मदीना शहराचे वर्णनात त्याने १२ पाने खर्ची घातली आहेत. त्यातील बरीचशी पाने प्रेषिताच्या मशिदीचे वर्णनानेच भरली आहेत. उरलेली पाने ही त्याने ऐकलेल्या कहाण्यांनी भरली आहेत. ती तर फारच मजेदार आहेत. त्यात वाळवंटातील जीवनाची बरीचशी वर्णने आपल्याला आढळतील. त्यातीलच एक एका शेखाची आहे. अबू म्हादी नावाचा हा शेख त्या वाळूच्या टेकड्यात रस्ता चुकला. एका बेदाउनला देवाने आज्ञा केली की त्याची सुटका कर. त्या आज्ञेमुळे तो त्या दिशेने प्रवास करु लागला आणि त्याला तो सापडला. पुढे पायाची पूर्ण कातडी सोलवटून निघाल्यामुळे महिनाभर तो उभा राहू शकत नव्हता इ. इ. बाकीच्या गोष्टी तर सुएझ ते दिल्ली प्रवासाच्या होत्या. या सर्व गोष्टी ऐकून २२ वर्षाच्या इब्न बतूतच्या मनात पुढच्या प्रवासाचे बीज रोवले गेले असे म्हणायला हरकत नाही.
"आमचा मदीनेतील मुक्काम हा ४ दिवसांचा होता. दररोज रात्री आम्ही मशिदीत जमायचो. त्या ठिकाणी वातावरण फारच धार्मिक असायचे. काही लोक वर्तुळात उभे राहून हातात मेणबत्या पेटवायचे. काही कुराणातील आयतांचे पठण करत होते. काही त्या कबरीचे भक्तीपूर्ण भावनेने निरीक्षण करत होते. सर्व बाजूला प्रेषिताची स्तुती करणार्या प्रार्थना म्हटल्या जात होत्या."
मदीनेच्या अलिकडे "धुअल्हुलाइफा" नावाचे गाव आहे तेथे सर्व हाजी जुने मळलेले कपडे बदलून "इर्हाम" घालायचे. इर्हाम म्हणजे पांढरे शुभ्र, दोन भागाचे वस्त्र असते. ते ज्याच्या अंगावर दिसे तो आता पवित्र मक्केत प्रवेश करणार आहे हे ओळखले जायचे. एकदा का इर्हाम अंगावर चढवला की हाजीने अत्यंत लीन व्हायचे, देवासमोर आणि इतरांसमोरसुध्दा, असा संकेत असायचा. खरंतर त्या वातावरणात ते आपोआपच व्हायचे.
"हाजच्या त्या रस्त्यावर मी हाजच्या परंपरेचे पालन करत चालत होतो आणि अखंड "लाबाइक अल्लाउमा" – (देवा तुझ्या सेवेत हजर आहे ) असे ओरडत होतो. असे करत करत मी अलीच्या खिंडीत रात्री पोहोचलो आणि तेथेच आम्ही रात्रीचा मुक्काम टाकला."
इब्न बतूतने त्याच्या बरोबर किती लोक होते याबद्दल का कोणास ठाऊक, काही विशेष लिहिले नाही. कदाचित त्यावेळेस ते त्याला नेहमीचेच असेल. पण हाज ठराविक काळातच असल्यामुळे त्याच्या बरोबर असणार्यांची संख्या बहुधा हजाराच्या घरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आत्तापर्यंत ज्या ज्या लेखकांनी मक्केची वर्णने केली आहेत त्याच्या तोडीस तोड पध्दतशीर वर्णन मक्का आणि तेथील विधी इब्न बतूतने केले आहे. ते इतके विस्तॄत आहे की बर्याच लोकांचा असा समज आहे की यातील बरेचसे वर्णन त्यांनी जुन्या पुस्तकातून घेतले आहे. त्यामुळे त्याच्या चार यात्रांपैकी कुठल्या यात्रेत कुठले वर्णन लिहिले आहे हे सांगणे कठीण आहे. काही ठिकाणी तो इतका कोरडेपणाने लिहितो की मक्केला त्या ठिकाणी तो गेलाय का नाही याचीच शंका यावी. पण एका जागी तो निश्चितच गेला होता. ते म्हणजे "जबल हिरा". हा एक पर्वत आहे आणि याठिकाणी महंमदाला साक्षात्कार झाला असे म्हणतात. या इथेच त्याला देवाकडून आज्ञा झाल्या ज्या त्याने लोकांना सांगितल्या आणि मग त्याचे कुराण झाले.
इब्न बतूत त्या पवित्र मशिदीचे वर्णन करतो -
"मग आमच्या नजरेत एकदम "काबा" भरला. जणूकाही सजवलेली वधू एखाद्या सजवलेल्या राजेशाही खुर्चीत बुरख्यात विराजमान झाली आहे. सातवेळा वळलेल्या रांगेत आम्ही त्याच्या दर्शनासाठी उभे राहून अखेरीस आम्ही त्याच्यापाशी पोहोचलो. अत्यंत भाविकतेने मी त्याचे रिवाजाप्रमाणे चुंबन घेतले. "मकाम इब्राहीम" येथे दोनदा प्रार्थना करुन काबा आणि दरवाजाच्या मधे असलेल्या पडद्यांना आम्ही हात लावून आम्ही दुवा मागितले. त्यानंतर आम्ही प्रसिध्द विहीर "झमझम" चे पाणी प्राशन केले. या पाण्याने सर्व आजार बरे होतात. तसेच भूक भागते, तहान भागते, अशी श्रध्दाळूंची श्रध्दा आहे.
१४व्या शतकात एवढी विविधता क्वचितच एखाद्या शहरात आढळत असेल. विविध प्रदेशातील लोक तेथे हाजला येत. यात्रेकरु स्वत:च्या यात्रेचा खर्च स्वत: व्यापार करुन करत असल्यामुळे अलिकडचे आणि पलिकडचे दिवस बाजार कसा फुललेला असे. सगळे यात्रेकरु या बाजारात उत्साहाने भाग घेत असत. "मक्केचे नागरिक उदार अंत:करणाचे, गरिबांना दानधर्म करणारे आणि नवागतांशी प्रेमाने वागणारे होते. एखाद्याने जर सार्वजनिक बेकरीमधे पाव करुन घेतला तर तो घरी जाताना जो मागेल त्याला थोडा का होईना तो पाव वाटत जाई आणि हे दॄष्य नेहमीचेच होते. मक्केचे नागरिक स्वच्छ कपडे परिधान करणारे, टापटापीचे आहेत. पांढरे, एकही डाग न पडलेले कपडे घालण्याच्या पध्दतीमुळे सगळीकडे तलम वातावरण असे. अत्तराचा वापर ते बहुतेकवेळा करतात. डोळ्यात सुरमा घालतात आणि अरकच्या (एक प्रकारचे लाकूड) काड्यांनी सारखे दात कोरत असतात.
इब्न बतूतने काबा, त्याच्या भोवतीचे हरम मक्का, आजूबाजूचा प्रदेश याच्या वर्णनासाठी ६० एक पाने खर्ची घातली आहेत. त्यात त्याने तेथील रितीरिवाज, विधी, तेथे जगातून येणार्या यात्रेकरुंच्या प्रथा, त्यांचे स्वभावधर्म, याबद्दल सविस्तर लिहिले आहे. मक्केचे महत्व वादातीत असल्यामुळे, त्याच्या नजरेतून काबा असो किंवा बाजार असो, तेथील काहीच निसटले नाही. त्याने केलेल्या मक्केच्या रंगतदार वर्णनाइतके चांगले वर्णन क्वचितच सापडेल. पण इब्न बतूतचे लक्ष पुढे लागले होते. मक्केतील अनुभव आणि अनेक म्हणजे पार सुदानीजपासून ते सिंधी भाषांशी आलेला संपर्क, त्याला पुढे काय आहे ? हे विचारत होता. इतर हाजींप्रमाणे इब्न बतूत मागे फिरला नाही. का ? त्याचे उत्तर त्याने दिलेले नाही. तरुण असल्यामुळे तो धाडसी असेल, किंवा त्याला बुर्हान अल्उद्दीनची भविष्यवाणी आठवली असेल किंवा त्याला त्याचे नशीबही आजमावयाचे असेल, सांगता येत नाही.
रॉस इ. डून ज्यांनी त्याच्या लिखाणाचा बराच अभ्यास केला आहे आणि ते त्यातील तज्ञ समजले जातात त्यांनी त्याबद्दल लिहिले आहे "जेव्हा त्याने टॅंजि सोडले तेव्हा त्याच्या मनात हाजची यात्रा करायची एवढेच ध्येय होते. पण जेव्हा तो बगदादला जाण्यासाठी इराकी यात्रेकरुंबरोबर निघाला तेव्हा हे स्पष्ट होते की धार्मिक यात्रा हा आता त्याचा हेतू नव्हता. तो इराकला, त्यात येऊ शकणार्या थरारक अनुभवांसाठीच चालला होता."
इब्न बतूतच्या "पहिला हाजी" या भागाचे लिखाण एकट्या बतूतने केले का नाही हा एक वादाचा मुद्दा आहे. त्यात आलेले वर्णन आणि त्याची भाषा ही इतर पानांपेक्षा बरीच वेगळी आहे. उदा. इब्न बतूतने त्या व्यासपीठाचे वर्णन करताना एक गोष्ट सांगितली आहे. महंमद एका खजूराच्या झाडाला नेहमी विचार करताना टेकून बसायचे. जेव्हा ते प्रचारासाठी निघाले तेव्हा ते झाड जशी उंटाच्या पिल्लाची आई तिचे पिल्लू सोडून जाताना रडेल तसे रडू लागले. महंमदांनी जेव्हा त्या झाडाला आलिंगन दिले तेव्हा ते अश्रू ढाळायचे थांबले. त्यानंतर त्याने त्या व्यासपीठाच्या बांधकामाचे वर्णन करायला घेतले आहे. हे सर्व त्याने लिहिले हे जरा विश्वास बसायला कठीण आहे. रिहालाच्या अभ्यासकांचे असे म्हणणे आहे की त्याच्या अगोदरचा जो प्रवासी, "इब्न जुब्यार" त्याच्या प्रवासवर्णनातून हा भाग उचलला आहे. काहींचे असेही म्हणणे आहे की खुद्द जुब्यारनेच यात, सुलतानाला हा वृत्तांत सादर करताना हा फेरफार केला. याचीच शक्यता जास्त वाटते. इब्न बतूतला याविषयी माहिती होती किंवा त्याची याला मान्यता होती का ? याविषयी खात्री देता येत नाही.
त्याच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्याने इराकला जायचा सरळ मार्ग अवलंबला नाही.
अरेबियन कल्पव्दिपातील वाळवंटातून त्याने इराणमधून एक वळसा मारला आणि उत्तरेकडे अजरबैजानमधील टॅबरीझ गाठले.
नवीन वर्ष चालू झाले होते.
ते होते १३२७.
त्याच वर्षात त्याने अभेद्य तटबंदीसाठी प्रसिध्द असलेल्या टायग्रीस शहरात प्रवेश
केला.
टायग्रीस म्हणजेच आजचे "बगदाद".
भाग -५ समाप्त
जयंत कुलकर्णी
पुढे चालू...............
प्रतिक्रिया
30 Sep 2010 - 11:21 am | रणजित चितळे
तुमचा हा भाग मी पहील्यांदा वाचला व खुपच आवडला, पण माझी जरा उलटीकडुन सुरवात झाली - बाकीचे आता वाचीन. फार सुंदर वर्णन कले आहे तुम्ही मनापासुन आवडले.
30 Sep 2010 - 12:00 pm | जिप्सी
अतिशय उत्तम लेखमाला ! तुमच्या सगळ्याच लेखमाला आवर्जून वाचतो. पण बाकीच्या प्रतिसाद्खेचक धाग्यांच्या गर्दीत अशा उत्तम लेखमाला हरवून जातात याचच वाईट वाटतं.तुमच्यासारखे अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे मि.पा.वर कमीच आहेत. मराठा लाईट इंन्फ्ट्रीसारख्या अतिशय माहीतीपूर्ण ७ लेखांवर सगळे मिळून १५० प्रतिसाद नाहीत याचा अर्थ आमची अभिरूची हीन होत चाललेली आहे असा होत नाही काय?
30 Sep 2010 - 2:10 pm | अभिरत भिरभि-या
अतिशय उत्तम लेखमाला ! तुमच्या सगळ्याच लेखमाला आवर्जून वाचतो. पण बाकीच्या प्रतिसाद्खेचक धाग्यांच्या गर्दीत अशा उत्तम लेखमाला हरवून जातात याचच वाईट वाटतं.तुमच्यासारखे अभ्यासपूर्ण लेख लिहिणारे मि.पा.वर कमीच आहेत. मराठा लाईट इंन्फ्ट्रीसारख्या अतिशय माहीतीपूर्ण ७ लेखांवर सगळे मिळून १५० प्रतिसाद नाहीत याचा अर्थ आमची अभिरूची हीन होत चाललेली आहे असा होत नाही काय?
सहमत ..
सकस खाद्य सोडून जंकफूडच्या मागे दुनिया धावतेय.
कुलकर्णी साहेब ,
लिहित राहा. प्रतिसाद दिला नाही तरी प्रत्येक भाग वाचत आहोत.
30 Sep 2010 - 4:49 pm | जयंत कुलकर्णी
मला वाटते कोणाला काय आवडावे हे आपण कसे सांगणार ?
पण एक आहे नवीन लेखन आणि नवीन प्रतिसाद असे दोन ऑप्शन्स ठेवले तर हा प्रश्न बर्यापैकी सुटेल. निलकांतांना या बाबतीत काही करता आले तर त्यांनी हे जरूर करावे ही विनंती.
12 Oct 2010 - 11:29 am | Pain
सहमत
12 Oct 2010 - 11:34 am | Pain
सहमत.
आता असलेल्या नियमांमधे दर्जाबद्दलही नियम समाविष्ट करण्यात यावेत.
सध्या सदस्यांना धागा आपल्या मर्जीनुसार सुरु करता येतो ते चांगले आहे पण काही लोक त्याचा इतका गैरवापर करत आहेत, की त्यांना कसे थांबवावे माहित नाही. नुकतेच समोर आलेले उदाहरण फारच बोलके आहे.
कदाचित लेखन संपादकांना पाठवावे आणि त्यांना वाटले तर प्रकाशित होईल असे काहीतरी असावे.
30 Sep 2010 - 12:54 pm | विलासराव
हा ईब्न बतुत.
मला तर खुप आवडला त्याचा प्रवास.
अन तुमची ही लेखमाला सुध्दा.
30 Sep 2010 - 1:51 pm | पाषाणभेद
अरे! आमच्यावेळची इतिहासाची पुस्तके अशी असती तर?
का नव्हती अशी पुस्तके इतिहासाची?
30 Sep 2010 - 3:50 pm | स्वाती२
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
30 Sep 2010 - 4:29 pm | मन१
उत्तम लेखमाला....
ते म्हणजे "जबल हिरा". हा एक पर्वत आहे आणि याठिकाणी महंमदाला साक्षात्कार झाला
सगळ्याच धर्मात एखादा पर्वत पुजायची का क्रेझ आहे कळत नाही.,जसं की हिमालय(वैदिक्,हिंदु,तिबेटी बुद्धीझम ह्यामध्ये), किंवा माउंट सिनाइ(ख्रिस्त धर्म्,ज्युं/यहुदी मध्ये ), किंवा माउंट फुजि(जपान आणि पूर्व चीन मध्ये)
1 Oct 2010 - 2:28 am | शिल्पा ब
मस्त...अजुन येउ दया.
उगाच काहीतरी लेख अन प्रकाशचीत्रांच्या धाग्याच्या भाऊगर्दीत असे धागे खाली जातात.
1 Oct 2010 - 6:30 am | आंसमा शख्स
सुंदर झाली आहे लेखमाला.
इतकी चांगली ओळख करुन दिल्या बद्दल शुक्रीया|
असे अजून आले पाहिजे. इस्लामी जगताची वेगळी ओळखही महत्त्वाची आहे.
मक्केचे वातावरण वाचून छान वाटले.
पण समाप्त का? अजून तर फक्त तैग्रीसवरच पोहोचले आहेत इब्नसाहेब.
12 Oct 2010 - 11:28 am | Pain
टायग्रीस म्हणजे बाण! अत्यंत वेगवान प्रवाह असल्याने त्या नदीला हे नाव पडले होते.
बगदाद शहर हे त्याच नदीच्या काठी वसलेले होते का ?