इब्न बतूत भाग - ९

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 Oct 2010 - 7:58 pm

त्या रात्री भयंकर तूफान आले. त्या बंदरात ते काही नवीन नव्हते. "ती शुक्रवारची रात्र आम्ही किनार्‍यावर काढली. आम्ही बोटीवर जाऊ शकत नव्हतो आणि बोटीवरचे किनार्‍यावर उतरु शकत नव्हते. माझ्याजवळ अंथरण्याच्या सतरंजीखेरीज काहीही नव्हते. शांत होण्याऐवजी वादळ उग्र रुप धारण करत होते. त्या उथळ पाण्यात त्या गलबतांचे हाल झाले. त्या गलबताच्या सारंग्याने ते गलबत खोल पाण्यात नेण्याचा प्रयत्न केला म्हणजे तेथून ते गलबत बाहेर काढता येईल."
पण त्याचा तो प्रयत्न फसला. इब्न बतूतच्या डोळ्यासमोर ते गलबत त्या खडकांवर आपटून त्याचे अक्षरश: तुकडे झाले. त्यावरचे सगळेच या प्रकारात मृत्युमुखी पडले. त्यापेक्षाही भयंकर म्हणजे दुसर्‍या छोट्या बोटीवरच्या ( ज्यावर बतूतची बायका मुले होती) लोकांनी हे पाहिल्यावर त्यांनी वाट न बघता सरळ पळ काढला. "त्यांनी आपली शिडे पसरली आणि मला एकट्याला त्या किनार्‍यावर सोडून ते निघून गेले."
त्या तुकडे झालेल्या गलबतांबरोबर इब्न बतूतच्या दिल्लीच्या स्वप्नाचेही तुकडे झाले. त्याला माहिती होते सुलतान त्याला पहिला प्रश्न हाच विचारणार की तो त्याच्या गलबतात का बसला नाही आणि त्याबरोबर त्याने जलसमाधी का घेतली नाही. यावेळेस मागच्यासारखे सोंग आणून चालले नसते. त्यावेळेची त्याची मन:स्थिती किती भयंकर असेल याची आपण कल्पना करु शकतो. पण त्या मन:स्थितीतही त्याने सगळ्याचे वर्णन करायचे थंबवले नव्हते. यामुळेच रिहालाचे महत्व वादातीत आहे.
"कालिकतच्या सुलतानाचे पोलीस त्या जहाजावरच्या वस्तू लुटणार्‍या लोकांना मारहाण करत होते. मलबारमधे फक्त याच किनार्‍यावर असा कायदा आहे की फुटलेल्या गलबतातील माल जर किनार्‍यावर वहात आला तर तो सरकारी खजिन्यात जमा करायचा. इतर ठिकाणी तो सर्रास लुटला जायचा. कालिकतला मात्र तो मूळ मालकाला परत मिळायचा म्हणून कालिकत हे फार भरभराट झालेले बंदर होते आणि गलबते येथूनच सुटायचा प्रयत्न करायची.

इब्न बतूतने मग होनावर येथे जायचे ठरवले. त्या तेथे त्याने जवळजवळ सहा आठवडे एकांतात घालवले. प्रार्थना आणि उपवास हेच त्याचे त्यावेळी सोबती होते. कदाचित त्याला मुलाच्या वियोगाचे दु:ख विसरायचे असेल किंवा निराशेतून त्याला बाहेर यायचे असेल. स्वाभाविक आहे ! त्याच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी पडले होते. कदाचित त्याला पुढच्या योजनाही आखायच्या असतील. या त्याच्या एकांताचा अंत लवकरच झाला जेव्हा त्याने होनावरच्या एका छोट्या सैन्याचे अधिपत्य केले. हे त्याने का केले हे कळत नाही. ह्या लढाईत त्याने विजय मिळवला खरा पण लवकरच प्रतीचढाईत " आम्हाला आमच्याच सुलतानानेच दगा दिला. आमचे हालहाल झाले. जेव्हा प्रकरण फारच गंभीर वळण घ्यायला लागले तेव्हा मात्र मी होनावर सोडले आणि कालिकतला परत आलो."
त्याच्याजवळ आता पैसे नव्हते, ओळखी नव्हत्या आणि एकही मित्र नव्हता. काय करावे हे त्याला सुचत नव्हते. पण परत एकदा त्या अंधारात त्याला उजेडाची एक तिरीप दिसली. ते घडले एका मालदीवला निघालेल्या गलबतावर.......
मालदीवची राणी "रेहेंदी किलेज" जिला तेथे "खादिजा" नावाने ओळखले जायचे ती तिचा वझीर पतीच्या हातातील प्यादे होती. इब्न बतूतने कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या येण्याची बातमी त्या शाही जोडप्याकडे पोहोचायची राहिली नाही. एक शिकलेला क्वादी आपल्या राज्यात आला आहे, आणि त्याने येथे येण्याअगोदर दिल्लीच्या सुलतानाकडे महत्वाच्या पदावर काम केले आहे हे कळल्यावर त्यांनी त्याला ताबडतोब बोलावणे पाठवले. त्यांच्या राज्यात आत्तापर्यंत क्वादी नव्हताच त्यामुळे त्याला लगेचच ते काम पत्करायची हुकूमवजा विनंती करण्यात आली. अर्थात ती नाकारायचा प्रश्नच नव्हता.
मी माझीच समजूत काढली. जरी मला ती नोकरी पत्करायची नसली तरी मनाविरुध्द बळजबरीने ती करावीच लागणार आहे. हो म्हणून टाकायला काय हरकत आहे ? असा विचार करुन मी होकार दिला."
पुढचे काही महिने इब्न बतूतने सत्तेबरोबर येण्यार्‍या सर्व सुखसोईंचा यथेच्च आस्वाद घेतला आणि क्वादीचे कर्तव्यही पार पाडले. अर्थात त्यात त्याला नवीन असे काहीच नव्हते. हे करता करता त्याने त्या बेटावरच्या स्त्रियांना बुरख्याची पध्दत, जी तेथे एवढी पाळली जात नव्हती. ती पाळायला लावायची शिकस्त केली पण त्यात त्याला प्रचंड अपयश आले. मग त्याचे लग्न त्या राजघराण्यात झाले आणि इस्लामी प्रथेनुसार त्याची अजून तीन लग्नेही झाली. या लग्नांच्यामागे बरेच राजकारण होते आणि लवकरच तो मालदीवमधल्य़ा प्रमुख सरदारांमधे ओळखला जाऊ लागला.
त्याला मदत झाली ती त्याच्या दिल्लीच्या अनुभवाची. त्याच्या वाढत्या राजकीय ताकदीचा परिणाम एवढाच झाला की तो त्या सत्ताधिशांच्या मर्जीतून उतरला. त्याच्यावर राणीच्या विरुध्द बंडाच्या कटाचा आरोप करण्यात आला. (जो खरा होता.) सात महिन्यात इब्न बतूतचा प्रवास नावाजलेला क्वादी ते नावडता क्वादी असा झाला.
मग तो सिलोनला गेला ज्याचे वर्णन मार्को पोलोने जगातील सर्वात सुंदर बेट असे केले आहे. तेथे गेल्यावर त्याची अध्यात्माची आवड परत उफाळून आली आणि त्याने मग एडॅम्सच्या शिखरावर पायपीट केली. तेथे त्याला बरेच हिंदू आणि ख्रिश्चन यात्रेकरु भेटले. त्यांच्या बरोबर त्याने बरीच चर्चा केली असावी. त्या रस्त्यावर त्यला माणके, इंद्रनील मुबलक आढळली. या वर्णनात "उडत्या जळवांचा" पण उल्लेख आहे.
हिंदुस्थानच्या पूर्वेच्या किनार्‍यावर कोरोमंडेलच्या काठी एका भयंकर वावटळीने त्याच्या गलबताचे तुकडे केले. त्याने त्याच्या बायकांना बड्या मुश्कीलीने एका तराफ्यावर चढविले. पण त्याच्यावर त्याच्यासाठी बिलकुल जागा नव्हती. इब्न बतूत हा काही पट्टीचा पोहणारा नव्हता. ती रात्र त्याने त्या गलबताच्या सुकाणूला लोंबकळून काढली. पहाटे, त्याचे नशीब चांगले, एका मासेमारीच्या बोटीने त्याची सुटका केली आणि त्याला तेथील सुलतानाकडे घेऊन गेले. हा सुलतान म्हणजे त्याचा मेव्हणा निघाला. (त्याच्या दिल्लीतील बायकोचा भाऊ) जग त्यावेळीही छोटे होते तर !
इब्न बतूत आणि सुलतानाने ज्याचे नाव होते घियाउद्दीन, मग मालदीवला सैन्य घेऊन परत जायचे ठरवले. ते फिसकटलेले बंड त्याला पूर्णत्वाला न्यायचे होते. त्या प्रवासात इब्न बतूतने घियाउद्दीन मुसलमान नसलेल्या लोकांना जी अमानुष वागणूक देत असे त्याबद्दल असे म्हटले आहे. "त्याचे हे वागणे घॄणास्पद होते. म्हणूनच अल्लाने त्याचा मॄत्यू लवकर घडवून आणला." त्यावेळी पट्टन शहरात प्लेगची साथ पसरली होती आणि लोक दोन तीन दिवसात लागण झाल्यावर मरुन पडू लागले, त्यातच घियाउद्दीनचा मॄत्यू झाला. त्यानंतर मात्र इब्न बतूतने आपली मालदीवची योजना बासनात बांधून ठेवलेली दिसते.
पुन्हा एकदा तो पश्चिम किनार्‍यावर होनावरला गलबताने निघाला आणि यावेळी मात्र पूर्णपणे नागवला गेला. यावेळी चाचांनी त्याचे गलबत लुटले." ते समुद्रात विखरुन त्यांची गलबते चालवत. एकामेकांशी ते दिव्यांच्या सांकेतिक भाषेत बोलत. एखाद्या गलबताला घेरुन मग ते पूर्ण लुटत. त्यांनी माझे सर्वस्व लुटले. मी अडीअडचणीसाठी ठेवलेले सोने, चांदी, सिलोनच्या राजाने मला दिलेले मोती, रत्ने, माणके, एवढंच काय माझे कपडे पण त्यांनी सोडले नाहीत. माझ्याकडे फक्त माझी सुरवार राहिली. "


इब्न बतूतच्या इस्लामी प्रदेशातील ओळखींचे प्रत्यंतर येथे येते. जरी तो अंगावरच्या नेसत्या कपड्यानिशी किनार्‍यावर आला असला तरी, संध्याकाळपर्यंत त्याच्या अंगभर कपडेलत्ते होते आणि आठवड्यात त्याच्याकडे खर्चायला पैसेही होते. लगेचचतो मालदीवला जाणार्‍या गलबतात बसलासुध्दा. ही त्याची एकटयाची गुपचुप भेट होती. मालदीवच्या राणीला आणि वजीराला त्याने फक्त त्याच्या मुलाला भेटण्याची परवानगी मागितली. त्याच्या मुलाची गाठ घेतल्यावर पाचच दिवसांनी तो बंगाल, सुमात्रा आणि चीनच्या, हो चीनच्या सफरीला बाहेर पडला.
चीन का? हा प्रश्न आपल्या मनात उभा राहिल्याशिवाय रहात नाही. एवढे हिंडल्यावर चीन का? सरळसाधे उत्तर म्हणजे इब्न बतूतने दारुलइस्लामच्या बाहेर जास्तीत जास्त दूर जायचे ठरवले होते. मलबारच्या किनार्‍यापासून टॅंजिए हे चीन इतकेच दूर होते. चीनला जाण्याचा त्याचा पहिला प्रयत्न हा तुघलकचा राजदूत म्हणून झाला. तो यशस्वी झाला असता तर तो मोठ्या मानाने चीन बघायला गेला असता. आता तो एक साधासुधा प्रवासी होता. त्याच्याकडे प्रवासाचा अनुभव, त्याच्या अहाण्या, जगाचा अनुभव, त्याचा इस्लामचा अभ्यास याच्याशिवाय काय होते? चीनला जाण्याची त्याला आवश्यकता नव्हती. असा काय फरक पडला असता तो सरळ घरी गेला असता तर ?
पण हेही खरंच होतं, चीन हे जगातील सगळ्या प्रवाशांचे आकर्षण होते व आजही आहे. १० व्या ते १३ व्या शतकापर्यंत अबसईदांच्या राजवटीत इस्लामी जगत आणि सुंग राजांच्या अधिपत्याखालील चीन, यांच्या मधल्या व्यापाराने परमोच्च बिंदू गाठला होता. मोगल युआन राजांनी चीनवर आपली राजवट १२७९ साली लादली. मोगलांच्या राजवटीत दारुलइस्लाम जरी भरडून निघत होता तरी या व्यापारावर म्हणावा तसा काही परिणाम झाला नव्हता. ओमानमधील व्यापारी अजूनही १८ महिन्याचा प्रवास करुन अरेबियन गल्फ ते चुआन-चाऊ असे जात होते.
युआन राजांनी जरी इतर मंगोल राजवटींप्रमाणे इस्लाम धर्म स्विकारला नव्हता तरी त्यांच्या राजवटीचे एक वैशिष्ठ्य होते. ते त्यांच्या चीनी जनतेपेक्षा मुसलमानांवर जास्त विश्वास ठेवत. त्यांच्या मते हे लोक त्यांच्या शब्दाला पक्के असत, दारुच्या अंमलाखाली ते व्यापारात चुका करत नसत आणि इस्लाम धर्माचे ते काटेकोर पालन करत असत. त्यांच्या धर्माला कन्फ्युशियसच्या तत्वांमधेही बर्‍यापैकी मान्यता होती. युआन राजांच्या या स्वागतामुळे त्या राज्याच्या नोकरशाहीमधे जगातील सर्व भागातील मुसलमानांचा शिरकाव झाला होता. युरोपमधूनही निकोलो पोलो व त्याचा मुलगा मार्को हेही चीनमधे आले होते. या सगळ्यामुळे एखादी चांगली नोकरी हेसुध्दा त्याचे चीनला जाण्याचे कारण असू शकेल. आणि कदाचित अलेक्झांड्रियामधील अवलियाची भविष्यवाणी, हेसुध्दा कारण असू शकेल. त्याने भविष्य वर्तवले होते ना, की इब्न बतूत चीनला जाऊन त्याच्या भावाला भेटेल !
जरी इब्न बतूत जवळजवळ ५७००कि.मी. प्रवास करुन चीनला बर्मा-सुमात्रामार्गे गेला तरी त्याच्या त्या छोट्याशा मुक्कामाबद्दल तुलनेने त्याने फारच कमी लिहिले आहे. गंमत म्हणजे हिंदुस्थानमधील कानाकोपर्‍याचे वर्णनात मात्र त्याने पानावर पाने खर्ची घातली आहेत. चीनमधील अनेक बंदरे जी इस्लामी व्यापारांसाठी एवढी महत्वाची असूनसुध्दा त्या प्रदेशाचे वर्णन त्याने का गुंडाळले असावे हे एक रिहालाचे गूढच आहे.
रिहालामधे इब्न बतूत व त्याचा लेखनिक इब्न जुझ्झी याने चीनचे बरेच वर्णन इतर ठिकाणांहून उचललेलेआहे याचे भरपूर पुरावे मिळतात. इब्न जुझ्झीने या कामात मोलाची कामगिरी बजावलेली दिसते.असो.रिहालाचे कामच सुलतानाला बाहेरच्या जगाची माहिती द्यायची हे असल्यामुळे जे माहीत नाही ते बाहेरुन गोळा करुन त्यात घालणे हे क्षम्य मानले पाहिजे. ज्याप्रमाणे व्होल्गा नदीतून प्रवास करुन बल्गेरियाची माहिती घेतली ही थाप आहे त्याप्रमाणे चीनच्या वर्णनात अनेक घोळ सापडतात. इतके की तो खरोखरच तेथे गेला आहे की नाही याची शंका यावी.
काही वर्णने ही इतर वर्णनासारखी टवटवीत आहेत असे वाटावे तर फु-चाऊ, हॅंग-चाऊ आणि पेकिंगची वर्णने इतकी कृत्रिम आहेत की ही त्याने लिहिली आहेत का नाहीत याचा संशय यावा. बहुदा ही माहिती त्याने त्याला चीनच्या दक्षिणी बंदरावर (जेथे तो निर्विवाद गेला होता) भेटलेल्या व्यापारांकडून घेतली असावी.


मोरोक्कोच्या परतीच्या वाटेवर इब्न बतूतची गाठ या युगातील सगळ्यात भयंकर अशा संसर्गजन्य साथीच्या रोगाशी पडली. मध्य आशिया आणि युरोपला या साथीने एकाचवेळी चांगलेच पछाडले होते. "मी दमास्कसला गुरुवारी पोहोचलो. लोकांच्या उपवासाला तीन दिवस झाले होते. मृत्यूचा आकडा वाढून रोज २४०० असा झाला होता. त्यानंतर मी कैरोला गेलो. तेथे तर परिस्थिती अजुनच भयंकर होती. मला सांगण्यात आले की रोज २१००० लोक मृत्यूमुखी पडत आहेत. माझ्या ओळखीचे सर्व धर्मगुरु, तत्वज्ञानी मरण पावले होते. परमेश्चर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो.
जयंत कुलकर्णी
भाग – ९ समाप्त.
पुढे चालू.....

संस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानप्रवासभूगोलदेशांतरआस्वादसमीक्षालेखमाहितीसंदर्भभाषांतर

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

9 Oct 2010 - 8:13 pm | जयंत कुलकर्णी

शेवटच्या चित्राखालील मजकुर केशरी रंगात आहे असे समजावे. म्हणजे याचा मुळ मजकुराशी तसा संबंध नाही. हे जरा आपले विषयांतर थोडेसे. त्याचा रंग बदलायचा राहिला आहे आणि संपादकांना यासाठी त्रास देणे योग्य नाही. जरा समजून घ्या आपलं.

विलासराव's picture

9 Oct 2010 - 9:11 pm | विलासराव

आता चीन. पुढे?
सुंदर लेखमाला.

Pain's picture

12 Oct 2010 - 12:19 pm | Pain

तुम्ही शेवटच्या परिच्छेदात उल्लेख केलेला रोग कोणता ?

जयंत कुलकर्णी's picture

12 Oct 2010 - 7:27 pm | जयंत कुलकर्णी

प्लेग असावा...बहुदा