आमच्या शेजारच्या पावटे काकूंना त्यांच्या पोरीच्या म्हंजे स्वर्णीच्या लग्नाबद्दलचा लेख मुकपीठ मध्ये छापून आणायचा होता. त्यांच्या मते हे लग्न आगळेवेगळे आणि अभिनव पद्धतीने झालेले होते.शेजारधर्म पाळण्यात कसूर नगं म्हणून त्यांच्याकडून तिच्या लग्नाची बैजवार माहिती घेऊन लेख लिहून काढला. म्हटलं छापायला देण्यापूर्वी एकदा सगळ्यांच्या डोळ्याखालून सरकवावा. आन् कोणी अजुन काही चांगलं शीर्षक सुचवतय का ते बघावं. कारण ह्या बाबत मिपाकरांनी खटासि खट यांना त्यांच्या मुतपीठाच्या लेखासाठी केलेल्या मदतीचा अनुभव जमेला व्हता. तेव्हा शांत चित्ताने आपण हा लेख वाचावा अशी नम्र इनंती करुन माझे भाषण संपिवतो. धन्यवाद.
===============================================================================
जावई बसले अडून
परवा शहराच्या प्रतिष्ठित भागात असलेल्या आमच्या टुमदार बंगल्याच्या आवारातील अमेरिकन परसिम्मोनच्या झाडावर बसलेला कावळा खूपच कावकाव करत होता.आता या झाडा बद्दल सांगायचे म्हणजे माझे यजमान श्री.पावटे हे काही व्यावसायिक भेटीगाठी घेण्यासाठी सॅन जोस येथे गेले असताना त्यांचा, त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे की काय श्री. डागलेस क्चोरेट (डाइरेक्ट ऑफीसर)यांच्याशी अतिशय जवळून परिचय झाला. लवकरच परिचयाचे मैत्रीत रुपांतर झाले व ह्या मैत्रीचे प्रतीक म्हणून श्री. क्चोरेट यानी ह्या सिम्मोन झाडाचे रोप आमच्यासाठी भारतात पाठवले. पण इथल्या पोस्ट खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे रोप आम्हाला मिळेपर्यंत वाळून गेले होते. त्यावेळी आपल्या धिरोदात्त वृत्तीचे दर्शन घडवत श्री. पावटे यांनी आपले मेहुणे श्री. सोनबक्कले (अतिबाह्य कुक्कुट अधिकारी, कृषिविद्यालय)यांचे अमूल्य मार्गदर्शन घेउन ते रोप जगवले.
आज पाहुणे येणार असं दिसतयं असा विचार करत असतानाच, आमचे कौटुंबिक स्नेही श्री.आडदांडे सपत्निक आमच्या बंगल्याच्या स्पॅनिश पद्धतीच्या आधुनिक गेट मधून आत प्रवेश करते झाले. त्यांच्या मुलीच्या विवाह समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी ते खास आपल्या स्कूटी या वाहनाने आले होते. त्यांचा आमच्या सुनेने आम्सटरडॅम येथून पाठविलेला ओलॉंग अँड ट्यूलिप क्रश टी देऊन यथोचित पाहुणचार केला. ते दांपत्य गेल्यावर वाचण्यासाठी म्हणून ती लग्नपत्रिका हातात घेतली आणि मनाने अलगद भूतकाळात उडी घेतली. आम्हाला अंतर्बाह्य हादरवून टाकणार्या या घटनेला ५ वर्ष पूर्ण होतील पण ती घटना अजूनही मन:पटलावर स्पष्ट कोरली आहे.
त्यावेळी आमची सुशील आणि लाडकी कन्या सौ.वज्रदन्ति हार्डर म्हणजे पूर्वाश्रमीची स्वर्णि उर्फ स्वर्णदंती (पेट नाव पपडी) हिच्यासाठी नुकतेच वरसंशोधन चालू केले होते. अमेरिकेतिलच जावई मिळावा अशी आम्हा उभयतांची तीव्र मनीषा होती व त्या दृष्टीने प्रयत्न चालू होते ह्याचे कारण म्हणजे अमेरिकेत आपल्या भारतासारखे नसते, तिथे अगदी दोन वर्षाची मुलेही अस्खलित इंग्रजी बोलतात.
त्यातच श्री.पावटे याना कंबरदुखीच्या त्रासाने त्रस्त केले होते व उपचारांसाठी ते बर्लिन(जर्मनी)येथे जाण्याच्या तयारीत होते.पण आमच्या नशिबात मात्रं काहीतरी वेगळेच घडायचे होते.
इथे एक आवर्जून नमूद करावेसे वाटते, की आमची पपडी स्वर्णदंती माझ्यावर गेली असल्यामुळे अतिशय तल्लख बुद्धिमत्तेची, सुंदर व मोहक आहे. वैद्यकीय पदवी मिळवण्यासाठी तिने तब्बल १० वर्षे कॉलेजात काढली होती.
शिक्षण पूर्ण होताच, अवघ्या एक महिन्यातच तिला कुर्तडगंज येथे वैद्यकिय चिकित्सा शिबिरात जावे लागले. तेथेच, पोट साफ होत नाही ह्या तक्रारीवर इलाज करून घेण्यासाठी आमचे जावई श्री.वॉकफार्ट हार्डर हे न्यूयॉर्क येथून दाखल झाले होते. ते पाहताक्षणीच स्वर्णदंतीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी तिच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला.
मुलीवर लहानपणापासूनच आम्ही स्वातंत्र विचारसरणी जोपासण्याचे संस्कार केल्यामुळे तिनेहि परस्पर होकार देऊन लग्नाची तारीख निश्चित केली.तिने आम्हाला सविस्तर तार पाठवून, असाल तसे निघून येण्याचा निरोप दिला कारण लग्न कुर्तडगंज येथेच (अतिशय दुर्गम ठिकाण, इथून अंतर सुमारे ८५० कि. मी.) येथे उद्याच व्हावयाचे होते.
लेकीच्या लग्नाला जायचे म्हणून श्री. पावटे यांना हर्षवायूच झाला होता. लगेच सामान बांधायला घेतले व त्यात लेकिला आवडणारी लोणची, पापड, चटण्या हेही बरोबर घेतले.
कुर्तडगंज येथे जाण्यासाठी रात्रीचे विमान होते त्यात जागा पकडून कसे बसे विवाहस्थळी पोहोचले. तरी वाटेत रहदारिचा त्रास झालाच. (आपला देश कधी सुधारणार कोण जाणे).
लग्न "पळून जाणे" ह्या पद्धतीने करावयाचे असल्याने मुळीच डामडौल नव्हता,त्यामुळे दगदग ही वाटत नव्हती.पण ऐन लग्नाच्या घटिकेला श्री.वॉकफार्ट यांना कोणीतरी फूस लावल्यामुळे ते घोड्यावर बसण्यासाठी आडून बसले व मोठा बाका प्रसंग उभा राहिला.आता ऐनवेळी परक्या व दुर्गम ठिकाणी कुठून घोडा आणायचा ह्या घोर विवंचनेत आम्ही आकंठ बुडालो, पण ते आपला हट्ट सोडायला तयारच नव्हते. त्यांना काहिही करुन दोन मिनिटे का होईना घोड्यावर बसायचेच होते.
शेवटी देवाच्या कृपेनेच म्हणा हवंतर, कशी कोण जाणे, आमच्या तल्लख बुद्धीच्या स्वर्णदंतीला एक नामी कल्पना सुचली. तिने श्री.पावटेंना ते तिच्या लहानपणी तिच्याशी खेळताना आनंदाने तिचा घोडा घोडा होत या हृदयस्पर्शी गोष्टीची आठवण करून दिली. तिने लग्न सुरळीत पार पडण्यासाठी पावट्यांनी फक्त दोन मिनिटे घोडा होऊन श्री.वॉकफार्ट यांना पाठीवर घेण्यासाठी, डोळ्यांत पाणी आणून विनंती केली. श्री.पावट्यांनीही स्वत:ची कंबरदुखी विसरून आनंदाने हा तोडगा मान्य केला व श्री.वॉकफार्ट यांना दोन मिनिटे आपल्या पाठीवर बसवून घेतले.हे द्रुश्य बघून उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी अक्षरश: हेलावून गेली. श्री. पावटे यांचा हा त्याग बघून मला ही सतत गहीवरुन येत होते.
अशा रीतीने शेवटी विवाह निर्विघ्नपणे संपन्न झाला.
आजही कोणाची लग्नपत्रिका बघितली किंवा कोणाच्या लग्नाविषयी ऐकायला मिळाले की त्या प्रसंगाची आठवण येते आणि अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.
प्रतिक्रिया
5 Feb 2013 - 6:19 pm | सूड
हा हा हा !!
5 Feb 2013 - 6:33 pm | दादा कोंडके
जब्रा. ह ह पु.वा. :))
किमान चाळीस एक मुक्तपीठ लेख वाचून हे लिहलयं. :)
5 Feb 2013 - 6:36 pm | बॅटमॅन
सकलमुक्तपीठपरायण, समस्तधागाविच्छेदक अधिराज की जय!!!
7 Feb 2013 - 9:20 am | ऋषिकेश
+१ जय हो!!
5 Feb 2013 - 6:41 pm | पैसा
पक्के पिठिय लेखक दिसताय!
5 Feb 2013 - 6:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
च्यामारी ! लवकरच मिपावर मुक्तपिठाचा IPR चोरीचा दावा लाग्णार असे दिसते !
सर्वलोक्सहो, सांभाळून... आणि हो, नंतर बोलू नका की "अगोदर का नाही सांगीतले?" ;) :)) :)) :))
संमं, जरा ते प्रतिसाद स्वयंसुधारणेचं बघा की ! (कृपया वरचा अर्धवट प्रतिसाद उडवावा.)
5 Feb 2013 - 6:58 pm | तर्री
मुलीचा बाप >>>
5 Feb 2013 - 8:59 pm | तिमा
घोडा झाल्यामुळे श्री.पावट्यांचे पोट साफ झाले असेल.म्हणजे जावयाने एका दगडात दोन पक्षी मारले.
5 Feb 2013 - 9:33 pm | आनन्दिता
टिपीकल मुपी लेख...!!
5 Feb 2013 - 9:45 pm | जेनी...
मिपावर मुक्तपिठ ची जाहिरात होतेय ... संपादकांनी वेळीच लक्ष घालावं ...
बायदवे अक्खा लेख वाचलाच गेला नाहि ... कारण जेवढा वाचला त्यात कुठेहि
हसुच आलं नाहि ... उलट " केवढं पकवलय " असच वाटलं .
माफ करा पण खरच बोर झालं वाचुन :(
मुक्तपिठ ला बाजुला ठेवुन मिसळपाव ची शोभा वाढवा .
10 Dec 2013 - 10:48 am | lakhu risbud
हुप्रोद (उपरोध ) ब्रान्ड चा चष्मा लावून वाचा मंग गम्मत येतीया !
5 Feb 2013 - 9:58 pm | आदूबाळ
पपडीचं नाव वॉकहार्ट भाऊजींनी वज्रदंती का ठेवलं ते लिहायचं राहिलं
6 Feb 2013 - 9:39 pm | अधिराज
तिचे दात दगडावाणी मजबूत व कठीण आसल्याचा अनुभव कदाचित वॉकफार्ट यानी घेतला आसलं, काय सांगावं?
5 Feb 2013 - 10:22 pm | शुचि
सॉलीड!!
5 Feb 2013 - 10:42 pm | मितभाषी
पकाउ लेख.
ओढून ताणून इनोद करायचा केवीलवाना प्रयत्न
असो.
5 Feb 2013 - 10:57 pm | अभ्या..
च्यामारी
चिकाटी हाय राव तुमची अधिराज. ब्येस्ट. लगे रहो.
6 Feb 2013 - 6:23 am | किसन शिंदे
काल परवाच मुक्तपीठावरचा एक लेख पहिल्यांदा वाचला, म्हटलं हि वाट जरा वेगळीच वाटतीय. हा लेखही त्याच वाटेवरचा वाटलाय.
6 Feb 2013 - 3:06 pm | अभ्य
पकाऊऊऊऊऊ............
6 Feb 2013 - 3:36 pm | प्रसाद गोडबोले
कसं जमतं बुवा तुम्हाला असलं लिहायला ??
6 Feb 2013 - 9:35 pm | अधिराज
माझ्या मायबाप वाचकांनू आवं कुठं इनोद शोधावा ह्याचं काय गणित असावं का नाय म्हंतो मी. एका आदर्श गृहिणी आपल्या लाडक्या लेकीच्या आगळ्या वेगळ्या लग्नाचा अनभव समद्यां बरोबर शेयर करण्याचा प्रयत्न करती हाये, त्यांच्या मते जीवन हादरवून सोडणारी ती घटना होती.आन् तुम्ही म्हणताय आम्हाला हसायला नाही आलं.
आवं याचसाठी तर असतो तिथं लेख छापणार्यांचा अट्टाहास.
असो, काय चुकीचं बोल्लो आसलं तर माफ करा आन् समद्या परतिसादकर्त्याना धन्यवाद.
10 Dec 2013 - 5:36 pm | कपिलमुनी
आवडला..
7 Feb 2013 - 9:48 am | मुक्त विहारि
छान जमले आहे विडंबन
7 Feb 2013 - 2:15 pm | चिगो
विडंबन छान जमलंय.. आणि "पकाऊ" टायपातल्या प्रतिक्रियांमध्येच ह्या लेखाचे यश सामावले आहे.. :-)
(शाळा-प्रतिज्ञा आवडणारा) चिगो
10 Dec 2013 - 5:45 pm | बॅटमॅन
जय हिंद!!!!!
(प्रतिज्ञाप्रेमी) बॅटमॅन.
7 Feb 2013 - 2:24 pm | मन१
शॉलेट है बॉस
7 Feb 2013 - 2:31 pm | दिपक
जमेला है
आवडला!!
9 Feb 2013 - 9:56 am | श्रिया
झक्कास विडंबन! लेखात योजलेली नावेही छानच! अमेरिकन परसिम्मोनचे रोप "इथे" जगवले म्हणजे आश्चर्यच आहे, फळांनी लगडलेले परसिम्मोनचे झाड छान दिसते असं म्हणतात.
9 Feb 2013 - 11:52 am | अधिराज
धन्यवाद श्रियाजी.
हो, हो. अगदी. हा फोटो बघा. (इंटरनेट वरुन साभार)
![persimon](http://3.bp.blogspot.com/-k-pEZ_vdFcQ/UPQZj22A4YI/AAAAAAAALXE/zUJf5xbN-T8/s640/Persimon+tree.jpg)
9 Feb 2013 - 12:21 pm | प्रसाद गोडबोले
;)
9 Feb 2013 - 6:05 pm | अधिराज
होप सो, तुम्ही झाडालाच सुंदर म्हणताय.
9 Feb 2013 - 11:43 pm | प्रसाद गोडबोले
फळं सुंदर आहेत ;) ;) =))
10 Dec 2013 - 10:24 am | सर्जेराव
मुक्तपीठी लेखन चांगलच जमले आहे. तिथ युएस रिट्र्न लोकांचे लेख आले कि पब्लिकचं टाळकच सरकतं.
10 Dec 2013 - 10:33 am | खटासि खट
वज्रदण्ति वगैरे नावं बदलून लेख खरच मुक्तपीठला पाठवा अशी सूचना करतो. काय काय प्रतिक्रिया येतात ते पहायला जातीने हजर राहू. जमल्यास हळूच एखादी सोडून देऊ.
थोडासा भाबडा रस मिसळल्यास मुक्तपीठसाठी पर्फेक्ट लेख आहे.