मागील भाग -
भाग - ७
भाग - ६
भाग - ५
भाग - ४
भाग - ३
भाग - २
भाग - १
मागून पुढे चालू................
समरकंदच्या जवळ त्याने थोडे दिवस तार्मशिरीन नावाच्या चगताय टोळीच्या खानाबरोबर घालवले. याने नुकताच मुसलमान धर्म स्विकारला होता आणि त्यामुळे ज्याला कुराण समजते अशा क्वादीशी बोलण्यात त्यालाही खूपच रस असणार. जरी तर्माशिरीनने इब्न बतूतने सांगितल्याप्रमाणे एकही दिवस सकाळसंध्याकाळची प्रार्थना चुकवली नाही तरी त्याचे दुर्भाग्य काही चुकले नाही. त्याच्या पुतण्याने त्याला गादीवरुन थोड्याच दिवसात खाली खेचले.
इब्न बतूतचा अफगाणिस्तान आणि हिंदुकुश पर्वतातील मार्गाचा बरोबर अंदाज करता येत नाही कारण इंडस नदीच्या कुठल्या ठिकाणी आणि कुठल्या बाजूला तो आला हे त्याने लिहिलेले नाही. पण अतिथंड प्रदेशातून ऊबदार प्रदेशात प्रवेश केल्यावर तो मुलतानच्या दिशेने गेला. तेथून दिल्ली ४० दिवसाच्या प्रवासी अंतरावर आहे. “हा मार्ग सतत कुठल्या ना कुठल्यातरी गावातून जातो” (म्हणजे लोकवस्ती प्रचंड आहे हे त्यावेळीही वास्तव होते.) इब्न बतूतची लेखणी अशा प्रदेशाचे वर्णन करायला सरसावली नसेल तरच नवल.” या प्रदेशात बहुसंख्य जनता हिंदू असली तरी राज्यकर्ते मात्र मुसलमान आहेत” इब्न बतूतने आवर्जून नमूद केले आहे.
मुहम्मद ओझबेग खानाचा दरबार जो दर शुक्रवारी भरायचा. मध्य एशिया याच्या ताब्यात होता असे म्हटले तरी चालेल.
इब्न बतूतचा हेतू, सुलतान मुहम्मद तुघलकवर त्याच्या अनुभवांचा आणि ज्ञानाचा प्रभाव पाडून चांगली कायम स्वरुपाची नोकरी मिळते का ? हे बघायचा होता. तसे झाले असते तर या मुशाफिराचा थोडे स्थिर व्हायचा बेत होता. जेव्हा तो मुलतानला पोहोचला तेव्हा तेथील सरदाराला त्याने स्वत:ची कागदपत्रे सादर केली आणि सुलतानाला तो भेटल्यामुळे त्याला कसा उपयोग होईल हे सांगितल्यावर त्या सरदाराने ती सर्व कागदपत्रे आणि त्याची स्वत:ची शिफारसपत्रे जोडून ती सुलतानाकडे रवाना केली.
पहिल्याच भेटीत सुलतानाला खूष करणे आणि त्याची खात्री पटवणे इब्न बतूतला फार महत्वाचे वाटत होते कारण त्या दरबारात त्याला ओळखणारे किंवा त्याच्याबद्दल माहिती असणारे कोणीच नव्हते. जेव्हा त्याला सुलतानाच्या दरबारात हजेरी लावण्यास परवानगी मिळाली, तेव्हा त्याला हेही सांगण्यात आले की सुलतानाला नजराणा पेश केला तर त्याच्या पटीत तो दान किंवा बक्षीस देतो. हे कळल्यावर इब्न बतूतने एका व्यापार्यांबरोबर भागीदारी केली. त्या व्यापार्याकडून बरेचसे दीनार, उंट, घोडे त्याने कर्जाऊ घेतले आणि सुलतानाकडून परत मिळणार्या भेटीमधे त्याला भागीदारी दिली. तो व्यापारी त्यावेळचा व्हेन्चर कॅपीटॅलीस्ट असावा, त्यांनीही याला भरपूर सहाय्य केले आणि भरपूर नफाही मिळवला, “त्याने भरपूर नफा कमवला. त्याला मी बर्याच वर्षानंतर अलेप्पीला मला जेव्हा लुटारुंनी लुटले तेव्हा भेटलो, पण त्यावेळी त्याने मला कवडीचीही मदत केली नाही.”
इब्न बतूतने बगदाद आणि दमास्कसमधे जो वेळ कायद्याचा अभ्यास आणि तेथील विचारवंतांबरोबर त्याचा अर्थ शोधण्यात घालवला, त्याचा भरपूर उपयोग त्याला दिल्लीमधे झाला. त्याने त्याचा उपयोग करुन सुलतान मुहम्मद इब्न तुघलकवर छाप पाडली. सुलतानाने लगेच त्याला क्वादीची नोकरी देऊ केली. वार्षिक पगार – १२००० चांदीचे दीनार अधिक १२००० दीनार नोकरी पत्करून तेथे कायमचे राहण्याचे कबूल केल्याबद्दल.
पण सुलतानाचा हा दानधर्म आणि उधळपट्टी हे त्याच्या उत्पन्नाच्या तुलनेत अतोनात वाढल्यामुळे करही प्रमाणाबाहेर वाढवले गेले त्यामुळे खेडेगावातील जनता साफ नागावली गेली. पण शहरातील रंगढंग काही कमी झाले नव्हते. हे व्यस्त प्रमाण इब्न बतूतच्या ताबडतोब लक्षात आले. तो लिहितो “या सुलतानाला दोन व्यसने होती. एक म्हणजे विचार न करता बक्षिसांची खैरात करायची आणि रक्तपात. त्यामुळे त्याच्या महालाच्या दरवाजासमोर गरीब माणसे श्रीमंत व्हायची आणि काही लोकांचे मुडदे पडायचे. हे सगळे असूनसुध्दा तो एक साधा नम्र माणूस होता. समानता त्याच्या मनावर ठसली होती आणि खर्याची बाजू तो कसलाही विचार न करता घ्यायचा. त्याच्या हकीकती मी सांगितल्या तर त्यावर कोणाचा विश्वास बसणे कठीण आहे. सामान्यपणे काही लोक तर असे होणे अशक्य आहे असेही म्हणतील.”
“काबूलहून आम्ही मग रस्त्याने कारमाश नावाच्या गावाला निघालो. कारमाश म्हणजे एक दोन डोंगरांमधे वसलेला किल्ला आहे. याच रस्त्यावर अफगाण लुटारु वाटसरुंना लुटतात.
हा प्रवास करताना आमची त्यांच्याशी एकदा गाठ पडली.....त्यानंतर आम्ही बंज अब येथे एका वाळवंटात शिरलो. येथे आम्हाला सिंधू नदीचे पाणी लागले. इब्न बतूतचे या प्रवासाचे वर्णन सविस्तर असले तरी त्याच्या भौगोलिक माहितीत बरीच गडबड आहे त्यामुळे त्याने सिंधू नदी कुठे पार केली हे विवादास्पद आहे.
इब्न बतूतने यानंतर बरीच पाने सुलतानाच्या वंशाचा इतिहास, त्याच्या देशाचा इतिहास, त्याच्या दरबाराचे काटेकोर रीतीरिवाज, त्याची युध्दे, ज्यात तो गुंतून पडला होता ते होणारे रक्तरंजित उठाव, त्याच्या बक्षीसांच्या खैराती आणि राजधानीत त्याचा येण्याच्या आणि जाण्याच्या वेळचे समारंभ, यात खर्च केली आहेत. अशाच एका विजयानंतर जेव्हा तो राजधानीत परतला त्यावेळी त्यानी जी मिरवणूक काढली त्यात हजारो कलाकारांनी भाग घेतला होता त्याची आठवण इब्न बतूतने लिहून ठेवली आहे.
“शामियानाच्या मधल्या जागा रेशमाच्या गालिचांनी झाकला होता. त्यावरुन सुलतानाचा घोडा चालत होता....एका हत्तीवर चार मोठ्या गलोलीसारखी यंत्रे ठेवली होती आणि सुलतान राजधानीत शिरल्यापासून ते महालात पोहोचेपर्यंत यातून ते लांब दूरवर दीनार उधळत होते, ते वेचण्यासाठी लोकांची झुंबड उडत होती.”
पण या सर्व अनागोंदीमुळे सुलतानाला बरेच शत्रू निर्माण झाले होते. सुलतानाच्या हलक्या कानामुळे इब्न बतूतला भीती वाटू लागली होती की सुलतानाचा लहरी स्वभावामुळे त्याचाही घात होईल की काय, तरी पण इब्न बतूतने या सुलतानाच्या स्वभावाचे वर्णन समरसून केले आहे.
“जेव्हा हिंदुस्थान आणि सिंध प्रांतात भीषण दुष्काळ पडला त्या काळात त्याने असा फतवा काढला की सहा महिन्य़ांसाठी दिल्लीतील सर्व लोकांसाठी सरकारी गोदामातून धान्य खुले करण्यात यावे. पण हाच माणूस शिक्षा देताना अत्यंत निष्ठूर व्हायचा. दररोज न्यायालयात साखळदंडांनी जखडलेले शेकडो अपराधी आणले जात. त्यांच्या वयाकडे, ज्ञानाकडे, समाजातील प्रतिष्ठेकडे न बघता त्यांच्या शिक्षेची कठोरपणे अंमलबजावणी केली जायची.”
महागड्या प्रशासकीय चुकांचा तर तोटाच नव्हता : एकदा तुघलकने चीनी पुस्तकामधील अर्थशास्त्राचा चुकीचा अर्थ लावून विचित्र निर्णय घेतला. चांदीचा पुरवठा कमी असल्यामुळे नाणी तांब्याची पाडा असा निर्णय त्याने दिला. तांबे भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे खोट्या नाण्यांचा सुळसुळाट झाला आणि राज्याला खूपच नुकसान झाले.
अखेरीस इब्न बतूतची भीती खरी ठरली. इब्न बतूतचा शिक्षक राजाच्या विरुध्द कटात सामील असल्याच्या संशयावरुन त्याला शिक्षा झाली आणि इब्न बतूतची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. जिवाला घाबरुन त्याने शिक्षक बदलण्याचा निर्णय घेतला. हे कळल्यावर तुघलकने त्याला दरबारात हजर होण्याचा हुकूम दिला. “मी त्याच्या दरबारात जवळजवळ भिकार्याहच्या वेषात दाखल झालो. माझ्या एकंदरीत अवतारावरुन त्याला माझी दया येऊन तो माझ्याशी प्रेमाने बोलला आणि मला त्याने त्याच्या नोकरीत परत येण्याची मुभा दिली. मी नम्रपणे नकार देऊन त्याची हिजाजला जाण्याची परवानगी मागितली आणि त्याने ती लगेचच दिली.”
त्यानंतर ४० दिवसांनी सुलतानाने त्याला घोडे, गुलाम स्त्रिया, नोकर, कपडेलत्ते पाठवले. याचा अर्थ न समजण्याइतका तो दुधखुळा नव्हता. हे दरबाराचे बोलावणेच होते. परत एकदा इब्न बतूत दरबारात दाखल झाला. तेथे त्याने जे ऐकले त्याने त्याला धक्काच बसला.
“मी तुला माझा वकील म्हणून चीनच्या राजदरबारी पाठवायचे ठरवले आहे. मला माहीत आहे तुला अशा प्रवासाची आवड आहे.”
मक्केमधे जेव्हा त्याने पूर्वेला नशीब आजमावायचे ठरवले, तेव्हा असे काही आपल्या नशिबात असेल असे त्याला अजिबात वाटले नसेल. ते नशीब आता उजळले असे त्याला वाटले.
याप्रकारच्या कामगिरीसाठी इब्न बतूतच्या शिक्षणाचा काहीच उपयोग नव्हता. चीनला त्याच्या बरोबर १५ चीनी दूत जे त्याकाळी दिल्लीत रहात होते ते जाणार होते. त्याला जो चीनच्या सत्तधिशाला नजराणा पेश करायचा होता त्यावर लक्षही ठेवायचे होते. त्यामधे उत्तम १०० घोडे, १०० गुलाम, १०० नाचणार्या कलावंतीणी, १२०० वेगवेगळ्या कापडाचे तागे, १० मानाचे पोषाख जे सुलतानाच्या संग्रहातील होते, १० बाणाचे शोभिवंत भाते, त्यातील एक रत्नजडीत, त्याच प्रकारे रत्नजडीत तलवारी, खंजीर, म्याने, टोप्या, आणि १५ तृतीयपंथी सेवक.
जुलै २२, १३४२ रोजी १००० घोडेस्वारांबरोबर त्याने दिल्ली कालीकतला जाण्यासाठी सोडले. त्या बंदरात जी अनेक जुनाट चीनी जहाजे परतणार्याा मान्सूनची वाट बघत नांगर टाकून उभी होती. त्यातील काही जहाजांवर हे सगळे चढवून प्रवासाला निघायचा त्याचा बेत होता. त्याच्या नशिबात जे दुर्दैव पुढली पाच वर्षे त्याच्या हात धुऊन पाठी लागणार होते त्याची सुरुवात लगेचच झाली. तुघलकचे साम्राज्य मोडकळीस येण्यास सुरुवात झालीच होती. हिंदूंची छोटी छोटी राज्ये उठाव करुन स्वतंत्र होण्यासाठी संघर्ष करत होती. काळ मोठा धामधुमीचा होता. कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे लुटालूट, चोर्याठमार्यांलना ऊत आला होता. त्यांचा मार्ग दौलताबाद जे सुलतानाची दुसरी राजधानी होती त्यावरुन जात होता. अल्-जलाली येथे त्यांना अशाच एका १००० घोडेस्वार आणि १००० पायदळाशी सामना करावा लागला. त्या चकमकींमधे इब्न बतूत घोड्यावरुन पडला आणि त्याच्या सैन्यापासून वेगळा झाला तो सरळ त्या सरदाराच्या तावडीत सापडला. त्याने ताबडतोब त्याचे डोके उडवायची आज्ञा केली. परंतू त्या सैनिकांनी का कोणास ठाऊक त्याला सोडून दिले. तेथून पळून तो एका दलदलीत लपला. ७ दिवस तो आसरा शोधत होता जो त्याला कोणी दिला नाही. त्याला अन्नही मिळाले नाही. एका ठिकाणी त्याला उघडा करुन सोडून देण्यात आले. एका विहीरीपाशी त्यातील पाणी त्याच्या बूटाने काढण्याच्या प्रयत्नात तो बूटच त्या विहीरीत पडला. दुसर्यााचे दोन तुकडे करुन त्याच्या दोन चपला करण्याचा प्रयत्न करत असताना एक माणूस तेथे आला आणि त्याला त्याने फारसीमधे तू कोण आहेस असे विचारले.”वाट चुकलेला वाटसरु” असे इब्न बतूतने सांगितल्यावर तो म्हणाला मीपण वाट चुकलेलाच आहे. त्या मुसलमानाने मग त्याला एका मुसलमान खेड्यात नेले.
इब्न दिल्लीला आला त्याच्या ३० व्या वाढदिवशी.
जरी त्याला नोकरीची खात्री होती, तरी त्याला एवढे महत्वाचे पद मिळेल असे अजिबात वाटत नव्हते. जेव्हा तुघलकाच्या दरबारात त्याला प्रमुख क्वादीची जागा मिळाली तेव्हा तो उडालाच.
“हे पद तू कमी महत्वाचे समजू नकोस. आमच्या राज्यात या पदाला फार किंमत आहे.”
“महाराज मी मलिकी विचारधारेच्या कायद्याचा अभ्यास केला आहे. आणि येथे सर्व लोक हनाफी कायद्याचा आधार घेतात. शिवाय भाषेचाही प्रश्न आहेच.”
“मी तुझ्याबरोबर २ अधिकारी दिलेत. तुझ्या मार्गदर्शनाखाली ते काम करतील आणि फक्त तुलाच सही शिक्क्याचा अधिकार राहील. कारण आमचा तुझ्यावर विश्वास आहे आणि आम्ही तुला आमच्या मुलासमान मानतो.”
जो पगार इब्न बतूतला मिळाला तो प्रचंड होता. या नेमणुकीनंतर थोड्याच दिवसांनी राजघराण्यातील एका मुलीशी त्याचे लग्नही झाले.
त्या माणसामुळे इब्न बतूत परत एकदा त्याच्या काफिल्यात सामील होऊ शकला आणि ते वेळेवर कालिकतला पोहोचले. सर्व नजराणा आणि गुलाम त्या गलबतांवर चढवून, इब्न बतूत परत किनार्यायवर नमाजासाठी उतरला. किनार्या वरुन त्या जुनाट चीनी जहाजाकडे बघताना त्याला असे वाटले की या टाकाऊ जहाजांनी प्रवास करणे काही खरे नाही आणि त्याची खोलीही फारच छोटी होती. मग त्याचे वैयक्तिक सामान, त्याचा मुलगा आणि त्याच्या गर्भवती बायकोसह (?) एका छोट्या पण स्वतंत्र बोटीवर टाकण्यात आले. ती बोट त्या टाकाऊ गलबताबरोबर सफर करणार होती.
चीनला गेला का तो ? काय झाले पुढे हे बघुया पुढच्या भागात.......
भाग – ८ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
पुढे चालू.................
प्रतिक्रिया
5 Oct 2010 - 1:00 pm | जयंत कुलकर्णी
मित्रहो,
केशरी रंगाच्या लिखाणाचा मुळ (काळ्या ) लिखाणाशी तसा काही संबंध नाही. असे लिहल्यामुळे आपला गोंधळ होण्याची शक्यता आहे म्हणून हा खुलासा.
5 Oct 2010 - 2:20 pm | विलासराव
मस्त चालु आहे इब्नचा प्रवास.
लेखमाला आता मस्त रंगली आहे.
लिहा अजुन.
5 Oct 2010 - 2:47 pm | सविता००१
खूप सुन्दर लिहिले आहे.
असेच भराभर येउद्या. छान् आहे.
5 Oct 2010 - 3:32 pm | जयंत कुलकर्णी
श्री. कार्यकर्ते यांना विनंती. येथे "र्या" च्या चुका बर्याच राहिलेल्या आहेत. कृपया त्या दुरूस्त कराल का ?