चक्र (कथा)

vaibhav deshmukh's picture
vaibhav deshmukh in जनातलं, मनातलं
22 Sep 2020 - 6:23 pm

ती लगबगीने लोकलमधून खाली उतरली. लोकल तशीच पुढे निघून गेली. रात्र बरीच झाली होती. सगळीकडे सामसूम जाणवत होती. तिचा हा नित्याचाच प्रवास होता, पण आज उशीर जरा जास्त जाणवत होता. लोकलचा प्रवास नित्याचाच असला तरी, एवढा उशीर तिला अपेक्षित नव्हता.
     ते उपनगर नवीनच वसलेले असावे. जास्त रहदारी, धावपळ जाणवत नव्हती. ती स्टेशनवर उतरली, तेव्हा दोन-चार रिक्षा, काही तुरळक माणसे स्टेशनवर  दिसत होती. बाकी सर्व शांतता जाणवत होती. ती लगबगीने स्टेशन बाहेर आली. तिने एकदाआजूबाजूला नजर फिरवली. रिक्षा करावी का? हा विचार मनात डोकावला. पण ज्या तर्‍हेने ते रिक्षाचालक तिच्याकडे पाहत होते, तेव्हा तिने रिक्षाचा नाद सोडून दिला. उगाच रिक्षात बसावे, आणि रिक्षाचालकांनी भलतीकडेच घेऊन जावे, हे तिला पटले नाही. तिने घड्याळात नजर टाकली. साडेबाराचा सुमार झाला होता. पण रात्र काळभोर जाणवत होती. थंडीची जाणीवही तीव्र वाटू लागली. तिची चुळबूळ वाढू लागली. काहीतरी करावे लागणार होते. अधिक वेळ न दवडता समोरच्या हमरस्त्यावरून सरळ पायी निघावे! जरा वेगाने पाऊले टाकत गेलो तर, अर्ध्या तासात आपण घरी पोहोचू, असा विचार करून, ती लगेच पुढे निघाली. मनात नाना विचार येत होते. ती पंचवीस-सव्वीस वर्षांची तरुण महिला. अशी एकटी रस्त्याने जात असल्यावर सहाजिकच, मनात भीतीचे तरंग उमटणार! कोण कुठून झडप घालेल, याचा नेम नव्हता.
कधीकधी स्वतःचे सौंदर्यच, स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरू शकते. गोरा वर्ण, उणीपुरी उंची, मोहक देहयष्टी, जिथल्या तिथे व्यवस्थित असलेले अवयव, अंगावर लाल रंगाची साडी या सगळ्या पेहरावात ती अतिशय आकर्षक दिसत होती. उठावदार अवयव सहज नजर खेचून घेत होते. एकंदरीत ती सुंदर आणि कमनीय दिसत असल्याने, कोणालाही तिचा मोह सुटला असता.
मग अशा मध्यरात्रीच्या वेळी, त्यातही ती एकटी असताना, कोणालाही तिचा मोह सुटला तर नवल नको. अशी ही विचारांची मालिका तिच्या मनात सुरू असतानाच, पाठीमागून कसलातरी आवाज आला. विचारातून खाड्कन ती जाग्यावर आली. पुढे चालणारे  पावले अडखळल्यासारखे झाले. भीतीची एक संवेदना सरसर करत हृदयापर्यंत गेली. जे विचार मनात उमटले होते, त्यांचे रूपांतर भितीत झाले. तिने हळूच पाठीमागे, वळून बघण्याचा प्रयत्न केला. पाठीमागून कोणीतरी येत होते. एक तरूण दिसत होता. तो तिच्याकडेच बघत होता. ती जागेवर थांबली, तेव्हा तोही थांबला. ती जराशी घुटमळली, आणि पुन्हा घराकडे चालू लागली. पाठीमागे पुन्हा पावलांचा आवाज आला. म्हणजे तो तिच्याच पाठीमागे येत होता. तिला भिती वाटू लागली. तिने पावलांचा वेग वाढवला. पाठीमागेही वेग वाढल्यासारखा जाणवला. आता मात्र तिची खात्री झाली. तो आपलाच पाठलाग करत आहे. संकटाची जाणीव तिला झाली. तिने इकडे तिकडे पाहिले. काही मदतीची अपेक्षा होते का? याची चाचपणी केली, पण त्याची काहीच चिन्हे दिसेनात. सगळीकडे सामसूम पसरली होती. तिने चालण्याचा वेग अजून वाढवला. आता मागची पावले, नजीक आल्यासारखे तिला जाणवू लागले. तिने खांद्यावरची पर्स हातात घट्ट पकडली, आणि धावायला सुरुवात केली. तिला मोह झाला मागे वळून पहावे, त्याचा अंदाज घ्यावा. पण तिची हिंम्मत झाली नाही. ती जोरात पळू लागली. मागची पावले दूर जात होते. त्यांचा आवाज अस्पष्ट होत होता. तिला हायसे वाटू लागले. ती तशीच पळत पुढे जात होती. घर नजरेच्या टप्प्यात आले. तिच्या जीवात जीव आला. तिने घर गाठले. एकदा पाठीमागे नजर टाकली. दूरवरून पावलांचा आवाज येत असल्यासारखा जाणवला. तिने लगबगीने पर्समधील चावी काढली. कुलूप उघडले, आणि दरवाजा खोलून घरात आली. तिने मोठा सुस्कारा सोडला. पळून लागलेली धाप, त्या सुस्कार्‍याने हलकी झाली. हृदय भितीने, धावपळीने जोरजोरात धडकु लागले. पण आता तिला सुरक्षितता जाणवू लागली. बाहेरचा कानोसा घेण्याचा तिने  प्रयत्न केला. पण बाहेर काही हालचाल जाणवेना. नुसती शांतता जाणवत होती.
ती घरात आली. ग्लासभर पाणी पिले.
घर मोठे होते. वडिलोपार्जित असावे. पण ती एकटीच असल्यामुळे, एवढे मोठे घर तिला खायला उठायचे. मोजून दोन-तीन खोल्यांचा ती वापर करायची. बाकी सगळे घर अडगळी सारखे रिकामे पडलेले होते.
थोडेसे स्वस्थ बसून, ती बेडवर आडवी झाली. बेड मोठा ऐसपैस होता. एक हात डोक्यावर ठेवून, तिने झोपण्याचा प्रयत्न केला. भूक नव्हती, त्यामुळे जेवण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. उशीर झाल्यामुळे भूकमोडही झाली होती. एकचा सुमार झाला असावा. अचानक घराच्या पाठीमागच्या खिडकीचा आवाज झाला. खिडकी उघडण्याचा तो आवाज होता. आणि पाठोपाठ खिडकीतून कुणीतरी आत उडी मारल्याचाही आवाज आला. विजेच्या गतीने तो आवाज तीच्या कानात शिरला. मेंदूच्या संवेदना हृदयापर्यंत गेल्या. भीतीचा काटा अंगभर पसरत गेला. ती ताड्कन बेडवरून उठली. पण काय करावे? काहीच कळेना! पाठीमागच्या खिडकीतून, कोणीतरी आत आले होते, हे मात्र निश्चितच! ती उठली. हळूच पाठीमागच्या त्या खिडकीकडे जाण्याचा तिने प्रयत्न केला. आणि काही कळायच्या आत, तिच्या तोंडावर एक मजबूत हात आला. तिचे तोंड दाबण्यात आले. तीने धडपडीने तो हात सोडण्याचा प्रयत्न केला. पण त्या हाताची पकड मजबूत असावी, ते सुटता सुटेनात. दिवे कधीच विझले होते. तिला काहीच दिसत नव्हते. कोणाचा हात होता? ते कोण होते? काहीच समजेना. तिची धडपड वाढू लागली. पण तो मजबूत हात तिच्या तोंडावरून बाजूला हटेना. आता तिच्या कमरेभोवती एक हात आला. तिला कोणीतरी अलगद उचलले होते. तो मघाचाच तरूण असावा, हे तिला जाणवत होते. तिला एकटीला बघून तो घरात शिरला असावा. ती असहाय झाली. त्याने तिला तशीच उचलून बेडवर टाकली. ती धडपडू लागली. विरोध करू लागली. पण त्याच्यापुढे तिचा तो नगण्य विरोध टिकला नाही. तिची धडपड शांत होऊ लागली. तिचा टिकाव दुबळा ठरू लागला. ती असहाय होत गेली.
   
किती वेळ गेला. काळ गेला. काहीच कळले नाही. पण आवाज मात्र येत होते. गंध जाणवत होता. श्वास - उच्छवास वेगाने होत होता. त्याचा आवाज, तिचा आवाज येत होता. परंतु एक होते, आता आवाज विरोधाचा, धडपडीचा, दुःखाचा, वेदनेचा येत नव्हता. समाधानाचा, अत्युच्च आनंदाचा, तृप्तीचा येत होता. घामाचा खारट गंध जाणवत होता. सगळीकडे अंधार होता. पुढचे काही दिसत नव्हते. पण कान, नाक, स्पर्श यांच्या संवेदना जाग्या होत्या. त्यांच्याद्वारे काही स्पष्टीकरण मिळत होते. तिची अवस्था काय होती? काहीच कळेना. पण तिचा विरोधाचा आवाज, कधीच मागे पडल्या सारखा जाणवू लागला. एक प्रकारची समाधी लागल्यासारखी ती शांत जाणवत होती. मंदगतीने तिचा श्वास आत, बाहेर झाल्यासारखा वाटू लागला. त्या श्वासांच्या लयीवरून, त्याच्या आवाजावरून तिच्या अवस्थेचा काहीच अंदाज घेता येईना. पुढे काय चालले आहे? कशाचाच बोध होत नव्हता. पण एक मात्र होते. पुढचा शृंगर संपला होता. समाधानाचा तो परमोच्च बिंदू गाठला गेला होता. सगळीकडे कमालीची शांतता जाणवत होती.
     
एव्हाना वेळेची गती खूप पुढे गेली होती. सकाळचा कोवळा प्रकाश सगळीकडे जाणवत होता. आता हळूहळू ती खोली प्रकाशित होत होती. तो तरुण धडपडून उठायचा प्रयत्न करू लागला. पण त्याच्या हालचाली जड वाटू लागल्या. संवेदना बधिर वाटू लागल्या. जागेवरून शरीर तसूभरही हलेना. शरीर पॅरालीसीस झाल्यासारखे, संवेदनाहीन बनले होते. त्याने डोळे तिरकस करून, तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला. तिच्या डोक्यावर पांघरून होते. ते हळूहळू तिच्या तोंडावरून बाजूला सरकत होते. हजारो व्होल्टचा झटका बसावा, तसा त्याला तो धक्का बसला. समोर एक कृश, जख्ख, सुरकुत्या चेहऱ्याची वृद्धा झोपलेली होती. जी त्याच्याकडे बघून आता हसत होती. तिच्या अंगावरचे सगळे पांघरुण बाजूला झाले. तिचे सगळे शरीर उघडे झाले. सगळ्या अंगावर सुरकुत्या होत्या. लाल, तांबूस त्वचा सगळ्या शरीरभर पसरलेली होती. तोंडात एकही दात नव्हता. पण त्याच तोंडावर एक अघोरी, तृप्त, वखवखलेले हास्य होते. त्या सुरकूतलेल्या तोंडावर तृप्तीचे समाधानाचे भाव त्याला, आपण काय घोर पाप केले? याची जाणीव करून देऊ लागले. त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. काल रात्री भोगलेला देह कसा? आणि हा समोरचा देह कसा? तो मांसल,नरम, रसरशीत देह होता. एकएक अवयव मुलायम , नितळ, उठावदार जाणवत होता. आणि हा समोरचा नुसता टणक, बेढब, किळसवाणा, जख्ख भासत होता.
     आता ती वृद्धा जोरजोरात हसत होती. तिच्या चेहऱ्यावर अनेक भाव उमटत होते. तिचा उजवा हात वर उचलला गेला. तो त्याच्या तोंडावर आला. तोंड, नाक दाबले गेले. त्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण शरीर साथच देईना. ते एकदम स्थितप्रज्ञ झाले होते. त्याचा श्वास गुदमरू लागला. संवेदना कमी कमी होऊ लागल्या, आणि तो काळाच्या पडद्याआड सरकला गेला. मृत्यूच्या काळ्या गर्तेत तो कायमचा फेकला गेला.
            
आज पुन्हा ती लगबगीने लोकलमधून खाली उतरली. खूप उशीर झाला होता. नेहमीप्रमाणे तिने रिक्षा घेतली नाही. एकटीच घराकडे पायी निघाली. एवढी सुंदर ती, अशी एकटी रस्त्यावर पाहून, एक तरुण तिच्या पाठीमागे निघाला. ती आता पळत होती. आणि तो पाठीमागचा तरुणही तिच्या पाठीमागे पळत होता. पण त्याच्या पाठीमागे येण्याने ती आता खूश होती. आजची रात्र मजेत जाणार होती. कित्येक वर्षांपासूनचे हे तिचे चक्र सुरू होते. ते असेच सुरू राहणार होते. शेकडो वर्षांचा तिचा देह, आजही तृप्त होणार होता.

*समाप्त.
*वैभव देशमुख.

कथालेख

प्रतिक्रिया

सॅनफ्लॉवर्स's picture

22 Sep 2020 - 6:44 pm | सॅनफ्लॉवर्स

छान लिहिलय.

टवाळ कार्टा's picture

22 Sep 2020 - 7:45 pm | टवाळ कार्टा

predictive

विनिता००२'s picture

23 Sep 2020 - 10:22 am | विनिता००२

चांगले लिहीलेय.

चौथा कोनाडा's picture

24 Sep 2020 - 12:55 pm | चौथा कोनाडा

आवडली !
भारी +१
वातावरण निर्मिती छान झालीय !
खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली !

पुढील कथेच्या प्रतिक्षेत !

दुर्गविहारी's picture

24 Sep 2020 - 3:12 pm | दुर्गविहारी

मस्त ! ट्विस्ट असला की वाचायला मजा येते.

श्वेता२४'s picture

24 Sep 2020 - 4:00 pm | श्वेता२४

चांगला ट्वीस्ट.

शित्रेउमेश's picture

29 Sep 2020 - 10:06 am | शित्रेउमेश

आवडली...