इब्न बतूत - भाग १

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
21 Sep 2010 - 3:59 pm

header for blog1

मित्रहो,

या वेळेस आपण जरा वेगळ्याच विषयावर वाचणार आहोत. हे या युगाच्या प्रवाशाचे प्रवास वर्णन आहे. त्याचे नाव इब्न बतूत. मला स्वत:ला प्रवास प्रिय असल्यामूळे आणि नवनवीन प्रांतातल्या माणसांना भेटायची कमालीची हौस असल्यामुळे इब्न बतूतचा प्रवास मलातरी स्वप्नवत वाटला. हा प्रवास करण्यामागे काय प्रेरणा असेल आणि एवढे धैर्य त्याने कोठून गोळा केले असेल ते त्यालाच माहीत. ही पूढील लेखमाला वाचताना जर आपण स्वत:ला त्याच्या जागी उभे केले तर..... काय होते त्याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. आपणही तो कुठलाही पूर्वग्रह मनात न आणता घ्यावा ही विनंती.

पुढचा प्रवास मित्रहो, फार मोठा आहे. मोठा म्हणजे किती मोठा ? जवळ जवळ ७०,००० मैलांचा. कधी कधी आपल्याला कंटाळा येण्याची शक्यता आहे, पण इब्न बतूत ने हा प्रवास प्रत्यक्षात केला होता हे लक्षात घेतलेत की कदाचित आपण पुढचे वाचू लागाल.

हा लेख श्री डग्लस बुलीस यांच्या लेखावर आधारीत आहे. जवळ जवळ त्यांच्या लेखाचे भाषांतरच म्हणाना ! मी अर्थातच यात बरीच भर घातली आहे पण मूळ लेखाचा ढाचा तोच ठेवला आहे. त्यांचा हा लेख आर्मको वर्ल्डवर प्रसिध्द झाले आहे. त्यांनी ते भाषांतर करायला परवानगी दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

आपला,
जयंत कुलकर्णी.

इब्न बतूत. भाग – १

image005

जेवढा प्रवास केल्यावर एखाद्याला त्या युगाचा प्रवासी अशी पदवी देता येईल तेवढा प्रवास व्हेनीसच्या मार्कोपोलोनेच केला असेल, असे आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. पण तो मान टॅंजीएच्या इब्न बतूत ह्याच्याकडे जातो.

इब्न बतूत त्याच्या पुस्तकात त्याच्या पूर्वायुष्याबद्द्ल काहीच लिहीत नाही. कदाचित त्यावेळच्या इस्लामी सभ्यतेत ते मोडत नसेल. उपलब्ध महितीनुसार आपल्याला आज एवढे माहीत आहे की त्याला न्यायाधिशाचे शिक्षण मिळाले होते. ज्याला त्या काळात क्वादी म्हणत. इस्लामी कायद्याच्या "मालिकी" परंपरेचे शिक्षण त्याने घेतले होते. ज्या चार परंपरेतून शरियत निर्माण झाला त्यातलीच ही एक परंपरा. ह्यावरुन त्याने ह्या विषयांचा अभ्यास गुरुकडे राहून केला असणार आणि त्याने कुराणाचा अभ्यास केला असावा असा अंदाज निश्चितच बांधता येतो.

मार्कोपोलो मेल्यानंतर एकाच वर्षाने त्याने आपल्या पूर्वेच्या प्रवासास सुरुवात केली. फेज ते चीनमधील बिजिंग असा प्रवास त्याने केला. तो कसा केला आणि त्याचा मार्ग काय होता हे फारच मनोरंजक आहे. निघताना त्याने असे ठरवले होते की त्याच मार्गावरुन परत प्रवास करायचा नाही, तरीसुध्दा त्याने चारवेळा हाजची यात्रा केली. आजच्या नकाशात बघितले तर त्याने आजच्या हिशेबाने चाळीस देश ओलांडले, जवळजवळ निम्म्या लोकांचा सल्लागार म्हणून त्याने कुठल्या ना कुठल्यातरी स्वरुपात काम केले. ह्या प्रवासाच्या आठवणी त्याने ज्या पुस्तक स्वरुपात लिहून ठेवल्या त्याचे नाव आहे "रिहला" ह्यात तब्बल तो भेटलेल्या २००० माणसांची नावे नोंदवली आहेत. तुर्कस्तान, मध्य एशिया, पूर्व आणि पश्चिम आफ्रिका, मालदीव, भारतातला काही भाग, ह्या भागातील त्यावेळचे लोकजीवन, कसे होते हे समजण्याचा हे पुस्तक एक विश्वासपूर्ण स्त्रोत आहे. नव्हे, काहीवेळा तर फक्त त्याच्यावरच अवलंबून रहावे लागेल. त्याने काढलेली त्यावेळच्या राजांची शब्दचित्रे, त्याच्या प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असल्यामुळे आपण त्या काळात वावरतोय की काय असा भास होतो यात आश्चर्य ते कोणते ?

इब्न बतूतचा जन्म टॅंजीएमधे झाला. हे एक मोरोक्कोमधील त्यावेळचे महत्वाचे बंदर होते. जिब्राल्टरला जाण्यासाठी एशियामधल्या प्रवाशांना येथूनच गलबतं पकडायला लागत. जिब्राल्टरच्या पलिकडे होते ते देश म्हणजे "‍अल-ऍडालस, अरबी स्पेन म्हणजेच ग्रॅनाडा इ. देशांना जायचा बोटीचा मार्ग येथूनच होता.

वयाच्या २१ व्या वर्षी इब्न बतूतने अत्यंत अनुकूल अशा परिस्थितीत आपला प्रवास सुरु केला. अनुकूल अशासाठी की त्याच सुमारास, इस्लामी जगतात, "उम्माह" ह्या कल्पनेचा प्रखरतेने प्रचार होऊन, त्यांच्या अख्ख्या जगात एकतेची एक लाटच जणू पसरली होती. सर्व मुसलमान जाती व मतभेद विसरुन एका झेंड्याखाली एक होऊन जगावर राज्य करायला निघाले होते. इस्लाम त्यावेळचा एक प्रमुख धर्म होता. रोमच्या पाडावानंतर ते युरोपियन लोक व्यापारासाठी बाहेर पडले तोपर्यंत म्हणजे जवळजवळ ८०० वर्षे तो एक पुढारलेला धर्म समजला जायचा. शास्त्र, व्यापार, कला, राज्यशास्त्र, कायदा आणि साहित्य ह्या सर्वांमधे आणि त्याच्या शाखांमधे त्या काळात मुसलमानांचे योगदान मानवाला कधीच विसरता येणार नाही. आपल्याला येथे भारतात जेथे आपल्या इतिहासापलिकडे आपण बघतसुद्धा नाही त्यांना हे कळणे जरा अवघडच आहे.

थोडक्यात काय १४व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा युरोपातील रक्तपात आणि उपासमारीने थैमान घातले होते त्या काळात दारेसलाममधे म्हणजेच इस्लामी जगतामधे सोन्याचा धूर निघत होता. बारा एक मुसलमान पंथ गुण्यागोविंदाने नांदत होते. कुराणातील तत्वांवर आधारित हे पंथ ही तत्वं मोकळ्या मनाने त्यांची देवाणघेवाण करत पुढे जात होते. ह्या सर्व पंथांमधल्या अनेक वैद्य, कलाकार, वास्तुविशारद, कारागीर, तत्वज्ञानी ह्यांचा एकामेकांशी संबंध येऊन त्याचा ह्या शास्त्रांना फायदाच होत होता. तो काळ सुंदर आणि भव्य इमारतींचा होता. ह्या इमारतीत मशिदी होत्या तशीच वाचनालयं पण होती. असा काळ, की ज्यात विद्वत्तेला मान होता आणि मुसलमानांच्या एक छत्री अंमलाखाली स्थैर्य होते. याच काळात त्यांच्या कायद्याने माणसे भरकटणार नाहीत ह्याची खात्री दिली होती. आजच्या काळात आपण ज्याला हुंडी, चेक, वगैरे म्हणतो त्याची सुरुवात तेथील व्यापार्‍यांनी केली ती त्याच काळात. इब्न बतूत ह्या काळाचा एकमेव साक्षीदार आहे ज्याने हे सर्व उघड्या डोळ्याने बघितले. नुसते बघतलेच नाही तर आपल्यासाठी हे त्याने लिहून ठेवले.

टॅंजिएमधे ह्या असल्या काळात "शम्स अल्‌ - दीन अबू 'अब्दुल्ला मुहम्मद इब्न' अब्दुल्ला इब्न मुहम्मद इब्न इब्राहीम इब्न युसूफ ‍अल्‌ लवाटी अल्‌ तांजी इब्न बतूत" ह्या आपल्या नायकाचा जन्म एका सुस्थितीत असलेल्या क्वादींच्या घराण्यात झाला. ती तारीख होती २५ फेब्रुवारी १३०५. इस्लामी पंचांगाप्रमाणे ७२३ मधे. त्याच्या नावाखेरीज त्याच्या घराण्याबद्दल आपल्याला फारच थोडे ज्ञात आहे. कारण त्याने लिहिलेले पुस्तक हा एकच मार्ग त्याच्याबद्दल माहिती मिळण्याचा आहे. पण त्याने त्या सबंध पुस्तकात स्वत:बद्दल फार म्हणजे फारच कमीवेळा लिहिले आहे. बहुधा ते खाजगी, त्यात लोकांना काय रस असणार म्हणून लिहिले नसावे. पण त्यावेळच्या उपलब्ध साहित्यावरुन आपण अंदाजा करु शकतो की त्याचे शिक्षण वयाच्या ६व्या वर्षी सुरु झाले असणार. अर्थात त्या वेळेच्या पद्धतीनुसार त्याने पहिल्यांदा कुराणाचा अभ्यास केला असणार. त्याचा वर्ग एखद्या मशिदीत किंवा त्याच्या शिक्षकाच्या घरी भरत असणार. त्याचा खर्च वक्फने झकत मधून दिला असणार हे सर्व त्या काळात तसेच होते. अर्थात त्याच्या वडिलांनी परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याच्या शिक्षकांना खिशातूनही पैसे दिले असणार हेही स्वाभाविक आहे.

१४ व्या शकतील अभ्यासक्रम फक्त कुराणाचा होता हा एक गैरसमज आहे. प्राथमिक अंकगणित अभ्यासक्रमात बंधनकारक असे, कारण त्याशिवाय, जमिनीची विभागणी, मोजणी, पैशाचा हिशेब वगैरे अशक्य होते. पण पुढील शिक्षण मात्र नीतीमत्तेचेच असे. त्याच्याएवढेच महत्वाचे अरेबिक भाषेचे व्याकरण असे. त्या भाषेत कुराण लिहिले आहे म्हणून नाही, तर टिंबक्टूपासून ते चीनचा प्रांत कॅंटनपर्यंत हीच भाषा बोलली जायची. बाकीचे विषय इतिहास,भूगोल, कायदा, युध्दशास्त्र इ. शिकवले जायचेच.

इब्न बतूतने स्वत:चे शिक्षण आणि प्रवासात मिळवलेल्या अनुभवांचा आपल्या चरितार्थासाठी फार कल्पकतेने वापर करुन घेतला. सुरवातीच्या प्रवासात त्याला सगळीकडे क्वादी म्हणून मान्यता मिळत होती त्यामुळे तो जाईल तेथे तो क्वादीचे, किंवा कायद्याचा सल्लागार म्हणून सहज काम करायचा. त्यावेळी त्याचे ग्राहक होते गावांचे प्रमुख, त्यांच्या हाताखालील कमी दर्जाचे अधिकारी. जशीजशी त्याची किर्ती पसरत गेली तशी ह्या ग्राहकांची पत वाढतच गेली. नंतर नंतर ती खलीफा, सुलतान, वझीर अशा लोकांना सल्ले देताना आढळतॊ. त्या बदल्यात ते त्याला जे धन देत असत त्याची हल्लीचे प्रवासी लेखक किंवा टी.व्ही. वर सिरीअलस करणारे स्वप्नातसुध्दा कल्पना करु शकणार नाहीत.

जयंत कुलकर्णी
भाग १ समाप्त.

इतिहाससमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलदेशांतरलेखभाषांतर

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

21 Sep 2010 - 4:05 pm | यशोधरा

छान आहे, आवडले.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Sep 2010 - 4:06 pm | प्रकाश घाटपांडे

नवी मेजवानी मिळणार असे दिसते.

पुष्करिणी's picture

21 Sep 2010 - 4:07 pm | पुष्करिणी

सुंदर आणि माहितीपूर्ण लेख , पुढील भागांच्या प्रतिक्षेत.

अनुराग's picture

21 Sep 2010 - 4:10 pm | अनुराग

छान !!

सुनील's picture

21 Sep 2010 - 4:15 pm | सुनील

चांगली सुरुवात.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

नितिन थत्ते's picture

21 Sep 2010 - 4:15 pm | नितिन थत्ते

आवडले.

सहज's picture

21 Sep 2010 - 4:23 pm | सहज

इब न बटुटा गाणे ऐकल्यावर ह्या इसमाबद्दल कळले होते.

लेखमाला वाचतो आहे.

मेघवेडा's picture

21 Sep 2010 - 6:52 pm | मेघवेडा

असेच म्हणतो. 'हे कुणाचंतरी नाव होतं' हे वाचून आश्चर्यच वाटलं होतं. मला वाटलेलं 'बतुता' म्हणजे एखादा पक्षी वगैरे असावा! ;)

पुभाप्र.

अवलिया's picture

21 Sep 2010 - 4:25 pm | अवलिया

वाचत आहे

गणपा's picture

21 Sep 2010 - 4:33 pm | गणपा

वाचतोय. :)

sneharani's picture

21 Sep 2010 - 4:41 pm | sneharani

वाचतेय
:)

स्वाती२'s picture

21 Sep 2010 - 5:01 pm | स्वाती२

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

जिप्सी's picture

21 Sep 2010 - 5:10 pm | जिप्सी

नेहमीसारखंच वेगळ्या विषयावर वाचायला मिळणार ! पुढचा लेख लौकर येउदे !

मृत्युन्जय's picture

21 Sep 2010 - 5:26 pm | मृत्युन्जय

संपुर्ण मालिका वाचायला आवडेल. गुलजारांचा इब्न बतुता हाच काय?

इन्द्र्राज पवार's picture

21 Sep 2010 - 5:35 pm | इन्द्र्राज पवार

७०/७५ हजार मैलाचा प्रवास केलेला हा अफलातून प्रवासी म्हणजे एकप्रकारे मार्को पोलोच होता... आश्चर्यच होते. पण का कोण जाणे ना त्या मुस्लिम राष्ट्रांनी ना पाश्चिमात्य राष्ट्रांनी त्याच्या ऐतिहासिक प्रवासाची योग्य ती दखल (निदान त्या काळात तरी) घेतली नसल्याचे म्हटले जाते. ते कितपत सत्य, हे आपल्या लेखमालेतून उघडकिला यावे, ही अपेक्षा.

"रिहाला" नावाने प्रसिध्द असलेले त्याचे प्रवास वर्णन अनेक साहसवीरांना स्फूर्तिदायक ठरलेले आहे.

आपल्या लेखमालेच्या प्रतिक्षेत.

इन्द्रा

समंजस's picture

21 Sep 2010 - 5:40 pm | समंजस

आहे ही लेखमालिका...पुढील भागांच्या प्रतिक्षेत :)

वाचतोय. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत

मन१'s picture

21 Sep 2010 - 6:18 pm | मन१

पण त्याला हे सगळं करण्यासाठी एक महत्वाच व्यासापीठ मिळालं आंतरराष्ट्रिय राजकिय परिस्थितीमुळे.
त्याच्या (इ स १३०० च्या पुढे केलेल्या )प्रवासाची पार्श्वभूमी अशी:-
मागील किमान तीन शतके सतत crusade मुळे युद्धमान मध्यपूर्व . युद्धामुळं का असेना,मध्य पूर्वेतील अरब-इस्लामिक संस्कृती आणि पश्चिमेतील्/युरोपातील ख्रिश्चन संस्कृती (उत्तर रोमन कालीन संस्कृती ) ह्यांना एकमेकांचा बराच परिचय झाला. त्या भागात एक वेगळ्च सामाजिक अभिसरण सुरु झालं.

मध्य आशियापासुन ते पूर्व आशियाच्या बर्‍याच भागात मंगोलांचा शिल्लक असलेला पगडा.
(एवढ्या भूभागात एकच सत्त्ता असेल तर प्रवास करणं तुलनेनं सोयीचं होणार)

दक्षिण आशियात मजबुत असलेली खिल्जि राजवट(अजुन एक एकसंध राज्य) खिल्जिंमुळं सर्व दूर दक्षिणेपर्यंत एकच एक इस्लामिक राज्य स्थापन झालं.(दक्षिणेत इस्लामिक राजवट असल्याचा पुढं इब्न बतुता ला फायदा झाला. कालिकत ला उतरल्यावर त्याची पटापट रोजी-रोटी ची व्यवस्था झाली. एका मुस्लिम राजवटीखाली तो कोंककण्,दिल्ली, बंगाल हे ही विभाग फिरुन आला. गैर इस्लामिक राजवटीत पोटापाण्याला त्याला मिळ्णं अवघड असावं.)

"हिंद"मध्ये १०-११ शतकात आपली हिंस्त्र राजवट मजबुत करतानाच अरब्-इस्लामिकांना इथल्या (तत्कालिन) प्रगत गणन्,भूमिती,तत्वज्ञान, ज्योतिष गणित (फल ज्योतिश नाही.) ह्या सगळ्याची माहिती होउ लागली. त्यानिमित्तानं इथल्या बर्‍याच गोष्टींचा अभ्यास अरबांकडे सुरु झाला. पुढं इब्न बतुताला हे सामाजिक ब्याक ग्राउंड अत्यंत उपयुक्त ठरलं प्रवासा दरम्यान.

याशिवाय महत्वाचा फ्याक्टर म्हणजे त्याची अफाट जिद्द, अचाट हिंमत आणि नशिबाने अत्यंत प्रतिकूल वेळेस त्याची केलेली मदत.अगणित वेळेस त्याच्या काफिल्यावर हल्ले झाले. त्याची जहाजं बुडाली, काही भरकटली. काही त्याला किनार्‍यावर टाकुन गेली.कधी कधी तो ज्या राज्यकर्त्यांचा आश्रित होता, ती राजवटच उलथली गेल्यानं त्यालाही काढता पाय घ्यावा लागला. पण ह्या सगळ्याला पुरुन उरुन ७०००० कि मी चा प्रवास केवळ अतर्क्य वाटतो.
कल्पना करा (तेव्हाच्या मानानी)आज इतक्या सुस्थितीत असतानाही ,दळण वळणाची, माहिती तंत्रज्ञाची,दुसर्‍याची भाषा शिकण्याची इतकी साधनं उप्लब्ध असतानाही, एकदम अनोळखी प्रदेशात,अस्थिर राजवटीत आणि दूर देशी जायला सांगितलं तर आपण दहा वेळेस विचार करु.(किंवा तो ही न करता थेट "जाणार नाही" असं ठरवु.)

आणि सुमारे सातेक शतकांपुर्वी हा गृहस्थ इतके सगळे देश पलथे घालतोय.
धन्य आहे.

पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत,

आपलाच मनोबा.

जयंत कुलकर्णी's picture

21 Sep 2010 - 6:47 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !

सर्व वाचक मित्र/मैत्रिणींनींचे मनापासून आभार.

मी उद्या गावला जात आहे त्यामुळे आल्यावर पुढचा भाग टाकेन. आशा आहे आपण तो पर्यंत थांबाल.

पर्नल नेने मराठे's picture

21 Sep 2010 - 7:02 pm | पर्नल नेने मराठे

आम्च्या गावात''इबन बतुता ''नावाचा मॉल आहे..

अद्भुत रम्य!!
नावापासून ते आयुष्यापर्यंत सगळच सुरस वाटतय या माणसाचं.

छान लेखमालिका...मी या माणसाचे नाव आधी कधीच ऐकले नव्हते...
जाऊन घ्यायला उत्सुक.
मालिका चालू केल्याबद्दल धन्यवाद...आणि पुढच्या भागापासून उगाच कुठे हिंडायला जाऊ नका मालिका मधेच ठेऊन...नाहीतर आधी दोनचार भाग लिहून काढा अन मग गेल्यावर एक एक टाका.

फुकट सल्लागार
शिल्प चुटुक

जयंत कुलकर्णी's picture

22 Sep 2010 - 8:44 am | जयंत कुलकर्णी

एकवार माफी असावी. पुढच्या भागापासून नाही असं वागणार ! :-(

:-)

शिल्पाबाईंचा विद्यार्थी.

गंमत करतोय हां

यशोधरा's picture

22 Sep 2010 - 11:51 am | यशोधरा

मीही शमत शिल्पाबरोबर!

खूप चांगला लेख. आवडला.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

अवांतरः कॉलेजात इतिहासाच्या एका पेपरला इब्न बतूता वर १० मार्कांचा प्रश्न हमखास असायचा. मास्तर तसे वारंवार सांगायचे. त्यावेळी रिटायरमेंटला आलेल्या त्या सरांची कवळी 'इब्न बतूता' म्हणताना सारखी निसटायची !! मग आम्ही खूप हसायचो नि पुन्हा त्याच विषयावर प्रश्न विचारायचो ;) :))

प्राजु's picture

21 Sep 2010 - 10:13 pm | प्राजु

उत्तम लेख माला होईल ही. येऊद्या अजून.

चतुरंग's picture

21 Sep 2010 - 10:30 pm | चतुरंग

इब्न बतूत नाव वाचले ऐकले होते, ही सगळीच माहिती मला नवीन आहे.
अत्यंत रोमांचक वाटेने धाग्याची मार्गक्रमणा व्हायचे संकेत दिसत आहेत! येऊदेत.

रंगा

मदनबाण's picture

21 Sep 2010 - 10:39 pm | मदनबाण

वा...नविन विषयावर वाचायला मिळतयं. :)

अर्धवटराव's picture

22 Sep 2010 - 1:29 am | अर्धवटराव

येउ देत पुधील भाग लवकरात लवकर.

(प्रवासी) अर्धवटराव

धनंजय's picture

22 Sep 2010 - 3:18 am | धनंजय

चांगली माहिती.

पाषाणभेद's picture

22 Sep 2010 - 7:23 am | पाषाणभेद

एकदम नविन विषय. लेख लवकर येवूद्या.

गुंडोपंत's picture

22 Sep 2010 - 10:47 am | गुंडोपंत

रोमच्या पाडावानंतर ते युरोपियन लोक व्यापारासाठी बाहेर पडले तोपर्यंत म्हणजे जवळजवळ ८०० वर्षे तो एक पुढारलेला धर्म समजला जायचा. शास्त्र, व्यापार, कला, राज्यशास्त्र, कायदा आणि साहित्य ह्या सर्वांमधे आणि त्याच्या शाखांमधे त्या काळात मुसलमानांचे योगदान मानवाला कधीच विसरता येणार नाही. आपल्याला येथे भारतात जेथे आपल्या इतिहासापलिकडे आपण बघतसुद्धा नाही त्यांना हे कळणे जरा अवघडच आहे.
मला फक्त इतकेच नोंदवायचे आहे की, ११ व्या शतकात गझनी च्या महंमदाने भारतावर स्वारी केली. अजमेर काठियावाड आणि सोमनाथ येथून सुमारे एक लाखापेक्षा जास्त हिंदू गुलाम म्हणून मध्य पूर्वेत नेले. या नंतरही करत राहिलेल्या स्वार्‍यांमध्ये गुलाम म्हणून काफिरांना घेऊन जाणे हे प्रमुख कार्य होते.
या गुलामांच्या ज्ञानावर आणि बळावर मध्यपूर्वेत कलाकुसर, इमारती इत्यादी प्रगती झाली असे इंग्रजी विकिपीडिया वरील गुलामी विषयक लेखात दिसून आले. या शिवाय गुलामी वरील प्रमुख लेखही वाचनीय आहे!

(इंग्रजी वाचायला वेळ लागल्याने प्रतिसाद उशीरा दिला गेला.)

अवलिया's picture

22 Sep 2010 - 11:12 am | अवलिया

गुंडोपंतांच्या नोंदी नेहमीच विचारवंतांना (आमचा संबंध नाही, आम्ही विचार करत नाही) विचार करायला प्रवृत्त करत असतात.

(गुंडोपंतांनी दिलेल्या लिंक अजुन वाचल्या नाहीत)

गुंडोपंत's picture

22 Sep 2010 - 12:31 pm | गुंडोपंत

नोंदीची नोंद घेतल्या बद्दल धन्यवाद! पण सापडलेली नोंद ही ११ व्या शतकानंतरची आहे. ८ व्या शतका पर्यंत इस्लामी भरभराटी विषयी आधीचे वाक्य बरोबर असावे. तरीही शांततेने राहत होते या वाक्या विषयी कुतुहल आहे.

अवलिया's picture

22 Sep 2010 - 2:01 pm | अवलिया

इस्लामपूर्व म्हणजे तथाकथित बिगबँग ते इसवी सनाचे सहावे शतकापर्यंतचे काय?

त्याआधी त्या भागात काही होते की नाही आणि असल्यास कसे होते यावर माहिती मिळाल्यास आवडेल :)

मस्त कलंदर's picture

22 Sep 2010 - 11:55 am | मस्त कलंदर

वा: एका नव्या विषयाबद्दल वाचायला मिळते आहे. आधी मला इब्न बतुता हे फक्त गाण्यात निरर्थक शब्द असतात तसे वाटले होते.
मन१ यांचाही प्रतिसाद छान.

इब्न बतूत पहिल्यांदाच ऐकले आहे.
तुम्ही लिहित रहा .. वाचायला उत्सुक आहे ..

वेताळ's picture

22 Sep 2010 - 6:28 pm | वेताळ

बर्‍याच गोष्टी नवीनच आहे.
गुंडोपंत व नानाच्या शंका देखिल विचारकरण्या योग्य आहेत. मुळातच इतका पुढारलेला धर्म एकाएकी एकदम रानटी टोळ्याच्या ताब्यात कसा काय गेला?तसेच कुराण व्यतिरिक्त त्याकाळचे कोणते इस्लामिक ग्रंथ अजुन पर्यत टिकुन आहेत?
अजुन बरीच माहिती विस्कळित वाटते. पुढच्या भागाची वाट पहात आहे.

लेख आवडला. माहिती आणि मनोरंजन दोन्ही.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

लेख आवडला. "इब्न बटुटा" असे कुठले तरी गाणे मागे ऐकल्यानंतर कुतुहलाने शोधल्यावर इब्न बद्दल माहिती मिळाली होती त्याची आठवण झाली.

रुपी's picture

4 Jan 2018 - 4:02 am | रुपी

अत्यंत रोचक!
ही लेखमाला वाचायची केव्हापासून ठरवलं होतं, आता वाचून काढते सगळे भाग.

लेखमालेचा पहिला भाग आवडला.
तुमच्या प्रतिसादामुळे या लेखमालेविषयी कळलं, त्याबद्दल धन्यवाद!