आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व !
**************************************************************************
लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा. तर कधी ठणठणपाळ यांच्या लेखनावरून प्रेरीत असायचे. नशीब …, केशवकुमारांचे विनोद आमच्या डोक्यावरून जायचे बर्याचदा, त्यामुळे त्यांच्या वाटेला कधीच गेलो नाही. तसेच आमचेही लेखनही कुणाला कळायचे नाही. (मुळात फ़ारसे कुणी वाचायचेच नाहीत) जर कुणी वाचलेच आणि कुणी आक्षेप घेतलाच की यांचे लेखन पु.ल. किंवा वपुंप्रमाणे भासते तर म्हणायचो साळसुदपणे….
“अरे व्वा, माझे लेखन तुम्हाला पुलंच्या लेखनाप्रमाणे भासतेय म्हणजे नक्कीच पु.ल. हे चांगले लिहीत असले पाहीजेत.”
किंवा गंभीरपणे डोक्यावरच्या (उरल्या सुरल्या) केसांतून हात फिरवत म्हणायचो…..
“ह्म्म्म, अहो आमच्या लेखनावर तर लहानाची मोठी झाली वपुंची पिढी, आता आमच्या लेखनावर वपुंच्या लेखनाचा प्रभाव म्हणा की वपुंच्या लेखनात आमच्या लेखनाची लक्षणे म्हणा ते साहजिकच आहे ना.” (रच्याकने एकदा हा वपु की कोण म्हणतात तो वाचायला हवा…!)
एकंदरीत काय तर आमचे सुरूवातीचे सगळेच लेखन असे इन्स्पायर्ड वगैरे म्हणतात तसे असायचे. आपला महेश भट्ट नाही का ‘घोस्ट’ वरुन प्रेरीत होवून ‘प्यार का साया’ काढतो. आता तुमच्यासारखे विघ्नसंतुष्ट लोक त्याला चोरी म्हणतात. पण ते चालायचेच, कारण तुम्हाला एखाद्या गोष्टीने भारून जाणे माहीतच नाही. आता मला सांगा ‘वाल्मिकींच्या रामायणावरुन प्रेरणा घेवून संत तुलसीदासांनी ‘तुलसी रामायण’ रचलंच ना?…. मग…., त्यांना नाही कुणी चोर म्हणून हिणवलं? पण साहित्याच्या क्षेत्रात हे चालायचच. मी तर म्हणतो आजच्या जगात जिथे सगळीकडेच पक्षीय राजकारण केले जातेय तेथे साहित्यिकांनीच का मागे राहावे? आत्ता एखाद्या धारपांनी ढापल्या स्टिफन किंगच्या कल्पना, पण म्हणुन का ते लगेच चोर ठरतात. नाही, कारण त्या पाश्चात्य कल्पनांना भारतीय वातावरणात सुट होइल असे रुप देवून ते लेखन लोकप्रिय करणे ही काय खायची गोष्ट आहे का? पण मग त्याच न्यायाने आम्ही जर धारपांच्या कल्पना ढापल्या तर आम्ही मात्र लगेच वांङमय चौर्याचे आरोपी ठरणार. असो…., आपण निरपेक्ष बुद्धीने साहित्य सेवा करत राहायची म्हणजे राहायची. मग कुणी काही का म्हणोत….! अहो, क्रांतिकारकांच्या नशीबी असले भोग असतातच, त्याला पर्याय नाही.
आम्ही मात्र आईच्या पोटात असल्यापासुन साहित्याची निर्विकार (?) (किं निरपेक्ष) सेवा करायचे ठरवले असल्याकारणे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असे मनाशी ठरवुनच टाकले होते. अहो, आपल्या जगाची रितच आहे ही, कोणी जरा वेगळी वाट हाताळतोय असे दिसले की त्याच्यावर तुटून पडणार्यांचीच संख्या भरपूर असते आपल्याकडे. आणि आम्हीच नव्हे तर अशी निरपेक्ष सेवा करणार्यांवर समाज नेहमीच टीका करतो हे आजपर्यंत नेहमीच सिद्ध झालेले आहे. उदा. संगीत क्षेत्रात नदीम्-श्रवण, दिग्दर्शन क्षेत्रात भट कंपनी, साहित्य क्षेत्रात ज्येष्ठ साहित्यिक 'श्री. विशाजीपंत "ईरसाल" म्हमईकर' अर्थात अस्मादिकांसारख्या अशा निष्काम कर्मयोग्यांना नेहमीच समाजमनाच्या दुटप्पीपणाचे लक्ष्य व्हावे लागलेले आहे. पण आम्ही या सर्व टीकेकडे दुर्लक्ष करून आपली निष्काम साहित्यसेवा अशीच सदोदीत चालू ठेवायचे व्रतच घेतले आहे म्हणाना.
मुळातच कुठल्याही टीकेला भिक घालायची नाही असे ठरवले असल्याने आम्ही स्वतःदेखील काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच करत आलो आहोत. आता हेच बघा ना, पुलंच्या काही किश्शांमध्ये आमच्या लिखाणाची ल़क्षणे आढळतात….
आम्ही आमच्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पातळाऐवजी आमचे ‘आसक्तीचे विनोद’ हे पुस्तक दिले.(आमचे हितशत्रु त्या पुस्तकास ‘सक्तीचे विनोद’ असे संबोधीत करत असत) त्या पुस्तकावर लिहीले,
‘प्रिय सौभाग्यकांक्षिणी, वज्रचुडेमंडीत लाडके पत्नीस,
तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसंगी पातळाऐवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे.
तुझाच विनोदी लेखन करणारा अति-साहित्यिक पती!’
अर्थात आमच्या बायकोचं विनोदाशी वाकडंच असल्याने तिने थेट आमच्या मातोश्रींकडे धाव घेतली. मातोश्रींनी त्यांच्या खास शैलीत आम्हाला समजावले, ‘बावळ्या, आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं चिरंजिव!” (त्या पुस्तकातील विनोदांची नंतर आमच्या हितशत्रुंनी अतिरेकी विनोद अशी कुचेष्टा केल्याचेही आम्हास आठवते….. असतो एकेकाचा स्वभाव.)
(आता आपल्या या कृत्यामुळे आपल्याच मुलाला मिळणारा एक जास्तीचा वाचक आपण हिरावुन घेतला हे त्या पुज्य मातेच्या ध्यानीमनीनी नसेल. एखाद्या लेखकाचा वाचक हिरावला जाणे (ते ही त्याचं लेखन वाचणारे, मुळात कळणारे फारसे कुणी नसताना) यासारखी शोकांतिका नाही हो लेखकाच्या आयुष्यात.
पण खरा किस्सा पुढेच आहे. आमच्या आयुष्यात घडलेला हा प्रसंग कुणीतरी पुल भक्ताने आरामात पुलंच्या नावावर खपवला. काय तर म्हणे….
एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पातळाऐवजी पु.ल. चे ‘हसवणूक’ हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, ‘प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पातळाऐवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!’ त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाक्षरीनिशी त्याला समजावले, ‘आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!” (किती साळसुदपणे कुणाचेही विनोद कुणाच्याही नावावर खपवतात लोक? हे आई शारदे…, त्यांना क्षमा कर…! शेवटी तेही माझेच व्यवसाय बंधु आहेत)
असो, तर आम्ही आमच्या बालपणाच्या काही गोष्टी सांगत होतो. त्या वेळी चिविंचा चिमणराव खुपच गाजत होता. तो कोण एक चकणासा वाटणारा कलाकार चिमणरावाची भुमिका पण करायचा. चांगल्या गोष्टींवरून प्रेरणा घ्यायची चांगली सवय आमच्याकडे उपजतच असल्याकारणे आम्ही लगेचच एक पुस्तक लिहायला घेतले.
लक्षात घ्या तेव्हा आमचे वय फक्त पंधरा वर्षाचे होते. तेव्हा आम्ही इयत्ता चौथीत शिकत असु. आता तुम्ही म्हणाल पंधराच्या वर्षी चौथीत? पण आम्ही वर आधीच सांगितले आहे ना की आम्ही आमचे जिवन निष्काम साहित्यसेवेला समर्पित केलेले होते. त्यामुळे इतिहास-भुगोल, सामाजिक शास्त्रे किंवा गणीत्-विज्ञान अशा निरस विषयांना आम्ही अजिबात भिक घालत नसू. अरे, मराठी भाषा इतकी समृद्ध असताना इतर क्षुद्र विषयांकडे लक्ष द्यावेच का म्हणुन आम्ही? आमचे हे बहुमुल्य, क्रांतिकारी मत एकदा आम्ही आमच्या अजाण मास्तरांसमोर व्यक्त केले तेव्हा त्याला आमची कळकळ कळालीच नाही आणि त्याने आम्हाला पाठ आणि गुडघ्याला कळ लागेपर्यंत आंगठे धरून उभे केले. अखेर आमची कळकळ त्यांच्यापर्यंत पोचावी आणि त्यांनाही साहित्यसेवेचा कळवळा यावा म्हणून आम्ही आमची निष्काम साहित्यसेवेची संकल्पना अतिशय कळकळीने त्यांना समजावून सांगण्यांचा प्रयत्न केला तर त्यांनी आमच्या कोवळ्या तळहातावर एवढ्या जोराने छड्या मारल्या की थेट मस्तकातच कळ गेली. (अर्थातच आमच्या मस्तकात, त्यांच्या मस्तकात संतापाने कळ गेली असेलही कदाचित !!)
वर नतदृष्ट विचारतात कसे…
“अरे शिंच्या, साहित्याचा एवढा कळवळा आहे तर निदान मराठीत तरी उत्तीर्ण होवून दाखव ना!”
त्या मुढ जिवास आमच्या वर्षानुवर्षे एकाच वर्गात राहण्यामागचा त्याग कसा लक्षात यावा? मला सांगा उत्तीर्ण होवून वरच्या वर्गात गेलो की इतर विषयही अभ्यासणे आले आणि त्यामुळे साहजिकच साहित्यसेवेला दिला जाणारा वेळ विभागला जाणार. आमच्यासारख्या निष्काम कर्मयोगी साहित्य साधकाला हे कसे बरे मंजुर व्हावे? म्हणुन आम्ही त्या शारिरीक छळाची पर्वा न करता अलिप्तपणाने (ते त्याला निर्लज्जपणाने म्हणत) आमची साहित्यसेवा करत राहीलो.
असो, तर आम्ही चिमणरावावरून प्रेरीत होवून एक नवीन पुस्तक लिहायला घेतले. मुळात एका व्युत्पन्न ब्राह्मणाला असे बावळट आणि विसरभोळे दाखवण्याच्या चिवींच्या निषेधार्ह कृत्यामुळे आम्हाला अतिशय सात्त्विक असा संताप आणि मनस्ताप झालेला होता. तत्कारणे आमच्या कथेत आम्ही नायकाला अतिशय कुशाग्र, तैल बुद्धीचा आणि बुद्धीमान दाखवण्याचे योजीले. खरेतर आमच्या नायकाला चंद्रवदन असे नाव द्यायचे आमच्या मनात होते. पण आमच्या एका प्रिय शिष्याने आम्हाला विनंती केली की ‘गुरुवर्य, हे नाव आपण मला द्या. मी ते माझ्या रहस्यकथांच्या नायकाला देइन.’ आमचा स्वभाव मुळातच भोळा आणि दानशुर कर्णाप्रमाणे उदार असल्याने अतिशय आनंदाने ते नाव आम्ही आपल्या शिष्याला भेट म्हणून देवून टाकले. (तो पुढे मराठी भाषेतील आद्य रहस्यकथाकार म्हणून विख्यात झाला. आपल्या बहुतेक सर्व लेखनात त्याने आपल्या नायकाला ‘इरसाल’ ही उपाधी बहाल करुन एकप्रकारे आम्हाला गुरुदक्षीणाच दिली आहे)
आम्हाला आमचा नायक चिमणरावांप्रमाणे नेभळट आणि बुळबूळीत नव्हे तर धाडसी आणि चतूर दाखवायचा होता. पण चिवींना त्यांच्या कृत्याची जाणीव करुन द्यायची या उदात्त (आमचे मास्तर त्याला खवचटपणा म्हणाले होते) हेतुने आम्ही आमच्या नायकाचे नाव ‘खमणराव’ तर त्याच्या सन्मित्राचे नाव ‘रड्याभाऊ’ ठेवले. या महाकादंबरीचे पहिले प्रकरण आम्ही आमचे भाषेचे मास्तर श्री. चिरगुडे गुरूजी यांना अर्पण केले होते आणि त्यांच्या अभिप्रायार्थ आणि सुचनांसाठी म्हणून त्यांना वाचावयास दिले.
“शिंच्या, सुक्काळीच्या, आधी चौथी इयत्ता उत्तीर्ण हो आणि मग कर हे असले उपद्व्याप! (आणि चोर्याच करायच्या आहेत तर त्या पकडता येऊ नयेत अशा पद्धतीने तरी करा!” असा अनमोल सल्लादेखील दिला.)
अखेर अशा अतिशय तीव्र आणि निराशाजनक अभिप्रायासहीत त्यांनी आमची निरपेक्ष साहित्यसेवा त्यांची सकाळची मशेरी भाजायच्या कामी खर्च केली. आमची पहिली वहीली महाकादंबरी अशा रितीने जन्माला येण्याआधीच मृत झाली. एवढेच नव्हे तर आमच्या तीर्थरुपांना विद्यालयात बोलावून ‘हे पाहा आपल्या पाल्याचे नसते उपद्व्याप!’ असे म्हणून आमचे लिखाण दाखवून आमच्या साहित्यसेवेची कृर थट्टादेखील करण्यात आली. नंतर तीर्थरुपांनी निरगुडीच्या ओल्या फोकाने आम्हाला झोडपून काढले ते वेगळेच. पुढचे कित्येक दिवस आमचे शिक्षक आणि आमचे मित्र देखील ‘या लेखक’ असे म्हणुन आमचे स्वागत करत असत ही त्यातल्या त्यात सुखाची आणि आनंदाची बाब. (नंतर नीट लक्ष देवून ऐकले असता ते लेखक न म्हणता ‘लेखकु’ म्हणत असे आमच्या ध्यानात आले) पण आम्ही अतिशय मोठ्या मनाने त्यांना क्षमा केली.
‘अरे मुढांनो, तुम्हाला काय कल्पना केवढ्या मोठ्या आणि महान कादंबरीला मराठी साहित्यसृष्टी केवळ तुमच्या क्षुद्रबुद्धीमुळे मुकली आहे ते…….!”
तुम्हाला कल्पना यावी म्हणून आमच्या त्या महान लेखनातला एक नमुना तुम्हास वाचावयास देतो आहे, ज्यावरून तुम्हांस आमच्या त्या लहान वयातील बुद्धीच्या महान झेपेची कल्पना येइल.
“रड्याभाऊच्या नेहमीच्या रडगाण्याकडे दुर्लक्ष करून खमणरावांनी आपल्या विलायती ओव्हरकोटाची कॉलर ताठ केली व कानापर्यंत ओढून घेतली, जेणेकरुन कुणी पाहील्यास ओळख पटू नये. (आमचे समकालीन पाश्चात्य गुप्तहेर कथा लेखक श्री. आर्थर कॉनन डायल यांनी नंतर ही कल्पना त्यांच्या शेरलॉक होम्स नामक एका खमणरावापेक्षा कमी बुद्धीच्या नायकासाठी वापरली. ब्रिटीशांचे गुप्तहेरखाते नक्कीच अतिशय तेज असले पाहीजे. अन्यथा आमच्या पुर्णही न झालेल्या कादंबरीतील कल्पना त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली असती?) एका हाताने आपल्या खिशातील भिंग चाचपत (खमणराव ते भिंग आपल्या उपरण्याच्या घडीत गुंडाळुन ठेवत असे. मागे एकदा ते भिंग हातात धरुन काही कागदपत्रे तपासत असताना, भिंगावरून प्रकाश परावर्तीत होवून रड्याभाऊच्या शेंडीला आणि टिळकछाप मिशीला आग लागली होती. सर्वसाधारण भिंगावरून प्रकाश परावर्तीत होवून एकाच ठिकाणी आग लागु शकते. पण खमणरावाच्या भिंगावरून प्रकाश एकाच वेळी एकापेक्षा जास्त ठिकाणी परावर्तीत होत असे हे यावरून ध्यानात येते. तसेच त्याकाळी देखील खमणरावाकडे किती आधुनिक प्रकारची साधने उपलब्ध होती यावरही प्रकाश पडतो. तेव्हापासुन खमणराव ही काळजी घेत असे) त्याने हलकेच गाजरे चघळणार्या रड्याभाऊला एक गुप्त इशारा केला. (हल्लीच प्रसिद्ध झालेल्या ‘किटी’ बाईच्या बॉसने बहुदा गाजरे खाण्याची कल्पना आमच्या रड्याभाऊंपासुनच उचलली असावी.) पण तो गुप्त इशारा न कळल्याने रड्याभाऊने …
“काय रे हे खमण, हे काय एखाद्या त्रासलेल्या सासुरवाशीणीप्रमाणे चेहरा करून बुधवारात राहत असल्यासारख्या चित्रविचित्र खाणाखुणा करत आहेस. अशा खाणाखुणा फक्त बुधवारातल्या पिडीत स्त्रीयाच करतात हे तूस ठावकी नाही काय?”
असे जोरात विचारून मुर्खपणाने आजुबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले.
तुर्तास एवढाच उतारा पुरेसा आहे आमच्या बुद्धीची झेप तुमच्या लक्षात येण्यासाठी. वरील उतार्यावरून चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच की खमणराव हा वेशांतराबरोबरच अभिनयचतुरही होता. आपण गुप्तहेर आहोत हे सामान्य लोकांच्या ध्यानात येवु नये म्हणुन तो नेहमी उच्चकुलोत्पन सासुरवाशीणीचे (सदैव खाटकाला घाबरुन असलेल्या गरीब गायीसारखे) भाव चेहर्यावर बाळगुन असे. तसेच जाता जाता बुधवाराचा उल्लेख करून लेखकाने अतिशय चातुर्याने रड्याभाऊच्या स्वभावाचे आणि सवयीचे वर्णन केले आहे. याच वाक्यातून ही कथा पुण्यनगरीत घडते याचाही अंदाज काही चाणाक्ष वाचकांना बांधता आला असता. पण दुर्दैवाने ही महाकादंबरी रसिकाश्रय लाभण्याआधीच आमच्या मास्तरांची मशेरी भाजण्याच्या घृणीत कार्यात बलिदान पावती झाली आणि वाचक एका दिव्य अनुभवाला मुकले.
मशेरी (मिसरी) नामक अतिशय उग्र वासाच्या मादक पदार्थाचा शोध लावणार्या त्या अज्ञात महाभागाचा तीव्र निषेध ! ( हे वाक्य वाचुन आमच्या साहित्यसाधनेवर जळणार्या आमच्या हितशत्रुंनी आम्ही सदैव सदर्याच्या आतील खिश्यात बाळगत असलेल्या मिसरीच्या कुपीवर आक्षेप घेवु नये म्हणुन आम्ही हे वाक्य आम्ही लहान अक्षरात लिहीलेले आहे असे समजून वाचावे.)
आम्ही आपली साहित्यसेवा तशीच प्रामाणिकपणे पुढे चालू ठेवल्यामुळे त्यावर्षीदेखील आम्ही इयत्ता चौथीतच मुक्काम करते झालो. इयत्ता चौथीची परीक्षा नापास होईपर्यंत आम्ही अजुन एका साहित्यप्रकारावर आपली कुशाग्र बुद्धी आजमावून पाहीली होती. त्या काळात आम्ही आमच्या शाळेच्या मागे असलेल्या ओढ्याच्या चिखलात मनमुरादपणे डुंबणार्या बिन सोंडेंच्या इवल्या इवल्या हत्तींवर एक अतिशय गर्भित अर्थ असलेली कविता केली होती. (डुक्कर हा शब्द एखाद्यास अतिशय हिन वागणुक द्यावयाची असल्यास वापरला जात असल्याने आम्ही त्यांच्यासाठी बिन सोंडेचा हत्ती हे अतिशय काव्यमय संबोधन वापरून आपल्या प्रखर आणि शोधक बुद्धीमत्तेचे एक ज्वलंत उदाहरणच सादर केले होते. तसेही शाळेत वर्गात बसुन साहित्यसेवा शक्य नसल्याकारणे आणि आमचा शाळेत बसुनही काही उपयोग नसल्याने मास्तरांनी वर्गातून हाकलुन दिलेले असल्याकारणे आम्ही कायम ओढ्याच्या निसर्गरम्य वातावरणात आपल्या साहित्यसाधनेत रत असायचो.)
तर कविता अशी होती….
एका ओढ्यात होती…
बिनसोंडेची गजपिल्ले किती सुरेख…
होते अशक्त बावळे…
मानवी पिल्लू तयात एक ….
केवढी सुंदर आणि महान कल्पना होती बघा त्या निरागस काव्याची. ओढा हे मानवी जिवनाचे प्रतिक. मानवाला कायम अपेक्षा असते सुखा-समाधानाची पण ते कधीच मिळत नाही. जसे आमच्या या ओढ्यालाही कधीच पाणी नसे. बिन सोंडेचे हत्ती उर्फ डुक्कररुपी हे प्राणी ओढ्यातल्या त्या चिखलालाच जिवन मानून त्यातच डुंबण्यात आपले आयुष्य व्यतीत करत. पण त्यात एक मानवाचे दुबळे पण हुशार पिल्लुही (पक्षी कवि स्वतः) त्यांच्याबरोबर ओढ्याकाठी वास्तव्य करत होता. पुढे जावून त्यास त्या ओढ्याकाठीच भगवान बुद्धांप्रमाणे दिव्य ज्ञानाची प्राप्ती होणार होती. (हिच कविता पुढे थोडेफार क्षुद्र शब्द बदल करून कुणा एका क्षुद्र कविने त्याचे रुपांतर एका गाण्यात केले जे पुढे खुप लोकप्रिय झाले. पण आम्ही उदार मनाने त्या गाण्याची रॉयल्टी मागण्यास नकार दिला.)
पण ते महाकाव्य पुर्ण व्हायच्या आधीच परीक्षेचा आणि त्याबरोबर आमचाही निकाल लागल्याने आमच्या संतप्त आणि अज्ञानी तीर्थरुपांनी आमचे नाव शाळेच्या पटावरून कमी करून घेतले. अखेर आमची रवानगी घरच्या रंगी आणि गंगी या दोन म्हशींचे उदरभरण करण्याच्या परम पवित्र कार्यावर करण्यात आली. ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ मग ते दुसर्याचे का असेना या उदात्त विचाराने आणि निष्काम भावनेने आम्ही ते कार्य स्विकारले.
सांगण्यास अतिशय आनंद होतो की आम्ही आपल्या निष्काम साहित्यसेवेला तिथेही खंड पडू दिला नाही. लवकरच रंगी म्हैस, तिचा प्रियकर टेकाड्या वळू आणि गंगी म्हैस यांच्या प्रेम त्रिकोणावर आधारीत एक महाकाव्य आम्ही रचून काढले. त्यात रंगी म्हशीच्या अंगावर बसुन तिच्या केसातल्या क्षुद्र किटकांवर आपले उदर भरण करणार्या गरिब बिचार्या कावळ्यांची हृदयद्रावक शोकांतिकाही आम्ही रंगवली होती.
असो, त्या घटनेला बरीच वर्षे उलटून गेलेली आहेत. आता आम्हीही तितके लहान राहीलो नाही. पण साहित्यसेवा मात्र अव्याहतपणे चालु आहे. रंगी, गंगी व टेकाड्याची जागादेखिल त्यांच्या पुढच्या पिढीने घेतलेली आहे. आणि या पिढीच्या उदरनिर्वाहाची जबाबदारीसुद्धा आमच्या मजबुत खांद्यावरच आहे. सद्ध्या आम्हास त्यांस घेवून सटवाईने आमच्या भाळी रेखुन ठेवलेल्या कार्यासाठी यमाईच्या माळावर जायचे आहे. न गेल्यास (अजुनही…. अरेरे ) तीर्थरुप पुन्हा ओल्या फोकाने आमची पुजा बांधण्याचा संभव आहे अन्यथा आम्ही आमचे ते महा-महाकाव्य आपणास म्हणुन दाखवले असते. असो पुढच्या वेळेस भेटू तेव्हा आपणास ते महाकाव्य नक्कीच वाचुन दाखवतो. तात्पुरती आपणा सर्वांची रजा घेतोय. आम्हास खात्री आहे की आपण सर्वजण ते महाकाव्य ऐकण्यास, वाचण्यास अतिशय उत्सुक आहात. तेव्हा पुढील भेटीत (जेव्हा आमच्या अशाच कुठल्यातरी निस्वार्थ कृत्याने प्रेरीत होवून आमचे तीर्थरुप ओल्या निरगुडीच्या फोकाने आम्हाला झोडपून काढतील, तेव्हा प्रकृतीअस्वास्थ्याच्या कारणाने काही दिवस आम्ही निवांतपणे आराम करु शकू) ते आपणासमोर मांडण्याचे आश्वासन देवुन आम्ही पुनश्च नव्या पिढीतल्या रंगी-गंगी-टेकाड्यांची मंगलमय अशी युती करून देण्यासाठी कटीबद्ध होवून यमाईच्या माळाकडे गमन करतो.
महत्वाची नोंद : आम्ही डोकेदुखीवर रामबाण औषधही देतो. (आमचे लेखन वाचल्यावर बहुतेकांना गरज पडते.)
जय मराठी, जय आई सरस्वती !
आपलाच,
ईरसाल म्हमईकर
(तथाकथीत बुद्धीवंताच्या संकुचित आणि पक्षपाती वृत्तीमुळे अप्रसिद्ध राहीलेला एक ज्ञानी, व्यासंगी साहित्यिक)
*******************************************************************************************
(तळटिप : प्रस्तुत लेखात उल्लेखित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. तेव्हा त्यांना कमी लेखण्याचा किंवा इतर कुणाही रसिकांच्या भावना दुखावण्याचा यात अजिबात हेतू नाही. हे लेखन केवळ एक विनोद म्हणुन वाचावे आणि काही क्षणांपुरती मौज असे समजून विसरून जावे हि नम्र विनंती.)
विशाल कुलकर्णी
प्रतिक्रिया
18 Jul 2015 - 7:31 am | एक एकटा एकटाच
खमणराव आणी रड्याभाउ
मस्त होते...
18 Jul 2015 - 7:58 am | कैलासवासी सोन्याबापु
बाबौ !!! आरा काय हे रे!!! खिक:!!!
18 Jul 2015 - 9:40 am | पैसा
ह.ह.पु.वा.!! फँटास्टिक झालाय लिखाण! बादवे खरोखरच खमणराव आणि रड्याभाऊचे कारनामे लिहायला हरकत नाही! बाकी गंगी रंगी टेकाड्या वगैरे लिखाणही पूर्ण करावे ही विनंती! =)) =))
18 Jul 2015 - 10:00 am | अजया
=))
जमलंय. मजा आली वाचायला!!
पै ताईशी सहमत,खमणराव रड्याभौके कारनामे वाचण्यास उत्सुक!
18 Jul 2015 - 2:09 pm | नाखु
चिमणरावा बरोबर हरेक धाग्यावर "रडणार्या" रडूभाऊंबद्दल लिहायचे मनावर घ्या !!!!
अता पहिली गोष्ट : लिखाण फर्मास पण पुढचा भाग कधी???
सदा (धांदरट)
19 Jul 2015 - 10:38 pm | विशाल कुलकर्णी
ऐडिया लैच भारीये नाखुशेट. इच्च्यार करु ;)
18 Jul 2015 - 7:43 pm | भीमराव
विकुन ल्हेलय भारी पन वळु म्हन्जी बैल का रेडा हेचात जरा गफलत हाय, भवतेक आयायन वाले हैती
19 Jul 2015 - 9:40 pm | विशाल कुलकर्णी
आपण खुपच मागासलेले दिसता बाबुदादासाहेब. म्हशींबरोबर वळूची जोडी लावताना आम्ही केवढा क्रांतिकारक विचार केला होता याची कल्पना तुम्हास येणे जरा कठीणच वाटते आम्हास. असो, असते मर्यादा काहीजणांच्या बाबतीत !
18 Jul 2015 - 7:54 pm | मित्रहो
मस्त लेख
ह. ह. पु. वा.
19 Jul 2015 - 7:25 am | चलत मुसाफिर
'प्यार का साया' या चित्रपटाशी महेश भटचा काहीच संबंध नाही