानागेश's picture

3 Sep 2014 - 9:43 am | कवितानागेश

मी वर पाण्चटपणा उगीच केलाय. (सवयीनी)
पण जिथे कृती करण्याची घाई नसते, तिथे आपण घाई करतो; आणि जिथे करायला हवी, तिथे आरामात सगळं आपोआप जुळून येण्याची वाट पाहात राहतो.>> हे अगदी पटतंय. :)

बॅटमॅन's picture

3 Sep 2014 - 12:23 pm | बॅटमॅन

खरं तर रोजच्याच आयुष्यात कितीतरी अशा कृती कच-यासारख्या पडलेल्या असतात, कोणीतरी येऊन आपल्याला उचलेल आणि विल्हेवाट लावेल या आशेने. पण लोकांना कचरा ही जशी उचलण्याची कृती कमी आणि टाकण्याची जास्त वाटते, तसंच इतर कृतींबाबतही आहे.

एकच नंबर!!!!

पण एका कवीने म्हटलेय त्याप्रमाणे या जन्मावर, या आळसावर, शतदा प्रेम करावे. म्हणून मी आळसावर प्रेम करतो.

समीरसूर's picture

3 Sep 2014 - 12:26 pm | समीरसूर

अगदी बरोबर विचार! कृती श्रेष्ठच असते. ती चुकली तरी शिकवून जाते. कृतीशून्यता माणसाला मूढ बनवते. विचार पटले.

अभिरुप's picture

3 Sep 2014 - 1:59 pm | अभिरुप

विचारांशी सहमत.........एकदम सुंदर लेख.

मुक्त विहारि's picture

3 Sep 2014 - 2:51 pm | मुक्त विहारि

जरा आराम करावा, असे मी रोज म्हणतो...

>>या आळसाला हरवण्याचं साधन आहे तुमची घाई.
ये बात कुछ हज़म नहीं हुई, बाकी लेख बर्‍यापैकी जमलाय.

हे अगदी पटतंय :D बाकि लेख एकदम आशावादि वाटला.