ज्याचे करावे भले..
मी आजवर अनेकजणांना आर्थिक आणि इतरही मदत केली आहे. मला बऱ्याच वेळा यश आले पण जास्त वेळा वाईट अनुभव आले. त्यातले नमुन्यादाखल अगदी थोडे किस्से सांगावेसे वाटतात.
माझ्या घरच्या प्रत्येक कामवालीचे मी बॅंकेत खाते काढून दिले.
त्यांच्या पगाराची काही रक्कम त्यांच्या अनुमतीने त्यांच्या खात्यात जमा केली. बचतीची सवय व्हावी हा उद्देश. माझ्या एकुलत्या एक मुलाला सोबत म्हणून कायम एखादा गरजू मुलगा किंवा मुलगी घरी सांभाळली. तिला/त्याला शाळेत घातलं.
कपडालत्ता, वह्या पुस्तकं, फी याची काळजी घेतली. मुलींच्या लग्नासाठी खर्चात मदत केली. भांडीकुंडी दिली. इतर कितीतरी मुलांचे क्लासेसचे पैसे भरले. पुढे त्यांच्या नोकरीसाठी खटपट केली.
आपण सगळेच अशी मदत करत असतो. पण आपणा सर्वांनाच बहुधा बरेवाईट अनुभव येत असावेत.
असाच एक तरुण मुलगा. लहान गावातून आलेला. शिक्षण बेताचं. दहावी पास. तो आमच्या घरी मदत मागायला आला. त्याला माझ्या मिस्टरांनी खटपट करुन नोकरी लावून दिली. पण नोकरी कष्टाची होती. जड शारिरीक काम, वेल्डिंग करावे लागे. त्याला जरा सुखाची नोकरी मिळावी म्हणून मी त्याला म्हटले, तू टायपिंग शिक. चांगला क्लास शोधला आणि त्याची टायपिंगची फी भरली. पुढे दरमहा मी त्याला घरी बोलवायची. त्याच्या आवडीचा स्वयंपाक करायची. त्याला जेवू खाऊ घालायची. घरापासून दूर एकटा राहात होता म्हणून.
त्याला दरमहा माझ्याकडं फीचे पैसे मागायला ऑकवर्ड होऊ नये म्हणून त्याने न मागता त्याच्या हातात फीचे पैसे ठेवायची. फी भर असं सांगायची.
असे चार महिने झाले. एका निमसरकारी ऑफिसमध्ये काही पोस्टस् भरायच्या होत्या. टायपिस्टच्या. माझ्या मैत्रिणीचे मिस्टर तिथे ऑफिसर होते. त्यांच्याकडं या मुलासाठी शब्द टाकला. ते हो म्हणाले.
त्यांनी याला म्हटलं,"तू तुझं टायपिंग क्लासचं सर्टिफिकेट घेऊन ये. तुला नोकरी मिळू शकेल.
अनेकदा सांगूनही त्यांनी सर्टिफिकेट आणले नाही. मग मी माझ्या मिस्टरांना त्याच्या क्लासमध्ये चौकशी करायला सांगितले. तर क्लासवाला म्हणाला, "साहेब,तो फक्त आठवडाभर क्लासला आला. नंतर आलाच नाही. क्लासची फीही भरलेली नाही. कसलं सर्टिफिकेट देणार?"
ते ऐकून मी हतबुद्ध झाले. म्हणजे मी दरमहा देत असलेले फीचे पैसे घेताना हा एकदाही म्हणाला नाही की,"मला पैसे देऊ नका मी क्लासला जात नाही."
मग त्या पैशाचं तो करायचा काय? आणि मी मात्र त्याला पैसे मागायचीही वेळ येऊ द्यायची नाही. स्वतःहून द्यायची. त्याच्या मनाचा विचार करुन. मी त्याच्यावर चिडले. पण एका अक्षराने त्याला रागाने बोलले नाही. तो फक्त साॅरी म्हणाला. काही दिवसांनी तो त्याच्या आईकडे निघून गेला.
माझ्याकडे कामाला एक मुलगी होती. तिला शाळा वगैरे शिकवून मी तिच्या बॅंकेत पैसे टाकले. तिचं लग्न झालं. तरीही ती माझ्याकडे काम करतच होती. मी नोकरीला जायची. घरात ती आणि माझा मुलगा असायचे. मुलगा शाळेत गेला की ती घरी एकटीच असायची. माझ्या लक्षात आलं की घरातले टोपलीतले कांदे, बटाटे, डब्यातले डाळ, तांदूळ हळूहळू कमी होत आहेत.
पण पुरावा नसताना तिच्यावर आळ कसा घेणार? एकदा माझे सासरे आमच्याकडे राहायला आले. मी त्यांना तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितले. एकदा त्यांना काॅटखाली एक पिशवी दिसली. त्या पिशवीत त्यांना गहू भरून ठेवलेले दिसले. जरा वेळाने ती मुलगी सासऱ्यांना म्हणाली,"माझी वेळ संपली. मी घरी जाते." जाताना ती गव्हाची पिशवी काॅटखालून काढून लपवत लपवत घेऊन गेली. सासऱ्यांना शंका आली. मी कामावरून आल्यावर ते म्हणाले,"तू कामवालीला गहू दळून हा आणायला सांगितलंस का? ती गहू घेऊन गेलीय."
दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांनी तिला त्या पूर्ण महिन्याचे पैसे देऊन कामावरून कमी केले. मी तिला केलेली सगळी मदत ती विसरली होती. तिला पश्चात्ताप झाला. ती रडली. मलाही वाईट वाटले. गरीबी वाईट असा विचार मनात आला.
आता एकच किस्सा सांगते. आमच्या नव्या काॅलनीचं बांधकाम अजून चालू होतं. पण आमचं घर पूर्ण झालं म्हणून आम्ही लवकर राहायला आलो होतो. बांधकाम साहित्याच्या रक्षणासाठी एक वाॅचमन ठेवला होता. त्याची फॅमिली घेऊन तो आमच्या काॅलनीतच एका शेडमध्ये राहात होता. त्याला दोन मुलं होती. एक मुलगी, एक मुलगा. ती दोघंही कुपोषित होती. मी ठरवलं, त्या दोघांना दूध प्यायला द्यायचं. सकाळी माझ्या घरच्या रतीबाच्या दुधाच्या पिशव्या आल्या की मी त्यातली अर्धा लिटरची पिशवी त्याच्या बायकोला हाक मारून तिच्या हातात द्यायची. मुलांना प्यायला दे असं सांगायची. तीही, "हो ताई, देते प्यायला" असे म्हणून पिशवी घेऊन जात असे.
एक दीड महिना झाला, मला मुलांच्या तब्येतीत फरक दिसेना. मग न राहवून मी तिच्या मुलीला विचारलं की रोज दूध पिता की नाही? ती म्हणाली,"आई आमाला दूद प्याला देत न्हाई. ती आन बाबा दोनदा चा करून पितात." मला त्या बाईचा राग आला. ती माझ्याकडून रोज दूध घेऊन जायची आणि मुलांना द्यायचीच नाही. बरं, तुझ्या मुलीनं मला असं सांगितलं असं तरी कसं सांगायचं? त्या मुलीला मार बसला असता. मग मी एक युक्ती केली. वाॅचमनला बोलावून सांगितले,"तुझ्या दोन्ही मुलांना तू उद्यापासून माझ्या घरी पाठवत जा. मीच दूध देईन त्यांना." दुसऱ्या दिवसांपासून ती दोन्ही मुलं माझ्या घरी यायची. आणि मी त्यांना माझ्यासमोर दूध , बिस्किटे द्यायची.
महिन्याभरात मुलांची तब्येत सुधारली. पण नंतर काॅलनीचं बांधकाम संपलं आणि तो वाॅचमन दुसऱ्या कामावर गेला.
अशी कितीतरी उदाहरणे आहेत. काही थोड्याजणांनी मी केलेल्या मदतीचा फायदा घेऊन आपलं आयुष्य सुधारलं. पण खूप जास्त जणांनी फसवलं..
मला काही वेळा वाटतं ज्या माणसांनी माझीच मदत घेऊन शेवटी मलाच अपयश दिलं, त्यांच्यामुळे माझा इगो हर्ट झाला का? म्हणून मी चिडले का? तसं असेल तर ती माझीच चूक आहे.
इतक्या जणांना मदत केल्यावरही दान सत्पात्री करावं इतकंही मला कळू नये?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जास्त विचार करू नका आजी. १०
छान
छान लिहिलंय हो.
हे बरोबर आहे, हे या आधी
छान...
लहान तोंडी मोठा घास घेत आहे..
असे अनुभव मलाही आलेले आहेत.
आजी सोडून द्या विषय!
मला आलेल्या अनुभवांपैकी दोन
काही लोकांमध्ये गरिबी ही
मदत का करीत नाहीत लोक ?
उत्तम लेख.
तुमचे अनुभव वाचून वाईट वाटले.
@ आजी : आपण कुणालाही मदत,
कायमचा बाद करायचा.
सर,
@ राजाभाउ : अपेक्षा न करणं आणि भोळसटपणा यात
हो ते मान्यच आहे, व ते
@ राजाभाउ : ओके
फार वाईट अनुभव.
यांच्याकडे खूप पैसे आहेत,
सेम. यांच्याकडे खूप पैसा आहे
सवलती, अंशदान, आरक्षण,
वाईट अनुभव !
कोणत्याही माणसाच्या नोकरीसाठी
@ बबन ताम्बे : याला म्हणतात काळाच्या पुढे असणं !
☺ ते तो अमेरिकेत करत असावा.
एकदा बसून बोला त्याच्याशी
या गोष्टीला 18 वर्षे झाली
मदत घेणे शक्यतो टाळावे
माणसाची ओळख करता आली पाहिजे
वीणा३-"जास्त विचार करू नका