अमेरिका २- बावळट आम्ही..!!
'खुदके गली मे कुत्ता भी शेर होता है ।' असा कुण्या एका हिंदी सिनेमामध्ये डायलॉग होता. पण आपल्या घरात-कामात-गावात 'शेर' नसलो तरी काहीतरी साध्य केलेल्या आमच्यासारख्या पालकांना 1-2 टक्के ते 100 % इन्फिरीएरीटी कॉम्प्लेक्स इथे आल्यावर येत असणार. याची झलक खरंतर एअरपोर्टला आल्यावरच सगळ्या भारतीय आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसायला लागते. भारतातून निघतानाच ठासून भरलेल्या बॅगा, वजनाला जास्त झालं की विमानतळावर होणारे चेक इन बॅगेतून 'वस्तूहरण' आणि केबिन बॅगेमध्ये 'वस्तूभरण' होते. नव्याने घेतलेल्या बुटांमधून अवघडत चालणार्या, मुद्दाम परदेश प्रवासासाठी घेतलेली नवी पर्स सांभाळणाऱ्या आया लगेच ओळखू येतात.