https://www.misalpav.com/node/42846
अहो डाॅक्टर तुम्ही सांगीतलं होतं की प्रत्येक वेळेस अपॉईन्टमेन्ट घेऊनच या , पण तुमचा फोनच लागत नाहीये ; परवा पासून किमान १५ वेळा तरी प्रयत्न केला .......
मी विचारलं नेमका कोणता फोन नंबर लावताय दाखवा बरं .... मग पेशंटनी नंबर दाखवला आणि मी एवढच बोलू शकलो की हा नंबर कधीच लागणार नाहीये !! ....
कारण हा मनुष्य फोन नंबर ऐवजी माझा रजिट्रेशन नंबर (मेडीकल काॅन्सिल कडून मिळालेला) डायल करत होता....
_/\_....
__________________•______________
हा ७ वर्षाचा मुलगा माझा पेशंट आहे, आई बाबांसोबत नियमित येतो. मागच्या भेटीत विचारलं त्याला काही व्यायाम करतोस का ? तर आई अगदी हिरीरीनं म्हणाली डाॅक्टर तुम्हीच सांगा बरं काहीच व्यायाम म्हणून काहीच करत नाही बघा हा....
.... मग त्याच्या पालकांना विचारलं मी तुम्ही करता का काही व्यायाम ? त्यावर दोघांनीही नकारार्थी माना डोलावल्या ...
जर तुम्हीच व्यायाम नाही करत तर मुलाकडून का अपेक्षा ठेवता ? संस्कार घडवावे लागतात ते आचरणातूनच , उपदेश करून होत नाहीत ....
फिस्स् करून मुलगा हसला ......
ह्या प्रसंगातली गंमत सोडली तर आपल्या देशाची अवस्था अजिबात वेगळी नाहीये . १% लोक सुद्धा नियमीत व्यायाम करत नाहीत आणि जे करतात त्यातले बहूतांश लोकं रिटायर झालेले असतात किंवा बिपी /डायबिटीस झाल्यानंतर डाॅक्टरांनी सांगीतलं म्हणून करतात .
__________________•______________
ह्या बाई पहिल्यांदाच दाखवायला आल्या होत्या . आलेल्या प्रत्येक पेशंटचं नाव , वय आणि पत्ता लिहून घेतल्यावरच मी पुढची हिस्ट्री घ्यायला सुरवात करतो...
बाईंना वय विचारल्यावर ....३५ वर्षे !!!त्यांनी ईतक्या कॉन्फिडन्टली सांगीतलं की मला हसू आवरलंच नाही .... :)))
मी हसणं आवरत म्हणालो अहो मावशी तुमचं किमान ५५-६० दरम्यान वय असावं तुमचा मुलगा पस्तिशीचा दिसतोय... ह्यावर त्यांचा मुलगा पण चिडून म्हणाला अग ३५ वर्ष !! मीच तर ३६ चा आहे .....
पुढे हिस्ट्री घेतांना खोकला आणि बेडका (कफ) आहे म्हणल्यावर कफ कोणत्या रंगाचा आहे हे विचारलं तर पेशंट म्हणते निळा !!....
सहसा हिरवट किंवा पिवळसर कफ म्हणजे ईन्फेक्शन, लाल म्हणजे बहूतांशी रक्तमिश्रीत पण निळा म्हणजे सायनाईडमुळे किंवा लहान मुलं खेळतांना पेनाची शाई तोंडात घालतात तेव्हा ....
आता मात्र मुलगा चिडला ... निळा रंग असतो का कुठे कफाचा ? ....
मी त्याला शांत करत पेशंटला विचारलं की आकाशाचा रंग निळा असतो तसा निळा रंग का ? ... त्यावर पेशंट नाही म्हणाली आणि हिरवा रंग असावा असं सांगितलं.....
हे छोटेसे पण मजेदार प्रसंग कायम स्मरणात राहून जातात ;))
_________________॰_______________
प्रतिक्रिया
2 Jul 2018 - 8:28 am | गवि
मस्त आणि हलकंफुलकं.. सही.
2 Jul 2018 - 9:09 am | धडपड्या
छान...
नेहमी काहीतरी गंभिर, विचार करायला वगैरे लावणारं लिहिता... आज असं हलकं फुलक वाचून बरं वाटलं...
2 Jul 2018 - 11:00 am | प्रशांत
+१
2 Jul 2018 - 9:33 am | एस
:-)
2 Jul 2018 - 11:09 am | sagarpdy
:D
2 Jul 2018 - 1:24 pm | देशपांडेमामा
पहीला किस्सा भारी आहे :-D
पुलेशु
देश
2 Jul 2018 - 1:26 pm | सुबोध खरे
डाॅक्टर तुम्हीच सांगा बरं
हे कायमचं पालुपद असत हे खरं.
बाकी लेखन उत्तम
2 Jul 2018 - 1:57 pm | गवि
हो. अगदी अगदी.
जनरली लोकांना असं वाटतं की डॉक्टरने सांगितल्यावरच तो /ती ऐकेल.
अशावेळी डॉक्टरने सांगावं असं माझं मत आहे. आईवडिलांनी चूक केली किंवा करताहेत (म्हणजे आपल्या तीसचाळीस वर्षांच्या संग्रहित चुकांना ते आता चाळीशीत अचानक "सुधारून दाखवू" शकत नाही आहेत म्हणून त्यांचं ताडन करून नवीन पिढीला छद्मी हास्य करण्याची संधी देण्यापेक्षा डॉक्टर म्हणून नवीन पिढीतल्या पोराला व्यायाम कर असं डॉक्टरांनी सांगणं (व्यायामाच्या फायद्यांसाहित) हे सकारात्मक वाटतं. आईबापांना चार फटके देऊन पोराला खुदुखुदू हसू येणं हा पोराने व्यायाम आवडीने करावा यासाठी योग्य उपाय नव्हे.
डॉ. खरे सर, मी तुमचा मोठा फॅन आहे आणि तुमचं याआधीचं लिखाण वाचताना लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे. पण प्लीज पालकांचं फेल्युअर त्यांच्या पुढच्या पिढीवर कंपल्सरी लादून स्वतःला सोपं सोल्युशन करून घेऊ नका. किमान नव्या पिढीला वाचवा आपले शब्द वापरून. आम्ही पालक आदर्श व्यायाम करणारे नाही आहोत, फोतले, युसलेस आहोत म्हणून पुढच्या पिढीला वाचवणं सोयीस्कर आर्ग्युमेन्ट करून टाळू नका ही हात जोडून विनंती सर्व डॉक्टर्सना. आम्ही नालायक पालक असणं म्हणजे आमच्या पोरांची लायकीच लठ्ठ होऊन अकाली मरण्याची, असं मत असेल तर बोलणं खुंटलं. पण एक प्रोफेशनल मेडिकल व्यक्ती ब्लेमगेमपेक्षा जितके नवीन पिढीतले जीव चांगल्या मार्गाला लावता येतील तितके (चार जास्त शब्द, फीच्या बाहेरचे) ऐकवून मदत करतील अशी आशा.
अल्कोहॉलिक मनुष्याच्या मुलाला अल्कोहोलपासून दूर ठेवण्यापेक्षा त्याच्या बेवड्या बापाला "आधी तू स्वतः सुधार, मग पोराकडून अपेक्षा कर" असं तुम्ही सांगणार का?
Please be new generation saviors first than taking easy "parent basher" route.
अप्रिय विनंती आहे. आगोदरच माफी मागतो.
2 Jul 2018 - 2:04 pm | गवि
हे कधीच स्वीकारलं जाणार नाही आणि उलट ऑफेन्स समजून डिफेन्सीव्ह, वैट्ट वैट्ट पालकांना आणखी युसलेस ठरवणारे रिस्पॉन्स येऊ शकण्याची रिस्क गृहीत धरूनही विनंतीचं धारिष्ट्य दाखवतोय. __/\__
2 Jul 2018 - 2:32 pm | Nitin Palkar
तुमचं म्हणण पटतंय.... तरी "जो बात गलत है, वो गलत है..." ---दिलीप कुमार --- चित्रपट 'शक्ती'
2 Jul 2018 - 11:19 pm | नाखु
पालकांची परिस्थिती (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि जैविक ही) पाहीली जात नाही.
एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि आईला सकाळपासूनच घबडग्यात जुंपून घ्यावं लागतं ती मुलीबरोबर कधी प्राणायामाचा श्वास घेणार?
काही वेळा अगदी अल्प प्रमाणात खाणे असले तरी बांधा सुदृढता सोडत नाही अगदी व्यायाम करून ही त्यांची कुचंबणा.
फक्त संस्कार, वागणूक व सर्वांशी संवाद हा पालकांनी मुलांना आपल्या वागण्यातून शिकवले जातात
आधिक उणे क्षमा
बालक असलेला नाखु पालक (भाजीपाला)
4 Jul 2018 - 2:48 pm | डॉ श्रीहास
नाखु साहेब अनेक चांगल्या गोष्टी संस्काराच्या व्याख्येत येत नसल्या तरी पुढच्या पिढीला शिकवणं गरजेचं आहे... In short we are on the same page !!
2 Jul 2018 - 2:35 pm | डॉ श्रीहास
माझ्या सांगण्याचा अर्थ असा आहे की सिग्नल पाळणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता कचरा कुंडीत टाकणे हे सुद्धा संस्कारच आहेत. त्याच प्रमाणे व्यायाम करणे हा देखील संस्कारच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे.... वजन कमी करण्यापेक्षा फिटनेस वाढावा मी ह्या मतावर येऊन पोहोचलो आहे माझं स्वत:चं वजन हव्या त्या कक्षेत (parameter) मध्ये बसत नाही पण माझी क्षमता (कमावलेली) बरीच बरी आहे.
तुमच्या मतामागे कदाचीत काही अप्रिय/वाईट अनुभव असावेत परंतू माझं म्हणणं पूर्णपणे वेगळ्या अर्थाचं आहे.
2 Jul 2018 - 2:51 pm | साबु
माझी पण विनन्ती. _/\_
3 Jul 2018 - 1:08 pm | सुबोध खरे
लठ्ठ पाल्याच्या पालकांविषयी असा जजमेंट पास करणारा उल्लेख वाचला आहे.
गवि साहेब
हि जजमेंट मी त्या पालकाला सांगितली नाही पण जो विचार मनात आला तो केवळ मी लिहून दाखवला तर त्यावर बऱ्याच लोकांनी मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.जालावर केवळ लोकांना आवडेल असे चान चान लिहायचे मला तरी जमत नाही.
१५ वर्षाच्या मुलीचे वजन ९६ किलो आहे तिला ६ महिने पाळी आली नाही म्हणून डॉक्टरकडे येणार बाप तिच्या हातावर पडणारे "स्ट्रेच मार्क्स" पाहू शकत नाही का? तिचे सुटलेले पोट दिसत नाही का? वर तिला "नॉन व्हेज खायला फार आवडतं आणि ती चिकन शिवाय दुसऱ्या कशाला हात लावत नाही" म्हणून तिचं कौतुक करत असेल तर काय म्हणायचं? ज्या मुलीला हात असलेल्या खुर्चीत बसताना किंवा उठताना ऍडजस्ट ( योग्य शब्द सुचत नाहीये) करावे लागते. अशा बापाच्या बाबत माझ्या मनात (तुम्ही ९६ किलो वजन होईपर्यंत काय गोट्या खेळत होता का?) हाच विचार आला होता असे मी लिहिलेले हि होते. आणि याबद्दल मला आजही अजिबात खेद वाटत नाही. कारण या माणसाला तुम्ही आज पर्यंत काय करत होता असे विचारल्यावर आम्ही तिला सांगतोय, ती ऐकतच नाही. मी विचारले कि तुम्ही चिकन आणून देणे बंद करा. यावर हा माणूस फक्त हसला. कारण नंतर त्याच्या बायकोने सांगितले ह्यांना रोज चिकन लागतं.
तुकाराम महाराजांकडे एक स्त्री आली आणि म्हणाली कि महाराज आमचा मुलगा रोज गूळ खातो. यावर तुकाराम महाराज म्हणाले कि तू एक आठवड्याने ये. एक आठवड्याने ती स्री आली तेंव्हा तुकाराम महाराजांनी त्याला गूळ खाऊ नको म्हणून उपदेश केला. तेंव्हा ती स्री म्हणाली महाराज हा उपदेश तुम्ही एक आठवड्यापूर्वी देऊ शकला असतात. त्यावर तुकाराम महाराजांनि सांगितले कि मी पण रोज गूळ खात होतो. प्रथम मी गूळ खाणे थांबवले मगच उपदेश केला. आधी केले मग सांगितले हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे.
आपली जबाबदारी डॉक्टरवर टाकणारे पालक रोजच पाहायला मिळत आहेत हि अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.
चार वर्षाच्या नातवाला (acidity) आम्लपित्त होते म्हणून घेऊन येणारे आजोबा वर "तो रोज कुरकुरे खाल्ल्याशिवाय मागत नाही"म्हणून ते कौतुक करत असताना डॉक्टरने काय करावे अशी अपेक्षा आहे? मी आजोबाना म्हणालो अहो तो स्वतः दुकानातून आणतो का? त्यावर ते म्हणाले कि "नाही दिले तर तो रडतो", यावर मी त्यांना विचारले कि अहो उद्या तो (ड्रग्स) अमली पदार्थ मागू लागला तर तुम्ही देणार का?
यावर हॅ हॅ हॅ डॉक्टर तुम्ही जोक करताय म्हणून आजोबा हसतात. आता याबद्दल काय म्हणावे?
बारावीतील मुलगी ८७ किलो वजन आणि आई तिचे कौतुक करते कि "तिचे पप्पा तिचे लाड करतात तिला रोज दोन वडा पाव आणून देतात" आता अशा पालकांचे काय करायचं? वर "डॉक्टर तुम्हीच सांगा तिला"?
वजन जास्त झाल्यामुळे पाळी न येणाऱ्या मुली माझ्याकडे रोजच येतात. (PCOS https://en.wikipedia.org/wiki/Polycystic_ovary_syndrome.) त्यांना तू वजन कमी केले नाहीस तर तुझी त्वचा मुलांसारखी राठ होईल, ओठावर लव (मिशी) येईल. हात पायाचे वॅक्सिन्ग सारखे सारखे करावे लागेल. असे मी रोजच्या रोजच समजावून देत असतो. परंतु काही काही पालक मात्र आपला भर डॉक्टरच्या डोक्यावर टाकून थंड बसतात ते पाहून संताप होतो. वयात येणारी मुले आईबापांचे ऐकत नाहीत हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे मुलाना सौम्य पण परखड शब्दात सांगणे हा तर आमच्या व्यवसायाचा भागच आहे पण आपण चांगले पालक होऊन वाईट पणा फक्त डॉक्टरने घ्यायचा हे पटत नाही.
स्वतःची प्रौढी म्हणून सांगत नाही परंतु आपल्याला काय आजार झाला आहे हे ९० % रेडिओलॉजिस्ट सांगतच नाहीत. केवळ अहवाल (रिपोर्ट आणि चित्रे) देतात आणि आपल्या डॉक्टरांना विचारा म्हणून सांगतात. मी सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगतो त्यात "अशा" लोकांना रसच नसतो.
3 Jul 2018 - 1:18 pm | गवि
डॉक, त्यावेळी भावनेच्या भरात जे काही लिहून गेलो ते गेलो. माफी करा. नाराज होऊ नका. हेमंतला सुरमई थाळी खात पुढील चर्चा करू. डॉ. श्रीहास येणार असतील तरी वेलकम.
4 Jul 2018 - 7:37 pm | मोदक
पत्ता द्या. =))
4 Jul 2018 - 8:11 pm | गवि
अरे देवा, म्हणजे हा पण येणार तिथे चापायला. आणि वरून तिथली बाकीची सगळी सुरमई पार्सल करून नेणार.
4 Jul 2018 - 8:46 pm | मोदक
:D
2 Jul 2018 - 2:47 pm | डॉ श्रीहास
एक वयस्क बाईंना त्यांचं वय किती हा प्रश्न विचारल्यावर , तुम्हीच बघा बरं (म्हणजे मी सांगावं असं म्हणणं होतं)....
मी निर्विकार चेहेऱ्यानी म्हटलं १०० वर्षे लिहीतो... मग काय बाई एकदम खडबडून म्हणाल्या नाही हो डाॅक्टर ७०-७२ असेल.. मग केबिन मध्ये असलेले नातेवाईक , पेशंट आणि मी खळखळून हसलो.
4 Jul 2018 - 12:24 am | डॉ सुहास म्हात्रे
=)) =)) =))
2 Jul 2018 - 2:27 pm | Nitin Palkar
मुलाने जिमची पूर्ण वर्षाची फी भरली आणि चार दिवसात त्याचा उत्साह का मावळला ते आत्ता कळले. अनेकदा तुमचे किस्से वाचतांना इसाप नीती मधल्या छोट्या छोट्या बोधकथा वाचत असल्याचा feel येतो. आणि तुम्ही न लिहिलेले तात्पर्य अपोआप मनात उमटते. काही वाचक तुमचे किस्से लहान असतात अशी तक्रार करतात, मला तसे वाटत नाही... ते तसेच असोत... आखूड नसतात. असेच लिहित राहा.
2 Jul 2018 - 2:38 pm | डॉ श्रीहास
काका आपण भेटून गप्पा मारू ....
5 Jul 2018 - 12:31 pm | mayu4u
सहमत! नेहमीप्रमाणे सुंदर लेखन.
2 Jul 2018 - 7:12 pm | टर्मीनेटर
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. गमतीशीर अनुभव, मजा आली वाचायला.
2 Jul 2018 - 7:33 pm | भ ट क्या खे ड वा ला
वेगळेच नेहमी पेक्षा ...
3 Jul 2018 - 12:36 am | शलभ
मस्त किस्से
3 Jul 2018 - 7:19 am | सुधीर कांदळकर
१. व्यायामाबद्दल लिहिलेले अगदी मनोमन पटले. व्यायाम (वा कोणतीही आवश्यक गोष्ट) न करण्याबद्दल कारणे देणे चूकच. तासनतास मोबाईलवर वा टीव्हीसमोर घालवणार्यांना व्यायामाला वेळ नसतो.
२. आमच्या एका मित्राचा १६वा वाढदिवस आम्ही गेली ३०-४० वर्षे दरवर्षी नेमाने साजरा करीत आहोत.
३. १५ वा भाग नजरेतून सुटला होता तो आताच वाचला. आता संगणक/लॅपटॉप सर्रास वापरले जातात. फाईल जशी विसरली जाते तसे त्यातला एखादा कागद देखील पेशन्ट गहाळ करू शकतो. माझ्या मते निदान आता तरी प्रत्येक डॉक्टरांनी प्रत्येक पेशन्टसाठी संगणकात एकेक फाईल उघडून त्यात पेशन्टच्या शारिरिक/मानसिक तक्रारी, स्वत: तसे अगोदरच्या डॉक्टरांनी केलेले निदान, सुचवलेली औषधे आणि पथ्यादी इतर उपचार अशा शिस्तबद्ध प्रारूपात नोंदी घ्याव्यात. कागद खरडायला लागतो त्यापेक्षा कमी वेळात हे होऊ शकते. फक्त केसपेपरसाठी ए४ आकाराचा एक आणि प्रिस्क्रीप्शनसाठी दुसरा छोटा असे दोन प्रिन्टर वापरावे लागतील आणि दोन्ही प्रिन्टर्सच्या शाईचे एकेक जादा कार्ट्रीज बाळगावे लागेल. सध्या बरेच डॉक्टर्स आपली जबाबदारी टाळण्यासाठी कागदवर मोघम काहीतरी खरडतात ते बरोबर नाही असे वाटते. मग मारहाणीचे प्रकार घडण्याची शक्यता वाढते.
एमबीबीबीएस च्या शिक्षणात सध्या असा अभिलेख ठेवण्यासंबंधी उल्लेख आहे की नाही ठाऊक नाही पण आवश्यक आहे असे वाटते. त्याचबरोबर तत्संबंधी कायद्याच्या प्रशि़क्षणाचा अंतर्भाव असावा. कुणी पेशन्टने वा सरकारने खटला भरल्यास अशा अभिलेखाचा उपयोग होईल. हे सारे मेडिकल कौन्सिलला कळत नसेल असे वाटत नाही. त्यामागे आणखी (रास्त असलेली वा नसलेली) कारणे असू शकतात.
तसेच डॉक्टरांना हाणामारी करण्यापूर्वी पेशन्टच्या नातेवाईकांना विचार करावा लागेल असे वाटते. संगणक/मॉनिटर्/लॅअपटॉप फोडला तरी त्यातला डाटा बहुतेक सुरक्षित राहील.
3 Jul 2018 - 1:24 pm | सुबोध खरे
कांदळकर साहेब
माझ्या कडे गेल्या साडे आठ वर्षात आलेल्या प्रत्येक रुग्णाचा प्रत्येक अहवाल (रिपोर्ट) आणि चित्रफिती सुरक्षित आहेत. शिवाय याच गोष्टी कागदोपत्री सुद्धा नोंद (रजिस्टर) आहे.
दुर्दैवाने आजकाल मेडिकल शॉपिंग फार वाढले आहे. रुग्ण एका डॉक्टर कडून दुसरीकडे मग तिसरीकडे असे जाणे बरेच वाढले आहे. त्यातून मग अगोदर दुसऱ्या पॅथीकडे गेल्याने रोग बळावला हे लपवण्याची मनस्थिती असतेच.
कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असलेल्या रुग्णाचीसुद्धा उपचाराची फाईल लोक घरी ठेवून येतात आणि आल्यावर तुम्ही सोनोग्राफी करा फाईल मग आणून दाखवतो म्हणून सांगतात. त्यांना समजवावे लागते कि रोग अगोदर कुठे होता आणि किती कमी झाला आहे यासाठी अगोदरची स्थिती पाहावी लागते. तरीही एखादा माणूस हलत नाही.
मेडिकल रेकॉर्ड्स हे वैद्यकीय शिक्षणात व्यवस्थित शिकवले जाते. आणि आपले रेकॉर्ड्स व्यवस्थित ठेवा हे परत परत सांगितले जाते. कारण उद्या खटला झाला असेल तर तुमचे रेकॉर्डस च तुमच्या साहाय्याला येतील. रुग्ण टाके नको म्हणून सांगतात किंवा अमुक तमुक चाचणी करणार नाही म्हणून सांगतात ते व्यवस्थित लिहून ठेवलेले असले कि नंतर येऊन उलटतपासणी करण्याचे प्रमाण लक्षणीय दृष्ट्या कमी होते.
अर्थात असा अभिलेख ठेवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री आणि त्याला लागणारा काळ ( resources & time value) याचे मूल्य देण्याची समाजाची तयारी आणि मनोवृत्ती नाही हि वस्तुस्थिती आहे.
3 Jul 2018 - 9:40 am | ऋष्या
>> मीच तर ३६ चा आहे :) :)
मस्त खुसखुशीत लेख लिहिलाय डॉक. लगे रहो.
3 Jul 2018 - 4:21 pm | नितीन पाठक
डॉ़क,
तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आधी स्वतः केले तर आपण दुस-यांना अधिकाराने सांगू शकतो.
लेख नेहमीप्रमाणे मस्त, वाचनीय .......
3 Jul 2018 - 5:09 pm | गामा पैलवान
डॉक्टर श्रीहास,
मस्त किस्से आहेत. काही भाष्य करेन म्हणतो.
१.
आधारला पंजीकरण जोडलं तर त्या क्रमांकाने डॉक्टरशी संपर्क साधण्याची सुविधा प्राप्त होईल. पण देव करो आणि अशी काही वेळ न येवो. कारण बिग ब्रदर इज वॉचिंग यू.
२.
प्रश्न रास्त आहे. फक्त तो लहान मुलासमोर उच्चारायला नको होता. पश्चातबुद्धीने म्हणता येईल की, 'घरातल्या सगळ्यांनी व्यायाम केलेला चांगला असतो' असं बोलायला हवं होतं.
३.
यावरून शाळेतल्या वडीलमुलग्यांच्या वयांच्या गणिताची आठवण झाली. :-)
एकाने उत्तर काढलं होतं बाप ३० वर्षांचा आणि मुलगा २५ वर्षांचा. छान! म्हणजे बापाने पाचव्या वर्षी पोरास जन्म दिला की काय!
आ.न.,
-गा.पै.
4 Jul 2018 - 10:12 am | रायनची आई
माझ्या सासूबाई पण अशाच; कोणत्याही डॉक्टर कडे जाऊन घरी आल्यावर सांगतात की मी डॉक्टरना माझ वय सांगितल तर डॉक्टरना पटतच नाही...
त्या जेव्हा 64 वर्षाची होत्या तेव्हा म्हणायच्या की आज मी डॉक्टरना माझ वय सांगितले तर ते म्हणाले की काहीतरीच काय? 46 वाटतय फारफार तर.. :))
4 Jul 2018 - 3:01 pm | डॉ श्रीहास
सांगायचं झालं तर , कधीच शाळेत न गेल्यामुळे वयाचा दाखला अंदाजे बनवलेला असतो. असे पेशंट त्यांचं वय किती हे नक्की सांगूच शकत नाहीत म्हणून डॉक्टर नी अंदाजानी वय लिहावं अशी भाबडी अपेक्षा असते.
तर काही पेशंट वय सांगतांना ५० / ६० असं मोघम उत्तर देतात तेव्हा त्यांना सांगावं लागतं की दहा वर्षांचा फरक आहे दोन्ही आकड्यांमध्ये ... तेव्हा त्यांना गडबड लक्षात येते आणि ५५ लिहा असं ॲव्हरेज काढून देतात ..... :))
4 Jul 2018 - 12:17 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
तुम्ही डॉक्टर आहात ना मग मुलाचं मन तुम्हाला तरी वळवता येतंय का ते बघूया अशी पालकांची अगतिकता असते. असा काहीसा प्रकार माझ्या बाबतीत होत असे. शालेय परीक्षांत 'हुशार' विद्यार्थी असल्याने माझ्या सांगण्याचा काही परिणाम होईल या आशेने ओळखीचे लोकं त्यांच्या मुलांना घेऊन माझ्या भेटीस येत. पण शालेय अभ्यास कधीही मन लावून केलेला नसल्याने मार्कांचे चार तुकडे प्रगतीपुस्तकावर फेकले की सुटलो तिच्यायला, अशी अस्मादिकांची धारणा असे. मुलांना काय घंटा उपदेश द्यायचा मी?
सांगायचा मुद्दा असा की पालकांचं सोडून द्या, इथं सोळासतरा वर्षांचा उपदेशक म्हणजे मीच अगतिक होतो. पण एक डॉक्टर म्हणून तुम्ही कदाचित अधिक सुस्थितीत असाल म्हणून हा संदेशप्रपंच.
पालक तुमच्याकडे अंतिम उपाय म्हणून आलेले दिसतात. पण तो अंतिम उपाय तुम्ही अंमलात आणायचा नसून पालकांनीच आणायचा आहे. हे कान डॉक्टरांनी टोचलेले बरे म्हणावेत का?
आ.न.,
-गा.पै.
4 Jul 2018 - 1:28 pm | सुबोध खरे
तसं नाहीये
हे रुग्ण माझ्याकडे वजन कमी करण्यासाठी आलेले नसून पाळी येत नाही म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा त्यांचे फॅमिली डॉक्टर यांनी सोनोग्राफीसाठी पाठवलेले रुग्ण असतात. आपल्या मुलीची/ बायकोची पाळी न येण्याचे कारण त्यांचे वाढलेले वजन हे मी समजावण्याचा प्रयत्न करतो. ज्यांना मनापासून तसे करायचे असते आणि जमत नाही अशाना मी (फुकट) समुपदेशनही करतो. परंतु आम्ही काहीच करणार नाही जे काय करायचे ते डॉक्टरने केले पाहिजे असे १० % रुग्ण असतात( आम्ही पैसे फेकायला तयार आहोत पण हे खाणं कमी करा म्हणून सांगू नका काही गोळी असेल तर सांगा). अशा लोकांचा अविर्भाव पाहून डोकं फिरतं.
लग्न झाल्यावर वर्षभरात दहा पंधरा किलो वजन वाढलेली किती तरी उदाहरणे समोर येतात. सुरुवातीला पाळी आली नाही म्हणून काही तरी "गोड बातमी" साठी येतात. प्रत्यक्षात PCOS हा आजार झालेला आढळतो. वर वजन कमी करा सांगितले तर "आम्ही काही खातच नाही" हे पालुपद असतेच. अशा बरीच मुलींना मी समजावून देण्याचा प्रयत्न करतो. पण यात काही अशा आडमुठ्या मुली असतातच कि डॉक्टर खाणं कमी करायला सांगू नका. आता अशांना काय सांगणार. मी निष्काम वृत्तीने सांगतो वजन कमी केले नाहीत तर मूल व्हायला त्रास होईल आणि वंध्यत्वाचा उपचार अतिशय खर्चिक आहे. बऱ्यचशा मुली ते ऐकून न ऐकल्यासारखे करतात. ( काय डॉक्टर पकवतो आहे असा भाव चेहऱ्यावर असतो)
"कर्मण्येवाधिकारस्ते" हेच खरं.
4 Jul 2018 - 5:44 pm | गामा पैलवान
खरे डॉक्टर,
माझं एकंदरीत मत सांगतो. हे तुम्हाला उद्देशून असं काही नाही. सर्वसाधारण निरीक्षण आहे.
त्याचं काय आहे की डॉक्टर आणि रुग्ण यांचं काम म्हणजे रोगास पिटाळून लावणे. हे सांघिक कार्य आहे. कुण्या एकावर जबाबदारी टाकता येत नाही. मिळून मिसळून काम करायचं आहे तेव्हा परस्परांत सहकार्य हवंच. रुग्णांची ही जाणीव आताशा लोप पावंत चाललीये.
माझ्या अंदाजानुसार कौटुंबिक वैद्य (= फ्यामिली डॉक्टर) ही जमात नाहीशी झाल्यापासनं अशी गडबड होऊ लागलीये. तुमचं भाष्य ऐकायला आवडेल.
आ.न.,
-गा.पै.
4 Jul 2018 - 9:09 pm | गामा पैलवान
अवांतर :
एक कोडं :
एक बाई डॉक्टरकडे जाते. डॉक्टरांना तिचं 53 वर्षं वय माहित असतं. तरीपण खात्री करून घेण्यासाठी तिच्याकडून फॉर्म भरून घेतात. त्यात ती लिहिते 35. ते वाचून डॉक्टर मिश्कीलपणे हसतात आणि म्हणतात की वय बरोबर लिहिलंय. त्यावर बाई म्हणते, मग काय तर, नव्या युगाची परिभाषा आहे ही.
तर तिने वयाच्या रकान्यात काय लिहिलं असेल?
-आ.पै.
4 Jul 2018 - 10:06 pm | अमेरिकन त्रिशंकू
हेक्सॅडेसिमल??
5 Jul 2018 - 2:17 am | गामा पैलवान
यस्सर्र!
-गा.पै.
5 Jul 2018 - 1:43 pm | मोदक
डॉक.. भारी लिहिताय.. अजून येऊद्या.