जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सायकल राईड, २५ ऑगस्ट, २०२०

Primary tabs

सतीश विष्णू जाधव's picture
सतीश विष्णू जाधव in भटकंती
24 Sep 2020 - 10:29 pm

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सायकल राईड

२५ ऑगस्ट, २०२०

500

दोन वर्षांपूर्वी विजयदुर्ग किल्यावर गेलो होतो, तेव्हा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प खाडीच्या पलीकडे दिसत होता. या प्रकल्प परिसराला भेट देण्याचे तेव्हाच नक्की केले होते. आज सायकलिंग करत जैतापूरला जाण्यामुळे माझ्या बकेटलिस्ट मधील एक इच्छा पूर्ण होणार होती.

सकाळीच राजापुरातील वाल्ये गावातून सुरुवात करून कोंडये घाटी रस्ता निवडला. या घाटी रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. मनात गाणे गुणगुणत अतिशय हळू गतीने चढ चढत होतो. तेव्हढ्यात झाडीतून फुरऱ्... फुरर्... आवाज आला. सायकल थांबवून झाडीत नजर टाकली तर झाडीत रानगव्याचे दर्शन झाले. शिंगाखालील माथ्याचा भाग पांढरा शुभ्र, तेज नजर, बाकदार शिंग आणि चेहऱ्यावरील राकट भाव जंगलाच्या शूर सरदारासारखे भासले. नजरेला नजर झाली. त्याला कॅमेऱ्यात कैद करणार तेव्हढ्यात रानगवा घनदाट रानात गायब झाला.

.

.
जंगलाच्या प्रत्येक प्राण्यांची, पक्षांची, कीटकांची एक सिमीत हद्द असते. त्या हद्दीत राहूनच त्यांची दिनचर्या सुरू असते. त्यामुळे त्यांच्या प्रदेशात शिरताना त्यांना त्रास होणार नाही, त्यांचे स्वतंत्र अबाधित राहील अशीच आपली वागणूक हवी.

काळ्या मुंग्यांची अतिशय शिस्तबद्ध रांग तुरुतुरु चालताना दिसली. सायकल थांबवून त्या रांगेला कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन रस्ता ओलांडला.

टी टी टीव... टी टी टीव..., चूक चूक..., कुहू कुहू... असे वेगवेगळ्या पक्षांची गायकी ऐकून मन मोहून गेले. आज वारा पडला होता. समोर दिसणाऱ्या दरीतून पांढऱ्या शुभ्र ढगांचे पुंजके हिरव्यागार झाडांना स्पर्श करीत वर वर येत होते. घाटी चढताना दमछाक होत होती. एव्हढ्यात दवबिंदूंची बरसात सुरू झाली. हाताच्या केसांवर पडणारे दवबिंदूंचे थेंब मोत्यासारखे चमकत होते.

वर चढण्याचा भार कमी व्हावा म्हणून झिक झ्याक सायकलिंग करत होतो. रस्त्याच्या किनारीच्या भागावर शेवाळ जमा झाल्यामुळे सायकल ग्रीप सोडून घसरू लागली. समर्पयामीच्या आदित्यने ट्रेनिंग दिल्याप्रमाणे चाकातील हवा थोडी थोडी कमी केली. त्यामुळे शेवाळात सुद्धा रस्ता पकडून सायकलिंग दमदारपणे सुरू होती. कोंबडीच्या पिलासारखा चिव चिव आवाज काढत रस्त्यावरून तुरु तुरु धावणाऱ्या लाव्हा पक्षांचे दर्शन झाले. त्यांचे तुरुतुरु धावणे परिकथेतील सात बुटक्यांसारखे भासले.
.

घाट चढून आलो. मजल दरमजल करीत कोंडीये गावाजवळील हायवेला आलो आणि सायकलची हवा टॉप अप केली. हायवेची सफर सराईतपणे पार करून हातीवले गावाजवळील उदयच्या चहा टपरीवर आलो. जान्हवी वहिनीच्या हातचा फक्कड चहा घेऊन जैतापूरकडे सायकल सफर सुरू झाली. येथून जैतापूर २९ किमी आहे. जुवाटी तिठ्या वरून जैतापूरकडे जाणाऱ्या रस्त्याला वळसा घेतला.
.

हा रस्ता राज्य महामार्ग आहे. या वर्षी पडलेल्या भरपूर पावसामुळे, बऱ्याच ठिकाणी रस्ता ओबडधोबड झाला होता. निसर्गात सफर सुरू होती. प्रथम काशींगे त्या नंतर महाळूनगे गाव लागले. काशींगे गावाचा परिसर नयनरम्य फुलांनी फुलला होता. तर महाळूनगेला मोठा सॅटेलाईट टॉवर उभा होता. चौके फाटा येथून २१ किमी होता. सुंदर वातावरणात सायकल सफरीचा आनंद घेत होतो.

.

.

'डोंगर' गावात जाणारा फाटा लागला. त्याचवेळी हमरस्त्यावरील समोरच्या डोंगरावर हापूस आंब्यांची मोठी बाग लागली. अतिशय सुबक पद्धतीने एका रांगेत कलमे लावली होतो. उभी आडवी आणि तिरक्या रेषेत दिसणारी कलमी झाडांची रांग त्या वाडीच्या मालकाची कलात्मकता दाखवीत होती.

येथूनच नाणार फाटा लागला. नाणार प्रकल्प सध्या बंद स्थितीत आहे. उजवीकडे जाणार फाटा थेट राजापूरला जात होता. पुढे विलये तिठा, पडवे आणि त्यानंतर मुरगुले वाडी ही गावे लागली. पुढे कोंबे गावाची हद्द सुरु झाली.

टपरीवजा हॉटेल दिसल्यामुळे हायड्रेशन ब्रेक घ्यायचे ठरविले. बाजूच्या रेशन दुकानावर बऱ्याच महिला मास्क लावून धान्य घेण्यासाठी सोशल डिस्टनसिंग पळून रांगेत उभ्या होत्या. चहा टपरीत स्पेशल चहाची ऑर्डर दिली आणि गावचे नाव विचारले. "साखरकोंबे" हे गावचे नाव ऐकून खूप गंमत वाटली. मालकाला सांगितले, 'चहात दोन चमचे साखर घाला'. गावांची अशी आगळीवेगळी नावे; ही त्या त्या गावाची जुनी ओळख देत असावीत. याच टपरीवर गावाकडची खोबरे चिक्की मिळाली. खोबरे, वेलची, खजूर आणि गूळ घालून बनविलेली चिक्की खूप चविष्ट होती.

येथून दहा किलोमीटर जैतापूर आहे. त्यामुळे पुढचा ब्रेक जैतापूरला घ्यायचे ठरवून पुढची सफर सुरू केली. वाटेत अनसुर, करेल गावे लागली करेलला शंकराचे माणेश्वर मंदिर आहे. पुढे मीठगव्हाणे गाव लागले. पूर्वी मिठाची मोठी कोठारे असावीत या गावात. यानंतर जांभळगाव लागले. येथे बाप्पाच्या आरतीचे सूर कानावर येत होते. त्यानंतर वाघ्रण गाव लागले. परममित्र शरदच्या पाटीलच्या अलिबागमधील गावचे नाव सुद्धा वाघ्रण आहे.
पुढे माडबन आणि अणुऊर्जा प्रकल्पाकडे जाणार फाटा लागला. या फाट्यावरून एकाबाजूला जैतापूर चार किमी दुसऱ्या बाजूला माडबन चार किमी अणुऊर्जा चार किमी आणि लाईट हाऊस चार किमी आहेत. क्षणभर विचार केला. प्रथम जैतापूर गावात जायचे नक्की केले.

मधल्या रस्त्यात कुवेशी, नंतर दळी आणि होळी गाव लागले. कोण कुलपती वेशीवर आला..., काय दळण दळल... आणि कशाची होळी केली... हे यां गावात थांबलो असतो तर नक्कीच शोधून काढले असते.

माझा सायकालिस्ट मित्र मितेश शिवलकरचे आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरचे जैतापूर हे गाव. खाडीच्या किनाऱ्यावर वसलेले निसर्गरम्य गाव.
.

.

.

या गावात शिरताच बाजारपेठ लागली. पुढे पुरातन वेताळ देवाचे मंदिर लागले. त्यानंतर गावाची सायकल सहल सुरू झाली.

चिंचोळ्या रस्त्यातून सायकलिंग करताना छोट्या छोट्या वाड्या लागत होत्या. नारळ, आंबा, केळी पोफळी, फणस या झाडांची रेलचेल होती. गावातील जेट्टी आणि बाजारपेठेतील जेट्टी यांना भेट दिली.

भरतीची वेळ होती. दूरवर मासेमारी जहाज नांगरली होती. जैतापूरचे विशाल आणि मनमोहक खाडीचा भाग दिसत होता. एका बोटीवर भगवा झेंडा फडकत होता. त्याच्या पलीकडे नाटे गावतील भगवती मंदिर दिसत होते.
.

.

जेट्टीवर सायकल सह फोटो काढले. उजव्या बाजूला रत्नागिरीला जाणाऱ्या कोष्टल हायवेवरील खाडी पूल होता. खाडीच्या पलीकडे नाटे गाव दिसत होते. खाडीत समोर एक बेट होते, त्यावर सुद्धा तीस चाळीस घरे दिसत होती. या गावात नावेनेच जाता येते.

.

पुढे कधी जैतापूरला राहणे झाले तर या बेटावर सायकलिंग करायला खूप आवडेल.

बाजारपेठेतील जेट्टीवर गेलो. पावसामुळे फेरी सर्व्हिस बंद होती. पायऱ्या पायऱ्यांची जेट्टी एकदम खाडीत लुप्त झाली होती. भरतीच्या पाण्यात जेट्टीच्या शेवटच्या तीन पायऱ्या बुडाल्या होत्या. पाण्यात सायकल उभी करून तिचे फोटो काढले.
.

बाजारपेठेत मांजरेकर खानावळीत जेवण घेऊन तडक माडबनकडे निघालो. जैतापूर सारखेच निसर्गरम्य माडबन गाव समुद्र किनारी वसलेले आहे. नावाप्रमाणेच माडांच्या झाडांतच हे गाव आहे. माडबन पर्यटनस्थळ आहे. चौपाटीवरून समोर विजयदुर्ग किल्ल्याचे दर्शन होते. किल्ल्याच्या उंच बुरुजावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता.

समुद्रांच्या लाटांचे उसळणे मनाला भावले. भरती असल्यामुळे चौपाटीचा किनारा फेसळलेल्या पाण्याने झाकला गेला होता.

माडबन गावातून पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन अणुऊर्जा प्रकल्पाकडे प्रस्थान केले. तीन किमी सायकलिंग करीन प्रकल्पाच्या गेट जवळ पोहोचलो. गेट बंद होते.
.

गेटजवळ सायकल थांबवून तेथील सुरक्षा रक्षकांबरोबर वार्तालाप सुरू केला. आत प्रकल्पाची कामे सुरू होती. प्रत्यक्ष हे स्टेशन चालू व्हायला किती काळ लागेल , याचे उत्तर मिळले नाही. पाण्याची बाटली भरून घेतली. सुरक्षा रक्षकांचे आभार मानून परत मागे फिरलो.

आता दुपारचे साडेतीन वाजले होते आणि परतीचा प्रवास अंधार पडायच्या आत पूर्ण करायचा होता. त्यामुळे तीन किमी वरील माडबन लाईटहाऊसकडे न वळता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

संध्याकाळच्या तिरप्या सुर्यकिरणांमुळे सायकलची सावली लांबवर पाडू लागली होती. आकाशातील ढगांचे पुंजके, छोट्या छोट्या तळ्यात आंघोळ करायला उतरण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच काही ढग झुडपांबरोबर लपंडाव करीत होते.

.

पडवे गावात चहासाठी हायड्रेशन ब्रेक घेतला. येथे दुकान मालकाने आस्थेने चौकशी केली. सायकल वरून संपूर्ण राजापूर फिरल्याबद्दल त्यांना खूप आनंद झाला. पुन्हा सलग दीड तास सायकलिंग करत हातीवले हायवेला दुसरा हायड्रेशन ब्रेक घेतला. ११० किमी सायकलिंग करून संध्याकाळी साडेसहा वाजता घर गाठले.

आजच्या सायकल सफरीमध्ये गावांच्या नावाच्या गमती जमतीची मजा घेतली. जैतापूर खाडी, माडबन समुद्र, तेथून दिसणारा विजयदुर्ग किल्ला आणि निसर्गरम्य परिसर यांचा आनंद भरभरून लुटला.

.

सतीश जाधव
आझाद पंछी..

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

24 Sep 2020 - 10:58 pm | अर्धवटराव

छायाचित्रे तर अतिशय सुंदर.

खुपचं छान लिहिलंय.. एकूण एक फोटो निव्वळ अप्रतिम!! आवडलं.

दुर्गविहारी's picture

24 Sep 2020 - 11:26 pm | दुर्गविहारी

खुपच सुंदर लिहीले आहे आणि अप्रतिम फोटो. आणखी लिखाणाच्या प्रतिक्षेत.

कंजूस's picture

25 Sep 2020 - 5:49 am | कंजूस

सायकलमुळे तुम्हाला भटकता येतंय. सायकलचा आवाज होत नाही त्यामुळे वन्य पशुपक्षी सावध होऊन पळत नाहीत.
रुट map आहे का? नक्की कुठे आहे? राजापूर कोणते?

धन्यवाद. बंदच्या काळात फोटोंवर हौस भागवली.

सतीश विष्णू जाधव's picture

25 Sep 2020 - 9:20 pm | सतीश विष्णू जाधव

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हे मोठे शहर आहे, राजापूर ते जैतापूर रूट नकाशा गुगल वर उपलब्ध आहे. राजापूर च्या गंगेमुळे हे शहर खूप प्रसिद्ध आहे.

अनुप ढेरे's picture

25 Sep 2020 - 10:23 pm | अनुप ढेरे

फोटो झकास आहेत. एकदा तारकर्ली-विजयदुर्ग-जैतापुर-गणपती पुळे असा प्रवास केला होता. भारी रस्ता आहे.