म्हणता म्हणता ......
काहीच नाही म्हणता म्हणता
चंद्राभवती पडले खळे,
खळेच पडले इतके सुंदर
चंद्र दिसेना त्यानंतर!
काहीच नाही म्हणता म्हणता
चाफ्याभवती पान उमटले
पानच इतके गर्भरेशमी,
फूल दिसेना त्यानंतर!
काहीच नाही म्हणता म्हणता
बागेभवती जडली माया
माया इतकी गर्दसावळी
बाग दिसेना त्यानंतर!
काहीच नाही, काहीच नाही
कशी म्हणू मी यानंतर?
तव श्वासांचे गान ऐकते
इथले तिथले मिळून अंतर!