सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा!
बघूच धावतो कसा? खट्याळ चांदवा...
सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा!
अजून पाहिली न मी भरात पौर्णिमा
उगाच दावतो मला घड्याळ चांदवा!
नभावरुन एकदाच हात फेरला
उद्या कळेल बातमी..'गहाळ चांदवा!'
शशीस चेहरा तुझा म्हणू कसा? प्रिये,
तुझ्यापुढे दिसे मला गव्हाळ चांदवा!
निळ्या नभावरी पिठूर साय पांघरु...
उधाणला उरातुनी दुधाळ चांदवा!
तनू-तनू तहानली सहाण वाटते
हळूच वेच चांदणे,उगाळ चांदवा!
पहाटही नभावरी गुलाल रंगते
मिठीत लाजला तिच्या मधाळ चांदवा!
—सत्यजित