http://www.misalpav.com/node/41320
ओपिडी संपत आली होती, आज फारसे पेशंट नव्हते मी रिलॅक्स मुड मध्ये होतो आणि तेवढ्यात एकजण केबिन मधे शिरला .... हातात भली मोठी पिशवी , बरेच रिपोर्ट्स असावेत असा अंदाज आला. पुढे तो स्वत:हून बोलला “डॉक्टर मी पेशंट नाहीये , माझ्या आईचे रिपोर्ट्स आहेत ,तुमचा सल्ला हवा आहे “....
मी रिपोर्ट्स घेऊन बघू लागलो आणि तो परत बोलला “माझ्या बायकोनी दोन्ही मुलांना तुम्हाला दाखवलं होतं मागच्या आठवड्यात ती फाईल बघूनच मी आलोय, त्यावर तुम्ही फुफ्फुसविकार तज्ञ आहे असं लिहीलेलं होतं”......
त्याच्या आईचे कॅन्सरच्या ट्रीटमेंट चे पेपर होते, कॅन्सर फुफ्फुसामध्ये पसरलेला होता आणि किमोथेरपी चालू होती, ह्या आधी एकदा कॅन्सर साठी किमो घेऊन झालेली होती आणि ह्यावेळेस कॅन्सर बराच पसरलेला होता आणि बऱ्याच डॉक्टरांनी बघीतलेलं होतं त्यावरून पुढे फारसं काही चांगलं नाही असं सरळ सरळ निष्कर्ष निघत होता, पण एक भाबडी आशा घेऊन आलेला हा माणूस..... मला नेमकं काय ते सांगावं किंवा कुठून सुरुवात करावी हे कळत नव्हतं पण स्पष्ट सांगणं हे गरजेचं होतं आणि बोलू लागलो “ तुम्हाला कल्पना आहे कि सगळी ट्रिटमेंट आणि कॅन्सरचा प्रसार ह्यावरून पुढे फारसं काही करण्यासारखं नाहीये, मी कॅन्सर तज्ञ नसल्यामुळे फार काही वेगळं बोलू शकणार नाही , पण जर काही अजून करायचं असेल तर आईला खुश ठेवण्यासाठी काय करता येईल ते करा.”
त्याला पटलं असं जाणवलं;सगळे कागद, फाईल्स आवरू लागला तेव्हा तुम्ही काय करता ? असं विचारल्यावर तो बोलला की माझा बिझनेस आहे , चांगला चालत होता पण गेल्या ६ महिन्यांपासून आईच्या आजरपणात सगळं बंद करून हाॅस्पिटलच्या वाऱ्या करतोय. मी म्हणालो की तुम्हाला आईला जर आनंदी बघायचं असेल तर परत बिझनेस चालू करा, मेहनत करा ; तुमची समृद्धी बघून आईला नक्कीच आनंद होईल!! आता ईकडे तिकडे फिरू नका , जे आहे तसंच चालू ठेवा , कॅन्सर स्पेशलिस्ट डाॅक्टर सांगतील ते योग्य असेल , माझ्याकडे पण परत येऊ नका कारण मला तुम्हाला देण्याकरता ह्यापेक्षा काहीच वेगळं नाही....
तो निघून गेला पण माझ्या मनात एवढंच होतं की मी जे त्याला सांगितलं ते बरोबर होतं आणि पेशंट सोबत त्याचं आयुष्य ताणाखाली जात होतं,त्याला थोडा आधार मिळेल.
_________________•_______________
दोघं जण समोरच्या खुर्च्यांवर बसून माझ्याकडे बघत होते आणि मी त्यांच्या आईच्या फाईल्स चाळत होतो , ILD (interstitial lung disease) फुफ्फुसाचा अतिगंभीर आणि जुनाट असा आजार हे निदान स्पष्ट होतं..... आणि गेल्या ७ वर्षापासून दुसऱ्या डाॅक्टरांकडे अगदी व्यवस्थीत ईलाज चालू होता... केवळ कोणीतरी नाव सुचवलं म्हणून ते मला विचारायला (second opinion साठी) आले होते.
मी विचारलं ऑक्सीजनवर आहे का पेशंट ? किती वेळ दिला जातो ? त्यावर पेशंटचा मोठा मुलगा म्हणाला “ शुरू में ७-८ घंटे चलता था लेकीन पिछले कई महीनो से २४ घंटे लगातार लगाना पड रहा है।संडास भी जाकर आने पर सांस फुल जाती है, मा जादा बात भी नही कर पाती है।”
ह्या दोघा जणांना आजाराविषयी थोडक्यात समजावून सांगितलं तर त्यांच्या डाॅक्टरांनी देखील हेच सांगीतलं होतं असं म्हटले... त्यावर मी म्हणालो सगळं तर व्यवस्थीत आहे म्हणून माझ्याकडे पेशंटला आणायची गरज नाहीये आणि त्यांच्या आधीच्या डाॅक्टरांना निरोप द्यायला सांगीतलं की अगदी योग्य ट्रिटमेंट आहे, तुम्ही जरी माझ्याकडे second opinion साठी आलात तरी माझ्याकडे वेगळं काहीच नाही करण्यासारखं , त्यामुळे आधीची सगळी ट्रिटमेंट जशीच्या तशी चालू ठेवणे आणि परत मला दाखवू नका.
धन्यवाद म्हणत दोघंही निघत होते तेव्हा एकानी मला म्हटलं की मेरे दोस्तने सच कहा आप के बारे में... “डाॅक्टर जितना जरूरी है ऊतनाही बताएंगे और तुम सिर्फ उतनाही करना, शुक्रीया डाक्टरसाब .”
कधी कधी काहीच न करणं हेच सगळं करण्याईतकं महत्वाचं ठरतं !!
_______________•_________________
हा मुलगा आपल्या आईला घेऊन येतो , अगदी नियमीत येतो. पेशंटचा १८ वर्षापुर्वी काही गंभीर आजारामुळे ऑपरेशनद्वारे डाव्या फुफ्फुसाचा अर्धा भाग काढुन टाकलेला होता आणि सध्या उजव्या फुफ्फुसाला देखील तश्याच प्रकारचा आजार जडल्यामुळे श्वासावर बराच परिणाम झालाय.
आई सोबत प्रत्येक व्हिसीट ला हा असतो, सर्व टेस्ट वेळच्या वेळी करून आणतो, चेहेऱ्यावर सतत हलकंस हसू असतं... पण डोळ्यात कुठेतरी काळजी दाटून असते ...
हा जरी माझा पेशंट नसला तरी मला ह्या मुलाबद्दल प्रचंड आदर आणि कुतूहल आहे .....
________________•________________
हे आजोबा तिन महीन्यांनी बोलावलं तरी १-१.५ महिन्यातच परत येतात आणि बहूतांशी सोबत नातू असतो पण कधी कधी तो नसला तर घरी काम करणाऱ्यांपैकी किंवा ओळखीच्या लोकांपैकी कोणीतरी असतंच...
मी त्यांना आणि त्यांच्या नातवाला किती तरी वेळा सांगितलं की तब्येत चांगली असली तर का वारंवार घेऊन येता आजोबांना ? त्यावर तो बोलला की आजोबांचं घरी कोणाशीच पटत नाही , मुलं-सुना यांच्याशी बोलत पण नाहीत आजोबा; फक्त मी एकटाच आहे ज्याच्याशी पटतं आणि मला वेळ असला तर मी येतोच सोबत... ईतकंच काय तर पैसे देखिल आपले आपणच जमवतात शेतीतून आणि स्वत:चा खर्च भागवतात, कोणालाही पैसे मागत नाहीत, तशी घरची परिस्थीती अगदी चांगली आहे ४० एकर जमीन आहे, छान शेती होते पण आजोबा त्यांचं त्यांचं करतात , पैसे जमले की तुमच्याकडे येतात आणि तुम्ही जरी ३ महिन्यांनी बोलावलं तरी एकाच महीन्याची औषधं घेतात आणि मला धरून आणतात सोबत....
मी नातवाला म्हणालो की घरच्यांना म्हणा की आजोबांनी रोज औषधं घेतली का ? जेवण झालं का ? केवळ ऐवढं जरी विचारलं तरी त्यांच्यासाठी पुरेसं आहे ... नातू मान हलवून संमती दर्शवत होता आणि खूपच कमी ऐकू येत असल्यानी आजोबा निर्विकार चेहेऱ्यानी आम्हा दोघांच्याकडे बघत होते.
———————#——————
प्रतिक्रिया
22 Feb 2018 - 11:14 pm | मुक्त विहारि
वाचत आहे...
व्यनि करतो...
28 Feb 2018 - 1:41 pm | डॉ श्रीहास
वाट पाहतो आहे.
22 Feb 2018 - 11:45 pm | अभ्या..
ग्रेट आहात डॉक तुम्ही.
22 Feb 2018 - 11:53 pm | शिव कन्या
पटलं ..... कधी कधी काहीच न करता, फक्त धीराचे दोन शब्द डॉक्टर कडून गेले कि बळ येते माणसाला.
23 Feb 2018 - 5:52 am | एस
केवळ वैद्यकीय सल्ला देण्यापेक्षा रुग्णांचं रोजचं आयुष्य सुसह्य व्हावं यासाठी प्रयत्न करणारे असे डॉक्टर हल्ली कमीच पहायला मिळतात. पुभाप्र.
23 Feb 2018 - 11:01 am | शलभ
+१
भारी डॉक. _/\_
23 Feb 2018 - 6:00 am | भ ट क्या खे ड वा ला
सुरु ठेवा ...
23 Feb 2018 - 6:31 am | गवि
खूप दिवसांनी पुढचा भाग वाचून बरं वाटलं. असेच अनुभव इथे सांगत रहा.
23 Feb 2018 - 10:39 am | sagarpdy
+१०००
23 Feb 2018 - 7:11 pm | प्रदीप
.
23 Feb 2018 - 6:39 am | दो-पहिया
खूप छान लिहिलं आहे.
23 Feb 2018 - 8:35 am | शैलेन्द्र
सुंदर लिहिलंय डॉक्टर , आवडलं
23 Feb 2018 - 11:12 am | अरिंजय
हा भाग पण मस्त झालाय डाॅक. थोडा सेन्टी.
23 Feb 2018 - 11:22 am | राजाभाउ
लेख मालीका परत सुरु केल्या बद्दल धन्यवाद.
अनेकांनी पुर्वी म्हणल्या प्रमाणे तुमच्या सारखे डॉक्टर सर्वांना लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना !!
तुम्ही डॉक्टर म्हणुन उत्तम आहातच, पण माणुस म्हणुन जास्त चांगले आहात. असेच चालू ठेवा, आणि लिहीत रहा.
23 Feb 2018 - 1:47 pm | शलभ
+१११११११११११११११११११११
23 Feb 2018 - 11:38 am | shashu
<मला भेटलेले रूग्ण - १२> वाट पाहुनी जीव क्षीणलेला.....
सुंदर
23 Feb 2018 - 12:49 pm | नितीन पाठक
एस आर डॉक़,
नमस्कार,
तुमच्या सारखे डॉक्टर सर्वांना लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना ......
तुम्ही डॉक्टर म्हणून उत्तम आहात
एक सायकलीस्ट म्हणून उत्कृष्ट आहात
आणि
एक माणूस म्हणून "महान" आहात.
23 Feb 2018 - 1:43 pm | shashu
मला नटसम्राट मधील काही संवाद आठवले.
27 Feb 2018 - 5:45 pm | प्रशांत
+१
लिहीत रहा आणि सायकल चालवत रहा
23 Feb 2018 - 2:35 pm | नाखु
डॉ अभिनंदन पुन्हा मालिका लिहायला सुरुवात केली त्याबद्दल
नित वाचक नाखु
23 Feb 2018 - 3:52 pm | किरण कुमार
नेहमीसारखे छान लेखन,
पुलेशू
23 Feb 2018 - 6:24 pm | टवाळ कार्टा
तुम्हाला भेटायला आवडेल...पण कट्ट्याला, दवाखान्यात नाही :D
23 Feb 2018 - 6:54 pm | Nitin Palkar
नेहमीसारखे छान लेखन,
सर्वांनी एवढ्या छान प्रतिक्रिया दिल्यावर म्या पामर आणखी लिहिणार....? तुमचं लेखन नेहमीच आवडत आलं आहे. त्यातून तुमच्यातल्या डॉक्टर बरोबरच तुमच्यातला सहृदय, कनवाळू माणूस दिसतो. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो या शुभेच्छा!
पुलेशू , पुभाप्र.
23 Feb 2018 - 7:40 pm | केडी
लिहत राहा होत डॉक तुम्ही ...ते ILD बद्दल वाचून जरा कंठ दाटून आला, का ते तुम्हाला माहिती आहेच....असेच हि लेखमाला सुरु राहू देत ह्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
27 Feb 2018 - 4:39 pm | प्रमोद देर्देकर
तुमचे लिखाण अतिशय हृदयस्पर्शी आहे. लिहीत रहा.
28 Feb 2018 - 2:05 pm | डॉ श्रीहास
हे भेटणारे रुग्ण खूप सारे अनुभव देऊन जातात, त्यामुळे मला एक माणूस म्हणून प्रगल्भता जाणवत आहेच ... बरेचदा हे अनुभव लिहीणं होत नाही किंवा स्पष्टच सांगायचं तर कंटाळा येतो, पण ईथले प्रतिसाद वाचून मी जोमानी लेखन/टंकन करतो हे मात्र खरं!! तुमच्या उत्साहवर्धक प्रतिसादांसाठी अनेकानेक धन्यवाद आणि तुम्हाला माझी डाॅक्टर म्हणून गरज पडू नये ह्या शुभेच्छा :)) ......