कविता
आज वाटते एक कविता अशी जन्मावी
हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी
तू नुकतीच नाहलेली अन ओलेती असावी
केस मोकळे, दवबिंदूंनी पापणी मिटावी
ऊन कोवळे लेऊन कांती तुझी चमकावी
आज वाटते ...
अशी पाहुनी तुला, मला अस्फूट स्फुरावी
जवळ येउनी तू माझ्या नयनी वाचावी
ह्या हृदयीची त्या हृदयी होऊन जावी
आज वाटते ...
मिठीत माझ्या दिठी तुझी ती अलगद यावी
गात्रांमधली थरथर होऊन तू प्रसवावी
ओठ टेकता तुझ्याच ओठांतून उमटावी
आज वाटते एक कविता अशी जन्मावी
हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी