अस्तित्वाच्या पल्याड..
अस्तित्वाच्या पल्याड कोठे संथ
नदीच्या पैलतिरावर,
जललहरींसह वाहत गेली दूर तिथे
स्वप्नांची घागर...
त्या तीरावर गोकुळनगरी
कान्हाची बेधुंद बासरी
पाहुन लोभस रूप तयाचे, मनही झाले
निळसर निळसर
सर्वार्थाने देह लाजला
पाहताच तो रोखुन मजला
नाजुक कटिकमलावर बसला रुतुन
तयाच्या नजरेचा शर
हळूच जवळी आला कान्हा
छेडित नाजुक अधरफुलाना
भान हरपले जेव्हा मजला स्पर्शुन
गेला तो मुरलीधर
हलवुन मजला गेला वारा
उधळुनी सुंदर स्वप्नफुलोरा
विरून गेले रूप सावळे
आणिक मागे उरली हुरहुर
©अदिती शरद जोशी