मागील भाग –
भाग - १०
भाग - ९
भाग - ८
भाग - ७
भाग - ६
भाग - ५
भाग - ४
भाग - ३
भाग - २
भाग - १
मागून पुढे चालू................
फेजमधे मग त्याने मारिनीद सुलतानाच्या प्रतिनिधीची भेट घेतली. सुलतान अबू इनान हा त्याच्या दृष्टीने फार महत्वाचा माणूस असल्यामुळे, त्याने त्याच्या भेटीवर सविस्तर लिहिले आहे त्यामुळे त्याच्या कुटुंबियांच्या, मित्रांच्या, नातवाईकांच्या भेटींचे वर्णन त्याने फार सविस्तर केलेले आढळत नाही. त्याऐवजी देशाच्या मातीचे चुंबन घेतले, सुलतानच्या माणसाची भेट इ. अशा नाट्यमय घटनांचे वर्णन त्याने रंगतदार करण्यात बर्यापैकी वेळ घालवलेला दिसतो. त्याच्या सुलतानाच्या भेटीचे वर्णन त्याच्या शब्दात –
“मी त्या सर्वशक्तीमान, दानशूर, सर्व सज्जनांचा सेनापती, असा माझा सुलतान अबू इनानसमोर उभा राहिलो. परमेश्चर त्याच्या शत्रूंचा नाश करु दे आणि त्याची सत्ता अबाधित ठेऊ देत, त्यांच्यासमोर उभे राहिल्यावर मला इराकच्या सुलतानाच्या राजेशाहीचा विसर पडला. त्यांचे बोलणे चालणे बघताना येमेनच्या सुलतानाचे मला काहीच विशेष वाटेनासे झाले. शौर्याच्या बाबतीत तुर्काचे सुलतानपण त्यांच्या पुढे फिक्केच पडले. अशा सुलतानसमोर मी माझा प्रवासाचा मानदंड खाली ठेवला आणि माझा देश सर्वांपेक्षा सुंदर आहे याची खात्री पटली.”
या भाटगिरीने अनेक पाने त्याने भरवली आहेत. पण जेव्हा तो टॅंजिएला पोहोचला त्याचे वर्णन त्याने अक्षरश: काही ओळीत उरकले आहे. त्याच्या आईच्या थडग्याला भेट, त्याचे आजारपण, त्याचा जिहादमधे भाग घ्यायचा निर्णय या सगळ्यासाठी फार तर त्याने दहाएक ओळी खर्ची घातल्या असतील.
जरी हा प्रवासी घरी पोहोचला होता, तरी त्याचा प्रवास मात्र संपलेला नव्हता असेच म्हणावे लागेल. अजून त्याला उत्तर आणि दक्षिण दिशा धुंडाळायची होती.
चीनच्या त्रोटक वर्णनाच्या तुलनेने अल्-एन्डुलासचे वर्णन त्याने बर्यापैकी केले आहे. स्पेनच्या दक्षिण भागात तो ज्या वाटेने चालला त्याच वाटेवर जर आज तुम्ही चाललात तर तेच सृष्टीसौंदर्य तुम्हाला बघायला मिळेल. फक्त रस्ते डांबरी आणि न तुटलेल्या लालभडक कौलारु घरांवर टी. व्ही.एंटीना, हा एवढाच फरक तुम्हाला जाणवेल.
ग्रानाडा त्याला आवडले. तसे ते आजही सर्व प्रवाशांना आवडते. तो काळ युसूफ पहिला याच्या वेळेचा होता. त्याने जगप्रसिध्द आलांब्राच्या इमारती बांधायला काढल्या होत्या.
इब्न बतूतने जाताजाता एक माहिती दिली आहे त्यावरुन कळते की त्या काळात माणसे कुठून कुठे जायची. तो म्हणतो ग्रानाडामधे एक फलटण पर्शियातून, एक समरकंदमधून आल्या होत्या. आणि त्या सर्वांनी तो देश त्यांना आवडल्यामुळे तेथेच वसाहती केल्या होत्या.
ग्रानाडात त्याची गाठ अजून एका तरुण कवीशी पडली. तो इब्न बतूतच्या प्रवासांच्या कहाण्यांनी फारच मंत्रमुग्ध झाला. त्याचे नाव होते मुहम्मद इब्न जुझ्झी. त्याने इब्न बतूतच्या बर्यारच कहाण्या स्वत:हून लिहून ठेवल्या आहेत. त्या दोघांची गाठ परत ५ वर्षांनी फेजमधे पडणार होती. जुझ्झी सांगतो “मी त्या काळात त्यांच्या बरोबर बागेत असायचो. शेख अबू अब्दुल्ला (इब्न बतूत) आम्हाला त्यांच्या प्रवासाची वर्णने सांगून आम्हाला अचंबित करायचे.”
इब्न बतूत मग राबात, माराकेचमार्गे परत फेजला आला. राबातमधे त्याने प्रसिध्द मिनार पाहिले.
राबातचे मिनार ( हल्लीचे)
त्या मिनारांवर आता आपण चढू शकत नाही, पण त्याने केलेल्या वर्णनाची कल्पना आपण निश्चितच करु शकतो.
जेव्हा तो परत मोरोक्कोला आला तेव्हा तेथे राजकीय शांतता होती. सुलतान अबू इनान याने एक मोठा मदरसा फेजमधे बांधायला घेतला होता. इब्न बतूतला यावेळी पन्नाशी गाठायला अजून तीन वर्षे होती. खरंतर प्रवासातून निवृत्त व्हायची ही चांगली वेळ होती. पण ....आत्तापर्यंत इब्न बतूतने आख्खे दारुल इस्लाम पालथे घातले होते. याला एक अपवाद होता आणि तो म्हणजे मोरोक्कोच्या जवळचे प्रदेश. पण अवघड रस्त्यांमुळे ते पोहोचायला कठीण होते.
मोहरमचा महिन्याच्या पहिल्या दिवशी इब्न बतूतने सहारा वाळवंट पार करुन माली आणि बिलाद-ए-सुदानला जाण्यासाठी त्याच्या काफिल्यासह फेज सोडले. बिलाद-ए-सुदान म्हणजे काळ्या माणसांचा देश. आजही तुरेग मार्गदर्शक त्यांच्या जांभळट पोषाखात उंटावरुन गुलेमाइन ते सिजीलमासा असा प्रवास काफिल्यांना घेऊन करतात. या प्रवासाला मधे काही झाले नाही तर ६३ दिवस लागतात. इब्न बतूतने ते दिवस काही मोजले नव्हते पण हा प्रवास खडतर आणि लांबलचक आहे असे मात्र म्हटले आहे.
केवळ उत्सुकतेपोटी तो या प्रवासाला निघाला नव्हता. मध्य पश्चिम आफ्रिकेच्या भरभराटीचे दिवस होते. वरच्या बाजुच्या सेनेगल आणि नायजर नदीच्या खोर्यात उत्तम पीक पाणी होत होते. फळांची प्रमाणाबाहेर मुबलकता होती. बांबूक आणि बुर येथील सोन्याच्या खाणींना लागणारा सर्व प्रकारचा माल ते पुरवू शकत होते. ख्रिश्चन प्रदेशात सोन्याचा वापर वाढत होता. सोन्याला प्रचंड मागणी होती आणि माली जगातील सोन्याच्या उत्पादनाच्या ६० टक्के उत्पादन करत होते. याचा परिणाम म्हणून मालीची अर्थव्यवस्था एकदमच सुधारली. नव्याने उभारलेल्या संपत्तीत अधिक चांगले सैन्य उभारले जाऊ लागले आणि त्याचा वापर अधिकाधिक प्रदेश काबीज करण्यासाठी होऊ लागला व त्यामुळे कर भरणार्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली.
जे उंटाचे काफिले मालीचे सोने मोरोक्कोला न्यायचे ते अर्थात त्याबरोबर इतरही माल व्यापारासाठी न्यायचेच. उदा. कातडी, बदाम, शहामृगाची आणि इतर पक्षांची पिसे, हस्तीदंत आणि मीठ, उलट्या दिशेने येताना ते सुती कापड, मसाले, दागिने, खिसमिस, घोडे, चांदी, लोखंड इ. परत आणायचे. इस्लामी व्यापार कसा दूरपर्यंत पसरला होता आणि कसा चालायचा याचे उदाहरण त्याने दिले आहे- मालदीवच्या कवड्या सुदानमधे चलन म्हणून वापरल्या जायच्या आणि मालीतील सोने मालदीवमधे विक्रीला सहज उपलब्ध होते. अंतर होते ९०० कि.मी आणि मधे एक महासागर.
माली – मोरोक्को हा व्यापार बर्बर जमातीच्या ताब्यात होता.
हे लोक मालीमधे सोन्याच्या खाणीच्या दक्षिणेला स्थायिक झाले होते. त्या जमातीच्या बरोबर आलेल्या व्यापारी संबंधामुळे मुसलमान व्यापारीपण तेथे स्थायिक झाले, त्यांनी तेथे मशिदी बांधल्या आणि स्थानिक लोकांनाही त्या मशिदीत प्रार्थना करायला बोलावले. मुसलमानांच्या स्वच्छ व्यापारामुळे व व्यवस्थापनामुळे त्या व्यापाराला जरा शिस्तही आली. त्यामुळे या मुसलमान व्यापारांचा दबदबाही वाढला होता.
इस्लामच्या वाढीमुळे व धर्मांतरांमुळे क्वादींची, उलेमांची आणि शिक्षित प्रशासकांची गरज प्रचंड वाढली आणि ती गरज इब्न बतूतसारखे लोक भागवत होते. मालीतील लोक सुसंस्कृत (त्या वेळेच्या तुलनेत) करायची जबाबदारी या लोकांनी उचलली होती म्हणाना. त्याचा परिणाम लगेचच दिसून आला. मालीतील राजाची एक कथा अजूनही चविष्टपणे सांगितली जाते. मन्सामूसा याने हाजला जाताना कैरोमधे इतके सोने वाटले की सोन्याचे भाव जगाच्या बर्याच भागात कोसळले. इतिहासकार अल्-उमारीने त्याच्याबद्दल लिहिले आहे की त्याने लोकांना शुक्रवार पाळायला शिकवले, प्रार्थना, आणि बांगची पध्दत रुढ केली. मालीमधे त्याने इस्लाम धर्म आणला आणि तो स्वत: त्याचा अभ्यासक बनला.
इब्न बतूतला हे काही नवीन नव्हते. त्यात त्याला जमेल त्या पध्दतीने तो भाग घेतच होता. पण या प्रवासात त्याला मागच्या प्रवासात मिळाला तेवढा मानमरातब मिळाला नाही.
“येथे (तगाझामधे) झाडे नाहीत, नुसते वाळवंट आणि त्यामधे मिठाच्या खाणी. जमीन खणल्यावर, मिठाच्या जाडजूड लाद्या दिसतात. जणूकाही त्या तेथे नीट लावून ठेवल्या आहेत. एका उंटावर दोन लाद्या लादल्या जातात. त्यापुढे वालता किंवा मालीमधे विकल्या जात. हे लोक मिठाचा चलन म्हणून उपयोग करतात. तेथे आम्ही १० दिवस तणावाखाली राहिलो कारण तेथील पाणी फारच निवळीयुक्त होते.”
त्याचा पुढील प्रवास तगझा ते वालता, हा ७०० मैलाचा होता. यात फक्त एकच ओएसिस होते. सगळा प्रदेश इतका निर्जन होता की काफिले त्या वाळवंटात हरवून जात. त्यामुळे त्यांची सुटका करण्याची एक प्रकारची व्यवस्था निर्माण झाली होती. काफिल्यांचे प्रमुख मुसाफा जमातीचा एखादा माणूस निरोप्या म्हणून नेमत. त्याला तक्शीफ असे म्हणत. हे तक्शीफ बरेच पैसे घेऊन त्या काफिल्याच्या अगोदर त्याच रस्त्याने वालाटाला पोहोचत आणि तेथील व्यापार्यांना हा काफिला येत असल्याची माहिती देत. अर्थात जाताना ते मागच्या लोकांसाठी खाणाखुणा ठेऊन पुढे जात. मग ते व्यापारी पाण्याचे उंट घेऊन चार दिवस आधीच निघून त्यांना वाटेत भेटत. तकशीफला हे दोन काफिले भेटल्यावरच पैसे मिळत. “कधीकधी तक्शीफ वाळवंटात हरवायचा आणि मग वालाटाच्या व्यापार्यांना या काफिल्याची काहीच माहिती मिळत नसे. कधीकधी आख्खा काफिलाच वाळवंटात नष्ट होत असे. ६० रात्री प्रवास (दिवसाच्या उष्णतेमुळे तो रात्रीच करावा लागत असे) करुन दूरवर पाण्याचे उंट दिसल्यावर ते सुटकेचा नि:श्र्वास कसा टाकत असतील याची आपल्याला कल्पना करता येते.
टिंबक्टूच्या पश्चिमेला ४०० मैल वाटाला आहे. तेथे त्याचे ज्या प्रकाराने त्याचे स्वागत करण्यात आले त्याने त्याचे या प्रदेशाबद्दलचे मत फारच वाईट झाले. स्थानिक सुलतान तर त्याच्याशी समोरासमोर बोलला सुध्दा नाही. मधे एक माणूस ठेवण्यात आला होता. ही पध्दतच आहे असे त्याला सांगण्यात आले पण इब्न बतूतला तो मोठा अपमान वाटला. त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम झाला. दूध भाकरी, थोडे मध असा जेवणाचा थाट होता. इब्न बतूत ज्याने देशविदेशातील उत्कृष्ट अन्न चाखले होते त्याला तो अपमान पचवता आला नाही. “मग मात्र माझी खात्री पटली की या माणसांकडून काही चांगल्याची आपेक्षा करण्यात अर्थ नाही.” त्या देशात तो ५० दिवस राहिला. “पण मला तेथील सामान्य जनतेने चांगलेच वागवले.”
काही दिवसानंतर मालीच्या राजधानीमधे तो मन्सा सुलेमानला भेटायला गेला.
“हा एक कंजूष सुलतान असून त्याच्याकडून काही मोठ्या बक्षिसाची आपेक्षा करण्यात अर्थ नाही.” त्याची मन:स्थिती जास्तच बिघडत गेली कारण त्याला तेथे विषबाधा झाली. तेथील क्वादीकडे तो स्वागत आणि बक्षिसाच्या आणि मानाच्या पोषाखाच्या आपेक्षेने थांबला होता. जेव्हा ते घेऊन माणूस आला, तेव्हा त्यात पावाचे तीन तुकडे, तळलेल्या मांसाचा एक तुकडा आणि दही निघाले. “ ते पाहून मला हसावे का रडावे ते कळेना. मला त्यांच्या बुध्दीची कीव आली.”
याच वेळेपासून मागे उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला त्याला हे सगळे लिहायचा किंवा सांगायचा कंटाळा आला आहे हे जाणवायला लागते. कदाचित त्याचा लांबलेला आजार हेही कारण असू शकेल. मालीमधील वाईट अनुभवात काही चांगला काळही त्याने व्यतीत केलेला आढळतो. त्यात लाकडात कोरलेल्या एकसंध छोट्या बोटीने त्याने टिंबक्टू ते गाओ हा नायजर नदीतील प्रवासाचे वर्णन वाचण्यासारखे आहे. गंमत म्हणजे या नदीला तो नाईलच म्हणतो. त्यानंतर तकाडाचे वाळवंट पार करताना तो अती उष्णतेने आणि कावीळीमुळे आजारी पडला. त्यातून थोडा बरा झाल्यावर त्याने लगेचच जवळच्या तांब्याच्या खाणीला भेट दिली. त्याचवेळी त्याला फेजच्या सुलतानाकडून खलीता मिळाला. त्यात त्याला परत फिरायची आज्ञा होती.
“मी त्या आज्ञेने चुंबन घेतले आणि लगेचच त्याचे पालन केले. ७० दिवसाचा शिधा घेऊन मी तकादा सोडले कारण तकादा आणि तावतच्यामधे धान्य मिळत नसे. फक्त मांस, दूध आणि लोणी मिळत असे.”
त्या परतीच्या प्रवासात बर्बर लुटारुंच्या धार्मिकतेबद्दल त्याने लिहिले आहे “आम्ही होगारमधे जो बर्बरांचा प्रांत म्हणून ओळखला जायचा तेथे आलो. हे बर्बर लोक पक्के बदमाश होते. पण आम्ही रमजानच्या महिन्यात तेथे पोहोचलो, आणि रमजानच्या महिन्यात लुटालूट करायची नाही असा त्यांचा रिवाज होता.”
१३५४च्या जानेवारीमधे इब्न बतूतचे फेजमधे अबू इनानच्या हस्ते भव्य स्वागत करण्यात आले. याच सुलतानाने ठरवले की इब्न बतूतच्या प्रवासाच्या कहाण्या लिहून ठेवण्यायोग्य आहेत. ते काम त्याने त्याच्या दरबारातील कवी इब्न जुझ्झी याला सांगितले. हा इब्न बतूतला ग्रानाडाला भेटलाच होता. त्याने ते काम उत्साहाने अंगावर घेतले.
आपल्याला या हस्तलिखिताचे नाव “ रिहाला” असे माहीत आहे. पण त्याचे खरे नाव आहे “तोहफा अल् नजरफी घरिब अल् अम्सर वाअजब अल् असफर” स्वैर भाषांतर केल्यास त्याचा अर्थ असा होऊ शकतो “ज्यांना आश्चर्ये, शहरे बघायला आवडतात आणि त्यासाठी अविश्चसनीय वाटावा असा प्रवास करायला आवडतो, त्यांना अर्पण.”
भाग ११ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
पुढे चालू.................
प्रतिक्रिया
19 Oct 2010 - 9:06 pm | रन्गराव
उत्तम लेखन केलं आहे. :)