सिनेमा आणि प्रेम
सिनेमा का कोण जाणे उगीचच बदनाम झालेला आहे. सर्वच उच्चभ्रू लोकांची त्याला येनकेनप्रकारेण नावं ठेवण्याची अहमहमिका लागलेली असते. सर्वसामान्यांना आवडतं त्याला नाकं मुरडल्याशिवाय स्वतःला विचारवंत आणि उच्चभ्रू म्हणवूनच घेता येत नाही. 'सिनेमे बघून मुलं बिघडतात' हा त्यांचा सगळ्यात नवीन शोध. मुलं हे देशाचे भावी आधारस्तंभ असल्यामुळे मुलं बिघडली की समाज बिघडतो, आणि त्यातूनच कॉंग्रेससारख्या पक्षाचं राज्य दशकानुदशकं टिकून राहतं. अर्थात लवकरच हे बदलणार आहे, त्यामुळे मला तर समाज बिघडलेला आहे याची चिंता वाटत नाही. पण तरीही या उच्चभ्रूंचा सिनेमांना नावं ठेवण्याचा उद्योग चालूच असतो.