आत्ताच्या आणि त्या काळात अर्थात फरक होताच. लहानग्या इब्न बतूतचे पहिले कर्तव्य हे इतर मुलांप्रमाणे कुराण तोंडपाठ करणे हे होते. ह्याबाबतीत त्याने पुस्तकात म्हटले आहे की " मी दररोज मोठ्याने संपूर्ण कुराण म्हणतो. अडचणीच्यावेळी तर मला आठवतंय मी ते २/३ वेळा म्हटलेले आहे." कुराणाचा अभ्यास हा सर्वात महत्वाचा मानला जात असे. ज्यांना परवडत असे ते जगाच्या ह्या टोकापासून दुसर्या टोकापर्यंत त्याच्या अभ्यासासाठी जात असत. त्यात कुराणाचा खरा अर्थ शोधण्याला प्रथम महत्व दिले जात होते. प्रत्येक गावातील तरुणांचे मक्केला, मदीनेला, बगदादला, दमास्कसला किंवा कैरोला शिकण्याचे ध्येय असे आणि त्यासाठी कुठल्याही कष्टांची त्यांची तयारी असे. हिंडणार्या अशा विद्वानांना बर्यापैकी चांगले जेवण जनता स्वत:हून देई. रहायला मदरसे होतेच, तेथेही जागा नसलीच तर मशीदीत थंडगार फरशीवर झोपायची त्यांची तयारी असे.
इब्न बतूतच्या आयुष्याचा काळ हा ज्या काळात इस्लाम परत पेटून उठला त्या काळातला. तो काळ मंगोलपूर्व इस्लामच्या पुनरुज्जीवनाचा काळ. तो काळ साधारणत: १२०० च्या शेवटी मंगोल योध्यांच्या आक्रमणानंतर १०० वर्षांनी. जेव्हा अर्ध्या जगाला (हिन्दुस्थान सोडून) मंदीने ग्रासले होते तेव्हाचा. १४व्या शतकाच्या सुरवतीला अशी परिस्थिती झाली की ह्या देशांच्या राजांनी इस्लाम धर्म स्विकारल्यामुळे हे सर्व देश एका धर्माने बांधले गेले. त्यानंतर मात्र त्या राजांनी आणि त्यांच्या जनतेने व्यापारऊदीमांकडे लक्ष पुरवल्यामुळे पर्शिया आणि ज्या मर्गाने रेशमाची वाहतूक व्हायची, त्या मर्गाची पुनर्स्थापना झाली आणि हे देश मंदीतून बाहेर पडले. त्यामुळे जेव्हा इब्न बतूत बाहेर पडला तेव्हा ह्या मार्गावर बर्यापैकी गर्दी होती. त्यावर व्यापार्यांबरोबर सर्वप्रकारचे लोक ये जा करु लागले होते. त्यात पूर्वीच म्हटल्याप्रमाणे वैद्य, कलाकार, वास्तुविशारद, कारागीर, तत्वज्ञानी इ. लोक होतेच. ते त्याला भेटत असणार हेही निश्चित ! त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होत असणार. त्यावेळी ह्या प्रवाशांमुळे बातम्या फार दूरवर आणि लवकर पोहोचत. पश्चिमेला अटलांटीक आणि पूर्वेला पॅसिफिक ह्याच दर-उल-इस्लामच्या सीमारेषा होत्या.
त्यावेळी विद्यापीठांच्या पदव्या नव्हत्या त्याऐवजी विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षक दाखला देत. सगळ्यात चांगला म्हणजे "अदाह." त्याचा अर्थ तो विद्यार्थी किती वाकबगार आहे त्याचा पुरावा असे. वाकबगार कशात ? तर चांगली वागणूक, उच्च दर्जाची आवडनिवड, विनम्रपणा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे "शिक्षणाने तो मातला तर नाही ना " याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय हा दाखला त्याला त्याच्या गुरुकडून मिळत नसे.
अरेबिकच्या खोल अभ्यासामुळे इब्न बतूतला टॅंजिएमधे जाईल तेथे एक विद्वान म्हणून मान्यता मिळायची. पण त्या गावात त्याचे मन रमत नव्हते कारण टॅंजिए हे काही शिक्षणासाठी ओळखले जात नव्हते. ते एक व्यापारी बंदर म्हणूनच ओळखले जायचे. त्या सुरुवातीच्या शिक्षणासाठी ते ठीक होते. जमलेल्या ज्ञानाच्या जोरावर इब्न पूर्वेच्या दिशेला जायच्या तयारीला लागला. त्याला बिचार्याला त्यावेळी हेही माहीत नव्हते.
मोरोक्कोतील ५ बंदरांपैकी एक महत्वाचे बंदर असल्यामुळे टॅंजिएमधील समाजजीवन कसे नविन नविन गोष्टींनी घुसळून निघत असे. व्यापार आणि नित्यनविन शोध ह्यांची अगदी रेलचेल होती. तरीसुध्दा ह्या गावातील शिक्षण परिपूर्ण समजले जात नसे. साहजिकच तरुणांचा ओढा हा मक्केला जाऊन शिकण्याकडे असे. ह्या शिक्षणाच्या पलिकडे जे ज्ञान मिळवावे लागते ते मात्र इब्न बतूतने त्याच्या ह्या अचंबित करणार्या प्रवासात भरपूर मिळवले. नुसतेच मिळवले नाही तर ह्या अनुभवांच्या गाठोड्यातील शिदोरीचा वापर त्याने फार हुशारीने त्याच्या आयुष्यात केलेला दिसतो. त्याच कारणाने त्याने अनेक लोकांची मर्जी संपादन करताना कोठेही लोचटपणा केलेला आढळत नाही. तो जाईल तेथे त्याला लोक आदराने मर्जी बहाल करत असत.
की त्याच्याजवळ असलेले ते ज्ञान त्याला त्यावेळच्या उघड्या जगात उपयोगी पडणार आहे का नाही. मक्केला जायचे असे ठरवून इब्न बतूतने टॅंजिए सोडले. त्याने लिहिलेल्या पुस्तकात तरुण इब्न बतूतने त्यावेळच्या त्याच्या मन:स्थितीचे यथार्थ वर्णन केले आहे. त्यात त्याची उत्सुकता आणि हूरहूर दोन्हीही डोकावलेले आपल्याला स्पष्ट जाणवेल. त्याने लिहिले होते ते त्याच्याच शब्दात :
"मी एकटाच गावाबाहेर पडलो. माझ्याबरोबर ना कोणी सोबती होता ना कोणी सहप्रवासी. ना मला कोणी निरोप द्यायला वेशीपर्यंत आले होते. माझे मला मीच समजावत होतो आणि स्वत:ला आनंदी ठेवायचा प्रयत्न करत होतो. मनात रुखरुख होती पण मनात आजवर जपलेली शिकण्याची उर्मी ह्या सगळ्या भावनांवर मात करत होती. मी माझ्याच मनाशी वारंवार केलेल्या निर्धाराचा पुनरुच्चार करत होतो. ज्याप्रमाणे पक्षांची पिल्ले घरटे सोडून उघड्या जगात उडी मारतात त्याचप्रमाणे मी घराचे सर्व पाश तोडून निघालो होतो. माझे आई वडील अजूनही ह्या जगात असल्यामुळे, त्यांना सोडून जाणे माझ्या जिवावर आले होते. ह्या होणार्या ताटातुटीमुळे आम्ही सर्व दु:खात बुडून गेलो."
ह्या वियोगानंतर ३० वर्षे जायची होती त्याला परत टॅंजिएला यायला आणि प्रवास थांबवायला. ह्या प्रवासाला तो निघाला तेव्हा बहुदा त्याच्या मनात फक्त मक्केला जायचे एवढेच होते.
इब्न बतूतच्या प्रवासाचे मार्ग.
पण त्यापर्यंतच्या प्रवासात त्याच्यात जे परिवर्तन झाले ते केवळ तर्काच्या पलिकडले होते. त्याचे रुपांतर एका अशा प्रवाशात झाले होते की "त्यासम तोच." त्याच्या पुढच्या प्रवासात त्याचा प्रवासाचा नकाशा त्याच्या लहरीप्रमाणे बदलत तो पुढे जात राहिला. मार्ग बदलल्यामुळे नवीन प्रदेश बघायला मिळेल किंवा राजाला भेटायला मिळेल अशी थोडीशी शंका जरी त्याच्या मनात आली तर तो काहीही कुरकुर न करता त्या रस्त्यावरचा मुसाफिर व्हायचा.
अनेकवेळा इप्सित ठिकाणी जाण्यासाठी त्याने वळसेच वळसे घातले आहेत. कित्येकवेळा उलट्या दिशेनेही प्रवास केला आहे. उदा. हिंदुस्थानातून निघताना जो प्रवास बोटीने फक्त ४० दिवसांचा होता. त्याला तुर्कस्तानला जायचे होते. पण तेव्हा अनुकूल वारे वहात नसल्यामुळे गलबतं सुटत नव्हती. तर ह्या पटठ्यांनी मध्य एशियातून, हिंदूकुश पर्वतातून तुर्कस्तान गाठले. त्यासाठी त्याला ३६५ दिवस लागले. पण नवीन प्रदेश माणसे भेटणार म्हटले की ......
त्याच्या जिद्दीचे दाखले आपल्याला त्याच्या पुस्तकात बर्याच सुरुवातीपासूनच बघायला मिळतात. टॅंजिएपासून तो पूर्वेला मेडिटेरिनियन मोरोक्को आणि इफ्रिकिया (आत्ताचा अल्जेरिया ) पार करुन तो पार ट्यूनिसला पोहोचला. त्या वाटेवर त्याचे दोन सहप्रवासी कुठल्याशा तापाने आजारी पडले. त्यातला एकतर मेला. त्या उरलेल्या प्रवाशाला तेथील भ्रष्ट सरकारी अधिकार्यांनी कसे लुटले ती हकीकत मुळात वाचण्यासारखी आहे. त्या बिचार्याची सर्व संपत्ती जी त्याने सोन्याच्या स्वरुपात त्याच्या वारसदारांसाठी आणली होती ती सगळी संपत्ती त्यांनी लुटून फस्त केली. स्वत: इब्न बतूत इतका आजारी पडला होता की त्याने आपण रस्त्यात कोठेतरी मरुन पडून जाऊ ह्या भितीने स्वत:ला त्याच्या खेचराला घट्ट बांधून घातले. त्याने ठरवलेच होते. मला जर देवाने मरण दिलेच तर त्यावेळी मी मक्केच्या रस्त्यावर आणि मक्केकडे तोंड असतानाच मरेन."
फारच लवकर तो रस्त्यावरच्या रितीभाती आणि सभ्यता शिकला. रस्त्यावरची एक वेगळीच संस्कॄती असते असे म्हणतात. रस्त्यावर वागायचेही एक शास्त्र असते. तेथे आपण कोण आहोत ते विसरुनच नम्रपणे वाटचाल करावी लागते.
जयंत कुलकर्णी
भाग -२ समाप्त.
पुढे चालू................
प्रतिक्रिया
27 Sep 2010 - 10:28 am | शिल्पा ब
मस्त...आता पुढचा भाग.
27 Sep 2010 - 10:39 am | विलासराव
इब्न बतूत बद्दल प्रथमच वाचतोय.
त्याच्या धाडसाला सलाम.
ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
27 Sep 2010 - 1:31 pm | पाषाणभेद
>>>> पण नवीन प्रदेश माणसे भेटणार म्हटले की ......
मधे मधे तुटकपणा का दिसतोय?
लवकर येवू द्या पुढला भाग. मस्त वर्णन आहे.
27 Sep 2010 - 4:38 pm | गणेशा
पुढे वाच्यण्यास उत्सुक ...
लिहित रहा .. वाचत आहे
27 Sep 2010 - 7:20 pm | प्रभो
मस्तच..वाचतोय..!!
12 Oct 2010 - 10:52 am | Pain
पहिला भाग तेव्हाच वाचला होता पण बाकी मालिका वाचायला आत्ता सुरुवात केली.
या नकाशात एका ठिकाणी हाडे व कवटीचे चित्र (धोका) आहे ते का ? त्या वाटांवर लूटमार, प्राणहानीचा धोका होता का ?