मज सुचले गं
मज सुचले गं
सुचले मंजुळ गाणे
हिंडता डोंगरापाठी
सापडले कोरीव लेणे
विसरल्या उन्हातली वाटा
विसरले पथातील काटे
ही गुहा भयावह आता
स्वप्नासम सुंदर वाटे
रसभाव भराला आले
काव्याहून लोभसवाणे
बोलाविण घुमती वाटे
तालात नाचती प्रीती
शब्दाविण होती गीते
बेभान भावना गाती
हा लाभ अचानक झाला
हे कुण्या प्रभुचे देणे
आकृती मनोहर इथल्या
मी एक त्यातली झाले
लावण्य बरसते येथे
सर्वात तयात मी न्हाले
सौंदर्य जीवना आले
जन्माचे झाले सोने
