सहजच...
सहजच चुकुनी वाट तुझी तू चुकून माझ्यासमोर यावे,
तुला पाहुनी हसून मीही तुझ्या चुकीला माफ करावे
सहजच मग तू हसता हसता हातामध्ये हात विणावा,
उगाच मग मी लटक्या रागे क्षणात तोही दूर करावा.
सहजच तुझिया गाली तेव्हा खट्याळ कलिका फुलून यावी,
पोक्त समंजस शब्दांची मग तिथेच नकळत वाट चुकावी.
सहजच तुजला सोडायाला, तुझ्या घराशी मी पोचावे,
कशी एकटी परतू मी? मग माझ्या सोबत तूही यावे.
अशी सहजता अपुल्यामधली, नाव कोणते देऊ याला?
जुने जाणते झालो तरीही सदैव खळखळ वाहत -हावी..