एका अनावर कैफात
एका अनावर कैफात लिहिली होती
ती कविता
नंतर वाटलं, इतके भाषालंकार कशाला ह्या कवितेत?
मग काढून टाकले सर्व - अनुप्रास, यमकं, उपमा
साधे सुधे शब्द घेऊन पुन्हा लिहिली
तेव्हा
थोडी भुंडी पण
थोडी खरीही वाटली
ती कविता
नंतर वाटलं - इतके शब्द कशाला ह्या कवितेत?
मग कापलं सपासप -
वायफळ शब्दतण
तेव्हा
जास्त ओकीबोकी पण मघापेक्षा
जास्तच खरी वाटली
ती कविता