परमेश्वर आहे का नाही, या विषयावर वादांचे जंग आजपर्यंत छेडत आलेले आहेत. मला आठवतंय आम्ही एका गावात एका कट्ट्यावर बसून या विषयावर भांडभांड भांडलो आहोत. या प्रश्नाचा निकाल लागला तर नाहीच, पण त्या वादाचे पर्यवसान त्या कटट्याचे नामांतर होण्यात झाले "परमेश्वरकट्टा". तो वरतीच आहे आणि आम्ही खालीच आहोत. तसेच.
खरे तर परमेश्वराच्या अगोदर सैतानाचा जन्म झाला असावा असे मला वाटते. सैतानाने त्रास दिला म्हणून त्याच्या लढण्यासाठी परमेश्वराचा जन्म झाला असावा. अशा या परमेश्वराच्या शोधाचा खरं तर प्रयत्न करण्यात काय हशील आहे ? पण जे शोधतात त्याचे (परमेश्वराच्या शोधाचे) अनेक मार्ग आहेत असे म्हणतात. त्यातला विचारी लोकांचा असावा "अध्यात्म" पण हे सत्य नाकारता येत नाही की समाजातील जास्त लोक त्याची पूजा ही घाबरुनच करतात. संकटांची भीती,मृत्यूची भीती, गरिबीची भीती, नात्यांची भीती, प्रवासाची भीती, उद्याची भीती,.....समाजाची भीती..अहोऽऽ कशाची भीती नाही ?
हे विचारी आणि ते पुजारी..... खय्याम म्हणतो...
काही त्यांच्या मार्गावर विचारी
काही त्यांच्या मार्गांवर घाबरुन पुजारी
माझ्या कानात तो समजावी,
त्या सगळ्यांची वाट आहे चुकली.
जास्त विचार केला की नामकरण होते तुमचे किंवा तुमच्या स्थानाचे. तो मिळतच नाही. घाबरलेल्यांचे हाल तर विचारुच नका! ते समाजाला घाबरुन स्वत:लाच लुबाडतात. किंवा असे म्हणा की समाजाला स्वत:ला लुबाडू देतात आणि जीवनाच्या खर्या आनंदाला पारखे होतात.
म्हणून तोच (परमेश्वर) त्याच्या कानात सांगतोय-
माझ्या कानात तो समजावी,
त्या सगळ्यांची वाट आहे चुकली.
मग जगावे कसे ? त्याचे उत्तर कदाचित पुढे मिळेल. काय सांगावे ?
माणसाच्या आयुष्याला किती कुंपणे असतात ? संशोधनाचा विषय आहे! जितकी माणसे तितके त्यांचे स्वभाव. जितके स्वभाव तितकी कुंपणे. ही झाली आपली स्वत:ची. समाजाने घातलेली वेगळीच. आपण आपल्यापुरते चांगले वाईट ठरवतो ती आतली. समाज जी घालतो ती जास्त व्यापक असतात आणि माणसाच्या जीवनावर आणि त्यांच्यातील संबंधावर खोलवर परिणाम करतात. या नियमांना समाज नैतिकता म्हणतो. काय चांगले आणि काय वाईट कोण ठरवणार ? आणि कोणाला काय आणि केव्हा काय चांगले हे कोण ठरवणार ? याचा अतिरेक झाला की हे जग तुरुंग वाटायला लागतो. उदा. तालीबानसारख्या संघटनांचे कायदे किंवा कठोर अशी कर्मकांडे.
या सगळ्याचा परिणाम म्हणून आयुष्यात आनंद आणि दु:ख असे दोन ऋतू तयार होतात.
जे विचार करतात ते तर्काची कास धरतात. पण मित्रहो, त्याने प्रश्न सुटतो म्हणता की काय ? मुळीच नाही. मग मधे येते ते नशीब (मानले तर). हे सगळे असे आहे बघा..............
मग खय्यामने विचारलेला पश्न आपल्यालाही विचारावासा वाटतो.
चांगले आणि वाईट हा नैतिकतेचा तुरुंग,
आनंद आणि दु:ख हे तर दोन ऋतू.
तर्काच्या मधेमधे नशीब तडमडते,
तर शहाणपणा कुठल्या कटाचा बळी ?
थोडक्यात काय, या जगात या जीवनात आनंदी रहायचे असेल तर चांगल्या वाईटाची दडपणे झुगारुन द्या. त्याच्या पलिकडे जा ! आपल्यापासून दुसर्याला त्रास होणार नाही हे एवढे एकच तत्व पाळले तर मला वाटते हे शक्य आहे !
खय्यामचा विरोध हा पहिल्यापासून कर्मकांडांना होता. सर्व प्रकारच्या कर्मकांडांना ! प्रामाणिक माणसाला याची गरज काय अशी त्याची प्रामाणिक शंका होती. दररोज परमेश्वराच्या प्रार्थनांचे अवडंबर माजवणे त्याला समजू शकत नव्हते. पण तो स्वत:शी प्रामाणिक होता. परमेश्वर असेल अशी त्याची आशा होती. इच्छा नव्हे. पण सर्वसामान्य समजतात किंवा धर्मगुरू सांगतात असे त्याचे स्वरुप असेल असे त्याला मित्रहो, मुळीच वाटत नव्ह्ते.
म्हणून तो परमेश्वरालाच म्हणतो –
तुझ्या जपाच्या माळेत नसेल ओवला मी एखादा मोती,
पण माझ्या चेहर्यावरची पापाची खंत मी अजूनही पुसलेली नाही.
मी तुझ्या दयेची आशा सोडलेली नाही, कारण हे परमेश्वरा,
मी अजून एकदाही असत्याला सत्य म्हटलेले नाही.
पापे कसली तर शास्त्रीय सत्य सांगण्याची ! दयेची भीक कोणासाठी तर ज्या कर्मठ लोकांनी सत्य स्विकारायला नकार दिला, त्यांच्यासाठी ! आणि सत्य काय तर “मी अजून एकदाही असत्याला सत्य म्हटलेले नाही.”
शास्त्राची (सायन्सची) पाठराखण करत असताना त्याने बरेच शत्रू जोडलेले होतेच !
मित्रहो, काळ लक्षात घ्या. अरबांनी नुकतेच इराण इस्लाममय केले होते तो काळ !
पुढे...... कुराण का सुरई ?.....................
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
8 Jun 2011 - 7:39 pm | प्रास
हा भाग तर लई म्हणता लईच भारी झालाय.
मुख्य म्हणजे -
१. या भागात तीन रुबायांचे वर्णन आलेले आहे.
२. तीनही रुबाया भन्नाट लॉजिकल आहेत.
भन्नाट भन्नाट एकदम भन्नाट.........
चालू द्या जयंतराव...... पुढल्या भागाची वाट बघतोय......
8 Jun 2011 - 8:05 pm | धनंजय
छान लेखमाला.
इंग्रजीत फित्झजेराल्डने भाषांतरित केलेल्या खय्यामाच्या रुबाया वाचलेल्या आहेत. पण असेही वाचले आहे, की इंग्रजांना कळावे म्हणून त्याने रूपांतरे केली आहेत. आणि आपण इंग्रज नसल्यामुळे मुळातील काही आशय आपल्याला थेट समजू शकेल.
हिंदी/उर्दूत किंवा मराठीत भाषांतरित रुबाया कुठे मिळू शकतील काय?
9 Jun 2011 - 1:02 am | बहुगुणी
..भाषांतरे केलेली आहेत. हरिवंशराय बच्चन यांचं भाषांतर पुस्तकरुपात इथे उपलब्ध आहेत असं दिसतं.