शुभ्र सारे जीवघेणे
एकटा मी चालताना सावली सोडून गेली
तापत्या सार्या उन्हांना हसत ओलांडून गेली
वेदनांना लपवणारे मुखवटे माळून गेली
शुभ्र सारे जीवघेणे सोसण्या सांगून गेली
एकटा मी चालताना सावली सोडून गेली
तापत्या सार्या उन्हांना हसत ओलांडून गेली
वेदनांना लपवणारे मुखवटे माळून गेली
शुभ्र सारे जीवघेणे सोसण्या सांगून गेली
इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने
एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे
काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती
मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे
अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे
रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने
पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी
ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे
नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या
विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने
हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा
नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे
-- विशाल
तार्यांनी गजबजल्या रात्री
चांदणवर्खी प्रकाशलाटा
शब्दांच्या घनगर्द सावलीत
धूसरल्या अर्थाच्या वाटा
त्या लाटांवर हरपे जाणीव
त्या वाटांवर अगणित संभव
जाणिवेतुनी ठिबके नेणीव
संभव सरता उरे असंभव
इथे गूढ अंधार दाटून येता, तिथे तारकांचे दिवे लागले
मिटताच डोळे हे होतील जागे, पुन्हा आठवांचे थवे मागले
जुनी तीच ओढ, जुनी तीच उर्मी, जुनी तीच ती आर्त व्याकुळता
भरुनी अकस्मात अस्मान येते नि जाते कडाडून विदयुल्लता
दिसेना कुणाला तिच्या अंतरीचे, फुत्कारते जीवघेणे प्रकार
"तिळा तिळा" मी किती घोकतो पण उघडीत नाही का हे कवाड
अस्वस्थ आसू ठिबकतो अबोल, डोळ्यांमध्ये उतरते रक्त का ?
पितांबरात घुसमटे एक काया, ये कंठात बावनकशी हुंदका
मनाच्या तळाशी उदसताच पाणी, त्या वेदनांचा का पूर होतो ?
चातकाप्रमाणे आतुर कोणी, उध्वस्त तेव्हा गझल पीत जातो
मी हळूहळू पण निश्चितपणे
पार दिसेनाशी होईन
तेव्हा तू चौकट ओलांड,
आणि निघताना.....
आपल्या हसल्याबोलल्या
आवाजांची फूले घेऊन ये
आपल्यातल्या गहिवरांचे
कढ, न हिंदकळता आण
मी न ओलांडलेली अंतरे
तू सहजच पार करुन ये
माझे न उच्चारलेले नाव
चारचौघांत सरळच घे
सगळे उठून जातील तेव्हा
आपल्यातल्या शब्दांची
आरास मांड
त्यानंतर आपोआप दिवा लागेल
तुझ्या डोळ्यांतले पाणी विझेल
अज्ञाताचा गड चढताना अशी पायरी आली
तर्कबुध्दी थकुनिया त्यावरी विश्रांतिस्तव बसली
उठून गड बेलाग लांघण्या कंबर कसुनी उठली
निरीक्षणाची, निष्कर्षाची वाट पकडुनी चढली
जिथे संपली वाट त्या तिथे काहीतरी लखलखले
त्या तेजातच अज्ञाताचे नवेच दर्शन घडले
जिच्यासाठी झटून दिनरात
दिली परीक्षा प्रीतीची
आज भेटली ती, होऊन
गर्भार सातव्या महिन्याची!
मावळला ध्यास, गळाली आस
गळ्यापाशी कोंडला श्वास
म्हणतील मामा, तिची लेकुरे
भीती मला त्या नात्याची!
क्षण पदोपदी झुरण्याचे
नकळत मागे फिरण्याचे
आता आठवती ते खर्च
आणि उसनवार मित्रांची!
आता काय, शोधू दुसरी
तीही नसेल तर तिसरी
करणार काय, मुळातच
आहे, बागेत गर्दी फुलांची!
- संदीप चांदणे
कठिण,गहन,भेदक प्रश्नांचे
चिंतन ज्यांना मोहविते
त्यांच्या प्रतिभेची प्रत्यंचा
इंद्रधनूसही वाकविते
जटिल समस्या त्यांच्या हाती
पडता सरळ,सुलभ होते
विभिन्न अस्फुट पैलूंमधले
नाते अलगद उलगडते
आदिम अनघड पत्थरातही
सुबक शिल्प त्यांना दिसते
केवळ प्रज्ञा-स्पर्शे त्यांच्या
हीणाचे सोने बनते
आयुष्यात कोणाची तरी साथ असणं खूप गरजेचं असत म्हणून कोणीतरी आपल्यासोबत कायम असाव त्याच वर्णन मी या कवितेत केल आहे. तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू शकता. https://www.truptiskavita.com
मेघ बरसला
विरही अश्रूंचा
खारा खारा.
मेघ बरसला
प्रथम आषाढी
प्रिय वार्तेचा.
मेघ बरसला
माळात रानात
काळा काळा.
मेघ बरसला
भिजली धरणी
हिरवी हिरवी.