रमलखुणांची भाषा
जरी तुटले आतून काही, तरी नकोस ओळख देऊ
जाताना थांबून थोडे, तू नकोस मागे पाहू
दिसतील अनाहूत इथल्या, सावल्या गडद होणाऱ्या
हुरहुरत्या संध्याप्रहरी, पावलांत घुटमळणाऱ्या
खोरणात तेवत असता, फडफडेल इथली दिवली
मग उरेल काजळमाया, शोषून स्निग्धता सगळी
ते वादळ येईल फिरुनी, पण सावर तोल जरासा
ओठींचे स्मित लपवूदे, श्वासातील खोल उसासा
ते विसर उमाळे इथले, पुसताना प्राक्तनरेषा
उलगडेल अवचित अवघी, मग रमलखुणांची भाषा.....