मराठवाड्यातील एक लग्न आणि इतर निरीक्षणे
परभणी जिल्ह्यातल्या एका लहानशा गावी, माझ्या आजोळच्या एका लग्नाला यायचं होतं. काल रात्री सिकंदराबादहून १७६६३ या रेल्वेने बसलो. आज सकाळी परभणीला आलो. तिथून आधी १७६६८ या गाडीने, नंतर एका जीपने लग्नाच्या गावी आलो.
फ्रेश होऊन नाश्ता झाल्यानंतर दाढी ट्रिम् करायला बाहेर पडलो. या गावात दोन सलुन आहेत. आधी एका ठिकाणी गेलो तर तिथे दोनजण आधीच बसून होते. दुसरा दुकानात तीनजण बसून होते. परत पहिल्या दुकानात आलो. वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
सलूनवाला हा - त्याचा चालू ग्राहक, इतर दोन ग्राहक आणि अजून एक मित्र यांच्याशी गप्पागोष्टी करत सावकाशपणे हात चालवत होता.
लोकांकडे इतका वेळ कसा काय असतो?
कुठल्यातरी अपक्ष उमेदवाराचा भोंगा लावलेला ऑटोरिक्षा इकडे तिकडे फिरत होता. त्यावरून, विधानसभेला यावेळी कोण निवडून येणार यावर जोरदार चर्चा सलूनमध्ये सुरू झाली. मी आपला एका बाजूला बसून केवळ ऐकण्याचं काम करत होतो.
पहिल्या ग्राहकाचं काम झाल्यावर दुसरा ग्राहक खुर्चीवर बसला. तो सकाळीच पावशेरी मारून आलेला होता. निवडणुकीचा काळ असल्यामुळे खिशात पैसा खुळखळत होता. गडी एकदम खुश होता. दाढी सुरू करण्याच्या आधीच त्याने सलूनवाल्याला थांबविलं आणि एका मित्राच्या हाती सर्वांना चहा मागविला.
मलाही चहा घेण्याचा खूप आग्रह झाला. पण मी चहा-कॉफी कधी घेत नाही म्हणून मी नकार दिला. सर्वांचा चहा पिऊन, काही जणांचा तंबाखू मळून झाल्यावर मग दुसऱ्या ग्राहकाचे काम सुरू झाले.
सर्व काही अगदी सावकाशपणे सुरू होते. कुणालाही कसलीही घाई नव्हती. लग्न दुपारी साडेबाराचं होतं. मला अगदीच काही घाई नव्हती पण मागच्या अनेक वर्षांपासून सलूनमध्ये वगैरे वाट पाहण्याची काही सवय राहिलेली नाही; आपला वेळ फारच वाया जातोय अशी भावना होत होती.
त्या लोकांना असं वाटत नसेल का?
शेवटी माझा नंबर आला. दाढी कशी ट्रिम् करायची आहे वगैरे रेसिपी सांगून, डोके मागे टेकवून, छताकडे पहात मी शांतपणे बसलो.
दाढी, चेहरा-फ्रेश, आफ्टर-शेव, पावडर इ. सगळ्यांसाठी मिळून फक्त चाळीस रुपये लागले. हैदराबादला अनेक सलूनमध्ये किमान ₹१९९/- पासून सेवा सुरू होतात!
हा माणूस रोजचे किती कमावत असेल?
मग कार्यालयात आलो. आंघोळ करून, तयार होऊन खाली आलो. दहा वाजत आले होते. पाहुणेमंडळी, काही कालच आली होती, काही आज सकाळी आली होती, काही हळूहळू येत होती. नमस्कार-चमत्कार, अनौपचारिक गप्पागोष्टी, चहा-नाश्त्याचा आग्रह सुरू वगैरे सुरू होतं. लहान मुला मुलींचे रंगीबेरंगी कपडे, स्त्रियांच्या काठापदराच्या वगैरे साड्या, फॅन्सी ड्रेसेस, माझ्यासहित इतर अनेक पुरुषांचे पांढरेशुभ्र कपडे असं एकूण वातावरण होतं.
माणसं लग्नाला नेमकं कशासाठी जातात?
ओळखीच्या बहुतेक सर्वांशी बोलून झालंय. मारुती मंदिराकडे लग्नाची वरात निघालीय. कार्यालयात बसून मी हे लिहीत आहे...
रविवार, १७ नोवेंबर २०२४, दु. १२:१५ वाजता
- द्येस्मुक्राव्
प्रतिक्रिया
17 Nov 2024 - 8:05 pm | कंजूस
वाट पाहात आहे डायरीतील पुढच्या पानांची.
19 Nov 2024 - 3:46 pm | विवेकपटाईत
१९९ जागी फक्त 40 रूपल्ये.कंजूस माणसाला आनंद झाला असेलच.