कविता

गर्भार सातव्या महिन्याची

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
1 Aug 2018 - 10:28 am

जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!

मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!

क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!

आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!

- संदीप चांदणे

eggsmiss you!अनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडगाणेजिलबीनागपुरी तडकाप्रेम कविताफ्री स्टाइलभूछत्रीमाझी कवितारतीबाच्या कविताभयानकहास्यकरुणशांतरसकविताप्रेमकाव्यविनोदमौजमजा

व्हाॅट्स अॅप संन्यास

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
28 Jul 2018 - 7:26 am

"हॅलो"
"तुझे posts फार होताहेत, ते गाणं ग्रुपवरुन delit कर"
"बर,लगेच करतो"
आम्ही तात्काळ ग्रुप्स exit व WA forced stop केले"

मौनातच संयमीत उद्रेक झाला...

व्हाॅट्स अॅप संन्यास

बरे झाले देवा,
WA सोडविला,
पाश तोडविला,
आंतर्जाल ।

अपुलेच सांगती
पोस्ट तुझे फार,
त्यांना होतो भार,
नेटपॅक।

कसे हे आले,
आम्हावरी बंधन
म्हणे करा लंघन,
थोडा वेळ।

आम्हावरी सेंसाॅर,
इतकेच खोकणे,
तितकेच पादणे
ते नै होणे
आम्हा चिये।

अभंगकविता

दोन रुपक कविता

मित्रहो's picture
मित्रहो in जे न देखे रवी...
26 Jul 2018 - 8:20 pm

छत्री
ती रोज सोसते घोंघावनाऱ्या वाऱ्याचा मारा
ती हसत झेलते बरसनाऱ्या पावसाच्या धारा
कधीही, कुठेही, मी तिचीच मदत घेतो एका झटक्यात
घरात मात्र माझ्या मी तिला ठेवतो दूर एका कोपऱ्यात

माती
तो गडगडतो, आवाज करतो म्हणून मग मी घाबरतो
ती कडकडते, चमकते, म्हणून मी घरात लपून बसतो
ती देते हिरवळ, ती देते गंध, ती घेते मला कुशीत
पण साधा चिखल झाला म्हणून मी तिला लाथाडतो

कविता माझीकविता

हट्ट!

मनमेघ's picture
मनमेघ in जे न देखे रवी...
26 Jul 2018 - 7:51 am

हट्ट कोणता करू तुजकडे?
थिट्या मनाची झेप थिटी
फिरून येती मनात इच्छा
भेट हवी मज, हवी मिठी.
आणि हासुनी ओळखशी तू,
देउन जाशी हवे तसे
मंतरल्यासम ते क्षण जाता,
इच्छांचे त्या पुन्हा पिसे.

'थांब थांब तू, नकोस जाऊ'
सांगावेसे तुज वाटे,
त्याच क्षणी अन् सभोवताली
काजळगहिरे तम दाटे.
म्हणून जाशी मिठी छेडुनी
झिणिझिणि वलये गात्रात
अन् पुढल्या भेटीची होते
मनी अनावर सुरुवात.

कविताहट्टमनमेघ

गुरू

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
24 Jul 2018 - 7:56 pm

कठिण,गहन,भेदक प्रश्नांचे
चिंतन ज्यांना मोहविते
त्यांच्या प्रतिभेची प्रत्यंचा
इंद्रधनूसही वाकविते

जटिल समस्या त्यांच्या हाती
पडता सरळ,सुलभ होते
विभिन्न अस्फुट पैलूंमधले
नाते अलगद उलगडते

आदिम अनघड पत्थरातही
सुबक शिल्प त्यांना दिसते
केवळ प्रज्ञा-स्पर्शे त्यांच्या
हीणाचे सोने बनते

माझी कविताकविता

घे मिठीत

आकाश५०८९'s picture
आकाश५०८९ in जे न देखे रवी...
24 Jul 2018 - 1:52 pm

घे मिठीत, घे मनात जसा असेन मी
माझ्यापुरताही सखे माझा नसेन मी

रितेपण प्यालातले माझ्यात ओतले
ओत लोचनांनी मद्य तेव्हा भरेन मी

नको स्पर्धा, नको जीत अन्‌ हारही
तू जिंकशील कशी जेव्हा हरेन मी

मला विसरल्याचेही विसरलीस तू
तू लाग आठवावया तुला सुचेन मी

थांबवले मृत्योस तुला भेटण्या मी
तू ये सखे लवकरी खोटा ठरेन मी

आहे आकाश मी माझ्याचसारखा
जसा तुला हवा तसा कसा असेन मी

---- आकाश

कविता

लाख अंतरे..

आकाश५०८९'s picture
आकाश५०८९ in जे न देखे रवी...
24 Jul 2018 - 1:50 pm

लाख अंतरे अन्‌ अंतरी तू
ऐलतिरी मी, पैलतिरी तू

म्हणाली विलग होता ओठ हे
झाले कॄष्ण मी, हो बासरी तू

आकाश.........

लाख अंतरे

कविता

पाऊस आला

Secret Stranger's picture
Secret Stranger in जे न देखे रवी...
23 Jul 2018 - 2:54 pm

आला आला पाऊस आला
येऊन माझ्या सोबत बसला,
ऐकून आपले प्रेम-तराणे
क्षणभर तो ही तुझ्यात रमला..

आला आला पाऊस आला
वाट तुझी मग पाहू लागला,
सोबत माझी करता-करता
तो ही झाला चिंब ओला..

आला आला पाऊस आला
मनात थोडा हिरमुसलेला,
तू नसल्याचे निमित्त सांगून
माझ्यावर मग रुसून बसला..

आला आला पाऊस आला
मनास माझ्या भिजवून गेला,
विरहाच्या या अवघड वेळी
तुझी आठवण देऊन गेला..

कविता

विठूबंदी

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
22 Jul 2018 - 10:24 pm

( News:10 लाख वारकऱ्यांच्या सुरेक्षेला प्राधान्य, मी विठ्ठल पूजेसाठी पंढरपूरात जाणार नाही'--मुख्यमंत्री)

विठूबंदी

धाडा रे कुणीतरी,
विठूला सांगावा,
आरक्षणाचा कांगावा,
फार झाला।

मागे होते एकदा
मराठा मंत्री सोळा,
आरक्षणाचा गोळा,
तेव्हाका नाही।

मुख्यमंत्र्यांना यंदा,
नाही महापूजा,
कारण बलभूजा,
जातीभेद।

संत सांगो गेले,
वारकरी एकता धर्म
भेदाभेद अमंगळ जर्म
जळो जळो।

नावडतीचे तुम्हा,
जरी अळणी मीठ,
निषेधाचे व्यासपीठ,
इथे नव्हे।

अभंगकविता

पाऊस !

मनमेघ's picture
मनमेघ in जे न देखे रवी...
21 Jul 2018 - 9:29 pm

भिजून भिजून, गात्री-
झेलून झेलून पाणी
झाडाशी बसून, गोड-
सुरात गातोय कोणी.

कातर कातरवेळी
लकेर लकेर ओठी
पालवी पालवी जशी
पानाच्या फुलते देठी.

सळसळ सळसळ पानी
चाहूल, जिवाला भूल
मोकळ्या मोकळ्या वाटा
वाटांत ओलेते सल...

गारवा, गारवा रात्री
हवेत वेगळा नाद...
दुरून, दुरून आली
कुणाची? कुणाची साद?

... झाडाशी झाडाशी खोल,
थरथर थरथर देही
डोळ्यांत, डोळ्यांत दोन
पाऊस झाला प्रवाही !

~ मनमेघ

कविताभिजून भिजून गात्री