***
शेतात स्थलांतरीत ग्रे हेराॅन पक्षांची घरटी स्थानिक घारींनी नष्ट केली. गेली सात आठ वर्षांपासून येणारे पाहुणे पक्षी गेले दोन तीन वर्षात आलेच नाहीत.
-
माळमुनिया,खंड्या, बुलबुल यासारखे छोटे पक्षी दाट झुडपं,इमारतीतील कोपरे,खोपचे, वातानुकूलित यंत्रा मागे,अडगळीत घरटे बनवतात. शिंपी हा खुपच छोटा पक्षी,चंचल,चपळ. अजून तरी मी त्याला कॅमेऱ्यात पकडू शकलो नाही. घनदाट पानांच्या झाडावर पाने शिवून सुंदर द्रोणा सारखे घरटे बनवतो. त्याच्यावरून याला शिंपी (Common Tailorbird) असे नाव पडले असेल. हा जितका छोटा आहे तितकाच जास्त गोंधळ घालतो,उपस्थीती आवाजामुळे कळते.तसेच चिरक (Indian Robin) हा आपले घरटे बनवताना गवत,रूटलेट्स व इतर सामग्रीचा वापर करतो.बहुतेक वेळा दगडांच्या खाली, झाडाच्या पोकळीत अशा ठिकाणीच घरटे बांधतो.
-
***
माळमुनिया
वेडा राघू (Asian Green Flycatcher) हा मातीच्या ढिगाऱ्यात आपली प्रजा वाढवतो.
निरीक्षण करताना एका पिंपळाच्या ढोलीत घुबड सहकुटुंब सुखेनैव नांदत होते.कधी कधी दर्शन द्यायचे,काही दिवसानंतर दिसेनासे झाले.एकदा अर्धा तास थांबल्यावर साळुंकी,(Common Mayana) चे जोडपे ढोलीत घुसले.स्वभावा प्रमाणे खुप आवाज करतहोते. थोड्या वेळात एक साळुंकी उडून गेली.त्या जोडप्याने ढोलीवर अतिक्रमण केल्याचे आढळले.
***
साळुन्की
***
तांबट,सुतार हे वठलेल्या झाडाच्या खोडावर तीस से.मी.चे गोल भोक पाडून आपली अंडी त्या मधे उबवतात.
टिटवी (Lapwing) शेतातील किडे मकोडे खाऊन जगणारा पक्षी.शेतकऱ्यांचा मित्र. एकदम बिनधास्त पक्षी.अंडी जमीनीवर घालतो. चितकबरी रंगाची अंडी शेतजमिनीत सहज लपून जातात. टिटवीला कधी बसलेले पाहीले नाही पण उष्मायन (Incubation) काळात आई टिटवी अंड्यावर बसून रहाते . काही टिटव्या अंतर राखून रक्षणार्थ फिरत असतात. शिकारी पक्षी,माणूस, प्राणी जवळ किंवा आसपास भटकताना दिसल्यावर जोर जोरात आवाज करत त्यांच्यावर फायटर विमाना सारख्या झपाटा मारतात. घाबरून शिकारी पक्षी पळून जातात. यांच्या हल्ल्याला घारी सुद्धा वचकून असतात. मला सुद्धा एक वेळ वाटले की शिरस्त्राण घालून यावे.
***
-
***
टिटवी ,Red Wattled Lapwing
***
भारतिय रातवा, इन्डियन नाईट जार
सुन्दर घरटी
***
स्वर्गीय नर्तक,Indian Paradise Flycatcher
-
***
नाचण, Spot Breasted Fantail
***
जांभळा सूर्यपक्षी, फूलचुखी,Purple Sunbird
प्रजनन काळात, निरिक्षणातून सुरक्षे बद्दल एक आणखीन गोष्ट लक्षात आली. हे पक्षी घरट्यात सरळ येत नाही.अतिशय सावधपणे, इकडे तीकडे पहात कुणाचे लक्ष नाही पाहून झेपावतात.नर किंवा मादा पक्षी दूर,अंतरा वरून धोकादायक परिस्थितीत आपल्या साथीदाराला आवाज देऊन सुचीत करतात.सुर्यपक्षांची पिल्ले खाताक्षणीच विष्ठा करतात. जन्मतःच देवाने त्यांना डायपर सारखी सोय केलेली असते.आई-बाप पिल्लांना जेवण देतात आणी लगेच हे डायपर लांब जाऊन फेकून देतात.याच्या वासाने शिकारी पक्षांना छोट्या पिल्लांचा मागमूस लागू शकतो, सुरक्षा धोक्यात येवू शकते.साधारण पंधरवडय़ात पिल्ले सक्षम होऊन घरट्या बाहेर पडतात तोपर्यंत घरटे व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ही कारवाई अवश्यक अनिवार्य असते. एक महीना दररोज तास दोन तास वेगवेगळ्या वेळेस सुर्यपक्षाच्या कुटुंबाचे निरीक्षण करून सलग सोळा मिनीटाची चित्रफित बनवली. या मधे वरील सर्व बाबी लक्षात येतात.या उलट शिकारी पक्षी सावज हेरतात, सतत टेहळणी करत असतात व संधी साधून शिकार करतात. आमच्या इमारतीत बुलबुल ने अंडे दिल्यापासून काही कावळे ठिय्या देऊन बसले होते.संधी मिळताच आपले लक्ष्य साधले.
***
-
-
घरटी बनवताना वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या प्रकारच्या सामुग्री व तंत्राचा उपयोग करतात.
सुगरण गवताची बारीक पातळ ,लांबलचक धाग्या सारखी काडी घेऊन पाय व चोचीत पकडून स्वेटर विणल्या सारखे घरटे विणते. खालून निमुळते आणि लांब बोगदा असलेले घरटे वर गोलाकार होत जाते. वरच्या भागात दोन किंवा जास्त कप्पे असतात. हे घरटे गवत, कापूस, केस आणि इतर वस्तूंनी तयार केलेले आणि व्यवस्थित विणलेले असते.घरट्याच्या फुगीर भागातओल्या मातीचा गिलावा असतो. विणकाम सुबक असते.विणण्याची कला बघत रहावेसे वाटते. सुगरणीं घरटे विणताना गाणी गातात. मस्त ऐकण्या सारखे असते. नर घरटे बनवण्याची सुरवात करतो अर्धवट झाले की मादा त्याला भेट देते.मादीला घरटेआवडले तरच पुढील कार्यक्रम होतो.अन्यथा " तू तुझ्या गावी मी माझ्या गावी".
नकारघंटा वाजली तरी नर निराश होत नाही. हे गाणे तर मुळीच गात नाही.
" तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही,
तुम किसी गैर को चाहोगी तो मुश्किल होगी".
या उलट, "तुम नही तो और सही, और नही तो गैर सही....".
नर सुगरण एकावेळी एकपेक्षा जास्त मादींचा "दादला" असतो.एकाच ठिकाणी दोन तीन घरटी बांधून दोन तीन सुगरणींना सहज हॅण्डल करतो.क्षणभर मलाही त्याचा हेवा वाटला.मादीच्या चिकित्सक स्वभावा मुळे एकाच ठिकाणी सुगरणींची पुर्ण व अर्धवट बांधलेली घरटी दिसतात.
माळमुनिया (Scaly-breasted munia) चे घरटे गवताची मोठ्ठाली,लांब पाती सुत गुंडा गुंडाळल्या प्रमाणे गोल गुंडाळत मध्यभागात मातीचा चिखल टाकून बनवते. घरटे छोट्या फुटबॉल सारखे,एका बाजूस दरवाजा सारखे खुले व उपलब्ध जागेत चपखल बसवलेले असते.माळमुनिया तेच घरटे पुन्हापुन्हावापरते.
नाचरा नाव्ही(White-breasted Fantail) चे घरटे सुबक कपा सारखे बनवतो.बुरूड कणगी
बनवतो तसाच आकार असतो. व्यवस्थित सारवल्या सारखे दिसते.घरट्याच्या आवती भवती भरपूर वस्ती करून रहाताना दिसतात. घरटे कॉम्पॅक्ट कप आकाराचे,झाडांच्या बेचक्यात,मॉस, साल आणि फायबरपासून बनवतात.
बुलबुल पक्षाचे घरटे फुलांच्या परडी सारखे असते.सुकलेली मुळं,गवताच्या काड्या, वाळकी पाने वगैरे वापरतात.पाय आणी चोचीत पकडून घरटे विणतात.आमच्या इमारतीत बनवलेल्या घरट्यात तर चक्क प्लास्टिक कागद अंथरल्याचे आढळून आले.
***
बुल्बूल,Red Whiskered Bulbul
घरटे प्रजननाच्या आगोदर बनवतात. काही पक्षी तेच घरटे पुन्हा वापरतात तर काही नवीन बनवतात.पक्षी प्रजनना नंतर खुल्या वातावरणात जगतात.पक्षांच्या घरट्याला "रैनबसेरा", म्हणतात.
संगोपन व प्रशिक्षण या दोन महत्वाच्या गोष्टी अगदी माणसा प्रमाणेच करतात. पंखात बळ येईपर्यंत आई-वडील पिल्लांची देखरेख कसोशीने करतात. निरिक्षण करताना, प्रेम,शिस्त,मातृत्व-पितृत्व भावना प्रकर्षांने जाणवल्या. उदाहरणार्थ, सुर्यपक्षाची मादी पिल्लाला उडण्याचे शिक्षण देताना चोचीत चारा न देता लांब बसते व जेवण घेण्यासाठी तिच्यापर्यंत उडून येण्यासाठी प्रोत्साहित करते. पिल्लू बराच वेळ सुरवातीला उडू शकत नाही तेव्हां शेवटी ती जवळ येवून घास भरवते. एक दिवस पिल्लांच्या पंखात बळ येते.ते आपल्या मार्गाने उडून जातात.मुले कितीही मोठी झाली तरी आई वडलांना किंवा आई वडिल मुलांना सोडत नाहीत.अपवाद सोडा. पक्षी आणी माणसां मधे हा महत्वाचा फरक जाणवला.
एक भूतपूर्व सैनिक म्हणून या निरीक्षणातून काय आढळले ते म्हणजे,Camouflage, concealment, guarding, strategies and security या विषयाबद्दल बरेच काही शिकण्या सारखे आहे.
पाषाणभेद यांची आवडलेली एक कवीता इथे टंकाळत वाचकांना कंटाळा येणाऱ्या आगोदर लेखणी आवरतो.
आभाळानं द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी
धरतीनं जागा द्यावी
झाडांची आई व्हावी
झाडांनी सावली द्यावी
पक्षांची घरटी ल्यावी
पक्षांनी पंख पसरावे
आभाळात विहरावे
आभाळाने द्यावे पाणी
धरतीनं गावी गाणी
पाषाणभेद ( त्रंबकेश्वर मुक्काम)
ताजा कलम:-
वरील लेख पक्षी आवलोकनातून आलेल्या, माझ्या अल्प बुद्धीला समजलेल्या गोष्टींवर आधारीत आहे. याला शास्त्रीय पुरावा काही नाही. काही प्रकाश चित्रे पक्षी मित्राच्या सौजन्याने .........
प्रतिक्रिया
6 Nov 2024 - 6:01 am | कंजूस
सुंदर संकलन.
रातव्याचा फोटो आवडला. कारण तो पक्षी मी अजून पाहिला नाही.
6 Nov 2024 - 6:36 am | कर्नलतपस्वी
भटकंती करताना याचे बरेचदा आवाज ऐकले. हा पक्षी निशाचर असल्याने सहसा दिसत नाही. उंद्री पिसोळी भागात भटकताना प्रथमच आढळला. अंडी उबवताना एका जागी बसला होता.
तपकिरी-करडा-बदामी रंगाचा त्यावर तुटक रेषा आणि ठिपके असलेला भारतीय रातवा साधारण २४ सें. मी. आकाराचा निशाचर पक्षी आहे. हा उडतांना याच्या पंखावरील पांढरा पट्टा दिसतो. नर-मादी दिसायला सारखेच असतात. हे पक्षी सहसा एकटे राहणे पसंत करतात. निशाचर असल्याने हे दिवसा एखाद्या झुडपाच्या आडोशाने लपून राहतात, अंधार पडल्यावर सर्वत्र यांचे आवाज ऐकू येतात.- विकी.
7 Nov 2024 - 5:28 am | किल्लेदार
शास्त्रीय माहिती वाचून केलेल्या निरिक्षणापेक्षा स्वानुभवातून मिळालेली माहिती वेगळी असू शकते. पक्षिनिरिक्षणासाठी तर भयंकर चिकाटी हवी. ती आपल्यात नाही बुवा. नाही म्हणायला माझ्या गच्चीतल्या दाट बांबूत मुनिया दर वर्षी नव्याने घरटे बांधते. तेवढेच आपले बर्डींग. मुठीएवढ्या त्या लहानश्या घरट्यातून दहा बारा पिल्ले निघतात तेव्हा खरंच अचंबा वाटतो.