इब्न बतूत भाग - ६

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 Oct 2010 - 11:29 am

header for blog1

पर्शिया आणि मेसोपोटेमियाच्या दिशेने त्याने जेव्हा पाऊल टाकले तेव्हा तो आता दारुलइस्लामच्या बाहेर पडत होता. टायग्रीस नदीच्या उगमापाशी त्याने ती नदी पार केली आणि तो गोर्‍या (त्याच्या दॄष्टीने गोरे) लोकांच्या प्रदेशात शिरला. याच प्रांतातून आर्यन लोक बाहेर पडले होते.(हे माझे मत नाही). अर्थात आता त्यांचा मागमूसही राहिला नव्हता. त्यांच्या प्रांताचे नाव होते : इराण ! इराक प्रांतात त्याने पाहिलेल्या माणसांची चेहरेपट्टी, त्यांची भाषा, तेथील मिनारांची रचना, त्यांचे शासन, हे सगळे इस्लामी होते पण तरीही वेगळे होते. इस्लामी जगतातीलच ही एक आगळी वेगळी संस्कृती होती. या प्रांताचे राज्यकर्ते होते इस्लामी मोगल. इलखान !

१२५८ पासून जेव्हा मोगलांनी इराण घेतले तेव्हा बगदाद, आणि त्याच्या पश्चिमेकडचा प्रदेशपण त्याच राज्याचा भाग होता. १३२७ च्या मध्यास इब्न बतूतने टायग्रिस नदी पार केली आणि कुफाच्या मार्गे त्याने एका प्रसिध्द शहरात प्रवेश केला. त्याचे नाव होते "बगदाद"!

चौदाव्या शतकातील बगदाद म्हणजे एक श्रीमंत आणि गजबजलेले शहर होते. मोगलांच्या ७० वर्षांपूर्वीच्या आक्रमणातून ते आता सावरत होते. सध्याचा सुलतान अबू सैद बहादूर खान, ज्याने शेवटी इस्लाम धर्म स्विकारला, त्याच्या अधिपत्याखाली बगदादचे अब्बसैदच्या वेळेचे (८व्या ते ११ शतकातील) गतवैभव परत मिळवायचे जोरदार प्रयत्न चालू होते.

इब्न बतूतने केलेले बगदादचे वर्णन हे दु:खदच आहे. शहराच्या पश्चिमेला खलिफा अल मामूननी बांधलेल्या भव्य "बाईत-अल्‍-हिक्म" मशिदीचे आता मोडकळीस आलेले अवशेषच उरले होते. खलिफाची गादी आणि त्याबरोबर येणारा मानमरातब आता कैरोला हालले होते आणि त्यामुळेच ते मोगलांपासून सुरक्षित राहिले होते एवढी वाईट अवस्था असूनही बगदादला टायग्रीसची राणी म्हणत. मोगलांनी त्याची वाट लावण्यापूर्वी त्याची एवढी भरभराट झाली होती की इब्न बतूतने त्याचा लेखनीक इब्न जुझ्झीला बगदादला त्या वैभवाची माहिती गोळा करायला पाठवले होते आणि ती माहिती मग त्याच्या पुस्तकात अंतर्भूत करण्यात आली. इब्न बतूतने मात्र बगदादच्या मशिदी, रस्ते, हमाम, राजवाडे, पूल, कारखाने, धान्याची कोठारे, तटबंदी इ. चे सविस्तर वर्णन केले आहे. विशेषत: बाजारांची रचना त्याला फारच वैशिष्ठ्यपूर्ण वाटली.

इब्न बतूतच्या अगोदर साधारणत: एक पिढी, मोगलांच्या हाती जवळजवळ नष्ट झालेल्या पर्शियाच्या पुनर्बांधणीचे काम चालू झाले. इब्न बतूत तेथे पोहोचला तेव्हा टॅबरीझ शहर त्याच्या एका सुपुत्राकडे मोठ्या आशेने बघत होते. त्याचे नाव होते रशीद अलादीन. तो एक चांगला मुत्सद्दी, राज्यकर्ता, राजकारणी आणि इतिहासकार होता. तो एक नव्हे ३ सुलतानांचा वजीर होता यावरुनच तो किती धोरणी असेल हे समजते. त्यातील एकाने मुसलमानांनी त्याचे मूळ विसरु नये म्हणून त्याला त्यांचा इतिहास लिहिण्याची आज्ञा केली. मग त्याने त्याच इतिहासात मोगल ज्यांच्या ज्यांच्या सान्निध्यात आले त्यांच्या बद्दलही लिहिले. अशारितीने रशीदने जगातील सर्वात जुने जागतिक इतिहासाचे पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे नाव "जामी-अल्‍-तवारिख" (इतिहासांचा संग्रह) असे होते. त्यात दारुल इस्लाम, चीन, तिबेट, तुर्कस्तान, बायझानटाईन, युरोप इ. प्रदेश आणि त्यांचा इतिहास यांची माहिती आहे. हा इतिहास लिहिण्यासाठी त्याने उपलब्ध असलेल्या सर्व इतिहासांचा वापर तर केलाच पण महत्वाचे म्हणजे त्यासाठी त्याने त्या त्या देशातील व्यापारी, वैद्य इ. लोकांशी मुलाखती केल्या. विशेषत: चीन आणि हिंदुस्थानमधील. त्या लोकांना नोकर्‍या पाहिजे होत्या आणि रशीदला ते देतील तेवढी माहिती.

शहराच्या पूर्वेला १४ व्या शतकापासून आलेल्या गरीब कामगारांची वस्ती होती. रस्ते अरुंद होते आणि घरे वाळवलेल्या विटांची होती. त्यातल्या त्यात बर्‍या स्थितीतील लोकांच्या घरासमोर अंगण आणि छोटीशी बाग आणि सावलीसाठी एखादे झाड, विहीर असे. इस्लाम धर्मानुसार संपत्तीचे प्रदर्शन टाळले जाई, त्यामुळे घराच्या दरवाजावरुन किंवा त्याच्या बाह्यांगावरुन आत राहणार्‍या माणसाच्या सांपत्तिक स्थितीची कल्पना येऊ शकत नसे.
आतमधे कारंजामधून पाणी उडत असे आणि ते मोठ्या माठात साठवले जायचे. (या प्रकारचे घर आपल्याला आत्ताच्या इराणी सिनेमात बघायला मिळते) जे जे शक्य आहे ते सजवले जात असे. भडक रंग आवडीने वापरले जात. या वस्त्यातून पाळला जाणारा कायदा हा इब्न बतूतच्या टॅंजिएमधील कायद्याप्रमाणेच होते. अर्थात तसे ते सर्व इस्लामी जगतात एकच असत म्हणा.

बगदादमधे असताना इब्न बतूतने परत एकदा मक्केची वारी करायची ठरवली. स्वत: सुलतानानेच त्याला त्याच्या काफिल्यात सामील होण्यास सांगितल्यामुळे प्रश्नच नव्हता आणि शिवाय उत्सुकता होतीच. १० दिवस तो अबू सईदच्या "महाल्ला" बरोबर चालत होता. त्या प्रवासाचे वर्णन त्याने जरा जास्तच सविस्तरपणे केले आहे. बहुतेक त्या प्रवासाने तो फारच प्रभावित झाला असावा किंवा मोरोक्कोच्या सुलतानाला इल्खान सुलतानांविषयी जास्त माहिती पाहिजे असावी. "सूर्योदयाला चालायला सुरुवात करायची आणि दुपारी उशीरा मुक्काम करायचा अशी त्यांची पध्दत आहे. निघायच्या वेळचा समारंभ खालीलप्रमाणे असायचा. प्रत्येक अमीर आणि सैनिक, वाद्यवृंद, निशाणे घेऊन त्याला नेमून दिलेल्या जागेवर उभे रहायचे. त्यात एकही पाऊल इकडे तिकडे चालत नसे. यांच्या दोन रांगा असत. एक रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. हे सगळे तेथे जमल्यावर सुलतान उंटावर चढत. चालायचा इशारा करण्यासाठी वाद्ये वाजविली जात. मग प्रत्येक अमीर त्याच्या सैनिकांबरोबर पुढे येऊन सुलतानाला मानवंदना देई. ते झाल्यावर ते सर्व परत आपल्या जागेवर जात. मग धर्मगुरु आणि काही सैनिक इ. सुलतानाच्या पुढे चालायला लागत. त्यांच्या पुढे १० घोडेस्वार, १० ड्रम इ. असत. सुलतानाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला सगळे अमीर चालत. त्यांच्याबरोबर त्याचा लवाजमा असे. त्यांच्या मागे सुलतानाचे सामान लादलेले उंट असत आणि सगळ्यात शेवटी उरलेले सैन्य असे ..." तो "महाल्ला" सोड्ल्यानंतर
इब्न बतूतने प्रवासाचा मार्ग बदलून शिराझ, इस्फहान आणि टॅब्रीझ या शहरांकडे आपला मोर्चा वळवला. ही शहरेही त्यावेळी इस्लामी संस्कृती आणि सत्तेची केंद्रे होती. टॅब्रीझमधे जास्त काळ न राहता आल्याने त्याने खेद व्यक्त केला आहे. "मुक्काम न करता आल्यामुळे या गावातील विद्वानांना भेटता आले नाही" म्हणून खेद ! सुलतानाचा परत काफिल्यात सामील व्हायचा निरोप आल्यामुळे त्याची जरा घाईच उडाली होती. याचवेळी त्याची आणि सुलतानाची प्रत्यक्ष भेट झाली आणि त्याला त्याच्या दुसर्‍या यात्रेसाठी सुलतानाकडून भरघोस मदतीची आश्वासने मिळाली.

आख्या रिहालामधून इब्न बतूतच्या वैयक्तिक चारित्र्य आणि स्वभाव याबद्दल सूचक घटनांमधून माहिती गोळा करावी लागते. आजच्या हिशोबाने तो एक कटकट्या, दुसर्‍यांच्या गोष्टीत ढवळाढवळ करणारा वाटेल कारण लोकांच्या क्षुल्लक चुकांसाठी त्याने त्यांना धारेवर धरले आहे. बसरामधे शुक्रवारच्या उपदेशामधील व्याकरणाच्या चुकांबद्दल त्याने स्थानिक क्वादीकडे तक्रार केली व त्याला चांगलेच फैलावर घेतले. त्याने फारच गयावया केले तेव्हा याने त्याला सोडले.

इजिप्तमधील "मिन्या" मधे सार्वजनिक पुरुषांच्या हमाममधे लोक कमरेच्या खाली काही गुंडाळत नाहीत याचा त्याला फार राग आला. जेव्हा त्याने याबद्दल स्थानिक अधिकार्‍यांकडे जोरदार तक्रार केली तेव्हा पंचा गुंडाळायचा कडक नियम करण्यात आला. पण त्याचबरोबर त्या यात्रेत जो काही रक्तपात सुलतानाकडून होत होता त्याबद्दल त्याने अवाक्षरही काढलेले नाही. त्याच्या या वृत्तीला सध्याच्या जगात सोयीची नैतिकता असे म्हटले जाईल. आपल्याला हेही त्या पुस्तकामधून माहिती होईल की तो फायद्याच्यावेळी खोटी स्तुती करायला मागे पुढे बघत नसे. पण त्याचवेळी तो कायद्याच्या बाबतीत फार काटेकोर आणि स्वच्छ होता. त्यावेळचे जग आणि तो त्यात त्या पध्दतीने जगत होता, हे खरे. तरीसुध्दा सत्ताधिशांशी खरे बोलण्याचे त्याच्याकडे धैर्य होते हे त्याच्या पर्शियातील "इधाज" नावाच्या शहराच्या सुलतानाच्या भेटीच्या वर्णनावरुन कळू शकते.

"मी ह्या 'आफ्रासियाब' नावाच्या सुलतानाची भेट मागितली. पण त्याची भेट होणे एवढे सोपे नव्हते कारण तो फक्त शुक्रवारीच बाहेर पडत असे. उरलेले दिवस तो दारुच्या धुंदीत असे. काही दिवसांनंतर मला त्याचे बोलावणे आले. मी ते निमंत्रण स्विकारले व त्याच्या भेटीला गेलो. सुलतान त्याच्या गादीवर बसला होता. त्याच्या समोर दोन सुरया होत्या. एक सोन्याची आणि एक चांदीची. थोड्याच वेळात तो दारुच्या धुंदीत आहे हे स्पष्ट झाले. मी त्याला म्हणालो 'आपण थोर सुलतान अताबेग अहमद्‍ यांचे चिरंजीव आहात, आपले आब्बा त्यांना लोकांबद्दल वाटणार्‍या करुणेसाठी आणि विरक्तीसाठी प्रसिध्द होते आणि तुमच्या विरुध्द हे सोडल्यास बाकी काहीही तक्रार नाही. मी त्या सुरयांकडे बोट दाखवून म्हटले. माझ्या ह्या बोलण्याने ते जरा गोंधळलेले दिसले आणि गप्प बसले. मुलाखत आता संपलीच म्हणून मी जायला उठलो. पण त्यांनी मला बसायला सांगितले आणि म्हणाले 'कृपया बसा. तुमच्यासारख्या माणसांना भेटायला मिळणे ही देवाचीच कृपा समजतो मी.' थोड्या काळाकरिता इब्न बतूत बगदादला परतला. आल्यावर त्याला सुलतानाने जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण मदत मिळाली. या मदतीचा उपयोग त्याने मक्केला जायला केला नाही कारण तो काफिला नंतर २ महिने तेथून हललाच नाही. मग त्या मदतीचा उपयोग करुन त्याने टायग्रिसच्या वरच्या बाजूला असलेल्या भागाचा दौरा केला. तो झाल्यावर तो परत बगदादला हाजच्या यात्रेत सामील होण्यासाठी आला. त्या यात्रेबद्दल त्याने काही विशेष लिहिले नाही. त्या वर्णनात तो आजारी पडला असा उल्लेख मात्र आहे. त्या आजाराच्या वर्णनावरुन त्याला संसर्गजन्य ताप आला होता हे समजते. त्या प्रवासात तो इतका आजारी पडला की "मला प्रार्थनासुध्दा बसून करायला लागल्या."

इब्न बतूतने मोगादिशूच्या किनार्‍याला बोटी लागायचे वर्णन असे केले आहे –
जेव्हा गलबत नांगर टाकण्याच्या ठिकाणी पोहोचे तेव्हा "संबूक" म्हणजे छोट्या बोटी त्यांना वेढा घालत. या संबूकमधे बरीच तरुण मंडळी असत, यांच्या हातात अन्नाची वस्त्राने झाकलेली ताटे असत. ही ताटे ते गलबतातील व्यापार्‍यांना नजर करत. त्या व्यापार्‍याने ते घेतल्यावर ते ते जाहीर करत 'हे माझे अतिथी आहेत.' ते व्यापारी मग बंदरावर उतरल्यावर त्या माणसाच्याच घरी त्याचे पाहुणे म्हणून रहायला जात. व्यापारीही त्याचा माल त्याच यजमानाला किंवा त्याच्या मार्फतच विकत असत.

इब्न बतूतच्या म्हणण्यानुसार तो मक्केत यावेळेस दोन वर्षे राहिला. पण खरंतर तो एकच वर्ष कसाबसा राहिला असेल. तारखांचे घोळ त्याच्या प्रवासवर्णनात भरपूर आहेत आणि ते आपल्यालाच काय तज्ञांनापण गोंधळून टाकतात. पण त्याबद्दल आपण त्याला माफ करायला हरकत नाही कारण रिहाला हे त्याने इतिहास म्हाणून लिहिलेले नसून त्याच्या मोरोक्कोच्या सुलतानाची माहितीची जिज्ञासा भागवायला लिहिले आहे.

मश्रबिया – दोन प्रकारचे.

या आजारातून बरे होऊन इब्न बतूत परत प्रवासाला निघाला तेव्हा त्याने दक्षिणेचा मार्ग पकडला. त्याने येमेनला निश्चितच भेट दिली असणार. फक्त तो त्याला "अल्‍-मश्रबिया" असे संबोधतो. याचा अर्थ चौकटी असलेल्या जाळीची खिडकी. "साना" आणि "ताईझ" मधील गल्लीबोळ त्याने केलेल्या वर्णनाची आजही साक्ष देतात.

या येमेनी घराच्या लाकडाच्या जाळ्यांच्या खिडक्यांबाहेरचा वारा आणि माफक उजेड आत सोडत पण बाहेरच्या लोकांना मात्र आतील काही दिसत नसे. याच्या वर्णनाबरोबर त्याने एक विचित्र निरीक्षणाची नोंद केली आहे आणि ती म्हणजे "येमेनमधे फक्त दुपारीच पाऊस पडतो.....संपूर्ण साना शहराचे रस्ते हे फरशी घातलेले आहेत त्यामुळे पाऊस पडला की सगळे रस्ते स्वच्छ होतात.

घरामधील आतील भिंती परवडतील तेवढ्या रंगाने रंगवल्या जात आणि घरात मोजकेच फर्निचर असले तरी बसायला मात्र चांगले गालिचे असत. यावर बसताना पुरुषमंडळी पायाची घडी पुढे घालून बसतात तर स्त्रिया पाय मागे मुडपून बसतात. घरातील चैनीची वस्तू म्हणजे "दिवाण". तो असलाच तर मात्र या टोकापासून त्या टोकापर्यंत पसरलेला असे आणि त्यावर टेकायला भरपूर गाद्यागिर्द्या असत. झोपायला गाद्या असतात आणि दिवसा गुंडाळून कपाटात ठेवल्या जात.

इब्न बतूत कधीकधी कडवट मत व्यक्त करतानाही आढळतो. ते कदाचित पुढच्या भागात असेल.

भाग -६ समाप्त.

जयंत कुलकर्णी
पुढे चालू........

संस्कृतीकलाधर्मइतिहाससमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरविचारसद्भावनासमीक्षालेखसल्लासंदर्भभाषांतर

प्रतिक्रिया

समंजस's picture

1 Oct 2010 - 12:26 pm | समंजस

भाग सुद्धा रोचक आहे.
पुढील भागांची वाट बघतोय :)

मृत्युन्जय's picture

1 Oct 2010 - 1:20 pm | मृत्युन्जय

मस्तच वर्णन आहे. तुम्ही कुठुन मिळवलीत ही सगळी माहिती? खुपच छान.

जयंत कुलकर्णी's picture

1 Oct 2010 - 3:12 pm | जयंत कुलकर्णी

ही माहिती मला एका लेखात सापडली मी त्यात भर टाकून ही मालिका बनवली. पण मुख्यतः पाया त्या लेखाचाच आहे. हे मी पहिल्या भागात लिहीलेच आहे.

:-)

अभिरत भिरभि-या's picture

1 Oct 2010 - 2:29 pm | अभिरत भिरभि-या

नेहमीप्रमाणे रोचक

>> दारुलइस्लामच्या बाहेर ?
म्हणजे मक्केच्या की अरेबियाच्या ??
दार - उल -इस्लाम म्हणजे इस्लामची राजधानी पण अभिप्रेत अर्थ काय ??

सुनील's picture

1 Oct 2010 - 3:31 pm | सुनील

हाही भाग नेहेमीप्रमाणेच छान.

मोगल ऐवजी तुम्हाला मोंगल (मंगोलियातील चेंगिझ खान आणि त्याचे वंशज) म्हणायचे असावे. कारण बगदादवर मोंगलांनी आक्रमण केले होते, मोगलांनी नव्हे.

विलासराव's picture

4 Oct 2010 - 10:09 pm | विलासराव

मस्तच.

Pain's picture

12 Oct 2010 - 11:45 am | Pain

इस्लामी जगतातीलच ही एक आगळी वेगळी संस्कृती होती. या प्रांताचे राज्यकर्ते होते इस्लामी मोगल. इलखान !
१२५८ पासून जेव्हा मोगलांनी इराण घेतले तेव्हा बगदाद, आणि...
...चौदाव्या शतकातील बगदाद म्हणजे एक श्रीमंत आणि गजबजलेले शहर होते. मोगलांच्या ७० वर्षांपूर्वीच्या आक्रमणातून ते आता सावरत होते.

मला हे अजिबात माहित नव्हते. नवीनच कळले. याबद्दल आणखी माहिती किंवा तुम्हाला वेळ नसल्यास पुस्तक/लिंक सांगता/देता का ?
मूळ इस्लाम धर्मापासून ते वेगळे कसे पडले ? इलखान म्हणजे काय ?