काही वैशिष्ट्यपूर्ण रसायने
बालपणातली आठवण अशी की आजारी पडलो, की आई-वडील किंवा आजी-मावशी बरोबर (औषधाच्या) बाटल्या घेऊन दवाखान्यात जायचो. तिथं एक (च) डॉक्टर अन एक कंपाउंडर असायचा. डॉक्टरकाका तपासायचे अन एका कागदावर चार ‘अर्वाच्य’ (पक्षी-वाचता न येणारे ) शब्द खरडून द्यायचे. मग कंपाउंडरकाका मागच्या कपाटातून भरलेल्या असंख्य बाटल्यांपैकी काहींची बुचे फिरवून एका पत्र्याच्या पांढऱ्या मगात त्याचे ‘मिक्स्चर’ बनवीत अन आमच्या बाटल्यांमध्ये भरून देत. अन पुढे चार दिवस आम्ही ते मिक्स्चर अन वहीच्या कागदाने बांधलेल्या पुडीतल्या गोळ्या पोटात ढकलायचो. चार दिवसांनी तब्येत खडखडीत !