चंद्रायण..!
ही रात निळीशार,
ओतीत चंद्र-धार...
स्वप्नातल्या कळ्यांना
देते नवा आकार!
पाण्यात चंद्र-पक्षी,
मांडून सौख्य-नक्षी...
किरणावरी शशीच्या
होतात मंद स्वार!
पाहून चंद्र-मेळा,
क्षितिजास ये उमाळा...
नक्षत्र बांधतात
तारांस एक-तार!
स्वप्नील चंद्र-गाणे
मधु-मीलनी उखाणे...
गातात फूल, वारे
छेडीत गंध-तार!
एकांत चंद्र-वेडा,
वितळून जात थोडा...
देतो अनामिकेला
अलगूजशी पुकार!
उचलून चंद्र-मेणा,
र्हदयात चंद्र-वेणा...
कित्येक चंद्र-वेळा,
करतात येरझार!
— सत्यजित