परतीचे प्रवास
म्हातारी माणसे एकटीच बसून
अश्रू ढाळतात.
कधी सहजच पाणी येते त्यांच्या
डोळ्यातून उगाच.
अचानक विकल होतात ती मागचे
काहीबाहि आठवून.
सैरभैर होतात माना हलवत
चेहेऱ्यावर अपराधी भाव घेऊन...
काय बर होत असेल त्यांना ?
कोण आठवतय आता या वयात ?
कशाने असे बावरले जात असतील ?
कसल्या वेदना पाझरताहेत मनातून?
आता खूप दूर निघून गेलेल्या
माणसांना काही सांगायचे असेल,
का आता जवळ असलेल्यांना
काहीच सांगता येत नसेल?
